रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर प्रथम आपण दात स्वच्छ करतो. दातांच्या फटींत व तोंडात इतरत्र अन्नाचे कण तसेच राहू दिले, तर लाळ व उष्णता यांमुळे ते कुजू लागतात. रोगजंतूंचा प्रादुर्भाव होतो. पिष्टमय आणि गोड पदार्थांचे तोंडात राहिलेले कण आणि तोंडातील बॅक्टेरिया यापासून लॅक्टिक आम्ल तयार होते व त्याने दंतवल्कावर व (एनॅमलावर) अनिष्ट घडतो. परिणाम एनॅमलमध्ये कॅल्शियम फॉस्फेट हे क्षार असतात. लॅक्टिक आम्लामुळे दातांवरील कॅल्शियम फॉस्फेटचे आवरण नाहीसे होते. यातूनच दात किडणे, हिरड्यांतून रक्त किंवा पू येणे, तोंडाला व श्वासाला घाण वास येणे इ. व्याधी उद्भवतात. दात स्वच्छ करण्यासाठी फार पूर्वीपासून दंतमंजन वापरले जात असे. दात स्वच्छ करण्यासाठी दातांवर घासण्याकरिता बनविलेल्या मिश्रणास ‘दंतमंजन’ म्हणतात.
पूर्वी दात स्वच्छ करण्यासाठी कडुनिंबांच्या काड्यांचा वापर करत असतं. कडुनिंब हे जंतुनाशक आहे. कडुनिंबाव्यतिरिक्त खैर, करंज, अक्रोड इ. तुरट चवीच्या झाडांच्या मृदू काड्या वापरत असतं. या झाडांच्या सालीत टॅनिन नावाचे जे द्रव्य असते त्याने हिरड्या आकसतात व कुंचल्यामुळे दातांच्या फर्टीतील अन्नकण निघून येतात. हिरडा, बेहेडा, आवळा (त्रिफळा चूर्ण) इत्यादींचे चूर्ण मधात मिसळून त्याने दात घासण्याची पद्धत होती. हिरड्यांमध्ये गॅलिक आम्ल, चेबुलिनिक आम्ल, टॅनिक आम्ल असते. आवळ्यात अँसकॉर्बिक आम्ल आणि बेहडामधे चेबुलॅजिक, गॅलिक, ऑक्झॅलिक आम्ल असतात. त्रिफळा चूर्णात तिन्ही फळांच्या एकत्रित रसायनांमुळे तोंडातील जीवाणूंच्या वाढीला प्रतिबंध होतो.
वनस्पतींशिवाय कोळसा आणि समुद्रफेस (एक प्राणिज औषधिद्रव्य) यांच्या चूर्णाचाही वापर दंतमंजन म्हणून पूर्वी केला जात असे. कोळसा, भाताचे तूस किंवा गोवऱ्या जाळून मिळणारी राख याचाही वापर केला जात असे. तंबाखू जाळून केलेली पूड (मशेरी) आजही वापरली जाते. तंबाखूत निकोटिन हे रसायन असते, ज्यामुळे रक्तदाब वाढणे यासारखे आजार होऊ शकतात, म्हणून ते न वापरणंच योग्य.
Leave a Reply