ते देखणे मंदिर होतं. सुशोभीत केलेलं… चकचकीत… बऱ्याच जणांची तिथे गर्दी झालेली… कुणाला कशासाठी न्याय हवा होता, कुणाला कशासाठी… कुणावर अत्याचार झाला होता, कुणी अन्यायाची शिकार झालेलं… प्रत्येकाची बाजू वेगवेगळी… न्याय मिळवून घेण्याची प्रत्येकाची घालमेलही वेगवेगळी… सगळेच फिरत होते… कोट घातलेल्या व्यक्तींच्या मागे… इकडून तिकडे… गरजवंताला आणि शोषीतांना काही कळत नाही… सांगतील तसे वाकतात ते… बिचारे.
अचानक हातात कागदाचे भेंडोळे घेऊन कोटवाल्यांची धावपळ सुरू झाली… तिकडे बिचाऱ्यांची पळापळ झाली… आता न्याय मिळेल असे बिचाऱ्यांना वाटू लागले होते… पण… झाले मात्र वेगळेच… न्यायाचे दान काही पदरात पडले नाही… सत्य काही समोर आलं नाही… बिचारे हताश झाले… उदास झाले… डोळ्यात पाणी दाटलं… तसेच निघाले होते माघारी… डोळ्यात पाणी दाटलेलं.. समोरचं चित्र धुकेलं… काही दिसेनासे झालेलं… त्याचवेळी एका बिचाऱ्याचा पाय लागला… तिथे पडलेल्या एका गाठोड्याला… तसे ते गाठोडं हललं… बिचारा भयंकीत झाला… हादरला.. भ्यालाही… तसं ते गाठोड उभं राहिलं… म्हणालंही ‘कुणी लाथ मारली’ म्हणून. बिचाऱ्याची बोलती बंद झालेली… न्याय न मिळाल्याने ग्लानी आलेला तो बिचारा. झाल्या प्रसंगाने पुन्हा गांगरला.. काय बोलावे सुचेना… तरीही हिंमत एकवटुन म्हणाला… ‘माझाच पाय लागला तुम्हाला… माफी द्या… पण… तुम्ही कोण? इथे कसे? का पडलात इथे?’ एका दमात त्यानं विचारून टाकलं सारं…. तसे ते गाठोडं थोडं मोकळं झालं… म्हणालं… ‘जेव्हा पासुन तुम्ही हे मंदिर बांधलं ना, तेव्हा पासुन मी इथेच आलोय रहायला… पुर्वी आत रहायचो… पण अलिकडे आत मला जागा मिळेनाशी झाली… तेव्हा मी माझं बस्तान हलवलं… बाहेर पडलो… मग इथे असतो पडुन… गपगुमान…’.
गाठोड्याच्या उत्तरानं बिचारा अधिकच गांगरला… काही कळेना काय होतयं… मी कोणाचा शोध घ्यायला आलो होतो मंदिरात … काय हवं होतं मला… न्याय की सत्य… मला न्याय हवा होता… समाजाला सत्य हवं होतं… सत्य ही न्यायाची देवता… म्हणजे या मंदिरात न्यायदेवता नाही… सत्य नाही… असा त्याचा अर्थ लावायचा का? बिचाऱ्याची मती गुंग झाली… काही केल्या त्याला काही कळेना… तसं गाठोडं म्हणालं… ‘हे मंदिर बांधलय खुप छान. दिमाखदार इमारत आहे त्याची. पण त्यात माझी किमत शुन्य झालीय, पैशांची मात्र वाढलीय. मंदिरात सत्याची लक्तरे वेशीवर टांगली जाऊ लागली… तसतशी माझी अवस्था खराब होऊ लागली… मंदिरातून मी बाहेर पडलो आणि इथेच पडुन असतो पडुन…’. आता कुठे बिचाऱ्याच्या डोक्यात प्रकाश पडला… म्हणजे मंदिरात मी जे शोधायला आलो होतो, जे मिळवायला आलो होतो, ते सत्य इथे बाहेर पडलयं…. गाठोडं होऊन… सत्याची ही अवस्था झालीयं.. कुणी केलीय… कशासाठी केलीयं… एक ना अनेक प्रश्न बिचाऱ्याच्या मनात उसळू लागले… तसा निर्धाराने त्याने गाठोड्याचा हात धरला म्हणाला, मी सामान्य माणुस आहे… साधारण आहे… पण सत्य बोलण्याची ताकद माझ्यात आहे… चल माझ्याबरोबर मी सांभाळीन तुला प्राणपणाने… असे बोलून बिचारा आणि गाठोड्यातलं सत्य दोघेही चालू लागले…!
दिनेश दीक्षित जळगाव.
Leave a Reply