शब्द उमजावेत, लागू नयेत हे खूप गरजेचं आहे.
संबंध संभाळावे, मनं सांभाळावीत हे खूप गरजेचे आहे.
कितीही पुढे निघून गेलो तरी वेळ असेपर्यंत
परतून येणे हे खूप गरजेचे आहे.
लांबी मोजून काय करायचंय ह्या जीवनाची?
दुःखाचे दिवस वेगाने व सुखाचे दिवस हळू हळू
जावेत हे खूप गरजेचे आहे.
शेवटी राखेत मिसळून जाणार ही जाणीव असतानाही
धावत राहणे, कारण दीप मालवेल त्या आधी
प्रकाशून जाणे हे खूप गरजेचे आहे.
मैत्रीचे क्षेत्रफळ मोजायचे समीकरण वेगळे असू शकते.
लांबी रुंदी मोजण्यात, खोली विसरून चालत नाही.
संवाद साधता आला नाही तरी एकमेकां बघताच
डोळ्यांतली चमक बोलावी हे खूप गरजेचे आहे.
हसतां रडतां, पडतां उठतां, अस्तित्व असेतोवर
व्यक्तीने संघर्ष करत रहाणे हे खूप गरजेचे आहे.
शब्द उमजावेत, लागू नयेत हे खूप गरजेचे आहे.
संबंध सांभाळावे, मनं सांभाळावीत हे खूप गरजेचे आहे.
– सौ. संध्या जोशी
व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार
Leave a Reply