गरोदर स्त्री आणि आयुर्वेद असं समीकरण असलं की ‘गर्भसंस्कार’ हा शब्द कानावर पडलाच म्हणून समजा. गेल्या काही वर्षांत तर मार्केटिंगमुळे गर्भसंस्कार या शब्दाला फार मोठे वलय प्राप्त झाले आहे. प्रत्यक्षात मात्र; आयुर्वेदात गर्भसंस्कार हा शब्द सापडतच नाही!! आयुर्वेदाला अपेक्षित आहे ते सुप्रजाजनन. कै. वैद्य वेणीमाधवशास्त्री जोशी यांसारख्या सिद्धहस्त वैद्यांनी या संकल्पनेवर सखोल अभ्यास करून आयुर्वेदीय सुप्रजाजननावर प्रात्यक्षिक तसेच लेखन या दोन्ही माध्यमांतून अतिशय महत्वाचे कार्य केले आहे.
सुप्रजाजनन हा शास्त्रीय विषय असल्याने त्याची सुरुवात सध्याच्या गर्भसंस्कार या प्रकरणासारखी गर्भादान झाल्यावर नव्हे तर एखाद्या जोडप्याने ‘चान्स घ्यायचा’ ठरवल्यापासून होते. माता पित्याचे स्वतःचे आरोग्य उत्तम असायला हवे याकरता पंचकर्मांपैकी आवश्यक ती कर्मे वैद्यांच्या सल्ल्याने आणि देखरेखीखाली करून घ्यावी लागतात. अन्यथा आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशी परिस्थिती उद्भवते. शेतीचे उदाहरण घ्या ना; आधी जमिनीची मशागत- नांगरणी वगैरे केल्यावरच बी पेरणी होते. नांगरणीशिवाय पेरणी होत नाही. आपल्या शरीराचंदेखील तसंच आहे.
माझ्या एमडी च्या संशोधनाच्या अभ्यासातील निष्कर्षानुसार; सुप्रजाजननासाठी आवश्यक पायऱ्या पुढीलप्रमाणे आहेत.
१. विवाहपूर्व समुपदेशन
२. विवाहोत्तर समुपदेशन तथा पंचकर्मादि उपचार
३. गर्भधारणा झाल्यावर मातेच्या आहार- विहाराविषयी आयुर्वेदीय मार्गदर्शन तसेच आवश्यतेनुरूप मासानुमासिक औषधी योजना
४. बालकाच्या जन्मानंतर बालक आणि माता यांच्या आरोग्याची आयुर्वेदाच्या दृष्टीने काळजी घेणे
५. बालकांसाठी सुवर्णप्राशन
या प्रत्येक मुद्द्यावर प्रसंगानुरूप सविस्तरपणे लिहिनच. तूर्त ‘गर्भसंस्कार’ नामक मार्केटिंग फंडा थोडा बाजूला सारून प्रत्यक्षात आयुर्वेदाने सांगितलेल्या सुप्रजाजनन या विशाल संकल्पनेकडे डोळसपणे बघायला सुरु करूया. संस्कारांची गरज गर्भाला नसून; सर्वप्रथम माता-पित्यांना आहे हे लक्षात घ्या!!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
(लेखक आयुर्वेदीय वंध्यत्व उपचार तज्ज्ञ असून सुप्रजाजननार्थ विवाहपूर्व समुपदेशन करतात.)
Leave a Reply