एकदा एका थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विषय होता गरिबी. खरं तर ‘गरिबी’ या शब्दाशी ज्यांचा त्यांच्या अल्पशा हयातभर संबंध आला असल्याची शक्यता नव्हती. तरीही शिक्षकांना वाटत होते, की आपले विद्यार्थी ‘गरिबी’ या विषयावर उत्तम लेखन करू शकतील. स्पर्धा झाली. निबंध झाले. त्यांचे परीक्षण झाले आणि एका मुलाला त्यात पहिले पारितोषिकही मिळाले. शिक्षकांनी त्या पारितोषकपात्र निबंधाचे वर्गात वाचन करण्याचे ठरविले. ते निबंध वाचू लागले…
‘गरिबी’ हा शब्दच खूप वाईट आहे. पंडित नेहरूंनाही गरिबीबद्दल तिटकारा होता. इंदिरा गांधी यांनीही ‘गरिबी हटाओ’ असा कार्यक्रम आखला होता. तरीही गरिबी आहेच. आज मी माझ्या गरीब शेजार्याविषयी लिहिणार आहे. तो इतका गरिब आहे, की त्याच्याकडे अवघी एकच मोटार आहे. तीही त्याच्या वडिलांना स्वतः चालवावी लागते. शोफर त्यांना परवडत नाही. माझ्या शेजार्याचा बंगला नाही; फक्त तीन बेडरुमचा फ्लॅट आहे. त्यांना स्वीमिगसाठी सोसायटीच्या क्लब हाऊसमधल्या पूलवर जावं लागतं. आमच्या तर घरातच पूल आहे अन् जिमही. वीकएंडला माझे शेजारी आऊटिगला जाऊ शकत नाही. फार तर वर्षातून एकदा ते सहल काढतात. तीही देशातच…
निबंध खूप मोठा होता; पण त्याचं सूत्र हे असं होतं. आपल्या शेजार्याचा आलिशान फ्लॅट हा या मुलाला गरिबीचं प्रतीक वाटत होता. त्याचं कारणही स्वच्छ आहे. की, ज्याला गरिबी म्हणतात ती त्यानं कधी पाहिली नव्हती. अनुभवली नव्हती. लहानपणी वाचलेली गोष्ट मला आठवते. राजपुत्राला एकदा त्याच्या भ्रमंतीमध्ये एक मुलगा भेटतो. त्याच्याच वयोगटातला. त्यांची ओळख होते. राजपुत्र विचारतो, ‘‘तू काय जेवतोस?’’ त्या वेळी त्याला उत्तर मिळतं, की दिवसाआड काही शिळंपाकं मिळालं तर पोट भरतो. जेवण असं होतंच असं नव्हे. मग राजपुत्र विचारतो, ‘‘म्हणजे पक्वान्न, सुकामेवा, मध, लोणी हे काहीच नसतं?’’ तो मुलगा हे म्हणजे काय, असा चेहरा करतो. राजपुत्र म्हणतो, ‘‘ठीक आहे. तुला हे काही मिळत नसेलही. मग तू ब्रेड अन् बटर का नाही खात?’’ या प्रश्नावरही तो मुलगा गप्पच असतो. दोष राजपुत्राचा नाही. सर्वात गरीब माणसालाही ब्रेड आणि बटर मिळत असलं पाहिजे.
सन १९७० ते अगदी गेल्या शतकापर्यंत श्रीमंत नायक किंवा नायिका यांनी गरिबीचा अनुभव घ्यायचं ठरविलं अन् त्यानंतरची कथा यावर अनेक चित्रपट येऊन गेलेले आहेत. हे सारं आजच आठवण्याचं कारणही तसंच आहे. भारताचे रेल्वेमंत्री लालुप्रसाद यादव यांनी परवाच रेल्वेचा अर्थसंकल्प संसदेला सादर केला. त्यात त्यांनी ‘गरीबरथ’ या नावाने वातानुकूलित गाडी सुरू करण्याची घोषणा केली आहे. वाटलं, भारतातल्या गरिबीचा स्तर बराच उंचावलेला दिसतो. अन्यथा, त्यांना सुखद प्रवासाबरोबरच गारवाही मिळावा, असं रेल्वेमंत्र्यांना वाटलं नसतं. खरं तर, यापूर्वीच्या रेल्वेमंत्र्यांनीही गरिबांसाठी जनता एक्सप्रेससारखे प्रयोग केले होते. तिसरा वर्ग रद्द करून सर्वच गरिबांना दुसर्या वर्गात नेलं होतं; पण अशा समस्त गरीबवर्गासाठी वातानुकूलित गाडीची ही कल्पनाच मुळात मला त्या पहिलं पारितोषिक मिळविणार्या विद्यार्थ्यासारखी वाटली. लालुप्रसादांच्या कृपेमुळे गरिबांनाही आता थंड प्रवास करता येणार, हेही नसे थोडके! या वेळी हेही लक्षात घ्यायला हवं, की जी माणसं अजूनही पॅसेन्जरने प्रवास करतात, दुसर्या वर्गाचा प्रवास करणंही त्यांना परवडत नाही. त्यांचं वर्गीकरण एक एप्रिलपासून ‘दारिद्र्यरेषेखालील’ झालं तर आश्चर्य वाटू नये.
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply