शैल बोर झाला होता. दहा बारा वर्षाच पोर. स्थिरता कुठून असणार. अश्यात त्याच कशातच मन लागेनास झालं होत. तेच तेच ऑन लाईन गेम तरी किती खेळणार? या सुट्या पेक्षा स्कुल असलेलं बर असत. शाळेतले फ्रेंड्स म्हणजे धमाल. पप्पाना ती मिडल क्लासची मूल घरी बोलावलेली आवडत नाहीत. कारपेट खराब होत म्हणतात. आता पप्पा आले कि, या वीकेंडला काहीतरी हटके करायचे, शैलने ठरवून टाकले.पप्पा त्यांच्या बिझनेस मिटींगा उरकून उशिराच आले. तोवर तो जागाच राहिला. काहीही झाला तरी आज पप्पाना या विकेंडला हटके प्लॅनिंग करायला सांगायचेच. आज गुरुवार. उद्याचा दिवस त्यांना मॅनेज करायला मिळेल.
“काय प्रिन्स? आज आजून जागाच आहेस? एनी थिंग स्पेशल?”
“पप्पा, मी बोर झालोय! तू कायम तुझ्या बिझनेसमध्ये. या विकेंडला मी घरात थांबणार नाही!”
“ओके. अम्युझमेंट पार्क?”
“कितीदा तेथे नेणार? आता मी मोठा झालोय! त्या घरसगुंडी आणि व्हीलमध्ये मला इंटरेस्ट राहिला नाही.”
पप्पा विचारात पडले. शाळेतील गरीब पोरांच्या संगतीने याच्या आवडी निवडी ‘चिप’ होण्याची शक्यता होती. हे वय तस संस्कारच. या वयात उच्चतम ग्रहण शक्ती मेंदूत असते. या वयातील संस्कार आयुष्यभर साथ करतात. याची त्या हुशार बापाला कल्पना होती. ‘सांगण्या’ पेक्षा ‘दाखवणे’ अधिक परिणामकारक असते. खूप विचार करून पप्पानी एक योजना आखली. कळूदेत याला गरिबी कशी त्रासदायक असते. किती कष्ट असतात. श्रीमंत बापाच्या पोटी येऊन तो कसा भाग्यवान आहे!
“बोला न पप्पा? काही तरी ‘हटके’ प्ल्यान कर!”
“ठीक! या विकेंडला तुला ‘गरिबी’ दाखवणार आहे. एका शेतकऱ्याकडे तुला फ्रायडे इव्हीनिंगला मी गाडीने सोडीन, संडे इव्हीनिंगला घेऊन येईन. एकदम हटके प्रोजेक्ट! ओन्ली फॉर प्रिंस शैल! आहे कबूल?”
“Wow! पप्पा ग्रेट! मस्त प्रोजेक्ट! मी त्या वे एक एसे पण लिहणार!! स्कुल टिचरला दाखवणार! लव्ह यु पप्पा! यु आर जिनियस!” शैल खुश झाला. एक डिफ्रंट एक्सपेरियन्स तो अनुभवणार होता.
“पण प्रिन्स. आता गुड नाईट मिल्क घ्यायचं. शहाण्या मुलं सारखं झोपी जायचं! सकाळी आवश्यक सामानाची बॅग भरून रेडी करायची! स्वीट ड्रीम्स!” पप्पा झोपायला निघून गेला.
शैल सोबत काय, काय घ्यायचं याची यादी मनात तयार करण्यात गुंतून गेला.
०००
शुक्रवारी पप्पा त्यांच्या ऑफिसमधून लवकरच परतले. शैल आपली बॅग भरून तयारच होता. सोबत लॅपटॉप, मोबाईल, त्यांचे चार्जर अश्या अतिशय गरजेच्या वस्तू सोबत घेतल्या होत्या. बॅग डिकीत ठेवली आणि तो गाडीत, सीटबेल्ट लावून बसला.
“सो, निघायचं प्रिन्स?” पप्पानी विचारलं. शैलने मानेने होकार दिला.
दीडदोन तासाच्या प्रवासा नन्तर ते गावाबाहेर पडले. रस्त्याशेजारच्या शेतातील हिरवळ मावळतीच्या सोनेरी किरणात मोहक दिसत होती. दूरवर डोंगरांची एक रांगच होती. अशी सिनेरी, शैलने ऑन लाईन खूपदा पहिली होती, पण त्यात जिवंतपणा नसायचा, जो त्याला आता जाणवत होता.
पप्पानी कार एका कच्या रस्त्यावर वळवली. दोन किलोमीटर सावकाश चालवल्यावर ते एका शेताजवळ थांबले. पप्पानी गाडीचा हॉर्न वाजवला, तसा एक शेतकरी कोठुनसा धावत गाडीजवळ आला. त्याने पप्पाना हात जोडून नमस्कार केला.
“शंकर, हा माझा मुलगा शैल आहे. रविवारी संध्याकाळ पर्यंत तुझ्या सोबत झोपडीत राहू दे. जगाची ओळख व्हावी या हेतूने घेऊन आलोय.”
शंकरने नम्रपणे मान हलवली.
शैल तोवर डिकीतून बॅग काढून गाडी बाहेर उभा होता.
“प्रिन्स, राहशील ना? बघ. नसेल तर परत बंगल्यावर जाऊ!”
“पप्पा मी ट्राय करतो. नाही अड्जस्ट झालं तर फोन करीन!” शैल म्हणाला.
एव्हाना अंधार दाटू लागला होता. पप्पांची गाडी निघून गेली.
“चला मालक. माझा हात धरा. ढेकळांचा रस्ता हाय, पाय घसरलं.” शंकर शैलला म्हणाला. तेव्हड्यात समोरून शैलच्याच वयाचा एक पोरगा पळत आला.
“काका, मला ‘मालक’ नका म्हणू. माझं नाव शैल आहे. याच नावानं हाक मारा. आणि हा मुलगा कोण आहे?”
“ह्यो? म्हादू, माझा पोरगा हाय! ते तुमचं नाव बोलायला जड जातंय, तवा शेलू मानलं तर चालतंय नव्ह?”
“म्हणा. शेलू म्हणा.”
“बा, तू व्हय म्होरं, मी आणतो शेलूबाबाला घराकडं.” म्हादू शंकरला म्हणाला. शंकर शैलची बॅग घेऊन, झपाझपा पावलं टाकत पुढे निघून गेला.
“महादबा, तू कितवीत आहेस?” शैलने विचारले.
“सावीत! अन तू?”
“मी पण सहावीतच.”
पोरांची दोस्ती व्हायला फक्त दोनच गोष्टी विचारली जातात.एक ‘तुझं नाव काय?’ अन ‘कितवीत आहेस?’ बाकी काही त्या वयात लागत नसत. महादू शैलला सकाळी कोणत्या झाडावर पोपटाचा थवा उतरतो?, रात्री चिंचेच्या झाडावर काजवे कसे चमकतात?, बा, पाटाला पाणी कसा सोडतो? असं काही काही सांगत होता. शैलला मात्र खूप प्रश्न पडत होते. जसे पाट म्हंजे काय? पोपट म्हणजे पॅरोटचं का? थवा म्हणजे? शैल आपल्या शंका महादुला विचारत होता.
“ते बग, आपलं घर!” महादु शैलला एका झोपडीकडे बोट दाखवत म्हणाला.
त्या झोपडीतून धूर पाझरत होता.
“महादू! धूर दिसतोय?”
“व्हय! आई भाकऱ्या थापत आसन? चुलीच धुराडं असतंय! तुला काय वाटलं? पेटल्याची शंका अली कि काय?”
दोघे मित्र झोपडीच्या दिशेने चालू लागले.
०००
पहाता, पहाता रविवारची संध्याकाळ झाली. पप्पाच्या गाडीचा हॉर्न वाजला. शंकर आणि महादू शेलूबाबाला निरोप द्यायला आले होते. शंकरने शैलच्या बॅगे सोबत, अजून काही तरी डिकीत ठेवल्याचे पप्पाना जाणवले.
“शंकर डिकीत काय टाकलास रे?”
“शैलबाबा साठी शेतातले आंबे हैत! गरीबाची एक, बारकी भेट समजा!”
“बर, शंकर हे ठेव! शैल तुझ्या कडे दोन-तीन दिवस राहिल्याचे!” पप्पांच्या हातात काही नोटा होत्या.
“पैस, नको! लेकराचे रहाण्याचे पैसे कसे घिवू? माया लावली त्यानं, दोन दिवसात! तेच्यातच भरून पावलोय!” शंकरने पैसे घेतले नाहीत.
हात हलवून शैलने शंकरकाकाला अन महादुचा निरोप घेतला.
गाडी निघाली.
“पप्पा तू पैसे ऑफर करायला नको होतेस!” शैल म्हणाला.
“प्रिन्स! हे गरीब लोक आहेत. त्यांच्या कडे पैसे नसतात. आणि एक माणूस घरात वाढलं कि तसा खर्च वाढतो. आपण ते कॉम्पन्सेट करायला नको का?”
यावर शैल काहीच बोलला नाही. गप्प बसून होता.
०००
पप्पानी हळूच शैलच्या बेड मध्ये डोकावून पाहिलं. शैल झोपला होता. त्याच्या स्टडी टेबलवरला लॅम्प जळत होता. त्यांनी पाय न वाजवता तो टेबललॅम्प बंद केला. शैललने झोपण्यापूर्वी निबंध लिहून ठेवला होता. बरोबर, उद्या पासून त्याची शाळा सुरु होणार होती. पप्पानी ते निबंधाचे पान सोबत घेतले. काय लिहलय प्रिन्सनी, हे त्यांना वाचण्याची उत्सुकता होतीच.
ते त्यांच्या बेडरूममध्ये आले. डोळ्याला चष्मा लावून शैलचा निबंध वाचायला घेतला.
“गरिबी!”
‘मी या उन्हाळ्याच्या सुटीत गरिबी माझ्या डोळ्यांनी पहिली. मी दोन दिवस आणि दोन रात्री, शंकरकाका आणि म्हादूच्या शेतावर, त्यांच्या सोबत राहिलो. तेथे लाईट नसायची. माझा मोबाईल आणि लॅपटॉप डिस्चार्ज झाले. त्यांचा उपयोग झालाच नाही. पहिल्या दिवशी ते चालू होते, पण रेंज नव्हती! खरे तर मला त्या मोबाईलची गरजच भासली नाही!
त्यांच्या आमच्यात काय फरक आहे? हे मी या निबंधात सांगणार आहे.
आमचे घर दहा हजार चौरस फुटाच्या, लहानश्या जमिनीच्या तुकड्यावर आहे. शंकरकाकांचे घर खूप मोठ्या शेतात आहे. त्यांचं शेत फुटात नाही तर एकरात मोजावे लागते! डोळे जेथ पर्यंत पाहू शकतात तेथ पर्यंत, आपलंच शेत असल्याचं महादुने मला सांगितलं.
आमच्या बंगल्यात एकच कुत्रा आहे, टायगर! त्यांच्या शेतावर चार-चार कुत्रे आहेत. मोत्या, काळू, लाल्या, आणि वाघ्या! आमच्या टायगर गळ्यात पट्टा आणि साखळी घेऊन फिरतो. त्यांची कुत्रे कुठल्याही बंधनात नसतात.
आमच्या अंगणात आणि घरासमोरच्या लँडस्केप मध्ये मोजकेच इंपोर्टेड दिवे रात्री लावले जातात. त्यांच्या शेतात लाखो चांदण्याचा सडा पडलेला असतो!
आम्ही मॉलमधून धान्य, फ्रुट्स, आणि भाज्या पैसे देऊन विकत आणतो. ते तर या गोष्टी पिकवतात! त्यांचं उत्पादन करतात!
मी या प्रोजेक्ट मध्ये खालील गोष्टी शिकलो.
१. शंकरकाकांनी मला विहिरीत पोहायला शिकवले.
२. महादुने झाडावर चढायला शिकवलं.
काकू खूप छान भाकरी करते. चहा सोबत पोळी खाऊन ब्रेकफास्ट करायचो. मस्त!
मी पप्पांचा खूप आभारी आहे. त्यांनी मला हि गरिबी डोळसपणे पहाण्याची संधी दिली! पप्पा खरच आय यम प्राऊड ऑफ यु! तुमच्या मुळे मला आज कळले कि, आम्ही किती गरीब आहोत ते! —समाप्त.’
पप्पानी तो निबंध बाजूला ठेवून दिला. सगळंच मुसळ केरात गेल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर पसरली. त्यांनी ज्या उद्देशाने शैलला शेतावर ठेवले होते, त्यावर या पोराने बोळा फिरवला होता.
त्यांना एक गोड वास नाकाला जाणवला. ते तडक पायऱ्याजवळ ठेवलेल्या गाठोड्या जवळ गेले. त्यात हात घातला.धम्मक पिवळा केशरी आंबा बाहेर काढला. बेसिनवर धून घेतला. माचून, पिकल्या आंब्याचे देठ काढून टाकले आणि तो तोंडाला लावला. ते शैलच्या वयाचे होते, तेव्हा आजोळी गेलं कि असेच आंबे खायचे! त्यांना आठवले.
“पप्पा तुला येतो आंबा असा खायला? मला महादुने शिकवला खायला.”
शैल कधी शेजारी येऊन बसला त्यांना कळलेच नाही.
०००
शैल सकाळी शाळेला निघाला.
“पप्पा हे पार्सल पाठवशील? प्लिज!”
“पार्सल? कसलं आहे प्रिन्स? अन कोणाला?”
“अरे, महादू कडे मॅथ्स अन इंग्लिशच बुकस नाहीत. पायात शूज पण नसतात. माझी पाठवतोय! म्हादूच्या शाळेच्या पत्यावर पाठव! शेतात कोण नेवून देणार?”
पप्पांचा गळा दाटून आला. का ते त्यांना हि कळाले नाही!
तुम्हाला समजले असेलच. नाही का?
— सु र कुलकर्णी
(मूळ कल्पना नेटवरून.)
(मित्रानो, इंटरनेटवर काही कथाबीजे सापडलीत. मी त्याना, माझ्या कुवती प्रमाणे, मायबोलीचा पेहराव चढवून स्वैर अनुवाद, मराठी वाचकांसाठी केलाय. मला आवडलेल्या काही कथा -‘माझ्या नेटक्या गोष्टी’तुन-आपल्या भेटीस येतील. स्वागत कराल हि आशा. अजून एकवार सांगतो या कल्पना माझ्या नाहीत.)
Leave a Reply