नवीन लेखन...

गरीबीला अश्रूंचे वावडे

१९७८ साली मी मुंबईतील कुर्ला पोलिस ठाणे येथे सब इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होतो.
एक दिवस सकाळी ११.०० च्या सुमारास, लोकमान्य टिळक इस्पितळ, सायन येथील ड्यूटी कॉन्स्टेबलचा फोन आला की कुर्ला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रीमिअर ऑटोमोबाईल कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या एका तबेल्यातून सर्पदंश झालेला एक पेशंट इस्पितळात आणण्यात आला असून त्याचा मृत्यू झाला आहे.
पोलिस ठाण्याच्या प्रत्येक कामकाजाची ज्यात नोंद असते,त्या पोलिस स्टेशन डायरी मधे रवाना होत असल्याची आवश्यक ती नोंद करून मी आणि माझे एक सहकारी हवालदार चांद इस्माईल असे इस्पितळाकडे जीपने निघालो. २५/३० मिनटात आम्ही इस्पितळात पोहोचलो असू. इस्पितळात आणलं गेलं तेव्हाच शरीरात सापाचे विष भिनल्यामुळे पेशंटची अवस्था गंभीर होती असे त्याला तपासणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
स्ट्रेचरवर असलेल्या मृतदेहाच्या चेहेऱ्यावरची पांढरी चादर वॉर्ड बॉयने बाजूला केली. मृत व्यक्ती २२ वर्षाचा तरूण मुलगा होता.
घटनेची पार्श्वभूमी अशी…
तबेल्यामधे पन्नास पन्नास म्हशींना वेगवेगळ्या पक्क्या गोठ्यात ठेवण्यात येते. खाली ओळीत लावलेल्या खुंटाना म्हशी बांधलेल्या असतात. त्यांच्या देखभालीची जबाबदारी पाच ते सहा कामगारांना दिलेली असते. म्हशींची निगा राखणे, शेण काढणे,चारापाणी पाहणे, दूध काढणे इत्यादी सर्व कामे हे कामगार करतात. कामाचे स्वरूप असे असते की यांचा सुटीशी संबंध नसतो. कामचक्र अव्याहतपणे सुरू असते. म्हशींच्या धारा काढणे, दुधाच्या कासंड्या भरून ठेवणे ही कामे तबेल्यात मध्यरात्रीच सुरू होतात.
पत्र्याच्या छपराखालच्या प्रचंड मोठ्या माळ्यावर हिरवा चारा, गवताचे भारे तसेच पेंड, चुणी ई. पशुखाद्याच्या गोणी रचून ठेवलेल्या असतात. तिथेच माळ्यावर, त्या गोठ्यातील कामाची जबाबदारी ज्यांच्यावर सोपविण्यात आलेली असते, तो कामगारांचा गट झोपतो.
अशाच एका माळ्यावर या तरुण मुलाला सर्पदंश झाला होता. आता आपल्याला प्रश्न पडेल माळ्यावर साप आला कुठून? असं आहे की पशुखाद्याचा साठा जिथे असतो तिथे उंदीर आणि घुशींचा सुळसुळाट असतो. त्यांची पिलावळ इतकी मोठी असते की त्यांच्या भरमसाठ संख्येमुळे सापांना अशा ठिकाणी त्यांचे भक्ष्य मुबलक आणि सहजरीत्या मिळते. त्याचबरोबर क्वचित प्रसंगी असेही होते की गवताची गासडी बांधतात तेंव्हा गवतात असलेला साप गवताबरोबर बांधला जातो आणि अगदी ट्रक, टेम्पोने अशा तबेल्यात त्याचे आगमन होते.
या तरुणाने सकाळी उचलण्यासाठी गवताच्या गासडीखाली हात घातला तोच एका सापाने त्याच्या हाताला विळखा घालून दंश केला. त्याने जोरात किंचाळून हात झटकला. माळ्यावरचे इतर सहकारी धावले. दीडएक फूट लांबीचा तो साप त्यांच्या दृष्टीस पडला परंतु काही कळायच्या आणि करायच्या आत माळ्यावरील फळ्यांच्या फटीतून त्यांच्या डोळ्यादेखत तो पसार झाला. साप चावलेला तरुण वेदनेने विव्हळत बेशुद्ध झाला. त्याला इस्पितळात घेऊन येईपर्यंत त्याचा अंत समीप आला होता.
मृताच्या उजव्या मनगटावर बाजूबाजूला असलेल्या,सुईने केल्यासारख्या सर्पदंशाच्या खूणांची नोंद करून पंचनामा आणि जबाब मी उरकले. मृताच्या वारसाबाबत चौकशी केली तेव्हा त्याचे वडीलसुध्दा त्याच तबेल्यात नोकरी करतात असे समजले. इस्पितळातील सोपस्कार आटोपून मी घटना जिथे घडली होती त्या तबेल्यात पोहोचलो.
तिथला माळ्यावरचा पंचनामाही उरकला आणि घटना घडलेल्या त्या विशिष्ट शेड मधील उरलेल्या कामगारांचे एकेकाचे जबाब घेण्यासाठी, तबेल्याच्या आवारातील ज्या एका खोलीत दुधाचे हिशोब लिहिले जात,त्या सिमेंटच्या खोलीत जाऊन बसलो.
ते सर्व कामगार मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपुर जवळील एका खेड्यातील होते. तबेलाकाम हे त्यांचे पिढीजात काम. ते इतके अंगात भिनलेले की एखाद्या माजलेल्या मारकुट्या रेड्याला वठणीवर आणण्याचे कठीण काम यांनीच करावे. मात्र, यांचे विश्व तबेल्यातच सीमित. काम, जेवणखाण, आराम, झोप सगळे त्या नेमून दिलेल्या शेडमधेच. दिवसे न् दिवस, महिनो न् महिने, वर्षानुवर्षे…. अगदी आयुष्याच्या अंतापर्यंत हे त्या तबेल्यातच काळ व्यतीत करणार. दोन वर्षात एकदा गावाकडे एखादी चक्कर झाली तर झाली.
तेवढ्यात तेथे, माझ्या पोलिस ठाण्यातील सहकाऱ्याचा ओळखीचा, खालसा कॉलेजमधे शिकणारा तबेला मालकाचा नातेवाईक मुलगा सायन इस्पितळात जाऊन रोजच्याप्रमाणे हिशोबाच्या कामासाठी तबेल्यात आला.
” सर, चाय लोगे ना? ” त्याने विचारले. मी नको म्हणालो.
” ऐसे करो, खरवस खा लो सर. ताजा है l”.. तो.
मी परत ठामपणे नाही सांगितलं.
” आपको खरवस पसंद हैं ना? “… तो.
” हां, लेकीन मुझे नहीं चाहिए l”…. मी.
” ऐसे करो, कच्चा खरवस लेके जाईये सर l”..तो.
इथे काय घडलंय आणि याला कशाचं पडलंय या विचाराने मला ते सगळं विचित्र वाटले. चीड आली. त्याला म्हणालो. ” मैं डेथ एनक्वायरी मे व्यस्त हू l तुम जरा उस लडकेके अंतिम संस्कारकी व्यवस्थामे लगे रहो l”
तो तिथून निघून गेला. जबाब पूरे करून मृताबद्दल आवश्यक ते फॉर्म भरत असताना मृताच्या वारसाला घेऊन या असे सांगितले. मृताचे वडिल माझ्या समोर येऊन उभे राहिले. लिहिताना मी मान वर करून पाहलं आणि चमकलो.
साठीकडे झुकलेला, गरीब चेहेऱ्याचा, कपड्यावर शेणाचे ठिपके वागवत असलेला हा इसम, मी, मघाशी माळ्यावरचा पंचनामा करायला जाताना शिडी चढत होतो तेव्हा शिडीजवळ सहज असा वावरताना दिसला होता. आत्ता मान खाली घालून समोर उभा असताना त्याच्या नजरेत कोणताही भाव नव्हता. रोज सतत समोर दिसणारा, बरोबर जेवणारा, तरणाताठा मुलगा, काही तासापूर्वी कायमचा जग सोडून गेलाय या जाणिवेने हंबरडा सोडा, रडणेही नाही. डोळे कोरडे. शरीराचे तंत्र सांभाळायला नाईलाजाने घशाखाली रोज मूठभर घासांचे इंधन उतरते म्हणून उभे असलेले दोन पायांचे हे यंत्र भावरहित चेहेऱ्याने माझ्यासमोर उभे होते. मी त्याला बसायची खूण केली तेंव्हा ती दुसऱ्याच कोणाला तरी असणार या खात्रीने त्याने मागे वळून पाहिले. परत परत सांगितले तेव्हा तो, तिथे खुर्ची असूनही खाली जमिनीवर बसला.
माझ्या प्रश्नांना, मान खालीवर करून किंवा आडवी हलवून उत्तरे देत होता. त्याला तीन मुले होती. आज गेलेला सर्वात लहान. एक गावी आणि एक वाडा जव्हारच्या बाजूला अशाच एका तबेल्यात नोकरीला होता. त्याचा नीटसा पत्ताही याला ठाऊक नव्हता. झाल्या घटने बाबत त्याला किंवा गावाला फोन करून कळविले का असे विचारले तर मान हलवून..”नाही “.. इतकेच उत्तर आले.
हलाखीच्या परिस्थितीने, जीवनातील सगळ्या भावनिक गोष्टींपासून निवृत्ती घ्यायला भाग पाडले होते. अवघ्या आयुष्याची जन्मठेप झाली होती. प्रेम,वात्सल्य, इच्छा, आवडी,आशा, आकांक्षा उपकार, अपकार, सगळया सगळ्या जाणीवा विझून गेलेल्या. आणि मनातील मुखहीन ज्वालामुखी कितीही उसळला तरीही मरेपर्यंत म्हशीचे दावे हातातून सुटणार नव्हते किंवा ज्या ठिकाणी रोज समोर असलेला, एका ताटात जेवणारा हाताशी आलेला पोटचा मुलगा सर्पदंशाने हकनाक कायमचा गेला, ती झोपायची जागा बदलणार नव्हती.
ज्या परिस्थितीने ही अवस्था केली होती ती काय असते हे त्याच परिस्थितीत पोळून आणि ती कोळून पिऊन स्वीकारलेली होती.
एका विलक्षण विषण्णपणाने व्यथित झालो. मरता येत नाही म्हणून जगणारे अशांसारखे लाखो अभागी कुठे आणि हे असलं पाहून टोचणी लागणाऱ्या आपल्याच मनाला खजील होण्यापासून दूर ढकलताना कर्माच्या सिद्धांता चा आधार घेत, ” गेल्या जन्मीचे भोग आहेत ” अशी वासलात लावणारं बव्हंशी जग कुठे!
दुसऱ्या दिवशी पोलिस ठाण्यात हजर झालो तोच निरोप मिळाला की, कोणीतरी भेटायला आलंय. आत बोलावले. पाहतो तर तोच कालपासून माझ्या मनाचा ताबा घेतलेला, तबेल्यापासून पोलिस स्टेशन पर्यन्त तीन साडेतीन किलोमीटर चालत आलेला, कालच्या मृत तरुणाचा बाप. हातात तांब्या. चेहेरा तस्साच भावहीन. नजर खाली. मी विचारले
” किसलिये आये हो? “
” चीक भेजा हैं l” खालच्या मानेनेच पुटपुटत तांब्या पुढे केला. त्याच्याबरोबर माझ्यासाठी चीक पाठविणाऱ्या हृदयशून्य मालकाचा संताप आला आणि माझीच मला प्रचंड लाज वाटली. त्याच्या भावशून्य निर्विकारतेत इतकी ताकद होती त्याच्या चेहेऱ्याकडे पाहण्याची माझी हिम्मत गळून पडली. तांब्या त्याच्या हातातून घेतला, आत जाऊन लॉक- अप समोरील बेसिनमधे रिकामा केला. तेंव्हा लॉकअप ड्यूटीवर समोरच असलेल्या चांद हवालदारांनी उत्सुकतेने विचारले.
” काय हो सर?”
मी म्हणालो ” कालच्या तबेल्याकडून चीक आला तो ओतला “
” बरं केलं सर “.एवढंच चांद म्हणाले.
तो चीक ओतून टाकणं ‘बरं’ का होतं हे विषद करण्यासाठी कालचा एकूण प्रसंग पाहिलेल्या कोणत्याही ” माणसाला ” आणखी काही शब्दांची आवश्यकता वाटली नसतीच.
रिकाम्या तांब्यात पन्नास रुपये टाकून तांब्या त्याच्या हातात ठेऊन ” जाताना रिक्षाने जा ” असे बजावून, तो डोळ्याआड होण्याआधी मीच आत वळून त्याला डोळ्याआड केला.
“जीवनात यशस्वी होण्यासाठी वास्तव स्वीकारायला शिकले पाहिजे “, असे धडे गिरवणाऱ्यांपेक्षा, परिस्थितीमुळे थिजलेल्या अश्रू,भावना, इच्छा, आकांक्षा, प्रेम अशा जाणीवांच्या वीटा पायाखाली रचून, त्यावर उभं राहून जग पाहणाऱ्यांना जीवनाचं वास्तव जास्त स्पष्ट दिसत असावं.
— अजित देशमुख.
(निवृत्त) अप्पर पोलिस उपायुक्त,
9892944007
ajitdeshmukh70@yahoo.in

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..