नवीन लेखन...

गरुड पुराण

फार फार पूर्वीची गोष्ट , आटपाट नगर होते त्यात Bald नावाचा राजा होता….. त्याची एक दासी होती..

राजाच्या राजधानीत गेल्यावर राजाला न भेटता परतावे हे म्हणजे दासीने स्वतःवर झालेला करवून घेतलेला घोर अन्याय म्हटल्यास वावगे होणार नाही..

परत एकदा म्हणेन Houston ने कृतकृत्य केलं अवघ्या तीन साडे तीन महिन्यांत…
सगळ्या गोष्टी , कुठली नाही मिळाली मला ???
निसर्ग , पक्षी , मैत्री , संगीत , थोर व्यक्तींच्या भेटी , नासा सारखे सेंटर असू द्या नाहीतर उच्च खाद्यभांडार असू द्या सगळं सगळं अगदी भरभरून दिलंय महाराजांनी लेकाकरवी ..
समाधानाने आनंदाने ओंजळ वाहती झालीय … हे कमी की काय म्हणून परवा अचानक परत एक चमत्कार घडला..

भव्यदिव्य हा राजवाडा (Usa)त्यातील एक दालन (Houston), त्या दालनातील एक कोपरा (Eldridge park) , आणि त्या कोपऱ्यातील एक वीट(दुर्गाबाडी परिसर) असे म्हटल्यास त्या एका विटेवर भारतातून आलेला एक जीव दासी उभी आहे आणि अनपेक्षित पणे पुढ्यात भव्यदिव्य राजवाड्याचा राजा येऊन उभा ठाकतो..

कल्पना करा…

बऱ्याच दिवसांत वातावरण ढगाळ असल्याने कुठे पक्षी बघायला जाता आलं नाही पण रविवार असल्याने आणि जरासे वातावरण बरे आहे असे वाटले म्हणून लेकाला म्हटलं सोडून दे मला (माझे फार आवडते सुंदर प्रसन्न शांत निर्मळ असे हे ठिकाण आहे ) तर तिथे गेल्यावर अवघ्या काही दोन एक तासाभरातच परत वातावरण बदलले .पण त्या दरम्यान श्री व सौ Great blue heron , नवे तीन चार पिटुकले मित्र ,Orange-crowned warbler, Blue-gray gnatcatcher , Ruby-crowned kinglet, Northern shoveler , Cormorants दोन प्रकारचे, Roseate spoonbill , Egrets ,White Ibis with juvenile , American coot , Black bellied whistling duck ,Beaver-Nutria , Great tailed Grackles , Europian starling वगैरे वगैरेंच्या भेटी झाल्यावर जरा चालत पुढे गेले .. मध्ये सुंदर स्वछ नितळ असा मोठा lake आणि त्याच्या भोवती गर्द हिरव्या झाडीतून डोकावणारा रस्ता..या इथे चालत असताना अनामिक प्रसन्नता वाटते इतकी प्रसन्न सुंदर मोकळ्या आकाशाखाली असलेली ही निसर्गरम्य जागा.. चालत असताना एका ठिकाणी नजर खिळली आणि बघते तर चक्क तुती दिसल्या झाडाला , पहिले वाटले नसेल म्हणून दुर्लक्ष केलं पण अगदी चार पावलं जात नाही तोच पुन्हा एका झाडाला पिकलेल्या मोठ्या मोठ्या काळ्या तुती ,आधी विश्वासच बसला नाही डोळ्यांवर  पण चार डोळे असल्याने अगदीच तसेही म्हणता येत नव्हते. जवळ जाऊन एक तोडून तोंडात टाकली आणि जी काही मिटकी मारली म्हणून सांगू…आपण अमेरिकेत आहो वैगरे साफ खोटं आपला स्वभाव सोडायचा नाही अजिबात… काय होईल म्हटलं होऊन होऊन या राजवाड्यात कैद होईल , शिक्षा होईल ..तेच तर हवे आहे.. कैदी व्हायला नक्कीच आवडेल म्हणून दोनचार तोडल्या आणि लेकाला घ्यायला बोलावलं होतं ,त्याला दाखवू म्हणून एका हातात ठेवलेल्या .. गळ्यात दुर्बीण एका हातात तुती एका खांद्याला कॅमेरा पाठीवर सॅक असा हा माझा भारी जबरदस्त अस्सल भारतीय परदेशी अवतार येणारे जाणारे देशस्थअमेरिकन कौतुकास्पद बघत होते . छान smile देत होते .. आणि एकदम अचानक शांतपणे आपल्या आपल्यात दंग मग्न असलेले तळ्यातल्या झाडांवरील हजारोंच्या संख्येने असलेले कॉर्मोरंट्स आवाज करत सैरभर उडू लागले.. दुपारचे चारसाडेचारच वाजलेले होते सूर्यप्रकाश बऱ्यापैकी कमी झालेला .. माझ्यातच दंग मग्न असलेली मी पण एकदम हलली आणि असे काय झालं म्हणून जरा नीट डोळे फाडून बघितलं तर काळ्या पांढऱ्या रंगाचे काहीतरी त्यांच्या भोवती घिरट्या घालताना दिसले म्हणून मग दुर्बिणीने बघितलं आणि तोंडाचा आss आ sss झाला पण मला कळलंच नाही की हातातील तुती त्या ‘आ’ मध्ये कोंबून हात रिकामा करावा आणि दोन्ही हाताने कॅमेरा पकडावा… काय होतंय कळायच्या आत एका हाताने कसेबसे एक दोन क्लीक केले… बावरल्यावर कशी अवस्था होते अगदी तशीच अवस्था झाली होती माझी..
दहीदुध लोणी घागर भरुनी नेऊ कशी बाजारी
बावरले मी सावरले ग जाऊ कशी चोरुन बाई
मथुरेच्या बाजारी.. कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी? हे बेला शेंडेचे गाणं अलगद ओठावर आलं… कृष्णाला बघून गोपींची अवस्था कशी होत असेल हे कळायला वेळ लागला नाही मला …
अर्थात हे राजा महाशय शिकारीसाठी निघाले होते , इतक्या वेगात की काय कळायच्या आत शिकार हाती लागली होती . सूर्यप्रकाश फारच कमी होता तर फोटो म्हणावा तसा आला असता की नाही माहीत नाही पण खरे सांगते काहीच कळलं नाही बॉ मला… ब्लॅंक होतो न तसेच काहीसे झाले अगदी … आनंद इतका झाला होता की आपण USA च्या प्रेसिडेंटच्या प्रेसिडेंटला भेटतो आहो की काय असे झालेले , म्हणजे काय ??? भेटतच होते..
जाऊ द्या फोटो महत्वाचा नाही , अगदीच महत्वाचा नाही असे नाही पण डोळ्यांनी बघितला आणि नाही म्हणायला एक फोटो मिळाला समजण्याकरिता (रेकॉर्ड शॉट).. कुत्र्याचा घोडा वैगरे काही अगदीच नाही झाला.. करायला गेलो हनुमान अन झाला… असे पण काही झालं नाही बरं..
स्पष्टपणे कळतंय फोटोत कोण आहे ते…
हो हो मंडळी अगदी प्रेसिडेंटच , एकवेळ प्रेसिडेंट श्री बायडनजींना भेटणे सोप्पे ठरवून ,अपॉइंटमेंट घेऊन वैगरे पण हे महाशय म्हणजे इतकं सोप्प प्रकरण नाही , नसतं .. पण अपुन को अपॉइंटमेंट वगैरेची नो गरज. थेट प्रवेश थेट भेट असते आपली , डायरेक्ट गळाभेटच.. आपण साधंसुध कोणाला भेटतच नाही.. अगदी गळ्यातच पडत असतो आपण..
कितीदा आणि कसे त्याचे आभार मानू ,आजवर कधीच नाराज केलं नाही त्यानं… इतकं इतकं भरभरून दिलं आहे की काहीच मागायचं बाकी नाही पण तरीही फक्त एकच मागणे मागते त्याला , निसर्गा नेहमीच तुझ्या ऋणात ठेव रे बाबा ह्या बद्ध जीवाला..
तर आता ऐका वाचा कोणाला भेटले मी , कोण भेटले मला त्या राजाचे नाव काय वगैरे वगैरे ??????
USA चा नॅशनल पक्षी म्हणून ज्याला 1662 साली घोषित केले त्याला त्या राजाला ज्याचं नाव *Bald eagle* ला.. फार काही फरक नाही त्याच्यात आणि माझ्यात , माझ्यापेक्षा फक्त तीनशेसातच वर्षे आधी
नावात काय आहे म्हणतात ते उगाच नाही म्हणूनच नावावर जाऊ नका.
*बाल्ड ईगल* हा जगातील सर्वात सुप्रसिद्ध प्रकारच्या गरुडांपैकी एक आहे आणि विशेषतः मी आहे सध्या त्या युनायटेड स्टेट्सचा राष्ट्रीय पक्षी आहे . खरेच अगदी थाट रुबाब त्याची श्रीमंती सगळं सगळं वाखाणण्याजोगी होती.. श्रीमंत देशाचा श्रीमंत राजा..त्याचा थाट तो काय वर्णावा..
काय दिसतो !!! रांगडा ..
अवाढव्य असे त्याचे विंग span.. दोन बाजूला तपकिरी रंगाचे पंख पसरलेले आणि पुढे मागे शुभ्र पांढरा रंग त्यात टोकदार बाक असलेली पिवळी चोच ..अशा या नैसर्गिक गर्भश्रीमंती असलेल्या लाभलेल्या पक्ष्यासोबत माझी अगदी अचानक थोडी का होईना भेट झाली हे महत्वाचे.. धन्य धन्य झाला हो हा पामर जीव…
लेकाला सांगितलं तर त्याचाही विश्वास बसला नाही पहिल्यांदा पण नंतर कळलं आपली आई जाईल तिथे जाईल तेव्हा काहीतरी करून येतेच…
आपल्याला बऱ्याच व्यक्तींबद्दल माहिती असते पण जेव्हा आपल्या पुढे एखादी व्यक्ती येते ती व्यक्ती भेटते तेव्हाच खरे काय ते आपण तिच्याबद्दल जाणून घेऊ शकतो तिला वाचू शकतो ओळखू शकतो आणि भेटल्यावर जितके चांगलं ओळखतो तितकं आधी नाही ओळखू शकत न ???
तसेच काहीसे या पक्षीव्यक्तीबद्दल मला झाले.. भेटल्यावर खूप जाणून घेतले , वाचलं आणि खूप काही निरीक्षणातून कळलं ..

आता थोडीशी माहिती ह्या विशेष पक्षीव्यक्ती बद्दल मला कळलेली …
प्रत्यक्षात हे नाव जुन्या इंग्रजी शब्दापासून आले आहे, “बाल्डे,” म्हणजे पांढरा.. डोक्याचा भाग पांढऱ्या पिसांचा असतो..
पण bald म्हणजे मराठीत टक्कल असा अर्थ होतो म्हणून मराठीत *टक्कल गरुड* असे म्हणतात.. गरुडांच्या डोक्यावर आणि मानेवर पांढरे पिसे असतात म्हणून Bald Eagle आणि त्यांचा पिसारा काळपट तपकिरी असतो. टक्कल गरुड प्रत्यक्षात टकले नसतात . त्याचा डोक्याचा पांढरा रंग त्याच्या तपकिरी शरीराच्या रंगामुळे जास्तच शुभ्र दिसत होता हे प्रत्यक्षात त्याला बघितल्यावर जाणवलं..

साधारण वजन सात आठ किलो तरी असेल इतका मोठा होता..
जगभरामध्ये गरुड पक्षाच्या 60 पेक्षा अधिक प्रजाती आढळतात. गरुड हा पक्ष्यांचा राजा म्हणून ओळखला जातो. अतिशय चालाक, बुद्धिमान, वेगवान, विशाल आकार, रहस्यमयी आणि सर्वश्रेष्ठ असा हा पक्षी. भारतीय, सुवर्ण, टक्कल, इबेरियन, बोनेलीचे, हार्पी, ठिपक्यांचा, पाणगरुड, मत्स्य, नेपाळी, पहाडी अशा अनेक प्रजाती आहे .. गरुड श्रेष्ठत्व आणि शक्तीचे प्रतीक आहे. त्यांचे उड्डाण उंच असते आणि त्यांचे डोळे देखील तीक्ष्ण आणि नजर एकदम भेदक असते. त्यांच्याकडे आश्चर्यकारक दृष्टी आहे. ते तीन ते चार किलोमीटर अंतरावरून सुद्धा त्यांची शिकार पाहू शकतात.
१६६२मध्ये अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केलेला हा पक्षी पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर होता, कारण त्यांची शिकार केली जाऊन त्यांच्या पंखांचा वापर सजावटीसाठी केला जात होता. शिवाय पिकांवर केलेल्या डीडीटी फवारणीमुळे होणारी विषबाधा. त्यामुळे आता अमेरिकेने त्यावर अत्यंत कडक कायदे केलेले आहे आणि पूर्णपणे त्यांना संरक्षण दिले गेले आहे म्हणून त्यांची संख्या परत वाढत आहे. पक्ष्यासाठी इतका कडक कायदा केलेला त्यासाठी द्यावे तितके धन्यवाद कमीच Usa सरकारला.. नाहीतर आपले कायदे माणसासाठी सुद्धा नाही..यावर न बोललेलंच बरे.. असो..

आपण सर्वांनी आपापल्या परीने पक्ष्यांचे संरक्षण करावयास हवे. नव्हे नव्हे केलेच पाहिजे.
हे गरुड पक्षी मादी आणि नर मिळून घरटे बांधतात. घरटे गवत, पीसं आणि काड्यांचे बनलेले असते. काही वेळेला ते खूप मोठे घरटे बनवतात. नुकतेच वाचण्यात आलेलं ,जगातील सर्वात मोठे घरटे फ्लोरिडाजवळ वीस फूट खोल आणि ९ फूट उंच आणि २ टनांपेक्षा जास्त वजनाचे आढळले आहे ज्याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे . हा टक्कल गरुड फक्त उत्तर अमेरिकेतच आढळतो .

हा सुंदर पक्षी 1782 पासून युनायटेड स्टेट्सचे राष्ट्रीय चिन्ह आहेत. शिकार आणि प्रदूषणामुळे बाल्ड गरुड नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर होते ,परंतु जवळजवळ 40 वर्षांपूर्वी तयार केलेल्या कायद्यांनी त्यांचे संरक्षण करण्यात मदत केली आहे आणि त्यांनी पुनरागमन केले आहे.

गरुड हा पक्षी शक्ती, स्वातंत्र आणि श्रेष्ठता याचे जिवंत प्रतीक म्हणून पूर्ण जगामध्ये ओळखला जातो. हा एक मोठ्या आकाराचा शिकारी पक्षी आहे . प्रत्यक्षात शिकार पकडताना बघितलं मी ..
शेवटी विचार करत असताना जीवनाचे अंतिम सत्य आठवलं आणि प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली ती म्हणजे आता आपल्याला मोक्ष मिळणारच (गंमत) पण मोक्ष तर नक्कीच मिळणार आपल्याला कारण पूर्ण पूर्ण समाधानी आहे आपला आत्मा आणि साक्षात गरुड दर्शन झाले पण तरीही मिळाला किंवा नाय तरी काय फरक पडणार नाही असे वाटून मन जरा गरुड पुराण वगैरेत गेलं ,आठवायला लागलं सगळं. प्राचीन संस्कृतीत गरुड किती महत्त्वाचे प्रतीक आहे. आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये दिसूनच येते त्याचे महत्व . गरुड दिसला म्हणजेच आपल्यासाठी शुभेच्छा आणि अध्यात्मिकतेचे काहीतरी संकेत मार्गदर्शन आहे का असे वाटले. आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये गरुड विष्णूचे वाहन आहे तसेच प्राचीन ग्रंथ गरुड पुराणामध्ये आत्म्याचे रहस्य, स्वर्ग आणि नरक यांचे वर्णन केलेले आहे म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती आपला इहलोक सोडून जाते तेव्हा त्या घरी गरुड पुराण वाचले जाते . म्हणजे मोक्षप्राप्ती आणि आत्मज्ञानाचे साधन आहे म्हणूनच न !! म्हणजेच आपल्या आत्म्याला बळ देणारा गरुडासारखा शक्तिशाली असा हा ग्रंथ गरुड पुराण .

इति गरुड पुराण समाप्त
नोट — माझी परत भेट झालीच तर चांगला फोटो घेईनच आणि तुम्हाला दाखवेन पण तोवर खालील फोटोने समाधान न झाल्यास गुगल करून या राजाला भेटू शकता तुम्ही…

…सीमा तंगडपल्लीवार

आम्ही साहित्यिक या फेसबुक गृप वरुन…

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..