आशापाशक्लेशविनाशं विदधानां
पादाम्भोजध्यानपराणां पुरुषाणाम् ।
ईशामीशार्धाङ्गहरां तामभिरामां
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ १०॥
भगवंताचे, भगवतीचे सगळ्यात मोठे वैभव म्हणजे भक्तवत्सलत्व. आपल्या भक्तांच्या सकल मनोकामना पूर्ण करणे हे जणू देवतांचे सर्वाधिक प्रिय कार्य. आई जगदंबेच्या या शरणागतवत्सल स्वरूपाचे वर्णन करतांना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
आशापाशक्लेशविनाशं विदधानां
पादाम्भोजध्यानपराणां पुरुषाणाम् ।
पादांभोज म्हणजे चरणकमलांचे, ध्यान करण्यात परायण असणाऱ्या पुरुष म्हणजे जीवांच्या आशारूपी पाशाचा विनाशक करणारी.
भगवंताच्या चरणी भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याच्याही पलीकडे जात आचार्यश्री म्हणतात, आई जगदंबेची कृपा झाली की भक्तांना कोणत्या आशाच उरत नाही.
आशा हा माणसाला पडलेला असा अजब पाश आहे की ज्याने जखडलेला धावत राहतो आणि यातून सुटलेला शांत बसून राहतो.
आई जगदंबेच्या चरणकमलांचे ध्यान करणारे जे भक्त असतात, त्यांचे असे आशा पाश जगदंबा खंडित करते. हे पाश गेले की त्यांना सुख शांती प्राप्त होते. आई त्यांना मुक्ती प्रदान करते.
ईशामीशा- ईश म्हणजे स्वामी. संपूर्ण विश्वाचे स्वामी भगवान शंकर. त्यामुळे त्यांना ईश असे म्हणतात. त्या ईशांची देखील ईशा. अर्थात त्यांचीही स्वामिनी. त्यांच्यावरही जिची सत्ता चालते अशी.
अर्धाङ्गहरां- त्यांच्या अर्ध्या अंगाला अर्थात अस्तित्वाला व्यापून असणाऱ्या,
तामभिरामां- त्या आत्यंतिक आकर्षक असणाऱ्या,
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे- कमलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या त्या आई जगदंबा गौरीचे मी स्मरण करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply