प्रातःकाले भावविशुद्धः प्रणिधाना-
द्भक्त्या नित्यं जल्पति गौरिदशकं यः ।
वाचां सिद्धिं सम्पदमग्र्यां शिवभक्तिं
तस्यावश्यं पर्वतपुत्री विदधाति ॥ ११॥
या गौरीदशकम् नामक स्तोत्राचे समापन करतांना या स्तोत्राच्या पठनाचा विधी आणि स्तोत्र पठनाचे लाभ सांगणाऱ्या फलश्रुती स्वरूप असणाऱ्या या श्लोकात आचार्यश्री म्हणतात,
प्रातःकाले – या स्तोत्राचे पठन प्रात:काळी अर्थात मंगलमय वातावरणात, प्राधान्यक्रमाने करावे.
भावविशुद्धः- मनात अत्यंत शुद्ध भाव ठेवून पठन करावे. तो शुद्ध भाव आपण उठल्या उठल्या अधिक प्रबल असतो.
त्यामुळेच सर्व व्रतवैकल्ये, प्रार्थना प्रभातकाली करण्यास सांगितलेल्या आहेत.
प्रणिधानाद्- परिपूर्ण तन्मय होऊन. अर्थात मनामध्ये आई जगदंबेच्या व्यतिरिक्त कशाचाही विचार नसतांना.
भक्त्या- परिपूर्ण भक्तीने युक्त अशा अवस्थेत.
नित्यं जल्पति गौरिदशकं यः – जो या गौरी दशकं स्तोत्राचे नित्य पठण करतो,
त्याला काय काय प्राप्त होते हे सांगताना उत्तरार्धामध्ये आचार्यश्री म्हणतात,
वाचां सिद्धिं- मनात येणारा प्रत्येक संकल्प मनातल्या मनात बोलल्याबरोबर देखील परिपूर्ण करणारी दिव्यशक्ती.
व्यवहारात देखील जे बोलेल ते पूर्ण होण्याची शक्ती.
सम्पदमग्र्यां- अग्र म्हणजे सर्वश्रेष्ठ संपत्ती. अध्यात्मशास्त्रामध्ये शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान या सहा गोष्टींना षट्संपत्ती असे म्हणतात. आई जगदंबेच्या कृपेने ही संपत्ती साधकाला प्राप्त होते.
शिवभक्तिं- भगवंताची परमभक्ती. शुद्ध मंगल भक्ती.
तस्यावश्यं पर्वतपुत्री विदधाति- पर्वतपुत्री अर्थात आई जगदंबा गौरी त्याला अवश्य प्रदान करते.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply