प्रत्याहारध्यानसमाधिस्थितिभाजां
नित्यं चित्ते निर्वृतिकाष्ठां कलयन्तीम् ।
सत्यज्ञानानन्दमयीं तां तनुरूपां
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ २॥
आई गौरीचे हे स्वरूपच सर्व साधकांचे साध्य आहे, उपास्य आहे,हे स्पष्ट करतांना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
प्रत्याहारध्यानसमाधिस्थितिभाजां- प्रत्याहार, ध्यान, समाधी इत्यादी योगशास्त्रातील स्थितींना जे भाज अर्थात पात्र आहेत अशा साधकांच्या,
नित्यं चित्ते निर्वृतिकाष्ठां कलयन्तीम् – चित्तामध्ये नित्य निवृत्ती रूपाने क्रीडा करणाऱ्या, काष्ठा अर्थात रुद्र भामिनी.
योगशास्त्र मध्ये अष्टांगयोगात प्रत्याहार, ध्यान, धारणा ,समाधी अशी उत्तरोत्तर श्रेष्ठ अंगे वर्णिली आहेत. आपापल्या योग्यतेनुसार त्या त्या अंगावर स्थिर असणाऱ्या साधकांचा चित्तात आई जगदंबा गौरी आनंदरूप क्रीडा करते.
सत्यज्ञानानन्दमयीं – वेदांता मध्ये परब्रह्माचे चे स्वरूपलक्षण म्हणून वर्णिलेल्या सत्, चित्, आनंद मयी. अर्थात परब्रह्मस्वरूपिणी.
सत् शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व. चित् शब्दाचा अर्थ आहे चैतन्य,ज्ञान. तर आनंद म्हणजे आनंदच. ही तीन वेगवेगळे नसून सच्चित् असणारा आनंद, अशा स्वरूपात तिन्हींचे एकत्रीकरण. परब्रह्म असे आहे. ते स्वरूप लक्षण आई जगदंबे ला वापरतांना आचार्य सुस्पष्ट करीत आहेत की ती परब्रह्म परमात्मस्वरूप आहे.
तां तनुरूपां- ती स्वरूपलक्षणे जणू काही तनू म्हणजे शरीर धारण केली आहेत अशी. अर्थात सत्- चित्- आनंद ही अमूर्त लक्षणे जर देहधारी म्हणजे सगुण-साकार झाली तर ती कशी दिसतील? याचे जणू काही सादरीकरण आई जगदंबेचे स्वरूप आहे. ती जणू काही ज्ञानाचे, आनंदाचे मूर्तिमंत रूप आहे.
ज्ञानाचा आनंदाचा रंग आहे गोरा. तेच तिचे स्वरूप म्हणून ती गौरी. गौरवर्णीय असणाऱ्या भगवान शंकरांची सहधर्मचारिणी. त्यांच्या समान वर्णाची ती गौरी.
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे – कमलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या त्या आई जगदंबा गौरीचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply