आदिक्षान्तामक्षरमूर्त्या विलसन्तीं
भूते भूते भूतकदम्बप्रसवित्रीम् ।
शब्दब्रह्मानन्दमयीं तां तटिदाभां
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ४॥
आई जगदंबेचे अतुलनीय वैभव वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
आदिक्षान्तामक्षरमूर्त्या विलसन्तीं- अ पासून क्ष पर्यंत सर्व अक्षरांच्या स्वरूपात विलास करणारी. यामध्ये अ पासून म्हणतांना सर्व अक्षरांपासून तर क्ष पर्यंत म्हणताना सर्व जोडाक्षरां पर्यंत असा भाव अंतर्हित आहे. सामान्य शब्दात सकल विद्या, सकल ज्ञान. सर्व शास्त्र ,ग्रंथ. या सगळ्यात असणारी जी ज्ञानशक्ती त्या रूपामध्ये आई गौरी विलास करते.
भूते भूते भूतकदम्बप्रसवित्रीम् – भूत शब्दाचा अर्थ आहे निर्माण झालेली गोष्ट. सामान्य शब्दांत हे चराचर विश्व. कदंब शब्दाचा अर्थ आहे ज्याच्या भोवती सर्व फिरते असे मध्यवर्ती स्थिर केंद्र.
अर्थात या जगात निर्माण होणाऱ्या प्रत्येक चराचर गोष्टीच्या मागे स्थिर स्वरूपातील केंद्र रूपात विलास करीत या सगळ्यांना निर्माण करणारी.
कदंब हे एका वृक्षाचे ही नाव आहे. या वृक्षाचे वैशिष्ट्य असे की या वृक्षावर जर एखादी खूण केली तर या वृक्षाचे कितीही पापुद्रे गेले तरी ती तशीच कायम राहते. याच स्वरूपात बाह्य जगात कितीही बदल झाले तरी, त्या सर्व बदलांनी रहित अशी अंतर्गत स्थिर चैतन्य शक्ती आहे आई गौरी.
शब्दब्रह्मानन्दमयीं – शब्दब्रह्म अर्थात वेद. त्यांचे वर्ण्य तत्व आहे परब्रह्म. त्याचे स्वरूप आहे आनंद. तो आनंद हेच जिचे स्वरूप आहे अशी. परमानंदमयी. शास्त्रानंदमयी.
तां तटिदाभां- तडीत् अर्थात विद्युत. तर आभा म्हणजे तेज. त्या लखलखत्या विजेप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या,
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे – कमलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या आई गौरीचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply