नित्यः शुद्धो निष्कल एको जगदीशः
साक्षी यस्याः सर्गविधौ संहरणे च ।
विश्वत्राणक्रीडनलोलां शिवपत्नीं
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ६॥
निर्गुण निराकार परब्रह्माची मूलशक्ती आदिमाया जगदंबा हीच सर्व कार्यामागे असलेले मूळचैतन्य आहे. हे स्पष्ट करताना आचार्य श्री प्रथम चरणात परब्रह्माचे वर्णन करीत आहेत. त्या परमात्म्या बद्दल ते म्हणतात,
नित्यः – परमात्मा नित्य आहे. अर्थात भूत, वर्तमान व भविष्य काळात तो आहेच आहे. शास्त्रात अशा तत्वालाच नित्य असे म्हणतात. जे काळानुसार निर्माण होते आणि नष्ट होते त्याला अनित्य म्हणतात. याच दृष्टीने सर्व जग अनित्य आहे. एकटा परमात्मा नित्य आहे.
शुद्धो- त्यात कोणत्याही पद्धतीने मायेचा लवलेश नाही. मायेच्या गुणांनी अशुद्धता येते. मायापती त्या गुणांच्या अतीत असतो. त्यामुळे त्याला शुद्ध म्हणतात.
निष्कल – त्यामध्ये कोणत्याही कला अर्थात बदल होत नाही. कमी किंवा अधिक होणे याला कला असे म्हणतात. परमात्मा परिपूर्ण आहे तो कमी किंवा अधिक होत नाही.
एको- एकमेवाद्वितीय. त्याचा सन्मान दुसरा कोणीच नसतो.
जगदीशः – या संपूर्ण विश्वाचा संचालक.
असा जो परमात्मा, तो
साक्षी यस्याः सर्गविधौ संहरणे च – जिच्या निर्मिती, विलयाचा साक्षी असतो अशी.
परमात्मा पुरुष केवळ साक्षी स्वरूपात अधिष्ठान असतो. तो स्वत: काहीच करत नाही. आदिमाया प्रकृतीच सर्व क्रीडा करते. परमात्मा तिच्या त्या क्रीडेचा साक्षी रूपात आस्वाद घेतो. त्याची योगमाया रूप ही आदिशक्ती असणाऱ्या,
विश्वत्राणक्रीडनलोलां- या सर्व विश्वाच्या पालनाची क्रीडा करीत असणाऱ्या,
शिवपत्नीं- शांत स्थाणू अशा स्वरूपातील भगवान शंकरांची पत्नी असणाऱ्या,
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे – कमलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या आई जगदंबा गौरीचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply