यस्यामोतं प्रोतमशेषं मणिमाला-
सूत्रे यद्वत्क्कापि चरं चाप्यचरं च ।
तामध्यात्मज्ञानपदव्या गमनीयां
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ८॥
या विश्वाची उत्पत्ती आई जगदंबे पासून होते हे सांगितल्यानंतर, ज्यावेळी हे विश्व दृशमान असते त्यावेळी आई जगदंबेचे स्थान नेमके काय? हे स्पष्ट करतांना आचार्यश्रींनी ही रचना साकारली आहे.
आई जगदंबे च्या विश्व जननी स्वरूपानंतर विश्वाधिष्ठान स्वरूपाबद्दल बोलताना आचार्यश्री म्हणतात,
यस्यामोतं प्रोतमशेषं मणिमाला-
सूत्रे यद्वत्क्कापि चरं चाप्यचरं च ।
एखाद्या धाग्यात ओवलेले मणी जसे माळेत असावेत, तसे संपूर्ण चराचर विश्व जिच्यात ओतप्रोत भरलेले आहे अशी.
येथे दिलेला माळेचा दृष्टांत मोठा रमणीय आहे. जसे माळेतील सर्व मणी एका अंतर्गत सूत्राने बांधलेले असतात, तसे या संपूर्ण विश्वाला बांधणारे आणि संचालित करणारे सूत्र म्हणजे आई जगदंबा.
बाहेरून माळ पाहतांना केवळ मणीच दिसतात. आतला धागा दिसत नाही. मात्र असे असले तरी आत तोच धागा आहे म्हणूनच माळ ही माळ आहे. तो धागा नसता तर सर्वत्र विखुरले पण राहिले असते. त्याप्रमाणे या संपूर्ण विश्वामध्ये जी एक निश्चित नियमानुसार असणारी सुसूत्रता दिसते ती आई जगदंबेची शक्ती आहे. तिचे दिसणे महत्त्वाचे नाहीतर असणे महत्त्वाचे आहे.
एक लहानशी गोष्ट लक्षात घेऊ. या दृष्टांतात धागा आत असतो पण येथे आचार्यश्री म्हणतात ही चराचर विश्व जिच्यात ओतप्रोत भरले आहे. ती आत आहे म्हणायच्या ऐवजी विश्व तिच्यात आहे असे म्हटले आहे. अर्थात विश्वापेक्षा व्यापक आणि श्रेष्ठ आहे, हे सांगण्याची ही किती सुंदर पद्धती आहे.
तामध्यात्मज्ञानपदव्या गमनीयां- त्या अध्यात्मज्ञानरूपी पदवीने प्राप्त होणाऱ्या
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे – कमळाप्रमाणे नेत्र असणाऱ्या आई जगदंबा गौरीचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply