धडाडीच्या महिला पत्रकार, संपादक व कार्यकर्त्या गौरी लंकेश यांचा जन्म २९ जानेवारी १९६२ रोजी झाला.
गौरी लंकेश या बेंगळुरूतील ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या संपादक व ज्येष्ठ पत्रकार होत्या. गौरी लंकेश यांनी बरीच वर्षे इंग्रजी पत्रकारितेत काढली. त्याकाळी त्यांची ओळख म्हणजे एक ‘व्यावसायिक पत्रकार’ अशी होती. त्यांचे वडील पी. लंकेश कन्नड पत्रकारितेतील एक आदरणीय नाव. त्यांचे स्वतःच्या मालकीचे व स्वतःच्या संपादकत्वाखाली एक कन्नड भाषिक ‘लंकेश पत्रिके’ हे साप्ताहिक होते. हे साप्ताहिक त्यांनी १९८२ साली सुरू केले होते. पी. लंकेश यांच्यासाठी पत्रकारिता म्हणजे समाजप्रबोधनाचे एक साधन होते. त्यांची शैली फार भेदक व बोचरी होती. मात्र, पी. लंकेश यांची शैली ‘लेकी बोले सुने लागे’ या प्रकारात मोडणारी होती. कर्नाटकातील जवळपास सर्व पक्ष त्यांच्या लेखणीचा आदर करत व त्यांना वचकून असत. पी. लंकेश यांचे २००० साली निधन झाल्यानंतर साप्ताहिक बंद झाले असते पण त्यांची कन्या गौरी लंकेश यांनी साप्ताहिक चालवण्याची जबाबदारी स्वीकारली. पी.लंकेश यांना दोन मुली व एक मुलगा. कायदेशीर कारणांसाठी ‘लंकेश पत्रिके’वर त्यांचा मुलगा इंद्रजित लंकेश यांचे नांव संपादक म्हणून छापले जात असे. पी.लंकेश यांच्यानंतर इंद्रजित व गौरी लंकेश यांच्यात संपादकीय धोरणांबद्दल तात्त्विक मतभेद झाले. परिणामी गौरी यांनी स्वतःचे ‘गौरी लंकेश पत्रिके’ हे साप्ताहिक सुरू केले.
गौरी यांची शैली अतिशय आक्रमक होती. त्यांच्या लेखनात प्रसंगी बेधडकपणा होता व त्या सरळ आरोप करत असत.त्यांनी २००२ साली धार्मिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी ‘फोरम फॉर कम्युनल हार्मनी’ ही संस्था स्थापन केली होती.
गौरी लंकेश यांची हत्या ५ सप्टेंबर २०१७ रोजी करण्यात आली.
Leave a Reply