आपल्या कॅमेर्यारने सिनेतारे-तारकांना ग्लॅमर मिळवून देणारे, कलाकारांना नवा चेहरा देणारे असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांचा जन्म १६ सप्टेंबर १९५० रोजी झाला. व्यक्तिचित्रण प्रकारातल्या प्रकाशचित्रांसाठी ते विशेष नावाजले जात असत. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट झेविअर्स हायस्कूल आणि पदवी शिक्षण सेंट झेविअर्स महाविद्यायतून झाले होते. आपल्या मितभाषी स्वभावाने, मृदू वाणीने आणि व्यक्तीतील मित्रत्वाचा शोध घेणार्याच दृष्टीने त्यांनी केवळ सिनेजगतातीलच नव्हे तर समाजाच्या विविध प्रांगणातील व्यक्तींना आपल्या मित्रपरिवारात सामावून घेतले होते.
गौतम राजाध्यक्ष यांना छायाचित्रणासह कलेच्या विविध प्रांतात आवड होती. इतिहास, पुरातत्त्वविद्या, छायाचित्रण, संगीत, इंग्रजी-मराठी साहित्य अशा गोष्टींत रस होता. ते बायो-केमिस्ट्रीतून पदवीधर झाले होते. महाविद्यालयीन काळात त्यांना याच विषयात त्यांना पीएच.डी. करायची होती. सेंट झेविअर महाविद्यालयात त्यांनी दोन वर्षे अध्यापनही केले. त्याच दरम्यान त्यांनी जाहिरात आणि जनसंपर्क या विषयाचा डिप्लोमा केला. त्याच्या प्रकल्पाच्या निमित्ताने १९७७मध्ये त्यांचा संबंध लिंटाजशी आला आणि त्यांना तिथेच नोकरीची संधी मिळाली. फोटोग्राफीेचे तंत्र ते लिंटाजमध्येच शिकले. या काळात त्यांनी लिंटाज इंडियामध्ये मानाच्या जागाही मिळविल्या होत्या. पुढे १९८० पासून १९८७ पर्यंत फॅशन फोटोग्राफर म्हणूनही काम पाहिले. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र काम केले.
छायाचित्र काढताना ज्यांचे छायाचित्र काढायचे त्यांचे व्यक्तिमत्त्व त्या छायाचित्रात आणण्याचा त्यांचा कसोशीचा प्रयत्न असायचा. म्हणून त्यांची छायाचित्रे बोलकी असत. त्यांना लेखनाचाही चांगला हात होता. शोभा डे यांच्या ‘सेलेब्रिटी’ या मासिकातून त्यांनी लेखनाला सुरुवात केली. सेलेब्रिटींच्या मुलाखती घेताना तेच त्यांची छायाचित्रे काढत असत. त्यांनी ‘चंदेरी’ या पाक्षिकाचे काही काळ संपादनही केले होते. चंदेरीत असताना त्यांना कलाकारांच्या अंतरंगात डोकावते आले. १९९७ मध्ये त्यांचे ‘फेसेस’ हे छायाचित्रांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. यात त्यांनी दुर्गा खोटे, साधना समर्थपासून एैश्वार्या रायपर्यंतच्या ४५ भावमुद्रा टिपल्या आहेत. दोन वर्षांपूर्वीच त्यांचे ‘चेहरे’ या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन लता मंगेशकर यांच्या हस्ते झाले होते. त्यांच्या छायाचित्रांची प्रदर्शनेही रसिकांच्या चांगल्याच स्मरणात आहेत.
छायाचित्राबरोबरच स्टील फोटोग्राफीचे कामही त्यांच्याकडे आले. अनेक चित्रपटांची त्यांनी स्टील फोटोग्राफी केली आहे. शालीन, सुसंस्कृत, सुशील, सदा हसमुख आणि मदतीला सदैव तत्पर असलेल्या गौतम राजाध्यक्ष यांना ऑपेरा संगीताची फार आवड होती. या पाश्चारत्य संगीताबरोबरच भारतीय शास्त्रीय संगीताचा त्यांचा कानही उत्तम होता. लता मंगेशकर यांच्याशी ते बर्यासचदा शास्त्रीय संगीताविषयी चर्चा करीत असत. मंगेशकर कुटुंबियांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. बालगंधर्वांच्या काळातील संगीताचेही ते शौकीन होते. कलेची सर्वच क्षेत्रे गौतम राजाध्यक्ष यांनी चांगल्या तर्हेाने हाताळली आहेत. मराठी साहित्याबद्दल त्यांना विशेष आसक्ती होती. त्यांनी ‘सखी’ या मराठी चित्रपटासह ‘बेखुदी’, ‘अंजाम’ या हिंदी चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या होत्या.
गौतम राजाध्यक्ष यांचे १३ सप्टेंबर २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply