माझ्या युनिव्हर्सिटी पासून, सू सेंटर १६०० मैलांवर होते. अमेरिकेत राहिलेल्या आणि रुळलेल्या लोकांच्या दृष्टीने, हा म्हणजे कारने दोन किंवा तीन दिवसांचा प्रवास. पण त्यावेळी माझ्याकडे गाडी नव्हती, त्यामुळे मी विमानाने जाणार होतो. अर्थात सू सेंटर हे अगदीच छोटं गाव असल्यामुळे तिथं जायला थेट विमानसेवा उपलब्ध नव्हती. सू सेंटरपासून साधारण तासाभराच्या अंतरावर सू सिटी हे ६५,००० लोकवस्तीचं बर्यापैकी मोठं गाव होतं. तिथे छोटा विमानतळ होता. त्यामुळे कनेक्टिकट राज्यातल्या हार्टफोर्डपासून, मिनेसोटा राज्यातल्या मिनीयापोलीस पर्यंत आणि तिथून पुढे सू सिटीपर्यंत, असा मला विमान प्रवास करायचा होता.
मिनीयापोलीस पर्यंतचा प्रवास नेहमीच्या मोठया जेट विमानातून झाला. तिथे विमान बदलायचं होतं. मिनीयापोलीसच्या प्रशस्त अद्ययावत विमानतळावर, सू सिटीला जाणार्या विमानाचं गेट शोधून काढलं. एकंदर विमानतळाच्या अवाढव्य, झकपक इमारतीच्या एका अंगाला, छोट्या छोट्या गावांना जाणार्या विमानांची गेट्स होती. मिनीयापोलीस पर्यंत मोठया विमानातून प्रवास झाल्यावर, पुढचं सू सिटीला जाणारं विमान अगदीच छोटं (३० आसनांचं) होतं. तेव्हढे देखील प्रवासी नसल्यामुळे, हवाईसुंदरीने अक्षरश: विमानाच्या दोन्ही बाजू समतोल व्हाव्यात म्हणून, प्रवाशांना मोजून मापून दोन्ही बाजूंना बसवलं. शेवटी एकदाचं ते छोटं विमान डगडग करत उडालं. तासाभराने सू सिटीचा विमानतळ येत असल्याची हवाईसुंदरीने सूचना दिल्यामुळे, मी जरा हुशारून बसलो. खाली बघितलं तर हिरव्यागार शेतांशिवाय काही दिसत नव्हतं. सू सिटी गाव देखील छोटंच वाटत होतं. विमानतळाची परिचित अशी काहीच खूण दिसत नव्हती. शेवटी एकदाचं विमान उतरलं. सू सिटीच्या त्या छोट्याशा विमानतळावर आमचं तेव्हढं एकच विमान दिसत होतं. पायलटने विमान वळवून विमानतळाच्या छोटेखानी इमारती समोर आणून उभं केलं.
विमानातल्या प्रवाशांना घ्यायला आलेली नातेवाईक, मित्रमंडळी चक्क विमानतळाच्या इमारतीच्या दरवाजात उभी होती. १५-२० पावलांत आम्ही इमारतीत शिरलो. विमानतळाची इमारत म्हणजे आपल्या बार्शी लाईट रेल्वे लाईनीवरच्या एखाद्या ठेसनासारखी होती. अशा ठेसनावर, दिवसाला एखाद दुसरी आगगाडी येणार असावी, तिच्या वेळेच्या अर्धा तास आधी ठेसन मास्तर, तिकीट कलेक्टर वगैरे हापीसर लोकांनी घाईघाईत पोशाख चढवावेत, लाईनमनने हातात लाल हिरवे बावटे घेऊन उगाच फलाटावर चकरा माराव्यात, तेव्हढ्यापुरता स्टॉलवाल्याने स्टॉल उघडून “च्या” उकळत ठेवावा आणि ५-१० पाशिंजरांनी ठेसनमास्तरांशी सलगी करत पानाच्या चंच्या सोडून बसावं तसा सारा प्रकार! विमान यायच्या वेळेपुरतं विमानतळावर १-२ काउंटर्स उघडले जातात, नावापुरते कर्मचारी मख्ख चेहेर्यांनी कामात गढून गेल्याचा आव आणतात, एकुलत्या एक रेस्टॉरंटच्या टेबलावर फडकं मारत एखादा मेक्सिकन पोर्या फेर्या मारतो आणि ट्रेनच्या वेळेनुसार आपल्याकडे रेल्वे स्टेशनाच्या बाहेर टांगे किंवा रिक्षांची वर्दळ वाढावी तशी तेव्हढ्यापुरती इथे विमानतळाच्या बाहेर थोडीशी गाड्यांची वर्दळ वाढते.
मला घ्यायला आमच्या लॅबचे दोन सहकारी, जे इथे आधीपासूनच त्यांच्या प्रकल्पांसाठी आले होते, ते आले होते. त्यांच्या गाडीतून आजूबाजूची शेतं आणि कुरणात चरणार्या काळ्याकुट्ट धष्टपुष्ट बीफ गाईंचे कळप बघता बघता सू सेंटरला येऊन पोहोचलो.
सू सेंटरची वस्ती ६,०००. बाजूला १०-१२ मैलांवर ऑरेंजसिटी हे दुसरं असंच ५,५०० वस्तीचं गाव. सबंध सू काउंटी मधली ही दोन सर्वात मोठी गावं. मग आजूबाजूला काही २ – ३,००० वस्तीची गावं, बरीचशी ४००-५०० वस्तीची गावं आणि बर्याचशा अक्षरश: १५-२० उंबरठ्यांच्या वस्त्या! सू सेंटरपासून वर उल्लेखलेलं सू सिटी हे ६५,००० वस्तीचं मोठं गाव साधारणत: ५० मिनिटांच्या अंतरावर दक्षिणेला, तर सू फॉल्स हे साउथ डकोटा राज्यातलं एक – सव्वा लाख वस्तीचं गाव एका तासाच्या अंतरावर उत्तरेला. सू सेंटर हे आयोवाच्या अगदी वायव्य कोपर्यात येतं. त्यामुळे उत्तरेला तासाभराच्या अंतरावर साउथ डकोटा आणि मिनेसोटा ही राज्यं लागतात. दक्षिणेला थोडं तिरकं गेलं की अडीच तासांत नेब्रास्का राज्याची सीमा लागते. सारीच राज्ये मिडवेस्ट मधली. सारा प्रदेश एक सारखा. गवताळ कुरणांनी भरलेल्या टेकड्या, मक्याची आणि सोयाबीनची शेतं आणि गायी किंवा डुकरांचे फार्मस्. चारी दिशांना नजर टाकावी तिथपर्यंत हेच ठरावीक चित्र!
सू सेंटरमधे तीन छोट्या बॅंका, एक छोटं पोस्ट ऑफिस, पाच रेस्टॉरंट्स, चार गाड्यांच्या विक्रीची दुकानं, चार-पाच शेतीच्या अवजारांची दुकानं, एक छोटं हॉस्पिटल, एक छोटा (दहा) दुकानांचा मॉल, पाच गॅस स्टेशनं, एक वॉलमार्ट आणि तब्बल सोळा चर्चेस होती. गावातून दक्षिणोत्तर जाणारा यु एस-७५ हा रस्ता गावाला मधोमध दुभागून जात होता. त्याच्या दोहो बाजूस साधारण मैलभराच्या लांबीमधे ही सारी दुकानं, रेस्टॉरंट्स, गॅस स्टेशन्स वगैरे दाटीवाटीने उभी होती. सू सेंटर हे या भागातलं मोठं गाव असल्यामुळे, आजूबाजूच्या छोटया गावांतले लोक इथे शॉपींग करायला किंवा रेस्टॉरंटस मधे जायला येतात, हे ऐकल्यावर मी कपाळाला हात लावला. इथे काही आठवडयाचा बाजार वगैरे भरतो आणि आसपासचे शेतकरी इथे बैलगाडया वगैरे घेऊन येतात की काय, हे विचारायचा मोह मी मोठया कष्टाने आवरला. नाही म्हणायला, नजरेत भरण्यासारखे, मुख्य रस्याला लागूनच दोन मोठे जनावरांचे दवाखाने आणि पशुखाद्य बनवण्याच्या दोन छोटया कंपन्या होत्या. यु एस-७५ च्या एका बाजूला गावाचा रहिवासी (residential) भाग होता. रस्त्याच्या दुसर्या बाजूला, काही अंतरावर, गावाबाहेरुन जाणारी रेल्वे लाईन होती. रेल्वे लाईनला लागूनच मोठा ग्रेन एलेवेटर (grain elevator) होता. ग्रेन एलेवेटर म्हणजे धान्य साठवण्याच्या मोठाल्या इमारती. शेतांतून आलेले धान्य या एलेवेटर्सपर्यंत आणून ते conveyor belts च्या सहाय्याने इमारतीच्या वरच्या भागात नेऊन साठवलं जातं. मग जरूरी प्रमाणे वेगवेगळ्या पाईप्समधून ते ट्रक्स, मालगाड्यांचे डबे किंवा बोटींमधे भरून दूर अंतरावर त्याची पाठवणी केली जाते. त्यामुळे साहजिकच, बंदरांमधे किंवा रेल्वे लाईन्सच्या जवळ असे एलेवेटर्स बांधलेले असतात.
अमेरिकेच्या ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था बर्याच अंशी शेती प्रधान आहे. १९९७ सालच्या अहवालानुसार, अमेरिकेत त्यावेळी १९ लाख फार्मस् होते. या प्रचंड संख्येने आणि दूरवर पसरलेल्या फार्मस्वरून धनधान्याची ने-आण करणं हे एक मोठंच आव्हान आहे. प्रेअरी आणि ग्रेट प्लेन्सच्या भागामधे, धान्य आणि तेलबियांचं उत्पादन मोठं आहे. या फार्मस्वरुन हे धान्य आणि तेलबिया गोळा करून साठवण्यासाठी आणि पुढे ते इतरत्र पाठवण्यासाठी ग्रेन एलेवेटर्स चा मोठाच उपयोग होतो. किंबहुना मिडवेस्टच्या कानाकोपर्यात, क्षितीजावर दिसणारे ग्रेन एलेवेटर्स हे एक अविभाज्य अंग आहे. मिडवेस्टच्या देवभोळ्या, कष्टकरी जनमानसात, चर्चेस आणि ग्रेन एलेवेटर्स ही दोन अतीव महत्वाची श्रद्धास्थानं !
धान्याच्या ने-आण करण्याच्या उद्देशामुळे मिडवेस्टमधे, रेल्वेच्या वाहतुकीला खूपच महत्व आहे. या भागातलं रेल्वेचं जाळं मुख्यत: १९१० पूर्वीचं. त्यावेळी तर अगदी छोट्या छोट्या गावांपर्यंत रेल्वेचे फाटे गेलेले होते. उद्देश हा की, शेतकर्यांना धान्य आपल्या घोडागाडीतून जवळच्या ग्रेन एलेवेटर पर्यंत आणून, संध्याकाळी अंधार होण्याच्या आत घरी परतता यावं. परंतु आता ग्रेन एलेवेटर्सची संख्या कमी होऊ लागलेली आहे. पूर्वी जवळपास प्रत्येक गावात छोटा ग्रेन एलेवेटर असावयाचा, त्याच्या जागी आता थोडेसेच पण मोठे आणि आधुनिक ग्रेन एलेवेटर्स दिसू लागले आहेत. त्यामुळे पूर्वी साधारणपणे शेतकर्यापासून १०-१२ मैलाच्या अंतरावर ग्रेन एलेवेटर असायचा तर आता त्याच कामासाठी शेतकर्याला ५० मैलांवर जावं लागतंय.
Leave a Reply