सुरवातीला वर्षभर आम्ही गावातल्या घरात रहात होतो. मग माझं संशोधन प्रकल्पाचं काम जसं वाढलं आणि संध्याकाळी उशीरा किंवा शनिवार रविवारी देखील जसं काम सुरू झालं, तसं आम्ही कंपनीच्या जुन्या फार्महाऊसवर रहायला गेलो. हे फार्महाऊस साधारणपणे सत्तर वर्षांचं जुनं आणि फारसं निगराणी न राखलेलं होतं. त्याचा उपयोग केवळ आमच्यासारखे काही काळापुरते येऊन प्रकल्पाचे काम करणारे किंवा फार्मवर उन्हाळ्याच्या सुट्टीत कामासाठी येणारे कॉलेजचे विद्यार्थी करायचे. आतापर्यंत बहुतेक सारे अविवाहित कॉलेज तरूण, तरूणी तिथे येऊन रहात असल्यामुळे, घराला आणखीनच हॉस्टेलची कळा आलेली होती. आम्ही त्यामानाने प्रौढ आणि कुटुंबीय, त्यामुळे इतर कॉलेज विद्यार्थ्यांबरोबर ते फार्महाऊस शेअर करण्याऐवजी सारं घरच आम्हाला देण्यात आलं.
घराला खालच्या मजल्यावर मोठा दिवाणखाना, एक स्टडीरूम, एक बेडरूम, किचन आणि डायनिंग रूम होती. वरच्या मजल्यावर तीन बेडरुम्स होत्या. कार्पेट आणि वॉलपेपर कधी बदललेले होते कुणास ठाऊक. घरात सर्व फर्निचर होतं पण ते देखील असंच जुनाट. बाहेरुन घराचा रंग करडा निळसर होता आणि पोपडे उडून आतल्या लाकडाचा मूळ रंग काही ठिकाणी दिसत होता. घराला वरच्या दोन बेडरूम्सना जोडून एक पोटमाळा (attic) होतं. त्यात कधी काळचं जुनं सामान अडगळीत पडलेलं होतं. मृणालने एक दोनदा ती अडगळ व्यवस्थित करण्याचा, धूळ झटकण्याचा प्रयत्न करून पाहिला आणि शेवटी तो नाद सोडून दिला. त्यात वटवाघळं किंवा इतर काही प्राणी नव्ह्ते हेच नशीब!
घराला एक तळघर (basement) होतं. त्याचं दार उघडलं की अलीबाबाच्या गुहेत प्रवेश केल्यासारखं वाटायचं. त्याच्या दाराशी एक दिव्याचं बटण होतं. ते लावून दिवा लावला की खाली जाणार्या पायर्या दिसायच्या. आत गेलं की अशीच अडगळ आणि मोडक्या तोडक्या वस्तूंची गर्दी! त्यात जुने पुराणे वॉशर, ड्रायर, फ्रिझ वगैरे देखील पडले होते. तिथेच घराची furnace देखील होती. हिवाळ्यात ती चालू केली की सारं घर बर्यापैकी उबदार व्हायचं. बर्यापैकी अशासाठी की घर इतकं जुनं असल्यामुळे खिडक्या दारांच्या चौकटीजवळ बारीकशा फटी आणि भेगा झाल्या होत्या आणि त्यातून आत शिरणारं गार वारं आमच्या furnace च्या उबदार हवेशी झटापट करायचं. त्या तळघराचं एकंदर रूप बघून आम्ही तिथे फक्त जरूरीपुरते जायचो. इतर वेळी तळघराचा दरवाजा बंद केला की अलीबाबाची ती जादुची गुहा, आपली सारी अडगळ पोटात घेऊन निपचीत पडून रहायची.
घराला जोडूनच एक गराज होतं. त्याची जमीन चक्क मातीची होती. त्याचं दार म्हणजे लाकडाच्या फळ्या जोडून केलेले दोन दरवाजे. गाडीतून आलं, की कुणीतरी गाडीतून खाली उतरायचं, दरवाजाची मोठाली कडी उघडायची, दरवाजे दोन बाजूला ओढून घ्यायचे, ते परत बंद होऊ नयेत म्हणून त्याला दोन्ही बाजूला दगड लावायचे आणि मग गाडी गराजमधे घ्यायची. परत तेच सोपस्कार करून दरवाजे बंद करायचे, बाहेरून कडी लावायची आणि मग मुख्य दारातून घरात शिरायचं. इथे सगळी सपाट जमीन आणि त्यात वार्याला अडथळा करतील अशी झाडं अगदीच नावापुरती. त्यामुळे पार उत्तरेला कॅनडातून येणारे थंडगार वारे सारखे भणाणत असायचे. त्यामुळे त्या वार्यांच्या जोरापुढे, लाकडी दरवाजे उघडून त्यांना दगड लावणं म्हणजे मोठीच कसरत असायची. थंडीत तर उबदार गाडीतून खाली उतरून, थंडी वार्याशी झुंजत, गराजचे दरवाजे उघडायला जीवावर यायचं. मला तर त्या गराजकडे बघितलं की त्याच्या आत घोडे बांधून ठेवले असतील आणि एखादा क्लिंट ईस्टवूड घोडयावर बसून गोळीबार करत बाहेर येईल की काय, असं वाटत रहायचं.
घराच्या आवारात, पुढच्या पायर्यांजवळ एक मोठंसं मेपलचं झाड होतं. घराच्या मागे चांगलं मोठं लॉन होतं. लॉनच्या एका कोपर्यात चेरी ब्लॉसम आणि दुसर्या कोपर्यात सफरचंदाचं अशी दोन छोटी झाडं होती. उन्हाळ्यात अधे मधे कंपनीतील लोक येऊन लॉन कापून जायचे, हिवाळ्यात तर बर्फ पडलेलं असल्यामुळे काही प्रश्नच नसायचा. घराच्या तीन बाजूंना, साधारण १०० फूट सोडून फार्मचं कुंपण होतं, त्यामुळे घराच्या कुठल्याही खिडकी, दरवाजामधून पाहिलं तरी, कुंपणापलीकडे शेकडो काळ्या कुट्ट बीफ गायींचं दर्शन व्हायचं. दिवसाच्या ठरावीक वेळेला फार्मचे ट्रॅक्टर्स, गायींसाठी चारा आणि आंबोण घेऊन यायचे आणि कुंपणाच्या कडेला बांधलेल्या सिमेंटच्या पन्हाळीमधे ओतत जायचे. तेवढयापुरता गायींच्या हंबरण्याचा, धावण्याचा, खुरांचा आवाज आसमंतात भरून रहायचा. त्या आवाजाची आम्हाला पुढे एवढी सवय झाली की घडयाळात न बघता, आम्हाला गायींच्या ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरची वेळ सांगता येऊ लागली.
घराच्या मागच्या बाजूला, लॉन संपलं की कच्चा रस्ता आणि रस्त्याच्या पलिकडे मक्याची शेतं. त्यामुळे तीन बाजूंनी गायींचे कळप आणि चौथ्या बाजूला मक्याची शेतं यांचा आमच्या फार्महाऊसला वेढा पडलेला होता. गायींच्या आवाजानं चांगली जाग असायची. भारतात असताना, घोडयांच्या, गायींच्या फार्मवर राहिल्यामुळे, मला या आवाजाची सवय होती. मृणालने देखील लग्नानंतर काही महिने, आमच्या NDDB च्या बीडजच्या फार्मवरच्या घरात घालवल्यामुळे, तिला देखील अशा आयुष्याची कल्पना होती. सिद्धार्थच्या दृष्टीने मात्र हा जगावेगळा अनुभव होता. मुंबईतल्या लोकल ट्रेन्स, गाडया, बसेस, रिक्षा, गर्दी, कोलाहल, या सगळ्यांपेक्षा हे जग फारच वेगळं होतं.
गायींच्या खाण्याच्या वेळचा आरडाओरडा, गोंधळ सोडला, तर इतर वेळ त्या शांत असायच्या. घरामागच्या कच्च्या रस्त्यावरून जाणार्या गाडया मोजायच्या म्हटलं, तर तासाभरात माणूस कंटाळून झोपी जाईल, अशी परिस्थिती. ट्रॅक्टर्स आणि ट्रक्स थोडया वेळापुरते येऊन जाणारे, त्यामुळे शांतता हाच इथला स्थायिभाव! ना कसला गोंधळ, ना आरडा ओरडा, ना गायींचा आवाज, ना कुत्र्यांचं भुंकणं. फक्त वारा असला की दारा खिडक्यांच्या फटीतून येणारा त्याचा आवाज हीच तेवढी जाग. मैलामैलाच्या अंतरावर रस्ते असल्यामुळे आणि साधारणत: उभे आडवे रस्ते मिळतील अशा कोपर्यांवर एक एक घर असल्यामुळे, आमचे जवळचे शेजारी मैलाच्या अंतरावर होते. मुंबईकर माणसाला कल्पना करणं देखील अवघड जावं, अशी ही परिस्थिती होती.
घराच्या आसपास थोडीफार बीळं होती. क्वचित छोटे साप दिसायचे. पण ते बिनविषारी आणि निरुपद्रवी आहेत, असे सांगून सगळ्यांनी आम्हाला निर्धास्त केलं होतं. बहुतेक बीळं सशांची असायची. पहाटे आणि संध्याकाळी बिळांतून बाहेर येऊन गवतावर बसलेले ससे हमखास दिसायचे. हे ससे मातकट, कबर्या रंगाचे, मातीच्या रंगाशी मिसळून जाणारे. संध्याकाळी, रात्री बाहेरून आलो आणि गाडी आवारात शिरली की गाडीच्या दिव्यांच्या उजेडात चरणारे ससे दिसायचे. क्षणभर टवकारून बघायचे आणि मग अचानक भानावर येऊन बाजूच्या अंधारात उडया मारून नाहीसे व्हायचे. झाडं फारशी नसल्यामुळे खारी त्यामानाने कमीच दिसायच्या. इतर प्राणी फारसे काही दृष्टीस पडायचे नाहीत पण हिवाळ्यात जेंव्हा सारी जमीन बर्फाच्छादित असायची, तेंव्हा सकाळी उठल्यावर, घराच्या आसपास अनेक प्राण्यांच्या पाऊल खुणा बर्फात उमटलेल्या दिसायच्या. त्यावरून रात्री घराच्या आसपास प्राण्यांचा वावर असणार, हे समजायचं. हळू हळू ते ठसे बघून जनावरांचा अंदाज यायला लागला. रकून्स, हरणं आणि सशांच्या पाऊलखुणा ओळखता येऊ लागल्या.
Leave a Reply