नवीन लेखन...

अमेरिकेतील छोटी गावे – भाग ४

Gavakadchi America Small Towns in America - Part 4

पालक देखील तेवढेच मनापासून शाळेत सहभागी होणारे. संध्याकाळचे जेवण पाच साडेपाच वाजताच आटोपून चर्चमधे choir प्रॅक्टीस (समूह – गान) करायला जाणे नित्याचेच. त्यामानाने शाळेतले कार्यक्रम कधीतरी होणारे, आणि म्हणून अधिक लोकप्रिय. आपल्या मुलांच्या शाळेतल्या बेसबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, फुटबॉल वगैरे टीम्सना पालकांचा उदंड प्रतिसाद असतो. आसपासच्या गावातल्या इतर छोट्या शाळांच्या टीम्स आल्या की सामने मोठे अटीतटीचे होतात. मोठमोठ्या व्यावसायिक खेळांच्या टीम्स प्रमाणे छोट्या छोट्या शाळांच्या टीम्सना देखील स्वत:ची जान पेहचान असते. ह्या टीम्स मग आपल्या गावाच्या नावापुढे आपल्या टीमचं नाव लावून स्वत:ची ओळख निर्माण करतात. जसं सू सेंटर वॉरियर्स, रॉकव्हॅली रॉकेट्स, डिक्सन सिटी ईगल्स वगैरे. प्रत्येक टीमचा युनिफॉर्म आणि रंगसंगती ठरलेली असते. त्यामुळे आपल्या शाळेच्या टीमला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या रंगसंगतीची जॅकेट्स किंवा टोप्या वापरून पालक, इतर कुटुंबीय आणि मित्रमंडळी अशा सामन्यांना आवर्जून उपस्थिती लावतात. खेळांप्रमाणेच शाळांचे band concerts देखील असेच भरपूर लोकप्रिय असतात. चार-सहा महिन्यांतून जेंव्हा कधी असा concert शाळेच्या सभागृहात किंवा जिम्नॅशियम मधे सादर होतो तेंव्हा मुलांचे आई वडील, आजी आजोबा, लहान भावंडं असा सगळा लवाजमा हजर असतो.

सॉकरची प्रॅक्टीस गावातल्या मैदानावर होते तेंव्हा लहान मुलामुलींच्या टीम्स आजूबाजूच्या ग्राउंड्सवर खेळत असतात. मुलांचे आई-वडील, आजी-आजोबा, भावंडं घरनं येतांना गाडीतून घडीच्या खुर्च्या, सतरंज्या वगैरे घेऊन येतात. मग दोन ग्राउंड्सच्या मधल्या जागेत खुर्च्या, सतरंज्या टाकून हा सारा कुटुंब कबिला विसावतो. मोठी माणसं कौतुकाने आपल्या मुला/नातवंडांना खेळताना बघत असतात. लहान मुलं आसपास धावपळ करत असतात. उन्हाळ्याचे तीन-चार महिने आणि त्यातून मिळणारे मोजकेच लख्ख सूर्यप्रकाशाचे दिवस, खुली मोकळी हवा आणि निसर्गाशी जवळीक सगळे जण मनापासून उपभोगत असतात.

मिडवेस्ट आणि ग्रेट प्लेन्सच्या बर्‍याचशा भागात गावांमधली अंतरं खूप. काही छोटी गावं तर इतकी दूर दूर असतात की तिथून कुठे जायचं म्हणजे अंतराचा हिशोब न करता तासांचाच हिशोब करावा लागतो. गावात असलंच तर एखादं छोटंस किराणामालाचं किरकोळ दुकान असणार. आठवड्याची किंवा पंधरवड्याची खाण्यापिण्याची सोय करायची म्हणजे अर्ध्या पाऊण तासावर जरा बर्‍याशा गावी जायचं. कपड्यांची वगैरे खरेदी करायची म्हटली तर दीड दोन तासांचा पल्ला गाठून एखाद्या बर्‍यापैकी मोठ्या गावात जायचं. मग या छोट्या गावातल्या मुला माणसांसाठी, साधी कपड्यांची खरेदी म्हणजे एक छोटंस काम न राहता तो एक सोहळाच बनतो. ठेवणीतले कपडे घालून, थोडंसं नटून सजून, धुळी चिखलानं भरलेली गाडी धुवून, लोक अशा मोठ्या गावात जातात. मग नुसतंच घाईघाईने खरेदी उरकून घरी परतण्यात काय मजा? मग कुठे नुसतं मोठ्या गावातल्या प्रशस्त रस्त्यावरून फिरणं, थोड्या मोठ्या आणि लखलखीत इमारती बघत रहाणं, खाणं पिणं, एखादा सिनेमा बघणं, ट्रॅक्टरच्या किंवा पिक-अप ट्रकच्या शोरूम्स मधे जाऊन नवीन ट्रक किंवा ट्रॅक्टर्स बघणं, असा भरगच्च कार्यक्रम असतो. लोक भल्या सकाळी आपल्या गावातून निघतात आणि दिवसभर अशी जीवाची चैन करून रात्री अंधार पडला की परत आपल्या खेडेवजा छोट्या गावाकडे परततात.

— डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..