नवीन लेखन...

अमेरिकेतील छोटी गावे – भाग ७

Gavakadchi America Small Towns in America Part 7

अगदी छोट्या (चार-पाचशे वस्तीच्या) गावांमधे तर सगळेजण एकमेकांना ओळखतात. थोड्या मोठ्या (दोन-चार हजार वस्तीच्या) गावांमधे सगळ्यांच्या ओळखी नसल्या तरी ओळखीचं हास्य तरी असतं. गाडीतून, पिक-अप ट्रकमधून जाता येताना एकमेकांना हात वर करून ओळख दाखवणं, हा सर्वसाधारणपणे शिरस्ता असतो. नवीन लोकांना देखील गाडीतून जाताना ओळखीचं हास्य किंवा हात वर करून दाखवणार. गावातल्या छोट्याश्या पोलीस ठाण्यामधे मोजून असणार दोन किंवा तीन पोलीस. त्यामुळे प्रत्येक पोलिसाला गाववाले ओळखतात. मग अगदी कोणत्या वीकएंडला कोणत्या पोलिसाची ड्युटी आहे, तो नवशिक्या आहे की तीस वर्षे खात्यात काढून मुरलेला आणि आजोबांसारखा प्रेमळ आहे, हे देखील सगळ्यांना ठाऊक. प्रत्येक पोलीस कुठे रहातो हे देखील सार्‍या गावाला माहीत. त्यामुळे शक्यतो त्याच्या घराच्या आसपासच्या रस्त्यावर आरडा ओरडा किंवा धिंगाणा न घालण्या एवढी पोराटोरांना देखील अक्कल आलेली असते. अगदी छोट्या गावांमधे तर सारा गावच जणू पोलीसाचे काम करत असतो. गावातल्या उंडारणार्‍या पोरांवर सगळ्या गावाचं लक्ष असतं. त्यामुळे वाह्यात पोरांच्या उनाडक्या आई बापांच्या कानावर जायला वेळ लागत नाही आणि त्यात काही गैर आहे असं आई बापांनाही वाटत नाही.

छोट्या गावांमधले रस्ते देखील छोटे आणि रहदारी देखील तुरळकच. अशा गावांमधे ट्रॅफिक लाईट्स देखील जेमतेम एक दोनच असतात. काही ठिकाणी उघडझाप करणारे (blinking) लाईट्स असतात. त्याच्या अनुसार तिथे आलं की गाड्या हळू करायच्या, आजूबाजूचा अंदाज घ्यायचा आणि मग पुढे जायचं. बहुतेक ठिकाणी stop signs असतात. त्याच्या अनुरोखाने गाड्या बरोबर थांबून मगच पुढे जातात. गाववाल्यांची पत्ते सांगायची पद्धत देखील विशिष्ट असते. सगळा उल्लेख, डांबरी रस्ता (black top) किंवा कच्चा रस्ता (gravel or dirt road) या संदर्भात होणार. दिशांचा अदमास तर यांच्या अंगी अगदी लहानपणापासूनच मुरलेला असतो. Go two blocks east on black top, then go two and half blocks on the dirt road अशा सूचना सर्रास ऐकायला मिळतात. अशा प्रकारे सूचना देऊन कोणी पत्ता सांगायला लागलं की सुरवातीला आम्ही अजागळासारखे बघत रहायचो, मग समजल्यासारखं दाखवून मुंडी हलवायची आणि हळूच उघड्यावर येऊन आकाशात सूर्य कुठे दिसतोय ते बघायचं आणि त्यावरून आडाखे बांधून दिशेचा अंदाज घ्यायचा. पुढे पुढे मग आपल्या परिसराचा अंदाज आला की त्यांच्या दिशादर्शक सूचना आपल्या संदर्भात बसवायच्या. म्हणजे मुख्य रस्त्यावरून चर्चच्या दिशेला वळलं की आली ईस्ट किंवा गॅस स्टेशनवरून उजवीकडे वळले की झाली साउथ वगैरे. तरी देखील गोंधळल्यासारखं व्हायचं ते होतंच. (आपल्या सारखं “गांधी रोड वरून वंदना टॉकीजच्या बाजूच्या गल्लीत वळायचं किंवा मारुतीच्या देवळावरून खाली आलं की कट्ट्यावर बसलेल्या कुणालाही विचारा – कुलकर्णी कुठे रहातात ते”. असा प्रकार नाही). Enter from the east or west entrance at the south end of the building, असल्या सूचनादर्शक पाट्या पाहून लिहिणार्‍याला गदगदून हलवून सांगावसं वाटतं “अरे बाबा, असं कोडं सांगितल्यासारखं का सांगतोस ? सरळ सांग ना की गॅस स्टेशनच्या बाजूला जे दार आहे तिकडून आत शिरा किंवा पोस्ट ऑफिसच्या जवळच्या दरवाजाचा वापर करा” म्हणून.

छोट्या गावांमधे downtown म्हणजे मोठा मजेशीर प्रकार असतो. एका रस्त्याच्या दोन बाजूंस असलेली काही दुकानं म्हणजे downtown. त्यात एक दोन बॅंका, दोन चार रेस्टॉरंट्स, गॅस स्टेशन्स, काही अ‍ॅंटीक शॉप्स, एखादं दुसरं ग्रोसरी स्टोअर, बार्बर शॉप, छोटसं पोस्ट ऑफिस, dairy queen सारखं एखाद आईस्क्रीम शॉप, अशी सारी दाटीवाटीने बसलेली. या दुकानांना पार्कींग लॉट नसतो. त्यांच्या समोर रस्त्यावरच गाड्या लावायच्या आणि उतरून दुकानात जाऊन कामं उरकायची. एक काळ होता जेंव्हा छोट्या गावांमधे घरगुती स्वरूपाची दुकानं म्हणजे जीवनाचा एक अविभाज्य भाग होता. त्यात किराणा मालापासून घरगुती वापरायच्या वस्तूंपर्यंत बरंच काही मिळायचं. गावातली पोरं उन्हाळ्यात आईस्क्रीम खायला किंवा गोळ्या चॉकलेट खायला तिकडे यायची. घरात कधी गरज लागलीच तर विजेचे दिवे, खिळे, शाळेच्या वह्या वगैरे लहान सहान गोष्टींसाठी लोक तिकडे धाव घ्यायचे. चकाट्या पिटण्यासाठी, घडीभर टेकण्यासाठी, पंचक्रोशीतल्या भानगडी ऐकण्यासाठी, स्थानिक राजकारणावर गरमा गरम चर्चा करण्यासाठी, ते एक हक्काचं ठिकाण असायचं. मुलांना उधारीवर खाऊ देतांना कुणी त्यांच्याकडे ओळखपत्र मागायचं नाही आणि दुकानदाराच्या उधारवहीत नुसतं नाव लिहून त्याच्यापुढे पैसे लिहून ठेवले तर चालायचं. एखाद्या न्हाव्याच्या दुकानात, दर्शनी काचेमधे “आज संध्याकाळी आपल्या शाळेची टीम जिंकली तर उद्या जे कोणी येतील त्यांचा हेअर कट फुकट” असा आपुलकीचा आणि गावातल्या शाळेबद्दलचा जिव्हाळा दाखवणारा बोर्ड दिसायचा.

पण हळू हळू हे चित्र बदलत आहे. वॉलमार्टने अमेरिकेच्या आतल्या भागांमधे देखील आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रचंड स्टोअर्समधून सारं काही उपलब्ध असतं. भाजीपाला, इतर खाद्यपदार्थ, कपडे, औषधं, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर, घरातल्या वापरातल्या सार्‍या वस्तू, जे म्हणावं ते. त्यांच्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर चाललेल्या उद्योगामुळे वॉलमार्ट जितक्या स्वस्त दरात वस्तू विकू शकते, तितक्या स्वस्त दरात ही जुनी दुकानं विकू शकत नाहीत. वॉलमार्टच्या जगडव्याळ पसार्‍याला टक्कर देऊन टिकून रहाणं या छोट्या दुकानांना शक्यच नसतं. त्यामुळे ही छोटी दुकानं धडाधड बंद होऊ लागतात. उदाहरणार्थ नुसत्या आयोवा राज्यामधेच १९८३ ते १९९३ च्या दशकामधे वॉलमार्टच्या आक्रमणामुळे ७३०० छोटी दुकानं बंद झाली. एकंदर पाहणीवरून असा निष्कर्ष निघतो की वॉलमार्ट किंवा तत्सम एखादं मोठं दुकान एखाद्या आतल्या भागात सुरू झालं की पुढच्या ४-५ वर्षांत आसपासच्या २० मैल अंतरापर्यंतच्या छोट्या गावांत साधारण २०% धंदा कमी होतो. वॉलमार्ट भले नवीन रोजगार निर्माण करण्याच्या वल्गना करत असेल पण आजवरचा अनुभव असं सांगतो की वॉलमार्टने निर्माण केलेल्या दर १०० रोजगारांमागे, आजूबाजूच्या छोट्या दुकानांतील १५० लोकांच्या रोजगारीवर गदा आलेली असते.

लोक देखील एकदा वॉलमार्ट संस्कृतीची चटक लागली की आपल्या छोट्या गावातल्या छोट्या दुकानांमधे जाणं टाळायला लागतात. हे सारं अपरिहार्यच आहे. या मोठमोठ्या super market chains जसजशा आपले पाश अमेरिकेच्या अंतर्भागातल्या छोट्या आणि मध्यम गावांभोवती आवळायला लागल्या आहेत आणि जागतिकीकरण हे जसजसं दिवसेंदिवस प्रखर सत्य होत चाललं आहे, तसतसं ग्रामीण अमेरिकेच्या ह्या जुन्या जीवनातल्या एका पर्वाचा अंत जवळ येत चालला आहे.

 

— डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..