माझा जन्म मुंबईचा. आयुष्याची साधारण ३० वर्षं मुंबईत काढलेला मी एक अस्सल मुंबईकर आहे. आई वडिलांच्या दोघांच्याही बाजूने वकीली आणि शिक्षकी हे दोन महत्वाचे पेशे. दोन्ही बाजूंच्या कुटुंबांमधे काहीजण डॉक्टर्स किंवा इंजिनिअर्स, बरेचसे पोस्टग्रॅज्युएट्स आणि काहीजण Ph.D. त्यामुळे घरातलं वातावरण शिक्षणाला सर्वस्व मानणारं. बहुतेक सारेजण मुंबई, पुण्यात स्थिरावलेले. त्यामुळे या सार्या शहरी वातावरणात, गावरान वारा लागण्याचं काहीच कारण नव्हतं. नाही म्हणायला ९-१० वर्षांचा होईपर्यंत मी आजोळी (आईच्या माहेरी) डोंबिवलीला वाढलो. डोंबिवली म्हणजे मुंबईपासून ५० कि.मि.वर ठाणे जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. मध्य रेल्वेवर ठाणं आणि कल्याण या दोन मोठया गावांच्या मधे आणि रेल्वेच्या लोकल सेवेने मुंबईपासून तासाभराच्या अंतरावर. १९६५ – १९७० च्या सुमारास देखील डोंबिवली फार वेगळं होतं. त्यावेळी ते उच्चभ्रू, सुसंस्कृत लोकांचं, मुंबईच्या धकाधकीपासून दूर पण तरीही सोईस्कर अंतरावर वसलेलं असं एक छोटंसं वसतिस्थान होतं. गावाच्या सुसंस्कृत वातावरणाची साक्ष पटवण्यासाठी पु.भा. भावे आणि शं.ना.नवरे यांच्यासारखे दिग्गज साहित्यिक / नाटककार डोंबिवलीला आपलं घर मानून रहात होते.
आजीच्या घरातून पाठीमागे भाताची शेती दिसायची. पुढच्या अंगणात पेरू, चिंचा, जांभूळ आणि पपईची झाडं होती. त्यामुळे घरची फळं खाण्याचा आनंद उपभोगला होता. आजीच्या घरापुढच्या रस्त्याच्या कडेलाच भाजीवाले, फळवाले टोपल्या घेऊन विकायला बसायचे. त्यावेळी डोंबिवलीत व आजूबाजूच्या खेड्यांमधे आगरी लोकांची वस्ती खूप होती. आगरी म्हणजे ठाणे जिल्ह्यातील आदिवासी. कमरेला जेमतेम फडकी गुंडाळलेले आगरी पुरुष आणि चापूनचोपून नेसलेल्या रंगीबेरंगी लुगडयातल्या आगरी बायका कायम दिसायच्या. सगळे रापलेले आणि काटक. पुरुषांच्या कमरेला उघडे कोयते आणि बायकांच्या केसात भरपूर फुलं. काही आगरी बायका आजीकडे वर्षानुवर्षे घरकामाला होत्या. कुणी शेतातले तांदूळ घेऊन यायचं, कुणी वरी, तर कुणी करवंद. उन्हाळ्याच्या दिवसांत कलिंगड, टरबुजांनी भरलेल्या बैलगाडया घेऊन आजूबाजूच्या खेडयांतून आगरी लोक यायचे. आजीच्या घरासमोरच बैलगाडया सोडून बैलांना बांधून ठेवलं जायचं. या बैलगाडया घेऊन येणारे काही आगरी लोक आजीच्या चांगले ओळखीचे झाले होते. मग ते कधी कधी विकायला आणलेल्या कलिंगडांची रास आजीच्या घरातच लावून जायचे.
आजीच्या घरासमोरचं अंगण मातीचं होतं. दर आठवडा पंधरवडयाने ते शेणानं सारवलं जायचं. समोरच्या रस्त्याच्या कडेला भाजीवाल्यांनी इतस्तत: टाकून दिलेला सडका भाजीपाला खायला गावातली भटकी गाई-गुरं यायची. ती कधी मधी आजीच्या अंगणात फुलझाडं खायला किंवा अंगणात वाळत टाकलेलं काही हुंगायला यायची. मग त्यांना आरडा ओरडा करून हुसकावून लावलं की मोठंच काम केल्यासारखं मला वाटायचं. शाळेतनं आलं की संध्याकाळी हुंदडतांना आसपास मोकाट गुरांचा वावर कायम असायचा. त्यातले काही सांड कधी कधी एकमेकांवर नाक फेंदारून आणि शिंगं रोखून चालून जायचे आणि त्यांच्या झुंजीमुळे सगळीकडे धुरळा उडायचा. आसपासचे लोक आरडा ओरडा करून, दगडं काठया मारून त्यांना पळवून लावायला बघायचे. मग तो सगळा गलका ऐकून आजी किंवा मामा धावत बाहेर यायचे आणि आम्हा मुलांना घरात घेऊन जायचे.
त्याकाळी डोंबिवली गावाच्या थोडसं बाहेर गोग्रासवाडी म्हणून एक गोशाळा होती. आजूबाजूला भरपूर झाडी आणि शेतं असलेलं ते एक शांत आणि सुंदर ठिकाण होतं. कधीतरी काही सणानिमित्ताने किंवा केवळ सहलीसाठी आजी आणि आजूबाजूच्या बायका आम्हा मुलांना तिकडे घेऊन जायच्या. त्या श्रद्धाळू बायकांच्या देखरेखीखाली आम्ही मुलं त्या गाई वासरांना हिरवं गवत आणि गूळ खायला द्यायचो आणि त्यांच्या डोक्यावरून हात फिरवून नमस्कार ठोकायचो.
माझ्या मामांना भटकण्याची खूप आवड. त्यामुळे शनिवार-रविवारी आसपासच्या खेडयांमधे, टेकडयांवर, खाडयांवर मामांबरोबर मी खूप भटकलो. कल्याण किंवा मुंब्र्याच्या खाडीवर जायचं, करवंदाच्या जाळीमधून फिरून करवंद खायची, शेतांच्या बांधांवरून चालायचं, पावसात भिजायचं हे सारं भरपूर केलं.
एकंदरीत १९६० च्या दशकातल्या डोंबिवलीने मला एका छोटयाशा गावातलं स्वछंद बालपण उपभोगू दिलं. त्या निमग्रामीण वातावरणाचा रंग माझ्या नकळत माझ्या अंतरंगावर पक्का बसला आणि मग पुढे शहरी वातावरणाचे, रंगाचे, कितीही थर त्यावर चढले तरी तो मूळ निमग्रामीण वातावरणाचा गाभा काही पुसला गेला नाही.
१९७१ साली आजोळ सोडून मी माटुंग्याला (मुंबई) आई वडिलांकडे रहायला आलो. दादरच्या बालमोहन विद्यामंदिर या मराठी माध्यमाच्या, त्या काळच्या मुंबईतल्या अग्रगण्य शाळेमध्ये पाचवीपासून शिकू लागलो. दादासाहेब रेग्यांसारख्या (मुलांसाठी “दादा”) शिक्षण महर्षींनी सुरू केलेल्या या शाळेने, मराठी माध्यमाची कास धरून, मध्यमुंबईतल्या कमीत कमी दोन पिढयांवर शुद्ध मराठी मध्यमवर्गीय संस्कार केले.