नवीन लेखन...

गावगुंड

आमच्या गावी एक सार्वजनिक कुत्रा होता. आम्ही सगळेजण त्याला गावगुंड म्हणत असू. तपकिरी रंग आणि काळसर तोंड असलेला हा गावगुंड गावातल्या सगळया मोकाट कुत्र्यांचा बादशहा होता. वैयक्तिक पाळलेली कुत्रीही याच्यासमोर अंगापिंडाने किडमिडीत वाटायची. शहाणी कुत्री तर याच्या सावलीलाही यायची नाहीत. रात्री जेवणाचा टाईम झाला की तो चौकटीत येउुन उभा रहायचा. मग त्याला भाकरी टाकावी लागायची. सिध्या बोलाने भाकरी नाही टाकली तर भाकरीचे टोपले पळवणारा गावगुंडासारखा धाडसी कुत्रा मी आजवर बघितला नाही.

भल्या भल्या कुत्र्यांना फक्त दगड खाली घेण्यासाठी वाकण्याचा अवकाश की पळण्यासाठी रस्ते दिसायचे नाहीत. पण शत्रुपक्षाला शेपुट दाखवणे गावगुंडाच्या रक्तात नव्हते. दगड घ्यायला खाली वाकले हा गुरगुरायचा. हातात दगड घेतला की उठून उभा रहायचा आणि दगड मारण्यासाठी हात उगारला की हा थेट अंगावर धावून यायचा. माझ्या एका मित्राने गावगुंड झोपला असताना पाय वाजवून “भॉ..” करायचा गाढवपणा करून पोटात चौदा इंजेक्शने घेतली होती. म्हणून आम्ही गावगुंडाला गाठायचेच असेल तर गँगनेच गाठायचो. भरपूर लोक दिसले की तो परिस्थिती ओळखून मग पोबारा करायचा.

वास्तविक गावगुंड हा अतिशय बुद्धिमान प्रकारातला श्वानावतार होता. भटक्या प्रकारातली खूप कमी कुत्री एवढी हुशार असतात. तो चपात्यांच्या टोपल्यांपासून शिजवलेल्या भाजीपर्यंत ज्या ज्या वस्तू तोंडात येतील त्या त्या तत्सम वस्तू पळवायचा. दुसर्‍याला तोंडातला घास पळवण्यात त्याला कसला आसूरी आनंद वाटायचा ते तो खंडोबाच जाणे! गावातल्या कितीतरी लोकांना त्याने देवळापासून घरापर्यंत एका चपलेवर परतवले आहे. नेमकी एक चप्प्ल गायब करण्यात त्याचा दातखंडा होता.

एकदिवशी तर त्याने कहरच केला. चार दारुडयांची गँग पार्टी करायची म्हणून सकाळपासून गावात झुलत होती. खालच्या आळीतला आंदा त्यांचा म्होरक्या होता. बाकीच्यांनी “काय सरदार, किती दिवस झाले, काय पार्टीच न्हाय. आज होउुन जाउु द्या मटनाची पार्टी…” म्हटल्यावर सरदार हरभर्‍याच्या झाडावरच चढला. बायको रानात गेल्याची संधी साधून त्याने छपरात बांधलेले बोकडच कापायला काढले. चौघेही आधीच नशेत होते. चांगल्या कामात उगाच कुणाचा व्यत्यय नको म्हणून कुणाला सुगावा लागण्याआधी हे काम तेवढे आटपू या म्हणून आपापली कामे वाटून घेउुन लागलीच कामाला लागले.

बिचार्‍या बोकडाचा बळी गेला. उलटे टांगलेले बोकड कापून वाटे बनवण्याचे काम चालले होते. बाजूलाच बोकडाची मुंडी ठेवली होती. मालक म्हणून तिच्यावर आंदाचा हक्क होता. टांगलेले बोकड संपल्यावर त्यांचे लक्ष मुंडी ठेवलेल्या रिकाम्या जागेकडे गेले आणि त्याची उतरलीच. सगळे मेंबर पिउुन तर्र असल्याची संधी साधून गावगुंडाने बोकडाची मुंडी लांबवली होती. शिवाय लपतछपत न जाता तोंडात मुंडी घेउुन विजयोत्सव साजरा करत लोक मशाल घेउुन धावतात तशा धुंदीत तो गावभर धावत होता.

आंदा बाजीराव सिंघमच्या कॅरेक्टरमध्ये गेला. त्याची सटकली की त्याला खूप राग येतो, म्हणून कोणीही त्याचे डोके खायला जायचे नाही.बाजूलाच पडलेली कुर्‍हाड घेउुन तो गावगुंडाच्या मागे लागला. सगळ्या गावात तासभर हे थरारनाट्य चालू होते. सगळी गल्ली बोळं धुंडाळून झाली पण गावगुंड मिळाला नाही. आंदा हार मानायला तयार नव्हता. अंगातला शर्ट फाटला, अंगभर ओरखडे निघाले तरी सगळया काटयांकुटयातून तो गावगुंडाला हुडकतच होता. समोरून कुर्‍हाड घेउुन धावत येणार्‍या आंदाला बघितल्यावर लोक आल्या वाटेनं परत पळायला लागले. काहीही दुश्मनी नसताना या असल्या दारुड्याच्या हातून उगाचच जीव जायचा म्हणून लोक घरातून बाहेर यायला घाबरू लागले. दिवसा ढवळ्या सगळं गाव चिडीचूप झालं तरीही त्या सगळ्या गडबडीत कुणीतरी जीवावर उदार होउुन शेताला गेला आणि आंदाच्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून त्याच्या बायकोला रानातून घरी घेउुन आल्यावर पुढचा घोळ मिटला.

दावणीचे बोकड कापल्याचे समजल्यावर त्याच्या बायकोने गळा काढून जो गहिवर सुरु केला त्याने गावगुंडाचा पाठलाग तर बाजुलाच राहिला पण गावातल्या लोकांना “मी जिवंत आहे.” हे सांगून सांगून आंदाची पुरती दमछाक झाली आणि त्याने बायकोला शेतातून कुणी बोलवले याची चौकशी सुरु केली.

आणि गावगुंड पुन्हा एकदा विजयी झाला.

© विजय माने, ठाणे
https://vijaymane.blog/

Avatar
About विजय माने 21 Articles
ब्लॉगर व खालील पुस्तकांचे लेखक : १. एक ना धड (सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक २००८. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा राज्यपुरस्कार) २. एक गाव बारा भानगडी ३. All I need is just you! (English). मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..