नवीन लेखन...

गावकऱ्यांची फसवणूक

गावकऱ्यांची फसवणूक

लेखक -डॉ.धोंडोपंत मानवतकर

————————————————————————-
रात्रीचे आठ वाजले होते. भागुजीच्या डबड्या मोबाईलची बेल वाजत होती. भागुजीनं ताटावरून उठून फोन घेतला.
“हं, हालव..! ”
“हं, कोन बोलतंय ?”
“मी,बाजीराव घोडे बोलतोय,आमदाराचा पीए. कोन,भागुजी तात्या का?”
“हो सायब, मीच बोलतूय.!”
“आरं तात्या, तुजं घरकुल मंजुर करून घेतलंय बरं का.”
“बरं बरं मालक; लय बरं झालं बगा !”
“पर ते सायबाला ईस हजार म्या कबुल केलेतं..ते दोनच्यार दिसांत द्यावं लागतील..!”
“मालक सद्या त् जहेर खाला पैसा नाई.”
“आरं तात्या,याजागिजानं काड की. आसी संदी येनार नाही बग. नाईतर घरकुल वापस जाईन. हं,अन् पुन्हा सांगतो हे आपल्या गावच्या सरपंचाला कळू देऊ नकू. आमदार सायबाचं अन् सरपंचाचं लय वाकडं हाय बग. घरकुल वापस गेलं मून समज” असं बोलून बाजीरावानं फोन ठेवला. घरकुल मंजुर झालं म्हणून भागुजी आनंदी झाला होता.
दुसऱ्या दिवशी भागुजी गावात सगळ्या पैसेवाल्याकडे जाऊन आला;पण वीस रुपये शेकड्यानेसुद्धा त्याला कुणी पैसे दिले नाही.
त्याच दिवशी रात्री भागुजीने बाजीरावला जाऊन सांगितले,”मालक नाई मिळालं पैसं.” बाजीराव म्हणाला,” ठीके.! मी सकाळीच गेनू सावकाराला सांगून जातो..पर त्याचा भाव तीस रुपये शेकडा हाय.! चालंल ना.?”
“चालंल की. मंग काय करावं, घेऊत की.”
“बरं बरं ” म्हणत बाजीरावने भागुजीला न कळत घरातून वीस हजार खिशात घालून फट्फटीवर गेणू सावकाराकडे नेऊन दिले. बाजीराव आणि गेणूचं जुगाड अगोदरच ठरलेलं होतं.
दुपारी भागुजीनं गेणू सावकारांकडून ठरल्याप्रमाणे वीस हजार रूपये आणले आणि रात्री बाजीरावच्या घरी नेऊन दिले.तेव्हा बाजीरावने भागुजी देखत साहेबाला लटकेच दोन-तीन शिव्या हासडल्या. तेवढ्यात भागुजी बोलला,”मालक त्यान्लाबी कामाचं दाम नकु का ? ‘तळं राखल ते पानी चाखल.” बाजीरावालाही हेच ऐकायचं होतं .
बाजीरावाने गावातून घरकुल योजनेच्या नावानं बरेच पैसे उकळले होते. शे-सव्वाशे लोकांना अशाच प्रकारे गेणू सावकाराचेच म्हणून व्याजाने वाटले होते. गेेणूला येणाऱ्या व्याजातून पाच टक्के देत होता. दोघेजण गावातल्या गरीबांना लुटत होते.
बाजीराव हा आपल्या ‘खांडेवाडी’ गावात आमदार सोमनाथ ढेकळेचा पीए म्हणून सांगत असायचा. बाजीरावने जवळजवळ दोनशे लोकांचे घरकुलाचे खोटे खोटे फॉर्म भरले होते. लोक त्याला रोजच विचारू लागले, ‘कधी येईल घरकुल?’ तो म्हणायचा, “ह्या महिन्यात चेक येईल, नाहीतर पुढच्या महिन्यात येईल” असं म्हणत एक वर्ष लोटलं.
चैत्र महिन्यात एकेदिवशी खांडेवाडीत तहसिलदार आणि विस्तार अधिकारी आले. सरपंचाला घेऊन गावातून पाहणी करून ग्रामपंचायतीच्या पटांगणात खुर्च्या टाकून बसले. सरपंचासोबत गावातील घरकुलांबाबत चर्चा चालू होती. गावातील बरेच लोक जमा झाले होते. जमलेल्या सर्व लोकांना विस्तार अधिकाऱ्यांनी सांगितले की,”तुमच्या गावातल्या सगळ्या लोकांची घरकुलं मंजूर करायची आहेत. तुम्ही सरपंचाकडे फॉर्म भरून द्या..!” लोकं अचंबित झाले. बाजीरावाने फसवल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं. लोकं एकमेकांकडे पाहू लागले. तेवढयात भागुजी बोलला,” सायब,आमी तर वरीस झालंय फारम भरून.” बरेचजण म्हणू लागले.” हो सायब, आमीबी भरलेतं आन् ईस ईस हजारबी देलेतं.” लगेच सरपंच पांडुअण्णा म्हणाले,”कोनाकडं देले रे ?” त्यावर लोक एकाच सूरात म्हणाले,” बाजीराव घोड्याकडं.” तेवढयात भागुजी तोंडातल्या तोंडात पुटपुटला ” यानं समद्यायलाच घोडे लावले वाट्टंय.” साहेब म्हणाले,”कोण बाजीराव घोडे ? बोलवा त्याला.” एक वृद्ध म्हणाला,” साहेब, तुमची गाडी गावात शिरली अन् बाज्या गावातून निसटला.” बाजीरावाने गावकऱ्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले. तहसिलदार आणि विस्तार अधिकारी यांनी सरपंचाला ताकीद दिली की, “या गरीब लोकांचे बाजीरावकडून पैसे परत मिळाले पाहिजे, या सर्वांना घरकुलही मिळाले पाहिजे आणि “गावकऱ्यांची फसवणूक” केल्याबद्दल त्याला तुरुंगवासही झाला पाहिजे. आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करू” साहेब असं बोलले नि गाडी निघून गेली.
लगेच सरपंचाने गावातल्या सगळ्या लोकांना सांगितले, “बाजीराव गावात घुसला की, त्याला घेराव घाला. बेदम मारा. मी पोलिसांची गाडी बोलावली आहे.” असं बोलून सरपंच पांडुअण्णा ढोले आणि सर्व गावकरी आपापल्या घरी गेले.
तरूणांनी गावकऱ्यांना सांगितले की, बाजीराव गावात शिरताच आम्ही पाचजण मिळून एक मोठी आरोळी ठोकू तेव्हा गावकऱ्यांनी गोळा व्हायचं, काहींनी त्याला मुक्कामार द्यायचा.
बाजीरावच्या वाटेत कडक पहारा लावला. त्या दिवशी रात्री नऊच्या सुमारास बाजीराव गावात शिरला. ठरल्याप्रमाणे मोठी आरोळी झाली. गाव जमा झालं. लोकांनी बाजीरावला घेराव घालून बेदम मारला. त्याच्या तोंडून गेणू सावकाराचंही नाव पुढं आलं.
गावात येऊन थांबलेले पोलीस त्या ठिकाणी आले. पोलीसांनी गेणू आणि बाजीरावला बेड्या ठोकल्या.”गावकऱ्यांचा जेवढा पैसा मी घेतलेला आहे तेवढया किंमतीची माझी शेती विकण्याचा व लोकांची रक्कम देण्याचा अधिकार मी सरपंच पांडुअण्णा ढोले यांना देत आहे.” अशा प्रकारचे शपथपत्र सरपंचाने आणलेल्या बॉंडवर लिहून घेतले. बाजीरावाची स्वाक्षरी झाली. पोलीस म्हणाले, “बाजीराव घोडे आणि गेणू घोगरे या दोघांना सहा महिने तुरूंगात ठेवले जाईल.” असं म्हणताच लोकांंनी टाळ्या वाजवल्या. दोघांना गाडीत बसवले आणि गाडी तालुक्याच्या दिशेने धावू लागली…

डॉ.धोंडोपंत मानवतकर

( सर्व पात्रे आणि कथानक काल्पनिक असून ही कथा कुठे मिळतीजुळती निघाल्यास तो योगायोग समजावा.)

Avatar
About डॉ.धोंडोपंत मानवतकर 6 Articles
डॉ.धोंडोपंत मानवतकर एम.ए.मराठी, पीएच्.डी.जी.डी.आर्ट, व बॅचलर ऑफ जर्नालिझम. कवी, लेखक, गीतकार, पत्रकार, संपादक, चित्रकार, समीक्षक, प्रकाशक आहेत. त्यांच्या नावे चार कवितासंग्रह व दोन संपादित अशी एकूण सहा पुस्तके प्रकाशित असून ते वृतपत्रासाठी सामाजिक विषयावर प्रासंगिक लेखन तसेच पुस्तक परीक्षण व काव्यलेखन सातत्याने करत असतात. दोन वेळा आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून काव्यवाचन व परिसंवादात सहभाग. अनेक कविसंमेलनात सहभाग. अनेक कविसंमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. साहित्य शिरोमणी या त्रैमासिकाचे ते संपादक राहिले आहेत. सध्या आविष्कार साहित्य मंडळाचे ते अध्यक्ष असून औरंगाबाद येथे शब्दभूमी पब्लिकेशन चे प्रकाशक आहेत. ते औरंगाबाद व मंठा येथील समाजभूषण या पुरस्काराने सन्मानित आहेत.

1 Comment on गावकऱ्यांची फसवणूक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..