रस्त्याच्या वळणावर एका झाडाखाली एक गाय शांत उभी होती. फक्त मानेची व शेपटीची हालचाल अधून मधून चालू होती. कितीतरी वेळ ती तशीच उभी होती. जाणारा येणारा तिच्या कपाळाला, शिंगाला व अंगाला हात लावून तिला नमस्कार करू बघत होता. डोळे मिटून शांत विश्रांती घेत असालेल्या त्या गायीला, प्रत्येकाचा स्पर्श होत असल्याची जाणीव, तिच्या किंचितशा हालचालीवरून दिसून येत होती. तिला त्यांच्या स्पर्शाबद्दल काय वाटत असावे, हे समजण्यास मार्ग नव्हाता. परंतु प्रत्येक वाटसरूला तिला स्पर्श करून, जणू तेहतीस कोटी देवांचे दर्शन घेतल्याचा आनंद झाल्याचे दिसून येत होते.
तेहतीस कोटी देवांचे दर्शन घेण्यासाठी, कुणालाच कसलेही श्रम व मेहनत घ्यावी लागत नव्हती. ती गाय, जिच्यात तेहतीस कोटी देवांचे अस्तित्व असल्याची भावना, जणू दर्शन देण्यासाठीच येणाऱ्या जाणाऱ्याच्या वाटेवर उभी होती. प्रत्येकजण दर्शन घेवून स्वतःचे समाधान आपल्याच कृतीत शोधात होता.
एक दहा वर्षाचा मुलगा हातात पिशवी घेवून तेथे आला. त्याने पिशवीतून प्रथम एक मोठा ब्रेड काढला. गाईचे लक्ष जातच ती त्याचावर झेपावली. अतिशय अधाशीपणे तिने तो सर्व ब्रेड क्षणात खावून टाकला. मुलगा बघतच होता. गायीला हात लावून तो निघून गेला. गाय हलके हलके वळून दूर जाण्याऱ्या त्या अनामिक मुलाला बघत होती. तिच्या डोळ्यातून बाहेर पडनार्या नजरेमधून तेहतीस कोटी देवांचे आशीर्वाद दिले जात असल्याचा संकेत स्पष्टपणे जाणवत होता.
— डॉ.भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply