लवकरच रेडिओवर तीन मराठी गाणी सादर करण्याचे कॉन्ट्रॅक्ट माझ्या घरी आले आणि गाणी घेऊन मी रेडिओच्या ऑफिसमध्ये गेलो. संगीतकार भूमानंद बोगम यांची भेट झाली आणि या पूर्वी कोणत्याही कलाकाराच्या आवाजात रेकॉर्ड झालेली गाणी सादर करता येणार नाहीत असे त्यांनी सांगितले. नवीन गाणी मिळवण्यासाठी माझी धावपळ सुरू झाली आणि मला एकदम आठवण झाली संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्या निमंत्रणाची. फोन करून मी ताबडतोब त्यांच्या घरी गेलो आणि रेडिओच्या कराराबाबत सांगितले. त्यांनी तीन नवी गाणी देण्यासाठी आनंदाने होकार दिला. या गाण्यांच्या सादरीकरणाच्या वेळी फक्त गायक किंवा गायिका आणि गीतकार यांचीच नावे रेडिओवर जाहीर करीत असत. संगीतकाराचे नाव जाहीर केले जात नसे, याची कल्पना मी श्रीकांतजींना दिली. तरीही मोठ्या मनाने त्यांनी मला गाणी शिकविण्याचे मान्य केले. ही नवीन गाणी शिकायला मी सुरुवात केली. त्यांच्याकडून गाणे शिकताना आपण आजपर्यंत ज्याचा विचारही केला नव्हता असे, खूप काही नवे शिकत असल्याची जाणीव मला झाली. रेडिओवरील गाणी तर चांगली झालीच. पण लहानपणापासून मला भावणारी हिंदी-उर्दू गझल आपण त्यांच्याकडून शिकावी अशी इच्छा माझ्या मनात तरळू लागली. मी ही इच्छा श्रीकांतजींसमोर प्रगट केली. त्यांनी माझ्या वडिलांना भेटायला बोलावले. “तुमच्या मुलाचा आवाज हिंदी-उर्दू गझलसाठी योग्य आहे. पण तो इंजिनीयर होऊन त्याने पूर्ण वेळ नोकरी करावी आणि केवळ आवड म्हणून गावे अशी आपली इच्छा असेल तर मला चालणार नाही. पण व्यावसायिक गायक होण्याची आपली परवानगी असेल तर मात्र मी त्यांना नक्कीच गझल शिकवीन.” असे श्रीकांतजींनी स्पष्टपणे सांगितले. माझ्या वडिलांनी तशी परवानगी दिली आणि हिंदी-ऊर्दू गझलचे पद्धतशीर शिक्षण सुरू झाले. कधी कॉलेज सुरू होण्यापूर्वी, तर कधी कॉलेज संपल्यानंतर व्ही.जे.टी.आय. मधून मी दादरला त्यांच्या घरी जाऊ लागलो आणि कधी मी ठाकरे कुटुंबीयांचा हिस्सा बनून गेलो ते मला समजलेच नाही. माझ्यावर आईसारखे प्रेम करणाऱ्या कुंदा वहिनी, कॉलेजमधील निरनिराळ्या विषयांवर गप्पा मारणारी जयूताई आणि आगामी हिंदी चित्रपटसृष्टीतील सिनेमांची गाणी आणि विविध किस्से सांगणारा श्रीकांतजींचा स्वरराज (सध्याचे लोकप्रिय नेते मनसेचे सर्वेसर्वा श्री. राज ठाकरे) या ठाकरे कुटुंबाचा मीसुद्धा एक सदस्य झालो. श्रीकांतजींनी तर माझ्यावर पुत्रवत प्रेम केले. ते स्वभावाने जितके कडक होते, तितकेच प्रेमळही होते. संगीतावर त्यांची नितांत भक्ती होती. ते हाडाचे कलाकार होते. जितके उत्तम संगीतकार होते, तितकेच उत्तम व्हायोलिन वादक होते, तितकेच उत्तम व्यंगचित्रकार होते. ‘मार्मिक’मध्ये ‘शुद्ध निषाद’ या नावाने ते मराठी व हिंदी चित्रपटांचे परीक्षण लिहीत असत. त्यांचे अनेक लेख त्या काळात प्रचंड गाजले होते. त्यांच्या रूपाने असा चतुरस्त्र गुरू मला लाभला हे माझे भाग्य. गाणे शिकविण्याबाबतचे त्यांचे नियम आणि त्यांची पद्धत मात्र कडक होती. श्रीकांतजींनी एक वर्ष माझ्या मराठी गाण्यावर बंदी घातली. माझा हिंदी व ऊर्दू भाषेचा लहजा सुधारण्यासाठी ते वर्ष मी फक्त हिंदी – ऊर्दू गझल आणि हिंदी गाणी गावीत असा त्यांचा आग्रह होता. कॉलेजमधील हिंदी भाषिक मित्रांशी मी जास्तीत जास्त वेळ हिंदीतून संभाषण करावे अशी ऊर्दू त्यांची इच्छा होती. मी त्यांचे नियम तंतोतंत पाळले. त्यांनी मला उच्चारदेखील शिकवले. या सर्व मेहनतीचा परिणाम माझ्या ऊर्दू उच्चारांमध्ये दिसू लागला. गझल गायकाला गझल सादर करताना हिंदी-ऊर्दूत बोलावेही लागते. भाषा हा माझा मुळात आवडीचा विषय. त्यात ऊर्दू भाषेतील ती अत्यंत प्रगल्भ अशी शायरी आणि ते शिकविण्यासाठी साक्षात श्रीकांतजी ठाकरे. माझी पुढील दोन वर्षे अत्यंत आनंदात गेली. हिंदी-ऊर्दू गझलच्या माझ्या सादरीकरणात प्रचंड सुधारणा झाली आणि या सर्वांचा परिणाम दिसू लागला. ऑल इंडिया रेडिओची हिंदी-ऊर्दू गझलची ऑडिशन टेस्ट मी पास झालो आणि गझलसाठीही मी रेडिओचा ग्रेडेड आर्टिस्ट झालो. तसेच जवळजवळ 25 आंतरमहाविद्यालयीन गाण्याच्या स्पर्धांमध्ये मी बक्षिसे मिळवली. टेलिव्हिजनच्या पडद्यावर झळकणे ही त्यावेळी फार मानाची गोष्ट होती. टीव्हीवर गाण्यासाठी रेडिओच्या ग्रेडेड आर्टिस्ट असणे आवश्यक होते. ती अट मी कमी वयातच पूर्ण केल्याने लवकरच मी मराठी सुगम संगीत, हिंदी सुगम-संगीत आणि मराठी युवदर्शन या कार्यक्रमात टीव्हीवर गाणी सादर केली. टीव्हीवरील गाण्यांमुळे माझी लोकप्रियता वाढली आणि काही जाहीर कार्यक्रमांसाठी मला बोलावले जाऊ लागले. पण मी इंजिनिअरींगची डिग्री पूर्ण करेपर्यंत कोणत्याही जाहीर कार्यक्रमात गाऊ नये अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. जाहीर कार्यक्रमांची संख्या वाढल्यास माझे अभ्यासावरचे लक्ष कमी होईल, असे त्यांचे मत होते. श्रीकांतजींनी देखील त्यांच्या मताला दुजोरा दिला. अजून एक ते दीड वर्षे उत्तम रियाज करूनच मी जाहीर कार्यक्रमांकडे वळावे असेच त्यांचे मत होते. त्या काळात मी अनेक कलाकारांचे कार्यक्रम ऐकायला जायचो. एका गायक कलाकाराचा मी फॅन झालो, ते म्हणजे विख्यात गझल आणि भजन गायक श्री. अनुप जलोटा. त्यावेळी अनुपजी भजनबरोबरच हिंदी गझलही गात असत. जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी त्यांचे कार्यक्रम ऐकायचो. मला अनेक कार्यक्रमांमध्ये पाहून एकदा त्यांनी भेटायला बोलावले. मी एक होतकरू गायक आहे. हे समजताच त्यांनी माझे गाणे ऐकले. माझे कौतुक केले. कार्यक्रम करण्यासंबंधी त्यांचा सल्ला विचारला. अनूपजी म्हणाले, “बिल्कूल सही फर्मा रहे हैं तुम्हारे गुरु और तुम्हारे पिताजी, जो भी रियाज करना है वो अभी करलो. प्रोग्रॅम्स शुरू होने के बाद रियाज को बिल्कूल वख्त नहीं मिलेगा।”
– अनिरुद्ध जोशी
Leave a Reply