नवीन लेखन...

गझलचें मराठी साहित्यावर आक्रमण होतें आहे काय ? (एक चिंतन)

प्रास्ताविक :

मागे एकदा माझ्या वाचनात आलें की, कांहीं वर्षांपूर्वी, मराठी साहित्यिक संमेलनात,  ‘गझलचें मराठी साहित्यावर आक्रमण’ असा एका परिसंवादाचा विषय होता. त्या परिसंवादात योग्य तो निष्कर्ष काढला गेला, असेंही वाचले. तें कांहींही असो, पण ‘गझलचें आक्रमण’ असा विषय संमेलनात चर्चेला यावा हीच मुळात काळजीची गोष्ट आहे. कोणी जर , ‘आक्रमण झालें आहे’ असें म्हणत असेल तर, तें विधान योग्य आहे काय, यावर विचार व्हायला हवा. म्हणून, आपण ‘मराठी व गझल’ या विषयात डोकावून पाहूं या, ऊहापोह करूं या, आणि बघूं या आपण काय निष्कर्षाला येतो ते.

खरें म्हणजे, ‘आक्रमण’ या शब्दाचें प्रयोजनच काय ? असें चित्र तर मुळीच दिसून येत नाहीं की मराठी गझल ही, मराठी भाषेला व मराठी साहित्यातील अन्य प्रवाहांना झाकोळून टाकते आहे, नामशेष करूं पहाते आहे. तरीसुद्धा, तसें कांहीं घडलें आहे अथवा घडतें आहे काय, किंवा तसें घडण्याची शक्यता आहे काय, या गोष्टीचा आपण धांडोळा घेऊं या.

हा विषय तसा बहुआयामी आहे. गझल व मराठी भाषा, गझल व ओव्हरऑल मराठी साहित्य, गझल व मराठी काव्य , वगैरे अनेक अंगांनी या विषयाकडे बघावें लागेल. तसेंच, त्या अनुषंगानें, मराठी प्रदेशातील संगीत, एकूणच मराठी संस्कृती, यासंबंधीचे पैलूसुद्धा विचारात घ्यावे लागतील.

गझल व मराठी भाषा :

गझल (ग़ज़ल) ही फारसीतून उर्दूत आली, आणि, मराठी व इतर भारतीय भाषांमध्ये ती फारसी किंवा उर्दूतून आली. आपण, उर्दू-हिंदुस्तानी-हिदी गझलांचा, हिंदी अथवा अन्य भाषांवर होणार्‍या परिणामाबद्दल चर्चा नाहीं आहोत ; आपली चर्चा आहे ती मराठी गझलच्या संदर्भात.

मराठी गझला मराठी भाषेचाच वापर करतात. क्वचित् त्यांच्यात उर्दू-फारसी-अरबी शब्द आढळून येतात, पण हें आक्रमण नव्हेंच. आपण मध्ययुगीन मराठी गद्य पाहिलें तर, त्यात अनेक फारसी शब्दांचा भरणा दिसून येईल. अजूनही लावणीसारख्या लोकसाहित्यात व ग्रामीण लोकांच्या बोलीत अशा शब्दांचा उपयोग दिसतो.  इतरत्र तो कमी झालेला असला तरी,

आजही अनेक फारसी किंवा अरबी शब्द, किंवा त्यांच्यापासून उद्भवलेले शब्द, आपल्या रोजच्या वापरात आहेत ; आणि त्यांचा उगम परभाषीय आहे याची अनेकांना जराही कल्पना नाहीं.

आजार, बाजार, सजा, रजा, मजा, जादू, बर्फ, जिना, जीन, खुर्द, खुद्द, खुर्ची, दप्तर, बाग, किल्ला, खून, तारीख, तक्रार, पैरण, पायजमा, दवाखाना, मेजवानी, चपाती, चादर, रुमाल, शाल, खरीफ, रबी, जिल्हा, मैफल (महफ़िल),  एल्गार (यल्गार), समई (शमअ), जंजीरा (जज़ीरा), नाखवा (नाख़ुदा), संगमरवर (संगेमरमर), मर्दुमकी मधील मर्द व मर्दुमी , पेशवा हा हुद्दा आणि तें आडनांव, डबीर (दबीर : लेखनिक) हें आडनांव, फडणवीस यामधील नवीस (लेखनिक) हा प्रत्यय, चिटणवीस (चिट्ठीनवीस) हें आडनांव, शिवशाही व लोकशाही यांमधील शाह हा शब्द, सरदेसाई-सरदेशमुख-सरदेशपांडे-सरपोतदार-सरनाईक इत्यादी आडनांवांमधील सर (उच्च) हा प्रत्यय, देवरूख या ग्रामनामातील रुख हा शब्द (रु़ख़ : चेहरा) , मलकापुर मधील मलका (मलिका) हा शब्द, जिरेटोप मधील जिर-ए ( ज़िरह : लोखंडाच्या साखळ्यांचें बनवलेलें कवच; ए म्हणजे ‘चा/ची/चें’ ) , ‘व‘ हें अव्यय (मूळ अरबीमधून) , अशी अनेक उदाहरणें देता येतील. मथळा (मत्ला), मक्तेदारी मधील मक्ता, हे तर गझलच्या संदर्भात वारंवार वापरले जाणारे शब्द. असे अनेक शब्द आपल्या भाषेत इतक्या बेमालूमपणें (ह्या  बेमालूमचा उगमही परभाषीयच आहे) मिसळून गेले आहेत, की ते मराठी नाहींत अशी आपण कल्पनाही करूं शकणार नाहीं. संत एकनाथांच्या काळातील मराठी गद्य पाहिलें तर, त्यात खूपसे फारसी, किंवा फारसीपासून उभवलेले, बनलेले, शब्द दिसतात. तसेच पेशवेकालीन मराठीतही आहे. त्यामानानें आजची मराठी कमी ‘फार्श्याळलेली’ आहे. ( याचें एक कारण, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची, तसेच माधवराव पटवर्धन, म्हणजेच माधव जूलियन, यांची भाषाशुद्धीची चळवळ, हें आहे).

मराठीनें इंग्रजीतून इस्पितळ, रेल्वे, मोटार, एंजिन, स्टेशन, मोबाइल फोन, हार्ड डिस्क, फ्लॉपी, पेन ड्राइव्ह, डिश अँटेना, इंटरनेट, असे अनेक शब्द सहज स्वीकारले आहेत. इंग्रजीतील ‘ऍ’ ‘ऑ’ सारखे उच्चार मराठीत नव्हते, ते आपण आपलेसे केले., त्यांना लिपी-चिन्हेंही दिली.  तसेंच, इंग्रजीतील स्वल्पविराम, अर्धविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, ‘इनव्हर्टेड कॉमाज्’, वगैरे अवतरणचिन्हें मराठीनें घेतली. आय्. टी. च्या उदयानंतर तर अनेकानेक नवीन शब्द इंग्रजीत निर्माण झाले, व ते मराठीत जसेच्या तसे वापरात आलेले आहेत.

फारसी-अरबी व इंग्रजीव्यतिरिक्त मराठीनें अनेक शब्द संस्कृतमधून, प्राकृतमधून, तसेंच कांहीं तमिळ, कन्नड, गुजराती इत्यादि भाषाभगिनींकडून घेतलेले आहेत. प्रश्न असा आहे की, अशा शब्दांचें मराठीवर आक्रमण होतें आहे कां? की त्यांच्यामुळे आपली भाषा समृद्ध झाली आहे? खरें तर, भाषा ही प्रवाहीच असायला हवी; तशी ती नसली तर नामशेष होईल. इंग्रजी भाषेनें लॅटिन, फ्रेंच वगैरे भाषांमधून, अगदी भारतीय भाषांमधूनही, शब्द घेतलेले आहेत. पण, त्यामुळें ती समृद्धच झाली आहे. हल्ली इंग्रजी वळणाची मराठी लिहिली-बोलली जाते , पण त्यामुळे फारसें कांहीं बिघडत नाहीं.

भाषेचें मुख्य कार्य काय, तर एका व्यक्तीचे विचार शब्दांच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोचवणें. तें कार्य योग्य पद्धतीनें होणें महत्वाचें. मान्सून (मौसम) हा शब्द परभाषेतून आला असला, तरी त्याचा वापर आपण मराठीत सर्रास करतो व भारतालील पावसाळा ऋतूला दुसरा योग्य शब्द नाहीं. ‘अग्निरथगमनागमनसंचालकहरितरक्तलौहपट्टिका’ यापेक्षा ‘सिग्नल’ असा उल्लेखच अधिक सोपा आहे. हें परभाषेचें आक्रमण असें आपण मानत नाहीं.

थोडक्यात काय, तर , कांहीं उर्दू-फारसी-अरबी शब्दांचा कांहीं वेळा उपयोग केल्यानें, मराठी गझल मराठी भाषेवर आक्रमण करते आहे, असें मुळीच म्हणतां येत नाहीं.

गझल व एकूणत: (ओव्हरऑल) मराठी सहित्य :

गझलनें एक साहित्यप्रकार म्हणून मराठी साहित्यावर आक्रमण केलें आहे काय, याच आपण आतां विचार करूं या.

श्रवणबेळगोळा येथील शिलालेख व इतर साधनांमुळे मराठी भाषेचा उगम १२००/१३०० वर्षें मागे नेतां येत असला, तरी मराठी भाषेतील सहित्याचा उगम यादवकाळापासूनचा, म्हणजे

मुकुंदराज-ज्ञानेश्वर यांच्या काळापासूनचा आहे. ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरील ‘टीका’ (म्हणजे, हल्लीच्या भाषेत, ‘समीक्षा’) आहे. भगवद्गीता तर संस्कृतमध्ये आहे. संस्कृत ग्रंथावरील ‘टीका’ म्हणून मराठी ग्रंथरचना करणें, याला आपण ‘संस्कृतचें मराठीवरील आक्रमण’ असें म्हणतो कां? उलट, आपल्याला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो ! बरें, त्या काळाला ‘मराठी साहित्याचा सुरुवातीचा काळ‘ असें संबोधून आपण जरा वेळ बाजूला ठेवू या. तरीपण, संतकवी व पंडितकवी यांनी नंतरच्या काळातही रामायण-महाभारत-हरिवंश वगैरे संस्कृत ग्रंथांच्या आधारेंच रचना केली. त्याला आपण, ‘संस्कृतचें मराठीवरील आक्रमण’ म्हणूं कां? खरें तर, अशा प्रकारें घेतलेल्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या साहित्यामुळे मराठी साहित्य समृद्धच झालें आहे.

लघुकथा, रहस्यकथा इत्यादि साहित्यप्रकार मराठीनें पाश्चिमात्य वाङ्मयातून घेतले आहेत. कादंबरी या सहित्यप्रकाराचें मूळ कांहीं अंशीं संस्कृत व कांहीं अंशीं पाश्चिमात्य साहित्यात शोधतां येतें. नाटकांची प्रेरणाही मराठीनें अशीच, एकीकडे संस्कृत,  व दुसरीकडे इंग्रजीद्वारे ग्रीक , यांच्यापासून घेतलेली आहे.

हें, त्या-त्या परभाषिक साहित्यप्रकारांचें मराठी साहित्यावरील आक्रमण आहे, असें आपण मुळीच मानत नाहीं. उलट, त्यामुळे मराठी साहित्य समृद्धच झालें आहे. अनुवादित साहित्याचेंही तसेंच. मग, गझल हा सहित्यप्रकार आपण उर्दू-फारसीतून घेतला, तर त्याला प्रत्यवाय नसावा, आणि तें मराठी सहित्यावर आक्रमण आहे, असें म्हणणें योग्य ठरणार नाहीं.

 

गझल व मराठी काव्य :

गझल हा एक काव्यप्रकार आहे. म्हणून गझल व मराठी काव्य, असा विशेष विचार आपण करून पाहूं या.

मराठी काव्य पाहूं गेलें तर, अनेक वृत्तें मराठीनें संस्कृतमधून घेतलेली आहेत, उदा. मंदाक्रांता, शार्दूलविक्रीडित वगैरे. मराठीतील काव्यालंकारसुद्धा (यमक, अनुप्रास इत्यादि) संस्कृतमधून आलेले आहेत. याला संस्कृतचें मराठीवर आक्रमण असें कोणीही खासच म्हणणार नाहीं. समर्थ रामदांच्या ‘मनाचे श्लोकां’मध्ये वापरलेलें वृत्त फारसी आहे, असेंही कांहीं विद्वान म्हणतात. तसें असल्यास, तें फारसीचें आक्रमण मानायचें कारण नाहीं.

केशवसुतांनी इंग्रजी काव्यपरंपरा मराठीत आणली, आणि त्यानंतर मराठी काव्याचा बाजच बदलला. पुढे ‘सॉनेट’ हा इंग्रजी काव्यप्रकार मराठीत ‘सुनीत‘ या नांवानें आला. माधव जूलियन यांनी फारसी व इंग्रजी यांच्यापासून प्रेरणा घेऊन प्रेमकाव्य मराठीत आणलें. भावगीताची परंपराही त्यानंतरच सुरूं झाली. मुक्तकाव्य या काव्यप्रकाराची प्रेरणाही  इंग्रजीतील ‘फ्री व्हर्स’ आहे. मराठीनें ‘हायकू’ हा तीन ओळींचा काव्यप्रकार जपानी भाषेपासून इंग्रजीद्वारे घेतला आहे. ‘रुबाई’ हा चार ओळींचा फारसी काव्यप्रकारसुद्धा मराठीनें बिनतक्रार स्वीकारलेला दिसतो. ‘मुक्तक’ हा चार ओळींचा काव्यप्रकार संस्कृतमधून घेतलेला आहे. वा. वा. ऊर्फ भाऊसाहेब पाटणकर यांनी शायरीची उर्दू परंपरा मराठीत पॉप्युलर केली. जसे हे काव्यप्रकार मराठीनें बाहेरून घेतले, तसेंच गझलही उर्दू-फारसीतून घेतली तर बिघडलें कुठे ?

हें कांहीं मराठी काव्यावर आक्रमण म्हणतां येणार नाहीं.

आणि, आकड्यांच्या आधारें बोलायचें झालें तर , शेकडो कवि मुक्तकाव्य लिहीत आहेत, ( खरें म्हणजे, मुक्तकाव्य हीच सध्या मराठीतील प्रमुख काव्यपद्धती झालेली आहे),  अनेक कवि गीतें लिहीत आहेत, अन् केवळ कांहीं मूठभर कवीच गझला लिहीत आहेत. म्हणजेच, गझल हा कांहीं मराठीतील प्रमुख काव्यप्रकार म्हणतां येणार नाहीं. याचाच अर्थ असा की, या दृष्टिकोनातूनही, गझलनें मराठी काव्यावर आक्रमण केलें आहे, असें खचितच म्हणतां येणार नाहीं.
गीत या लोकप्रिय काव्यप्रकाराबद्दल जसा पूर्वग्रहयुक्त दृष्टिकोन कांहीं लोकांनी ठेवला होता/आहे, (गीतकारांना कवि समजायचें नाहीं, व त्या काव्यप्रकाराला हिणकस लेखायचें), तसें कांहींसें गझलच्या बाबतीत झालें नाहीं ना ?

गझल व मराठी संगीत :

गझल हा काव्यप्रकार आहेच; पण त्याचबरोबर, गझल हें गेय काव्य आहे, हेंही आपण ध्यानात घ्यायला हवें. जेव्हां मुद्रणकलेची प्रगती झालेली नव्हती, तेव्हां मुशायर्‍यांमध्ये उर्दू गझल लयीवर (तरन्नुम में) वाचली जायची, किंवा मैफलींमध्ये गायली जायची. त्यामुळे त्या संस्कृतीत गझल लोकप्रिय झाली. आज अनेक पुस्तकें छापली जातात, त्यामुळे छापलेल्या स्वरूपात गझल हजारो रसिकांपर्यत पोचते आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळें हा ट्रेंड वाढतच जातो आहे (उदा. ई-बुक्स, वेब् ). संगीतविषयक पुस्तकें, गाण्यांची-गझलांची पुस्तकें हाही साहित्याचाच एक भाग आहे. म्हणून, गझलचा विचार या अंगानेंही करणें योग्य ठरेल.

लावणी हा प्रकार कांहीं अंशी तरी नक्कीच उत्तर हिंदुस्थानातील संस्कृतीशी संबंधित आहे. बैठकीची लावणी म्हणजे तर ठुमरीच. महाराष्ट्रातील शास्त्रीय संगीत उत्तर-हिंदुस्थानीच आहे, त्यातील बंदिशींची भाषा तर हिंदीच आहे. यमनसारखा राग हिंदुस्थानी संगीतानें ‘एमन‘ या फारसी रागावरुन घेतलेला आहे,  असें एक मत आहे. तसें असेल तर, हा फारसीचा हिंदुस्तानी व मराठी संगीतावरील परिणाम म्हणायला हरकत नाहीं. हिंदुस्थानी व कर्नाटकी संगीतातही मालकंस व शंकराभरणम् हे दोन्ही एकच राग आहेत; कोणी कोणापासून हा राग घेतला? मराठी नाट्यगीतांची प्रेरणा कन्नडमधून घेतलेली आहे. अन् त्याशिवाय, अनेक नाट्यगीतें हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतावर आधारित आहेत. भक्तिगीतांचा स्त्रोत संतकवींची भजनें-पदें आहेत असें म्हणतां येईल, आणि अर्थातच, त्यांची प्रेरणा संस्कृतमधून घेतलेली आहे. भावगीतांचा उल्लेख आपण आधी केलेलाच आहे. भावगीतांची प्रेरणा स्थानिक आहे असें छातीठोकपणें म्हणतांच येणार नाहीं. भावगीतें आली भावकवितेतून , आणि भावकवितेची प्रेरणा आहे पाश्चिमात्य साहित्य, तर प्रेमाधिष्ठित भावकवितेची आहे फारसी व इंग्रजी.

अशा अनेक गोष्टी मराठीनें बाहेरून घेतलेल्या आहेत, पण तेथें आपण ‘आक्रमण’ हा शब्द वापरत नाहीं. गझलच्या बाबतीतही तसाच दृष्टिकोन योग्य ठरेल, नाहीं कां ?

गझल व मराठी संस्कृती :

संस्कृतीची अनेक अंगें असतात. साहित्य व संगीताबद्दल आपण थोडासा विचार केला. गझल व संस्कृती या संबंधाचा विचार करण्यापूर्वी आपण संस्कृतीच्या इतर अंगांबद्दलही जरा पाहूं या.

कोकणातील ‘दशावतार‘ कर्नाटकातील यक्षगानापासून आले आहेत. महाराष्ट्राचें दैवत पांडुरंग हें कर्नाटकातून आलें आहे. ‘कानडा विठ्ठलु कर्नाटकु’ ही ज्ञानेश्वरांची उक्ति प्रसिद्धच आहे. दक्षिण महाराष्ट्राचा बराच भाग कांहीं शतकांपूर्वी कर्नाटकात सामील होता, (संदर्भ : सेतुमाधवराव पगडींचे लेख),  यावरूनही हें उघड आहें. दक्षिण महाराष्ट्रातील कांहीं देवीसुद्धा दाक्षिणात्य आहेत.

महाराष्ट्राचें एक मोठें देवत म्हणजे शिवाजी महाराज. महाराष्ट्राची अस्मिता त्यांनीच तर जागृत केली. त्यांचा मूळ वंश राजस्थानातील सिसोदिया घराणें,  असें म्हणतात. एवढेंच काय, तर, बहुतांश महाराष्ट्रीय मंडळींच्या पूर्वजांनी अनेकानेक पिढ्यांपूर्वी, दोनएक सहस्त्रकांपूर्वी, उत्तर हिदुस्थानातून महाराष्ट्रात स्थलांतर केलेलें आहे. (संदर्भ: इतिहासाचार्य राजवाडे यांचा लेख, ‘महाराष्ट्राची वसाहत’). माणसेंच जर बाहेरून महाराष्ट्रात आली, तर मग इतर गोष्टी आल्यास त्याचा बाऊ करायला नको.

सामोसा हा मूळ अरबी पदार्थ. जिलबी, गजक हे फारसी पदार्थ. त्यांना भारतीय रूपात-महाराष्ट्रीय रूपात मराठी संस्कृतीनें आत्मसात केले. फळें, भाज्या, धान्यें, पेयें इत्यादींचा विचार केला तर, भारतीयांनी व मराठी जनांनीही बटाटा, टोमॅटो, नारळ, काजू, सफरचंद, गहू, चहा, कॉफी, जायफळ, तांदूळ, साबुदाणा, टापियोका, इत्यादी परदेशीय गोष्टींचा स्वीकार केला. नुसताच स्वीकार नाहीं, तर महाराष्ट्रात बटाटा-साबुदाण्यासारखे पदार्थ उपासालाही चालतात. नारळ काय, उपासाला तर चालतोच ; पण धार्मिक कार्यक्रमांनाही अत्यावश्यक असतो. झीनिया, डेलिया, बोगनवेल, इत्यादि फुलझाडेंही परदेशीयच. इडली, सांबार, मेदुवडा, वगैरे दाक्षिणात्य पदार्थ व पराठा, नान, तंदूरी रोटी, पंजाबी पद्धतीच्या दाल-भाज्या आपण उत्साहानें खातो. आणि, हल्ली तर पिझ्झा, नूडल्स्, पास्ता, फ्रँकी इत्यादि खाद्यपदार्थ तरुण पिढीनेंच नव्हे, तर मध्यमवयातील लोकांनीही आपलेले केलेले आहेत. चिनी, थाय व इतर पद्धतीच्या रेस्टॉरंटमध्ये व स्टॉलस् वर गर्दी उसळलेली दिसते.

थोडक्यात काय, तर, विविध संस्कृतींमध्ये देवाण-घेवाण होतच असते  ;  मराठी संस्कृतीनें बर्‍याचकांहीं गोष्टी बाहेरून घेतलेल्या आहेत, व त्यात कांहींच गैर नाहीं.

गझल व संस्कृती यांचा विचार विविध अंगांनी करतां येईल. रिवायती (पारंपारिक) गझलमध्ये प्रामुख्यानें शृंगार रस असतो. मध्ययुगीन काव्यातील हिंदी-मराठी इत्यादी भाषांमधील शृंगार रस पाहिला तर, त्यात मीलन व विरह ही दोन्ही अंगें प्रेमिकेच्या, म्हणजे स्त्रीच्या, दृष्टिकोनातून वर्णलेली असतात. गझलमध्ये प्रामुख्यानें प्रेमिकाच्या, म्हणजे पुरुषाच्या, दृष्टिकोनातून हें वर्णन केलेलें असतें. म्हणजेंच, प्रेमाची एक बाजू जर इतर काव्य दाखवतें, तर गझल दुसरी बाजू दाखवते. त्यामुळे, गझलमुळे शृंगार रसात समतोल आलेला आहे, असेंच म्हटलें पाहिजे ; आणि त्यासाठी खरें तर रसिकांनी गझलचे आभार मानायला हवेत.

काव्यात संस्कृतीचें व जीवनाचें प्रतिबिंब पडतें. तें जसें इतर काव्यप्रकारांबद्दल खरें आहे, तसेंच गझलबद्दलही आहे. आजची गझल केवळ प्रेमी-प्रेमिका, मीलन-विरह, साकी-मदिरा एवढ्याच विषयांमध्ये मर्यादित राहिलेली नाहीं. अनेक सामाजिक, वास्तववादी विषयही गझलनें समर्थपणें पेललेले आहेत. कांहीं उदाहरणें पुरेशी आहेत.

  • उष:काल होतां होतां काळरात्र झाली

अरे पुन्हां आयुष्याच्या पेटवा मशाली .

  • खोकतांना बाप मेला, माय आजारात गेली

घेउनी देहास अपुल्या लेक बाजारात गेली .

  • रांडधंदा हीच सत्तेची कसोटी

विक्रयाला कायद्याने सूट आहे .

  • एक खोली फक्त खाली पाहिजे

इंद्रियांची सोय झाली पाहिजे .

  • फाटलेल्या ढुंगणाला

संस्कृतीची हाव नाही .

  • चोली के पीछे कहू मी काय आहे ?

भडव्या रे मी तुझी माय आहे .

…..

हातभट्टी झोकल्या बारा जणांनी

रात्रभर मी तुडवलेली गाय आहे.

यातला प्रत्येक शेर वाचून आपल्या अंगावर सर्रकन् काटा येतो; ‘वाह्’ अथवा आह्’ जाऊंच द्या, आपल्या तोंडातून शब्दच फुटत नाहीं, आपण अगदी नि:स्तब्ध होऊन जातो !

गझलनें अनेक प्रकारच्या जीवनानुभवांना समर्थपणें स्पर्श केलेला आहे. तेव्हां , या अंगानेंही विचार करतां, गझलनें संस्कृती समृद्ध केली आहे, असेंच म्हणावें लागेल.

गझल म्हणजे उत्कट अनुभूति , अनपेक्षित कलाटणी :

इतर काव्यप्रकार जसे रसिकांना आनंद देतात, तसेंच गझलचेंही आहे. गझल अत्यल्प शब्दांमध्ये उत्कट भावनांचें दर्शन घडवते. अनपेक्षित कलाटणी नुसताच आश्चर्योद्गार प्रस्फुटित करत नाहीं, तर विचारही करायला भाग पाडते.

खरें तर, वर दिलेली उदाहरणें पुरेसी बोलकी आहेत. तरीही, वानगीदाखल आणखी कांहीं, पण जरा वेगळ्या वळणाची, उदाहरणें पाहूं या.  ( प्रेमातील उत्कटतेची वा अनपेक्षित कलाटणीची अनेक उदाहरणें देता येतील ; ती इथें दिलेली नाहीत. मात्र, तशी ती आहेत, हें ध्यानीं घ्यावे).

  • दिवस तुझे हे फुलायचे

झोपाळ्यावाचून झुलायचे .

  • वाटेवर काटे वेचीत चाललो

वाटतें जसें फुलाफुलांत चाललो .

  • केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली

मिटले चुकून डोळे, हरवून रात्र गेली .

  • वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाहीं

उगीच कां ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते ?

  • कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे

मी असा की लागती ह्या सावल्यांनाही झळा .

  • शेवटी वेदमंत्रांनी अन्याय एवढा केला

मशहूर ज्ञानया झाला …. गोठ्यातच जगला हेला .

  • रडता रडता हात जोडुनी देव म्हणाले

कधीतरी माणसाप्रमाने वाग माणसा .

कुठलाही विषय असो, गझल रसिकाला उत्कट अनुभूति देते, भावविभोर करते. असल्या, थेट हृदयाला हात घालणार्‍या काव्यप्रकाराला, ‘साहित्यावर आक्रमण’  कसें म्हणतां येईल ?

खरें तर, गझल ही समृद्ध व यशस्वी जीवनासाठी अतिशय उपयुक्त अशी गोष्ट आहे, पण तो अन्य एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्याबद्दल पुन्हां केव्हांतरी.

 

तर मग , ‘गझलनें मराठी साहित्यवर आक्रमण केलें आहे,  असें कोणाला वाटत असल्यास,  

त्याचें कारण काय असावें ?

गेल्या दीड शतकात आपण पाश्चात्य संस्कृतींपासून विज्ञान, भाषाशास्त्र (लिंग्विस्टिक्स), संख्याशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, कंप्यूटर सायन्स, इनफरमेशन टेक्नॉलॉजी, इत्यादि अनेक विषयांचें ज्ञान मिळवलें आहे. त्या विषयांवरील, परभाषांमधील पुस्तकांचे मराठीत अनुवाद झाले आहेत, होत आहेत ; व परभाषीय पुस्तकांचे संदर्भ घेऊन मराठीत पुस्तकें लिहिली जात आहेत. ही अर्थातच स्तुत्य गोष्ट आहे. परभाषीय शब्द आपण स्वीकारले, परभाषीय विषय स्वीकारले, परभाषीय पुस्तकेंही. इतर भारतीय-अमराठी-संस्कृतींकडून, तसेंच पाश्चिमात्य संस्कृतींकडून, आपण बर्‍याच कांहीं गोष्टी घेतल्या. इतर भाषांकडून आपण काव्यप्रकारही घेतले आहेत. या सगळ्याला आक्रमण म्हणतां येत नाहीं , व आपण तसें म्हणतही नाहीं .

तर मग, गझलच्या बाबतीत असा आक्रमणाचा प्रश्न कोणाच्या मनात निर्माण होत असेल, तर तो कां, याचा विचार आपण केला पाहिजे. त्यासाठी गझलच्या इतिहासात जरा डोकावणें आवश्यक आहे.

गझलचा इतिहास म्हणजे, प्रथमत: , हिदुस्थानातील फारसी-उर्दू गझलचा इतिहास,  आणि त्यानंतर मराठी गझलचा इतिहास. भारतातील गझलची सुरुवात अमीर खुसरोपासूनची म्हणतां येईल. तो ज्ञानेश्वरांचा समकालीन. त्यानें फारसी व फारसी-हिंदवी मिश्र गझलांची रचना केली. (हिंदवी म्हणजे, हिंदची. त्या काळातील भारतीय भाषांना, व खास करून दिल्ली व उत्तर हिंदुस्थानातील भाषेस, अफगाणिस्तान-इराण येथून आलेले लोक ‘हिंदवी’ म्हणत.) . नंतरच्या काळात आपल्याला कबीर वगैरेंच्या थोड्या गझल रचना दिसून येतात. पण, आज ज्या तर्‍हेची उर्दू गझल लिहिली जाते, तिचा प्रणेता आहे वली दकनी हा मध्ययुगीन कवी. हा वली दकनी मूळचा ओरंगाबादचा. (अरे ! म्हणजे, विद्यमान उर्दू गझलचा पिता महाराष्ट्रीय भूभागातलाच की !) . दुसरी गोष्ट अशी की, आज ज्या भाषेला ‘उर्दू‘ म्हणतात, तिच्या पूर्वस्वरूपामध्ये ‘दकनी/दखनी’ म्हणून त्या काळीं ओळखल्या जाणार्‍या भाषेचा बराच वाटा आहे. (अरे ! इथेंही महाराष्ट्रीय भूभागाचा संबंध आहेच ! थोडक्यात काय, उर्दू ही भाषा व गझल हा साहित्यप्रकार आपल्याला वाटतो तितका परका नाहीं तर ! ). उर्दू गझलला ४००-५०० वर्षांचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे, साहित्यात सामावायला व मानाचें स्थान मिळवायला उर्दू गझलला पुरेसा वेळ मिळाला.

मराठी गझलची सुरुवात उत्तर-पेशवाईच्या काळातील आहे. ( मात्र, त्यापूर्वीही, दखनी भाषेद्वारें गझल मराठी जनांना परिचित होती. त्याकाळी राजकारण, युद्ध, मुलकी कारभार जनरल-ऍडमिनिस्ट्रेशन, या व अशा क्षेत्रांशी संबंधित लोकांना फारसी येत असे. अनेक संतांना तसेंच अनेक मराठी सामान्य जनांना दखनी येत असे). अमृतराय व मोरोपंत यांनी प्रथम मराठीत गझलसदृश रचना केल्या. उदा.  मोरोपंतांची  ‘रसने न राघवाच्या . . ’,  ही रचना . (अरेच्चा ! मराठीतील ख्यातनाम मध्ययुगीन कवि, संस्कृतचे पंडित, मोरोपंत हे गझलकारही होते ! कमालच आहे की ! ). अर्थात् , अमृतराय-मोरोपंत यांच्या या रचना म्हणजे गझलसमानच रचना आहेत, असें दाखवून दिलें २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात माधवराव पटवर्धन, म्हणजेच कवि माधव ज्यूलियन, यांनी. माधवरावांना फारसीचें उत्कृष्ट ज्ञान होतें. (ते फारसी शिकवतही, आणि त्यांनी फारसी-मराठी शब्दकोशही तयार केलेला आहे). त्यांनी अनेक गझलरचना केल्या, उदा. त्यांचें ‘गज्जलांजली‘ हें पुस्तक. माधवरावांनी आपली गझलरचना ही (हेतुत:) भावकवितेसारखी केलेली आहे. (आपण आधी भावकवितेचा उल्लेख केलेलाच आहे. भावकविता रविकिरण मंडळापासून सुरूं झाली, असें म्हणतां येईल. अन्, रविकिरण मंडळाचे अध्वर्यू होते माधव जूलियन). कुसुमाग्रज, अनिल, बा.भ. बोरकर, मंगेश पाडगांवकर अशा अनेक प्रथितयश कवींनीही गझला किंवा गझलसदृश रचना लिहिल्या. पण, मराठीत गझल जोमानें पुढे आणणारे कवि म्हणजे सुरेश भट ;  आणि, हा काळ १९६० नंतरचा आहे. (हिंदी, गुजराती इत्यादि भाषांमधील गझल त्यापेक्षा बरीच जुनी आहे). यावरून मराठीत गझल किती नवी आहे याचा अंदाज येईल.

म्हणजेच, मराठीत गझल जोमानें वाढूं लागली, त्याला ,  सुरेश भटांपासूनचा विचार केला तर,  फक्त ५० वर्षेंच झालेली आहेत ; आणि माधव ज्यूलियन यांच्यापासूनचा विचार केल्यास, ९०-९५ वर्षेंच झालेली आहेत.  पन्नास वर्षांचा काळ काय किंवा ९० वर्षांचा काय, साहित्याच्या संदर्भात तसा फार मोठा नव्हेच. हा अवधी, मराठीत गझल रुळायला व मराठी साहित्यानें तिला आपली म्हणायला, तसा अल्पच. समीक्षकांचें माहीत नाहीं, पण, या अवधीत गझल सामान्यजनांना मात्र प्रिय झाली. कदाचित् त्यामुळेंच, कांहीं लोकांना, ‘गझल मराठी साहित्यावर आक्रमण करते आहे’, अशी धास्ती वाटत असावी. परंतु, वस्तुस्थिती मात्र तशी नाहीं.

समारोप :

आपण अनेक पैलूंमधून,  अनेक अँगल्समधून,  या ‘आक्रमण’ प्रश्नाकडे पाहिले, आणि प्रत्येक वेळी हेंच दिसून आलें की, गझलनें मराठी साहित्यावर आक्रमण कांहीं केलेलें नाहीं. याउलट,  आपला असा निष्कर्ष निघतो की, गझलचा मराठीत प्रवेश ही एक स्वाभाविक सांस्कृतिक प्रक्रिया आहे, आणि, गझल मराठी साहित्याला समृद्धच करते आहे.

गझल ही अशी गोष्ट आहे की, एकदा माणूस तिच्या प्रेमात पडला की जन्मभर तिचा

दिवाणा बनून रहातो. म्हणून, गझलच्या आक्रमणाची धास्ती बाळगणारे जर कांहीं लोक असलेच, तर, ते येणार्‍या काळात गझलच्या प्रेमात पडतील, व गझलचे दिवाणे बनतील, अशी आपण अपेक्षा करूं या.

— सुभाष स. नाईक

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 294 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..