या संपूर्ण काळात पं. विनायकरावजी काळे आणि श्रीकांत ठाकरे गाण्याचे शिक्षण या गुरुंकडे माझे सुरूच होते. माझ्या गझल गायकीतील प्रगतीबद्दल श्रीकांतजी खूष होते. ‘दिलोजानसे’ या गझल अल्बमनंतर आजपर्यंत मी अनेक चित्रपटगीते व इतर गाणी गायलो होतो. पण गझलचे रेकॉर्डिंग काही झाले नव्हते. श्रीकांतजींच्या मते आता गझलचा पुढचा अल्बम करायची वेळ आली होती. यावेळी गायिका रंजना जोगळेकरबरोबर अल्बम करायचे आम्ही ठरवले. माझ्या पहिल्या जाहीर कार्यक्रमापासून आजपर्यंत अनेक कार्यक्रम आणि रेकॉर्डिंग्ज आम्ही बरोबर केली होती. आता हिंदी-उर्दू गीत-गझलचा अल्बम आम्ही बरोबर करायचे ठरवले. गीत गझलकार श्याम अनुरागी यांच्याकडून काही नवीन गझल आणि गाणी आम्ही लिहून घेतली.
‘गज़ब किया तेरे वादे पे ऐतबार किया
तमाम रात कयामत का इंतजार किया’
ही सुप्रसिद्ध गझलकार दाग यांची सुरेख गझल संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी माझ्यासाठी स्वरबद्ध केली. एके दिवशी फक्त दोन गाणी, अशा पद्धतीने रेकॉर्डिंग केले. अनेक नामवंत वादक कलाकारांना आम्ही निमंत्रित केले. काही दिवसातच संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आठ गीत-गझलचा अल्बम आम्ही रेकॉर्ड केला. कवीवर्य शांताराम नांदगावकर यांनी रेकॉर्डिंग स्टुडिओतच ही गाणी ऐकली आणि म्हणाले, ‘एका शब्दातच प्रतिक्रिया देतो. अप्रतिम!’ वर्तमानपत्रातील लेखांना आणि अल्बमला बिनतोड शीर्षके देणाऱ्या श्रीकांतजींनी नेमका हा धागा पकडला आणि म्हणाले, ‘अनिरुद्ध, मग या अल्बमचे नाव असेल बेहतरीन.’ ही गाणी बिंदाटोन कॅसेटचे प्रमुख बिंदासाहेब ठाकरे यांनी ऐकली आणि आमचा अल्बम ताबडतोब विकत घेतला.
यानंतर दादरच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या हीरक महोत्सवाच्या कार्यक्रमात मी गायलो. ‘त्रिवेणी’ नावाच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात तीन नामवंत संगीतकार दत्ता डावजेकर, यशवंत देव आणि श्रीधर फडके यांच्या रचना रवींद्र साठे, अनुराधा मराठे, संगीता देव आणि संजय पंडित या मान्यवर कलाकारांसोबत मी सादर केल्या. २६ ऑक्टोबर १९९६ रोजी राजभवन येथे कोजागिरीनिमित्त मी गीत-गझलचा कार्यक्रम सादर केला. हा माझा ४००वा जाहीर कार्यक्रम ठरला. २८ ऑक्टोबर १९९६ रोजी जिगर स्टुडिओ वरळी, मुंबई येथे मी २००वे गाणे रेकॉर्ड केले. अशाप्रकारे १९९६ मधील ऑक्टोबर महिना माझ्यासाठी दुहेरी संस्मरणीय ठरला.
सुमारे चार वर्षांपूर्वी माझा मित्र डॉ. सतीश गावंड याने संगीतकार विलास डफळापूरकर यांची ओळख करून दिली होती. डॉ. सतीश गावंड हा ठाण्यातील नामवंत ऑर्थोपेडीक सर्जन आणि तितकाच नामवंत अॅकॉर्डियन आणि पियानोवादक. सतीश आणि विलास हे दोघेही विख्यात संगीतकार ओ.पी. नय्यर साहेबांच्या अतिशय जवळचे आणि तसेच त्यांचे निस्सीम चाहते. विलासकडे मी गावे अशी सतीशची इच्छा होती, पण इतक्या वर्षात ते जमले नव्हते. विलास नेहमी म्हणायचा की गाणे हा एक योग असतो.तुझ्या आवाजात सजेल असे छान गाणे मी केले की तो योग येईल आणि चार वर्षांनी तो योग आला. गीतकार चंद्रशेखर सानेकर यांनी लिहिलेले गणपतीचे एक अतिशय सुंदर गीत मी विलाससाठी गायलो.
‘नाम तुझे घेता घेता गीत तुझे आले ओठी,
तुझे रूप ओवाळाया तेवतात प्राणज्योती’
गीतकार चंद्रशेखर सानेकर यांचे अप्रतिम गीत आणि संगीतकार विलास डफळापूरकर यांची तितकीच परिणामकारक चाल मी कधीच विसरू शकणार नाही. या गाण्याने विलास आणि मी जवळ आलो आणि एकमेकांचे जवळचे मित्र बनलो. त्यानंतर निर्मात्या किरण चित्रे यांच्यासाठी दूरदर्शनवर मी विलासच्या ‘शब्दांच्या पलीकडले’ या विशेष कार्यक्रमातदेखील गायलो.
– अनिरुद्ध जोशी
Leave a Reply