गीता दत्त (पूर्वाश्रमीची गीता घोष रॉय चौधरी) यांचा जन्म बंगालमधील जमीनदार घराण्यात झाला. गीता दत्त यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९३० रोजी झाला. १९४६ साली ललिता पवार यांचे पती हनुमानप्रसाद यांनी प्रथम गीता दत्त यांना गाण्यासाठी पहिला ब्रेक दिला. गीता दत्त यांनी १९४६ मध्ये भक्त प्रल्हाद या चित्रपटातील गीतापासून आपल्या पार्श्वगायनाच्या कारकीर्दीचा प्रारंभ केला. १९४६ ते १९६६ या २० वर्षाच्या काळात गीता दत्त यांनी अनेक प्रकारची, वेगवेगळय़ा ढंगाची, मूडची आणि बाजाची गाणी गायिली. त्यांच्या आवाजात मादकता होती, पण संयत अन् जीवघेणी.
‘बाबूजी धीरे चलना’सारख्या गाण्यांनी तर काळजाचा ठोका चुकावा, पण तोच मादक, मदिर आवाज ‘मै तो प्रेम दिवानी’, ‘मेरा दर्द न जाने कौन’ किंवा ‘घुंघट के पट खोल तोहे पिया मिलेंगे’ अशा भजनांमध्ये तितकाच लीन-तल्लीन होताना दिसतो. गीता दत्त यांनी पुरुष गायकांसोबतही तितक्याच आत्मविश्वासाने गाणी गायिली. ‘खयालो में किस के इस तरह आया नहीं करते’ हे ‘बावरे नैन’मधलं गीत मुकेशबरोबर गाताना त्याच्या दमदार आवाजाला ताकदीने साथ दिली. तशीच ‘न ये चाँद होगा ना तारे रहेंगे’ गाताना हेमंतकुमारच्या भारदस्त आवाजापुढे ती दबली किंवा कोमजली नाही. ‘हम आप की आँखो को इस दिल में बसा ले तो’ या महंमद रफीबरोबरच्या गाण्याला खेळकर साथ देणारी गीता दत्त असते. गीता दत्त यांनी मराठी गाणीसुद्धा गायिली आहेत, ‘मुक्या मनाचे बोल सजना, बोल झाले फोल’ किंवा ‘जा सांग लक्ष्मणा सांग रामराजाला, म्हणावे न्या तुझा सीतेला’ ही मराठी गाणी गाणारी गीता दत्तच होत्या यावर विश्वास बसत नाही.
गीता दत्त यांनी संगीतविश्वात आपल्या सुरांनी चौफेर सैर केली. गाण्याच्या आशयाला आपल्या वैविध्यपूर्ण सुरावटींनी न्याय दिला. आपल्या विशिष्ट आवाजाची छाप संगीतक्षेत्रात उमटवली होती. असं असूनही तिच्या वाटय़ाला फार प्रसिद्धी आली नाही. दिग्दर्शक गुरू दत्त यांच्याशी त्यांनी विवाह केला. गुरुदत्त नावाच्या शोकांतिकेचा गीतादत्त ही एक हिस्सा होती. ‘जिन्हे नाझ है हिंदपर वो कहाँ है’ असं म्हणणारा गुरुदत्त, स्त्रीजीवनाचं वास्तव आपल्या कॅमे-याच्या तीक्ष्ण डोळ्यांतून टिपणारा गुरुदत्त गीताला स्वत:च्या चित्रपटांखेरीज इतरत्र गाऊ देत नव्हता, हे वास्तव नाकारता येत नाही. संगीतक्षेत्रात आणि व्यक्तिगत आयुष्यातही गीतादत्तच्या वाटय़ाला उपेक्षाच आली. ज्या मधूर-मदिर आवाजावर लुब्ध होऊन गुरुदत्तने गीता दत्तशी प्रेमविवाह केला होता, त्याच गीताला गुरुदत्तने वहिदा आयुष्यात आल्यानंतर दुरावलं होतं. गीता दत्त यांचे २० जुलै १९७२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply