!! यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ! अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानम सृज्याहम !!
|| परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥
सामान्यजनांमध्ये भगवत्-गीता, ‘गीता’ या नावाने ओळखली जाते.
कुरुक्षेत्रावर रणांगणामधे युद्धाच्या सुरुवातीला सांगितली गेलेली गीता, हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असून, त्यामधे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे. विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णाने अर्जुनाला, योग आणि वेदान्त यांबद्दल मार्गदर्शन केले आहे. यामुळे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान, सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे गीतेचे स्वरूप आहे. जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत, आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे.
भारतीय संस्कृतीमधे गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे, की गीतेला ‘योगोपनिषद’ किंवा ‘गीतोपनिषद’ ही म्हणले जाते. तिला उपनिषदांचा दर्जा दिला जातो. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला ‘उपनिषदांचे उपनिषद’ असेही म्हणले जाते.
गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला ‘मोक्षशास्त्र’ म्हणले गेले आहे.
— अनिल सांबरे
Leave a Reply