नवीन लेखन...

भूशास्त्रज्ञ शंकर पुरुषोत्तम आघारकर

वनस्पतिशास्त्रज्ञ, प्राणिशास्त्रज्ञ आणि भूशास्त्रज्ञ शंकर पुरुषोत्तम आघारकर यांचा जन्म १८ नोव्हेंबर १८८४ रोजी मालवण येथे झाला.

शंकर पुरुषोत्तम आघारकर यांचे वडील शासकीय खात्यात असल्यामुळे त्यांच्या अनेक गावी बदल्या होत असत. त्यामुळे शंकर आघारकर यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण निरनिराळ्या गावी झाले. ते १९०१ मध्ये धारवाडच्या शासकीय प्रशालेमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी १९०२ मध्ये मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि यथाकाल वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र या विषयांचा अभ्यास करून त्यांनी बी.ए.च्या परीक्षेत प्रथम वर्ग मिळवला. याच परीक्षेत इंग्रजीमध्ये दाखवलेल्या नैपुण्यासाठी त्यांना बेल पारितोषिक देण्यात आले. ते १९०९ मध्ये वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र आणि भूशास्त्र हे विषय घेऊन एम.ए. झाले.

आघारकर यांना १९१० मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्राणिशास्त्र प्राध्यापक आणि विभागप्रमुख या पदावर तात्पुरती नोकरी मिळाली. त्यांनी १९१३ पर्यंत त्या विषयाचे अध्यापन केले. अध्यापनाबरोबर निसर्ग निरीक्षण आणि संशोधनाची त्यांना विलक्षण गोडी असल्यामुळे, सवड मिळताच निरनिराळ्या ठिकाणी जाऊन ते वनस्पती आणि प्राण्यांचे निरीक्षण करत. आवश्यकता वाटल्यास त्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत घेऊन येत. त्यांच्या या छंदामुळे पश्चिम घाटातील नद्या आणि पाणवठे यात लिम्नॉक्निडा इण्डिका या जलव्याल प्राणीसंघातील जलपुष्प गणातील प्राण्यांचे अस्तित्व असल्याचे आढळून आले. त्यापूर्वी पश्चिघम घाटात या जलपुष्पाचे अस्तित्व कोणासही ठाऊक नव्हते. तांबी, वेण्णा, धोम येथील धरणांमध्येही हे प्राणी आढळून आले. त्यावर ‘नेचर’ या प्रख्यात नियतकालिकात त्यांचा संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाला.

एल्फिन्स्टन महाविद्यालयातील अध्यापकाची नोकरी संपल्यावर आघारकर १९१३ मध्ये कोलकाता येथे गेले. तेथील भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेतील इंग्रज अधीक्षक डॉ. अॅलनेडेल यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहाराच्या माध्यमातून परिचय झालेला असल्यामुळे त्यांनी आघारकरांना भारतीय संग्रहालयाचे (इंडियन म्युझियम) मानद पत्र-प्रतिनिधी म्हणून नेमले. या संस्थेत स्वत:बरोबर आणलेल्या वनस्पती, प्राणी संग्रहाचा अभ्यास करत असताना उपअधीक्षक ग्रॅव्हली यांच्याशी परिचय झाला. आघारकर यांना त्यांच्याकडून अनेक तंत्रे शिकावयास मिळाली. ग्रॅव्हली यांच्याबरोबर पश्चिकम घाटामध्ये प्रवास करून तेथील प्राणी आणि खास करून जलव्याल प्राणिसंघातील प्राण्यांचा त्यांनी अधिक अभ्यास केला.

कोलकाता विद्यापीठाचे कुलगुरू सर आशुतोष मुखर्जी यांनी डॉ.सी.व्ही. रामन यांच्या शिफारशीवरून १९१३ मध्ये आघारकर यांची त्या विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागात प्राध्यापकपदी नियुक्ती केली. ही नियुक्ती तेथील घोष आसनाशी संबंधित होती.

आघारकर १९१४ मध्ये मुखर्जी यांच्या सांगण्यावरून पुढील शिक्षणासाठी जर्मनीला गेले, परंतु त्याच वर्षी पहिले महायुद्ध सुरू झाल्याने त्यांना १९१७ पर्यंत बंदिवासात राहावे लागले. नंतरची दोन वर्षे त्यांनी सक्षम वनस्पतिशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले आणि १९१९ च्या डिसेंबर महिन्यात त्यांनी पीएच.डी. पदवी मिळवली.

नंतर डॉ.आघारकर यांनी सार्याा युरोपभर प्रवास केला आणि तेथील विविध वनस्पतींचा संग्रह करून कोलकाता विद्यापीठात वनस्पतिशास्त्राचे अध्यापन, संशोधन आणि मार्गदर्शन यावर लक्ष केंद्रित केले. त्यांना विविध ठिकाणी जाऊन वनसृष्टीचा अभ्यास करण्याची अनुमती मिळाली. त्याचा लाभ घेत डॉ.आघारकर यांनी नेपाळ मधील विविध ठिकाणी जाऊन वनसृष्टीचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास केला आणि वनस्पतींचा संग्रह केला. त्यांनी केलेला अभ्यास हा नेपाळ मधील वनसृष्टीचा पहिलाच शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला अभ्यास होता, असे म्हटले जाते.

डॉ.आघारकर यांच्या कोलकाता विद्यापीठातील ३३ वर्षांच्या कारकिर्दीत वनस्पति-शरीरविज्ञान, आनुवंशशास्त्र, वर्गीकरण, कवकशास्त्र, पुरातन वनस्पतिविज्ञान अशा विज्ञानशाखांच्या अभ्यासासला प्रारंभ झाला. त्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी भात, आंबा, केळी, ज्यूट इत्यादी महत्त्वाच्या पिकांचे आणि अन्य फळांविषयी बहुमोल संशोधन केले.

शंकर पुरुषोत्तम आघारकर यांचे निधन १ सप्टेंबर १९६० रोजी झाले.

— डॉ. पुरुषोत्तम जोशी.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..