नवीन लेखन...

जर्मनीचा हुकूमशहा ॲ‍डॉल्फ हिटलर

ॲ‍डॉल्फ हिटलर यांचा जन्म २० एप्रिल १८८९ रोजी ब्राउनाऊ ॲ‍हम इन येथे झाला.

ॲ‍डॉल्फ हिटलर यांचे वडील ऑस्ट्रियन सरकारच्या अबकारी खात्यातील एक सामान्य अधिकारी होते. क्लारा ही त्याच्या वडिलांची तिसरी पत्नी होती. हिटलरला अनेक भावंडे होती; परंतु त्यांपैकी बरीच बालपणी निर्वतली होती. धाकटी बहीण पॉला मात्र मोठी झाली. सावत्र भावंडांपैकी ॲ‍कलाइस हा भाऊ आणि एंजेला ही बहीण ही दोघे मोठी झाली. एंजेला हिच्याशीच हिटलरची जवळीक होती. १९२८ मध्ये जेव्हा हिटलरने हौस वॉचेनफेल्ड येथे घर घेतले, तेव्हा त्यांनी व्हिएन्नाहून एंजेलास बोलावून घेतले. एंजेला विधवा होती. तिने आपल्या दोन मुलींना बरोबर आणले. त्यांपैकी थोरली गेली रौबल हिच्या प्रेमात हिटलर पडला. १९०० मध्ये हिटलर जवळच्या लिंझ रिअल स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षणासाठी दाखल झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर (१९०३) त्याच्या आईला निवृत्तिवेतन मिळत असे. त्यांची परिस्थिती हिटलरने माय काम्फ (माझा लढा) मध्ये म्हटल्यापेक्षा खूपच चांगली होती. १९०४ मध्ये हिटलरने स्वतःच्या असमाधानकारक प्रगतीमुळे लिंझ रिअल स्कूल सोडले आणि स्टेर येथील शाळेत प्रवेश घेतला. नंतर वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी शिक्षण सोडले (१९०६); परंतु त्याला शाळा सोडल्याचा दाखला मिळाला नाही. शैक्षणिक क्षेत्रातील अपयशामुळे शिक्षणाविषयी आणि शिक्षितांविषयी हिटलरच्या मनात विलक्षण अढी निर्माण झाली. आपण मोठे चित्रकार होणार अशी त्याची खात्री होती. १९०७ मध्ये हिटलर व्हिएन्ना येथील अकॅडेमी ऑफ फाइन आर्ट्समध्ये शिक्षण घ्यावे या महत्त्वाकांक्षेने प्रवेशपरीक्षेस बसला व अनुत्तीर्ण झाला. त्याला पुन्हा परीक्षेस बसण्यास परवानगी मिळाली नाही. १९१३ पर्यंत तो व्हिएन्ना येथे होता. ह्या काळात त्यांनी कोणतीही नोकरी केल्याविषयीचा पुरावा उपलब्ध नाही. चित्रे काढून अगर प्रारूपकाराचे (ड्राफ्ट्समन) काम करून तो जगत होता. ह्याच काळात हिटलरचा श्रमजीवी वर्गाशी संपर्क आला. ह्या वर्गाविषयी त्याला सहानुभूती वाटण्याऐवजी घृणा उत्पन्न झाली. साम्यवादविरोध तो येथेच शिकला. त्याचप्रमाणे त्यांचा ज्यूद्वेषही याच वेळी जागृत झाला. ज्यू लोकांच्या पापाचा इतिहास वाचून त्यांनी आपल्या ज्यूद्वेषाचा पाया बळकट केला. लोकशाही मार्गाचा अवलंब करणे हेही मूर्खपणाचे आहे, असे त्याचे मत बनले. हुकूमशाही सर्वश्रेष्ठ आहे हे पायाभूत सत्य हिटलर व्हिएन्ना येथेच शिकला. एकंदरीत व्हिएन्नातील १९०७ ते १९१३ हा काळ हिटलरच्या जीवनात अत्यंत परिणामकारक होता. त्याच्या राजकीय विचारांना स्पष्ट स्वरूप देण्यास व्हिएन्नातील ज्या गटांची मदत झाली, त्यांमध्ये ऑस्ट्रियन सोशल डेमोक्रॅट, पॅन जर्मन नॅशनॅलिस्ट आणि ख्रिश्चन सोशल पार्टी यांचा वाटा मोठा होता.

पहिल्या महायुद्धात हिटलरने स्वयंस्फूर्तीने भाग घेतला. तत्पूर्वी त्याला अशक्त म्हणून सैन्यात अपात्र ठरविण्यात आले होते. बव्हेरियाच्या सोळाव्या राखीव दलात त्यांचा समावेश करण्यात आला. युद्धात हिटलरने धैर्याने आणि सचोटीने कामगिरी बजावली. त्याबद्दल त्याला आयर्न क्रॉस देण्यात आला. १९१६ मध्ये जखमी झाल्यामुळे त्याला जर्मनीस परत आणण्यात आले. पुन्हा युद्धात भाग घेतल्यानंतर १९१८ च्या ऑक्टोबरमध्ये त्याच्या डोळ्यांवर परिणाम झाल्यामुळे त्याला दिसेनासे झाले व पुनश्च इस्पितळात ठेवण्यात आले. त्यानंतर लवकरच युद्ध संपले.

महायुद्धात जर्मनीचा पराभव होण्यास राजकारणी लोक कारणीभूत होते, ह्या सर्वसामान्य मतप्रणालीशी हिटलर सहमत होता. प्रजासत्ताक पक्षाने व्हर्सायच्या तहावर सह्या केल्याने प्रजासत्ताक व लोकशाही यांविषयी त्याचे मत आणखी वाईट झाले. १९१९ च्या जानेवारीत हिटलर म्यूनिक येथे स्थायिक झाला. तेथे अर्न्स्ट र्होईम ह्या दहशतवादी लष्करी अधिकाऱ्याशी त्यांचा परिचय झाला. बव्हेरियन सरकारचे धोरण हे मध्यवर्ती सरकारच्या विरुद्ध असल्याने दहशतवाद अथवा मध्यवर्ती प्रजासत्ताकाविरोधी उठाव यांच्याकडे सरकारने नेहमीच कानाडोळा केला. ह्याच सुमारास हिटलरला लष्कराच्या राजकीय खात्यात आदेशाधिकारी (इन्स्ट्रक्शन ऑफिसर) म्हणून नेमण्यात आले. पुढे जर्मन कामगार पक्षात सामील होण्याचा आदेश मिळाल्यावरून हिटलरने त्या पक्षात प्रवेश केला (सप्टेंबर १९१९). मुळात सात सभासद असलेली ही संघटना हिटलरच्या नेतृत्वाखाली नॅशनल सोशालिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी म्हणून नावलौकिकास आली. म्यूनिकमधल्या लष्करी अधिकाऱ्यांच्या अनुमतीने त्यांनी आपली संघटना प्रबळ केली. पक्षाचे पाशवी बळ वाढविण्यासाठी स्वयंसेवक संघटनेची (स्टॉर्मट्रपर्स) योजना काढण्यात येऊन अनेक बेकार लष्करी जवानांचा तीत समावेश करण्यात आला. नाझी पक्षाच्या कार्याला सुरुवात येथपासूनच झाली. ह्या काळात हिटलरचा हेरमान गोरिंग, आल्फ्रेट रोझेनबेर्ख आदी लोकांशीसंबंध आला. १९२१ मध्ये दहशतवादाच्या आरोपावरून हिटलरला तीन महिन्यांची शिक्षा झाली.

८ नोव्हेंबर १९२३ रोजी हिटलरने बव्हेरियात सशस्त्र उठाव घडवून आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्याबद्दल त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली. तुरुंगाबाहेर आल्यावर हिटलरने पुन्हा पक्षसूत्रे हाती घेऊन पक्षबल वाढविण्यास प्रारंभ केला. ह्या काळात ल्यूडेन्डोर्फने पक्ष सोडून दिला. १९२५-२६ मध्ये हिटलर व इतर नाझी पुढारी यांच्यात वितुष्ट येऊन हॅनोव्हर येथील बैठकीत उत्तर नाझी पक्षाने हिटलरचा पक्षकार्यक्रम अमान्य केला. गोबेल्सने हिटलरला पक्षातून काढून टाकण्याची सूचना केली. बॅम्बर्गच्या बैठकीत इतर नाझी पुढारी व गोबेल्स यांची मने वळवून हिटलरने एकजूट राखली. ह्या सुमारास स्वयंसेवक संघटनेशी हिटलरचे वितुष्ट आले; परंतु अंती त्यांनी त्यांना आपल्या वर्चस्वाखाली आणले. हिटलरची संपूर्ण वैयक्तिक अधिकाराची मागणी संघर्षाच्या मुळाशी होती. गुस्टाव्ह श्ट्रेझमानच्या परराष्ट्रीय धोरणामुळे जर्मनीची परिस्थिती सुधारत होती. लोकांचे वैयक्तिक उत्पन्न वाढले, पुनरौद्योगिकीकरण झपाट्याने होत होते. नाझी पक्षाची त्यामुळे पीछेहाट झाली असती; परंतु युद्ध खंडणीचा प्रश्न हिटलरने ज्वलंत ठेवला. श्ट्रेझमानच्या मृत्यूनंतर त्यांना आवश्यक ती संधी मिळाली. त्यापूर्वी यंग कमिटीने ही खंडणी निश्चितकरून ४५ वर्षे ती हप्त्याने द्यावी, असा निर्णय दिला होता. याविरुद्ध जर्मनीत आल्फ्रेड हिंडेनबुर्ख ह्या श्रीमंत व अतिरेकी माणसाच्या नेतृत्वाखाली चळवळ सुरू झाली. तिचा मुख्य उद्देश असफल झाला; परंतु तिच्यामुळे हिटलर राष्ट्रीय पुढारी बनला. त्यामुळे व्यक्तिशः हिटलरची तसेच नाझी पक्षाची लोकप्रियता वाढली. १९२९ च्या डिसेंबरमध्ये नाझी पक्षाने प्रांतिक निवडणुकांत बेडन, ल्यूबेक, थुरिंजिया, सॅक्सनी व ब्रंझविक प्रांतांत यश मिळविले. १९३० च्या जागतिक आर्थिक मंदीचे परिणाम जर्मनीवर मोठ्या प्रमाणात झाले. नाझी पक्षाची लोकप्रियता वाढली. नाझी पक्षाचे धोरण प्रथमपासूनच व्हर्सायचा तह, साम्यवाद, लोकशाही यांना विरोधी होते. मंदीमुळे त्या विरोधाला राष्ट्रीय आधार मिळाला. १९३३ च्या जानेवारीत अध्यक्ष पॉल फॉन हिंडेनबुर्खने हिटलरला चॅन्सलरपदी नेमले. जर्मन संघराज्याच्या मध्यवर्ती संसदेत नाझी पक्षाचे बहुमत झाले होते. संसद व हिंडेनबुर्ख यांच्याकडून हिटलरने एक जादा कायदा (इनॅबलिंग ॲ‍ क्ट) संमत करून घेतला व त्या बळावर नाझी राजवट सुरू केली. १४ जुलै १९३३ रोजी एका वटहुकमाने नाझीशिवाय इतर पक्षांवर बंदी घालण्यात आली. नाझी राजवटीचा प्रारंभ हिंसेने व दहशतवादाने झाला. विशेष कायद्यांद्वारा ज्यूंना सर्व अधिकार नाकारण्यात आले. अर्थकारणाशिवाय सर्व क्षेत्रांचे त्यांनी नाझीकरण केले. वाढत्या अंदाधुंदीला आळा घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यास स्वयंसेवक संघटनेकडून विरोध होऊ लागला. विरोधकांचे खून करून त्यांनी त्यांचा कायमचा बंदोबस्त केला (३० जून १९३४ चे शुद्धीकरण) . २५ जुलैला ऑस्ट्रियात नाझी क्रांती घडवून आणण्यात त्याला यश मिळाले. २ ऑगस्ट १९३४ रोजी (हिंडेनबुर्खच्या मृत्यूनंतर) हिटलर जर्मनीचा अध्यक्षझाला. तो अध्यक्ष, चॅन्सलर, सरसेनानी आणि नाझी पक्षप्रमुख होता. १९ ऑगस्टला ह्या प्रश्नावर सार्वजनिक कौल घेण्यात येऊन हिटलरच्या बाजूने ८९.९३% मते पडली. परराष्ट्रखाते हिटलरने स्वतःकडे ठेवून घेतले. सर्वंकषवादी राज्य आणि एक नेता, एक वंश, एक पक्ष असे धोरण जर्मनीत स्वीकारण्यात आले. १३ जानेवारी १९३५ च्या सार्वमताने सार प्रांत जर्मनीच्या ताब्यात आला. १६ मार्च १९३५ रोजी हिटलरने व्हर्सायच्या तहातील युद्ध-सामग्रीबंदीची कलमे झुगारल्याची घोषणा केली. ह्या सुमारास इंग्लंडशी नाविक करार केला. जपान व इटलीशी तह करून जर्मनीचे परराष्ट्रीय वजन वाढविले. १९३८ मध्ये त्यांनी संरक्षणखाते स्वतःकडे घेतले आणितो खऱ्या अर्थाने जर्मनीचा हुकूमशहा झाला. इ. स. १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर त्यांनी सर्वाधिकार आपल्याच हाती ठेवले. युद्धनीतीतही कुशल तज्ज्ञांचा सल्ला न घेता त्यांचा स्वतःच्या बुद्धि-सामर्थ्यावर फार विश्वास असल्याने लष्करी अधिकारी दुरावले. तो स्वतः संशयी व कपटी असल्याने त्याला सर्वत्र कपटाचा संशय येई. त्याचे ज्यूंविषयींचे धोरण व्यक्तिगत वैफल्यभावनेतून निर्माण झाले होते. हिटलर-कालीन हत्याकांडामध्ये सु. साठ लाख ज्यूंचा बळी गेला. त्याच्या आत्यंतिक राष्ट्रवादाला आंतरराष्ट्रीय दृष्टी येऊ शकली नाही. विरोध त्यास सहन होत नसे. जगापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी अहंकाराचे कवच निर्माण केले. त्यातूनच त्याच्या वंशशुद्धीच्या सिद्धांताचा उगम झाला. दुसऱ्या महायुद्धास हिटलर कारणीभूत होते हे निःसंशय; परंतु त्यांची युद्धातील कर्तबगारी विचक्षण होती. त्यांनी मोठी प्रगती घडवून जर्मनीला समर्थ बनवले; परंतु महायुद्धापायी या साऱ्यावर पाणी पडले. महायुद्धातील प्रतिकूल परिस्थिती लक्षात येताच तो बर्लिनला परत आला. बर्लिन शहर रशियनांच्या ताब्यात जात असताना ॲ‍डॉल्फ हिटलर यांनी आपली पत्नी इव्हा ब्राऊनसह ३० एप्रिल १९४५ रोजी आत्महत्या केली.

ॲ‍डॉल्फ हिटलर यांनी‘माईन काम्फ’ – ‘माझा लढा’ हे आत्मचरित्र लिहिले आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..