वॉट्सअप मेसेज च नोटिफिकेशन वाजलं आणि रोहन ने झटकन मोबाईल उचलून मेसेज चेक केला. पण त्याला अपेक्षित असलेले मेसेज नव्हते … फोन बाजूला ठेवून त्याने पुन्हा लॅपटॉप मध्ये लक्ष केंद्रित केलं, थोड्या वेळानं पुन्हा एकदा मेसेज ची टोन वाजली आणि ते मेसेज पाहताना नकळत त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं . ” शाळासोबती” या व्हॉटसअप ग्रुप मध्ये ते मेसेज आले होते…अर्थात केवळ रोहनच नव्हे तर त्या खास ग्रुप मध्ये असलेल्या, अनुज, राकेश, संदीप, विनोद,मनोज तसेच दिप्ती, रेहाना स्वप्ना, अंजू सारख्या तीस चाळीस मुला मुलीं साठी ‘ हॅपनिंग ‘ ग्रुप होता तो.
साताऱ्याच्या ‘ नूतन विद्या मंदिर ‘ च्या सन १९९५ – ९६ च्या दहावी पास बॅच च्या मुला मुलींचा व्हॉटसअप ग्रुप होता तो.
काही महिन्या पूर्वी या पैकी काही मित्र मैत्रिणी जे फेसबुक वर एकमेकांशी संपर्कात होते त्यांच्या डोक्यात एक व्हॉटसअप ग्रुप तयार करण्याची कल्पना घोळू लागली. मग आपापल्या संपर्कात असलेले मित्र, मैत्रिणींचा शोध सुरू झाला आणि ‘ थेंबे थेंबे तळे साचे ‘ या उक्ती प्रमाणे लवकरच तीस चाळीस जणांचा एक व्हॉटसअप ग्रुप तयार झाला, त्या ग्रुप ला ” शाळासोबती” हे एक सार्थ नाव ही देण्यात आलं, कोणी तरी शाळेचा एक फोटो ग्रुप आयकॉन म्हणून लावला, रोहन , अनुज आणि दीप्ती या ग्रुप चे अॅडमीन बनले … आणि मग रात्रंदिवस त्या ग्रुप मध्ये शाळेत दहावी चा वर्ग भरल्या प्रमाणे कलकलाट सुरू झाला, गप्पा, एकमेकांची थट्टा मस्करी, शालेय जीवनातील कटू गोड आठवणी, यांचे तर पेवच फुटले . जवळ जवळ चोवीस पंचवीस वर्षां नंतर हा खास वर्ग भरला होता त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस थोड्या औपचारिक गप्पा, विचारपूस, ” ती सध्या काय करते? ” ” तो आज काल कुठे असतो? ” किंवा ” अमुक सर भेटले होते … ” सारख्या चर्चांमध्ये गेले, त्या वेळचे काही शिक्षक आणि काही वर्ग मित्र आता आपल्या मध्ये नाहीत ह्या सारख्या दुःखद आणि चुटपुट लावणाऱ्या बातम्यांची देखील देवाण घेवाण झाली, मग मात्र गुड मॉर्निंग पासून गुड नाईट पर्यंत हे सगळे बॅच मेट स् या ग्रुप रुपी वर्गात गुंग झाले, विषयांची कमतरता कधीच नसल्या मुळे सगळ्यांना आता या ग्रुप ची सवय झाली होती.
अश्यातच एकदा मनोज ने ग्रुप मध्ये प्रस्ताव मांडला ” आपण सगळे जण आता या ग्रुप मध्ये बरेच महिने नुसत्या गप्पा मारतोय, एक गेट टुगेदर घ्यायचं का आता? ” आणि लगेचच ऑनलाईन असलेल्या तमाम मेंबर्स नी थंप्स अप ची चिन्हं टाकून तो प्रस्ताव उचलून धरला…
” खरंच रे आपण सगळे आता भेटायला हवं ..इतकी वर्ष झाली राव शाळा सोडून “रोहन चे अनुमोदन.
” नक्की करू आपण .. पण कुठे करायचं गेट टुगेदर? ” दिप्ती ने विचारले ” तो काही मोठा विषय नाही ग ! आधी कोण कोण यायला तयार आहे ते बघा ” मनोज आणि मग गेट टुगेदर साठी च्या चर्चांना नुसते उधाण आले, सर्व मित्र मैत्रिणी मध्ये एक वेगळाच उत्साह संचारला . ” आपण ना आपल्या शाळेतच गेट टुगेदर घेऊ या ” पहिल्या पासूनच अभ्यासू आणि हा बोर्डात येणारच असा ज्याच्या बद्दल तो स्वतः सोडून प्रत्येकाला आत्मविश्वास होता असा अभिजित साने बोलला..
त्यावर लगेच ” नको यार ..शाळेत आपल्याला नीट एन्जॉय करता नाही येणार राव .. उगाच बंधनं कशाला ” असा एकत्रित सुर शाळेत आठवड्यातून कमीत कमी दोन तीन दिवस तरी अंगठे धरून वर्गा बाहेर उभे राहणारे संजय देशमुख आणि सुनील काळे या जोड गोळी ने लावला .
अर्थात ही सगळी चर्चा सुरू असताना मुलींमध्ये मात्र ” गेट टुगेदर साठी जायचं का नाही? ” या कळीच्या मुद्यावर च गाडी अडली होती . आता प्रत्येक जणी मागे संसार,पोर बाळ, नोकरी याचे व्याप जडले होते ..
अखेर हो नाही करता करता ग्रुप मध्ये असलेले आणि नसलेले असे सुमारे साठ जणं गेट टुगेदर साठी यायला तयार झाले, मुलींची संख्या देखील लक्षणीय होती, “त्यामुळेच न येणारी मुलं देखील यायला तयार झाली होती ” असं शाळेत असताना ‘ दिल फेक आशिक कम लव गुरु पण मुलींशी बोलताना मात्र ज्याची खाशी तारांबळ उडायची ‘ अश्या गिरीश देगावकर उर्फ गिऱ्या बच्चन यांचे प्रामाणिक मत होते . मग यथावकाश कोण कोण येणार याची फायनल लिस्ट करायचं काम रोहन, विनोद यांच्या कडे, तर मुलींच्या आघाडीवर अंजू आणि स्वप्ना यांच्या कडे आलं ..
तारीख ठरली ….
मग गेट टुगेदर कुठे आयोजित करायचं? याचा ऊहापोह सुरू झाला. गेट टुगेदर मध्ये आपल्या दहावी च्या शिक्षकांना बोलवायचं का? हा कळीचा प्रश्न उपस्थित झाला .
” अरे शिक्षकांना कशाला उगाच बोलावताय? नको ..त्या पेक्षा आपलं आपण एन्जॉय करू ” अर्थातच शेवटचा बेंच संघटना यांची मागणी …
” अरे असं नाही रे बरं वाटत, त्यांच्या मुळेच आज आपण आयुष्यात यशस्वी आहोत, शिक्षकांना बोलावू या आपण असा सूर हुशार आणि शिक्षक प्रिय विद्यार्थी आघाडी तर्फे आळवण्यात आला, अखेर मग सकाळी सर्वांनी शाळेत जमायचं, शिक्षकांचा सत्कार करायचा, त्यांच्या कडून मार्गदर्शन आणि आशिर्वाद घेऊन मग दुपारपासून साताऱ्यातील एका रिसोर्ट मध्ये गेट टुगेदर घ्यायचं असा सर्वमान्य सुवर्णमध्य काढण्यात आला .
अर्थात ही सर्व मत – मतांतरे असली तरी, प्रत्येकाचे एका बाबतीत मात्र उत्स्फूर्त पणे एकमत होतं, की ज्या शाला माऊली ने आपल्याला सर्वांना घडविले, लायक बनविले त्या शाळे साठी सर्वांनी मिळून वर्गणी जमा करून एक देणगी देण्यात यावी.. कारण ह्या सगळ्या वर्ग मित्र आणि मैत्रिणी पैकी काही जण डॉक्टर, काही वकील, काही बँकर होते तर काही जण यशस्वी उद्योजक होते, अर्थात मुली देखील कर्तबगारी मध्ये मागे नव्हत्या, त्यांच्या पैकी ही काही जणी डॉक्टर, इंटेरियर डिझायनर, तर काही शिक्षिकेच्या पवित्र पेशात होत्या, त्या मुळे शाळेसाठी द्यायच्या ऐच्छिक वर्गणी चा आकडा बघता बघता चार लाखावर पोहोचला. अनुज बँकेतला अधिकारी असल्यामुळे एक बँक खाते तयार करून त्यात ही देणगी रुपी ठेव जमा करण्याची जबाबदारी त्याच्या वर होती, शाळेत असताना गणितात हमखास काठावर पास होणाऱ्या अविनाश आणि शेखर यांनी गेट टुगेदर च्या वर्गणीचे कलेक्शन आणि जमा खर्च याचा भार उचलला, तर कार्यक्रमाची रूप रेषा, मेनू आदी आवडीची कामे मुलींपैकी अंजली, दीप्ती, स्नेहा आणि विद्या यांनी स्वखुशीने स्वीकारली. हॉटेल बुक झाले, कार्यक्रम रूप रेषा तयार झाली, शाळेत कार्यक्रमाला कोण कोणत्या शिक्षकांना आमंत्रित करायचं हे निश्चित झालं … शाळेत असताना मुलात मुल बनून राहणारे आणि छान छान गोष्टी सांगणारे सर्वांचे लाडके पेडणेकर सर तर यायलाच पाहिजेत.
त्याशिवाय मग ” ह्या बाई घरी दूध वाल्या शी पण संस्कृत मध्येच बोलत असाव्या ” अशी शंका येण्या इतपत अस्खलित संस्कृत बोलणाऱ्या पेंडसे बाई, मुलांना शारीरिक शिक्षण आणि नाट्य कला हे दोन्ही भिन्न विषय लीलया शिकवणारे राजपुरोहित सर, गणीतासारखा किचकट विषय छडी न वापरता गमती जमती ने शिकवणारे शिंदे सर …आणि इतर काही शिक्षक कार्यक्रमास येण्या साठी तयार झाले …. सर्व मुला मुलींची फायनल लिस्ट चेक करताना रोहन ला त्यात ” विन्या ” म्हणजेच विनायक प्रभाकर पेठकर चे नाव कुठेच दिसले नाही, त्याला आश्चर्य वाटले . विनायक व्हॉटसअप वर नाही हे त्याला ठाऊक होते पण त्याला कोणीच कसं संपर्क केला नाही हे त्याला उमगत नव्हतं, त्याने ग्रुप मध्ये मेसेज टाकून ” विन्या” ची विचारपूस केली, त्यावर तो सध्या कोणाच्याच संपर्कात नसल्याचे त्याला समजले. कोणी सांगितले की तो अजुन ही साताऱ्यात त्याच्या पेठेतल्या जुन्या घरात राहतो, अखेर साताऱ्यात राहणाऱ्या स्वप्ना ने माहिती पुरविली ” अरे माझी मुलगी आणि विनायक चा मुलगा चिन्मय आपल्याच शाळेत एकाच वर्गात आहेत, त्यामुळे विनायक अधून मधून भेटतो, विनायक चा मुलगा बरेच दिवस शाळेत आला नाही, त्याची तब्येत बरी नाही असे माझ्या मुलीने सांगितले तो एम आय डी डी मध्ये एका छोट्या कंपनीत कामाला आहे, अजुन ही घरची परिस्थिती बेताचीच आहे, तो फारसा मिक्स होत नाही कोणा मध्ये ” मग रोहन, अनुज, यांनी स्वप्ना च्या मदतीने विन्या चा फोन नंबर मिळवला आणि त्याला फोन केला पण नेमका त्या वेळेस तो फॅक्टरी मध्ये होता त्यामुळे बोलणं होऊ शकले नाही. असं ही गेट टुगेदर च्या एक दिवस आधी आपण साताऱ्यात जाणार आहोत, तेव्हा विन्या ला घरी जाऊन प्रत्यक्ष भेटून कार्यक्रमासाठी घेऊन येऊ असं ठरवून सगळे पुन्हा तयारीस लागले.
” विन्या ” गेट टुगेदर ला आलाच पाहिजे असा सर्वांचाच आग्रह होता कारण विन्या होताच तसा. त्याच्या आयुष्यावर ” परोपकारी विनू ” असा एखादा धडा तिसरी चौथी च्या पुस्तकात नक्की देता येईल इतका स हृदयी आणि गरीब स्वभावाचा… कित्येक जणांना त्यांचा गृहपाठ करून आणण्यास मदत केली असेल त्याने, प्रसंगी स्वतः च्या मोत्यासारख्या अक्षरात मित्रांची प्रॅक्टिकल बुक पूर्ण करणे, कोणा गरजू मित्राला पेन देणे, स्नेह संमेलन असताना अगदी कपडे सांभाळणे, आदी कामे तो अतिशय परोपकारी वृत्तीने करायचा . त्यामुळे विन्या सर्वांनाच हवा हवासा असायचा . अर्थात ते शालेय दिवस मुळी होतेच तसे मोरपंखी …मैत्री आणि मैत्र भावनेने भारलेले. मधल्या सुट्टीत अगदी खरकट्या हाताने एकमेकाच्या डब्यात हात घालून बिनधास्त खाताना जाती, धर्म, गरिबी आणि श्रीमंती यांचे अडसर कधीच यायचे नाहीत. शनिवारी भीमरूपी महारुद्रा स्तोत्र म्हणताना वर्गातले अब्दुल आणि रेहाना देखील तेव्हढ्याच भक्ती ने त्यात आवाज मिसळायचे, तर ईद आली की ” उद्या शिरखुर्मा आणला नाहीस तर बघ हं !!… ” असा प्रेमळ धमकी वजा आग्रह या दोघांना सगळे करायचे . एकमेकांमध्ये कोणता ही द्वेष, स्पर्धा, दूजाभाव कधीच नव्हता ..होती ती केवळ निकोप मैत्री, जिव्हाळा अन् दंगा मस्ती अखेर गेट टुगेदर चा दिवस उद्यावर आला आणि अंतिम आकडा पंचेचाळीस जणांचा झाला . त्यातील बरेच मेंबर्स साताऱ्यात स्थायिक झालेले होते, बाहेर गावाहून म्हणजे पुण्यातून, मुंबईतून, कोल्हापूर, नाशिक आणि एक दोन जण दिल्ली कर असे ही बरेच जणं येणार होते काही उत्साही वीर ” घरच कार्य ” असल्या प्रमाणे आदल्या दिवशीच मुक्कामी साताऱ्यात आले. रोहन, अनुज, मनोज आणि स्वप्ना संध्याकाळीच विन्या ला आश्चर्याचा धक्का द्यावा म्हणून थेट त्याच्या घरी गेले . शाळे च्या अगदी जवळ त्याचे घर असल्या मुळे ही मंडळी शालेय दिवसात नेहमी त्याच्या घरी कधी पाणी प्यायला, कधी दप्तरे ठेवायला आणि विन्याच्या आईच्या हातचा खास ” शिरा ” खायला आवर्जून जायची .
पण सर्वांचे स्वागत बंद दरवाजा आणि कुलूपाने केले . रोहन ने विनायक ला फोन केला तर समजलं की त्याचा नऊ वर्षांचा मुलगा सिंबायोसिस हॉस्पिटल मध्ये अॅडमिट आहे . त्याच्या करोनरी अर्टरी मध्ये लहान पणा पासून एक ब्लॉकेज होते, वाढत्या वयानुसार ते आपोआप बरे होईल असे डॉक्टरांना वाटत होते परंतु तसे झाले नाही आणि ते ब्लॉकेज तसेच राहिले, परिणामी हृदयाची कार्यक्षमता कमी होऊ लागली . आता बाय पास सर्जरी हाच एक पर्याय होता. सर्व जण काळजीत पडले . इकडे हॉस्पिटल मध्ये विनायक, त्याची पत्नी आणि आई डॉक्टर अजित पाटील यांच्या केबिन मध्ये बसून उपचारा बद्दल चर्चा करीत होते, चिन्मय आय सी यू मध्येच होता.
” मी आत्ता पुण्यातील रुबी हॉल च्या कर्डिओ सर्जन डॉक्टर सुहास हरदास यांच्या शी बोललो, आपल्याला वेळ न घालवता बाय पास सर्जरी करावी लागेल ” डॉक्टर अजित पाटील समजावून सांगत होते.
” पण सर लगेच कसे शक्य आहे? किती खर्च येईल, ? मी लगेच पैसे कसे अरेंज करणार? ” विनायक अतिशय चिंतातुर झाला होता.
” साधारण अडीच लाख रुपये लागतील, सर्जरी, हॉस्पिटल खर्च आणि मेडीसिन मिळून ” डॉक्टर म्हणाले. ” तुम्ही विचार करा आणि मला सांगा, आधी निदान एक लाख आगाऊ भरावे लागतील . तो पर्यंत बाकी काही उपचार करायचे आहेत ते मी करतो, ” असे म्हणत ते केबिन मधून बाहेर पडले.
सकाळी सगळे जण साडे नऊ वाजता शाळेतील कार्यक्रमासाठी जमणार होते .रोहन, अनुज आणि दिप्ती आधीच पोहोचले होते, पेडणेकर सर देखील आले होते, रोहन ने पेडणेकर सर आणि सध्याचे शालाप्रमुख बी के कुलकर्णी सर यांची भेट घेतली.
इकडे विनायक ने त्याच्या कंपनीत फोन करून प्रोविडेंट फंड चे पैसे काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले .
” मिस्टर विनायक .. तुम्हाला पाटील डॉक्टरांनी बोलावलंय ” नर्स सांगायला आली विनायक तत्परतेने केबिन मध्ये पोहोचला .डॉक्टरांनी त्याच्या समोर डीकलेरेशन फॉर्म ठेवले आणि पेन दिला आणि म्हणाले ” हे फॉर्म भरून द्या ” विनायक ला समजेना कसले फॉर्म आहेत. त्याने गोंधळून विचारलं ” कसले फॉर्म आहेत हे? ” डॉक्टर अजित पाटील यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होते .. ते म्हणाले ” अजुन एक तासानी आपण चिन्मय ची सर्जरी करणार आहोत .त्या साठी चे ते फॉर्म्स आहेत ” विनायक तर आता भांबावून गेला होता त्याने आश्चर्य चकित होत विचारले ” पण सर … कसं काय? अजुन माझी पैशाची व्यवस्था व्हायला वेळ लागेल सर .पी एफ मधून पैसे विड्रॉ साठी अर्ज केलाय ‘ त्या मुळे…”
त्याला मध्येच थांबवत डॉक्टर म्हणाले ” चिन्मय च्या सर्जरी चा संपूर्ण खर्च, हॉस्पिटल मध्ये आज सकाळीच जमा झालाय . काळजी करू नका ” ” काय? कोणी जमा केले पैसे? कसं शक्य आहे हे? ” विनायक चा स्वतः च्या कानावर विश्वास बसेना ” हे पहा ..यांनी केलेत ” असं म्हणत डॉक्टरांनी केबिन च्या दाराकडे बोट दाखवले .
विनायक ने मागे वळून पाहिले तर केबिन बाहेर रोहन, अनुज, मनोज, स्वप्ना आणि पेडणेकर सर देखील उभे होते. विनायक ला आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का बसला. तो खुर्चीवरून उठतोय तोवर रोहन ने पुढे होऊन त्याला मिठीच मारली आणि खास शाळेतील स्टाईल ने दोन चार शिव्या घातल्या आणि मगच बाकीची विचारपूस केली.
” साल्या फार शहाणा झालास का तू? आता मनोज ने एन्ट्री केली . ” एकदा ही वाटलं नाही का? मित्रांना फोन करावा, प्रोब्लेम शेअर करावे? ” अश्या प्रश्नांच्या सरबत्ती पुढे त्याला निरुत्तर झालेले बघून पेडणेकर सर पुढे आले आणि म्हणाले ” अरे मनोज आपल्याला विनायक चा स्वभाव ठाउक नाही का? थांब जरा त्याला बोलू दे ” अर्थात विनायक काही ही बोलायच्या परिस्थितीत नव्हताच.
मग पेडणेकर सर बोलू लागले ” आज मला अभिमान आहे माझ्या या सर्व विद्यार्थ्यांचा, त्यांच्यातील अतूट मैत्रीचा, काल सायंकाळी जसे चिन्मय बाबत सर्वांना समजले, तशी या गॅंग ने सूत्र फिरवायला सुरुवात केली. शाळेत येऊन मला आणि मुख्याध्यापकांना भेटले, गेट टुगेदर साठी आलेल्या इतर मित्र मैत्रिणींशी चर्चा केली आणि शाळे साठी देणगी म्हणून जमा केलेल्या रकमेतून अडीच लाख रुपये सकाळीच इथे हॉस्पिटल मध्ये जमा केले ” विनायक आता मात्र हमसून हमसून रडू लागला होता, त्याच्या साठी हे सर्व अनपेक्षित होते.
रोहन त्याला समजावत म्हणाला ” विन्या लेका शाळेत असताना तू किती निरपेक्ष वृत्तीने सर्वांना मदत करायचा, प्रसंगी स्वतः चे काम बाजूला ठेवून इतरांसाठी राबायचा.. मग आम्ही मित्रांनी एव्हढ पण करू नये का? आणि डोन्ट वरी शाळे साठी देणगी काय नंतर ही गोळा होईल .आधी चिन्मय आणि तू महत्त्वाचा ” आता डॉक्टर देखील पुढे आले आणि विनायक ला म्हणाले तुमच्या मित्रांपैकी कोणी अविनाश म्हणून आहे त्यांनी तर डॉक्टर सुहास हरदास सर यांच्याशी माझे बोलणे करून दिले आहे, ते त्यांचे मावस भाऊ आहेत, आणि गुड न्यूज आहे की डॉक्टर हरदास इज ऑन द वे टू सातारा . फॉर धिस सर्जरी … सो डोन्ट वरी ”
मग रोहन ने सांगितले की आम्ही सगळे जण ही सर्जरी होई पर्यंत इथेच थांबणार आहे .आणि संध्याकाळी तुला घेऊनच गेट टुगेदर ला जाणार … त्यावर सर्वांनीच टाळ्या वाजवत अनुमोदन दिले…..
विनायक आभारा साठी हात जोडणार तेव्हढ्यात ” आणि हो …फार आभार वगैरे मानायचा फालतू पणा करू नकोस ह !! मार खाशील ! चिन्मय घरी आला की काकूंच्या हातचा शिरा खायला आम्ही सगळी गँग नक्की येणार हे लक्षात ठेव..” अशी प्रेमळ धमकी अनुज ने देताच सगळे केबिन हास्य तुषारात बुडाले ….
मैत्रीच्या अनोख्या नात्यांचे, हे असले ” गेट टुगेदर ” डॉक्टर पाटील आणि हॉस्पिटल स्टाफ पहिल्यांदाच पाहत होते !!
@सागर जोशी, पुणे फोटो क्रेडिट: माझ्या स्वतः च्याच शाळेच्या म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल सातारा च्या सन १९९०-९१ बॅच च्या पहिल्या गेट टुगेदर ” जल्लोष ९१ ” चा खरा खुरा फोटो
Leave a Reply