अनघा दिवाळी अंक २०२० मध्ये यशवंत तुकाराम सुरोशे यांनी लिहिलेली ही कथा.
‘हॅलो, स्पृहा दांडेकर बोलतायत का?”
“होय. बोला, आपण कोण बोलताय?”
“स्पृहा, मी अनिकेत पाटील बोलतोय.
वर्गमित्र, आठवतंय का बघ.’
“हं, ऽऽ नाव आठवतंय. बोल कसा आहेस? नंबर
कसा मिळाला तुला?’
“ऐक ना. आपल्या दहावीच्या बॅचचे गेट टुगेदर करायचं ठरवलंय. सर्वांचे नंबर शोधतोय. मागच्या आठवड्यात गावी गेलो होतो तेव्हा तुझा नंबर मिळवला आपल्या वर्गातला विजय, रमेश आणि लावण्या यांच्यासोबत मी ठरवलंय की आपण एखाद्या दिवशी एकत्र येऊ या.
“अरे चांगली आयडिया आहे. स्पृहा.
“नुसते कौतुक नको करू. तुला यावं लागेल. तुला या महिन्याचा तिसरा रविवार चालू शकेल का? काही अडचण काढू नकोस.’ अनिकेत.
“बघून सांगते.’ स्पृहा
“हे बघ, स्पृहा, जवळजवळ पस्तीस-छत्तीस जणांचा संपर्क झाला आहे. गेट टुगेदरचं स्वरूप ठरतंय, तुझा कॉन्टॅक्ट नंबर मिळत नव्हता त्यामुळे तुला सांगायला उशीर झाला. पण तरी तू नक्की यायचं. आणि आणखी एक, येताना फक्त एकट्यानेच यायचं. आपण “ठरवलंय, येताना कोणीही नवरा, बायको, मुले यांना सोबत आणायचं नाही. प्रत्येकाला आपला वाटा असावा म्हणून नाममात्र शुल्क ठरवलंय पण ते दिलंच पाहिजे असं नाही. ते जाऊ दे. तू नक्की यायचं. मी इतरांनाही तू तुझ्याशी संपर्क झालाय हे सांगतो. वर्गातल्या इतर जणी तुझी आठवण काढत होत्या त्यांना तुझा नंबर देतो. बरं, तुझा हा नंबर वॉट्स अॅपला आहे ना? ग्रुपमध्येच अॅड करतो. चल ओ.के. बाय, वाट बघतो.”
स्पृहाचं म्हणणं ऐकून घेईपर्यंत अनिकेतने कॉल कट केलासुद्धा. दुपारपासून स्पृहाचं डोकं धरलंय त्यात कालच गुडघा सुजलाय. हल्ली थोडी जरी चाल पडली तरी सुजतो. मग घ्या पेनकिलर. मग अॅसिडिटी, अपचन, डोकेदुखी. गेल्या दहा वर्षात या सगळ्या दुखण्याची सवय कशी झाली नाही शरीराला असा स्पृहा स्वत:ला प्रश्न विचारी.
पण अनिकेतचा फोन आला. ती थोडेच बोलली पण तिला फार उत्साही वाटलं. ती हात टेकवून उठली. बेडरूममधून हॉलमध्ये आली. डोकं दुखायचं थांबलं होतं. बेसिनमध्ये चूळ भरली. गॅलरीतल्या खिडकीकडे पाहत खुर्चीत बसली. वाऱ्याची झुळूक अंगाला चाटून गेली. तिच्या लक्षात आले. आपण फॅन लावलाच नाही. पण तिला खुर्चीतून उठायचा कंटाळा आला होता. तिने आपल्या दिवट्याला फोन केला. चार रिंग्ज झाल्या तरी फोन उचलला नाही. पुढच्या दोन महिन्यात सतरा वर्षाचा होईल पण जबाबदारीचे भान नाही. बापासारखाच बेफिकीर जन्मला आहे. बाप कसा ऐटबाज, तसाच बेटाही.
साधे दहावी पास होता आले नाही. प्रायव्हेट आयटीआयला अॅडमिशन घेतली तर दिवट्याने तेही अर्धवट सोडले. आता हिंडतोय सोसायटीतल्या टग्यांसोबत. वर्गातली पोरे जेईई मेन, नीट, सेट ची तयारी करतायत नि हा दिवटा लोकांच्या गाड्यातून दिवस-दिवस हिंडत असतं बिनकामाचं. ना आंघोळीचं भान, ना कपड्यांची निगा. रात्री झोपण्यापुरता तरी बरा घरी येतो. त्याच्यासाठी दरवाजाची कडी उघडी ठेवावी लागते. तिने दरवाजाकडे पाहिले तर कडी उघडीच होती. म्हणजे दिवटा बाहेर गेला असावा. तिला तहान लागली होती पण पायाच्या वेदनांमुळे तिला उठता येईना. शेजारच्या खुर्चीत टी.व्ही.चा रिमोट होता पण टी.व्ही. बघायचाही तिला कंटाळा आला होता.
तेवढ्यात व्हॉट्स अॅपची मेसेज रिंग वाजली. कुतूहल म्हणून तिने मोबाईल उचलला. व्हॉट्स अॅप ओपन केलं तर पी. जे. हायस्कूल एस.एस.सी.ची बॅच १९८६ ग्रुपवरून तिला हाय करण्यात आलं होतं. तिला मनाला तरतरी आली. रिप्लाय द्यावा की देऊ नये असा क्षणभर विचार केला. मग तिने ग्रुप इन्फर्मेशन ओपन केले. ग्रुपमधल्या वर्गमित्रांची नावे, मैत्रिणींचे फोटो बघत राहिली.नांव आठवत राहिली. मैत्रिणींचा बदललेला चेहरा, वाढलेला आकार, अंगावरचे अलंकार, फॅशनेबल कपडे बघत राहिली. तिच्या चेहऱ्यावर हास्याच्या रेषा उमटल्या. मन एकदम खूश झालं. तिनं ग्रुपला ‘हाय’ करत रिस्पॉन्स दिला. ग्रुपसाठी आपण कोणता डी.पी. ठेवावा याचा विचार करू लागली. अल्बममध्ये जाऊन तिने स्वत:चे फोटो पाहिले. काही सेल्फी पाहिल्या. कॅमेरा ऑन करून पाहिला. केस विस्कटलेले, चेहरा सुजल्यासारखा, डोळ्याभोवतीची काळी वर्तुळ, पातळ भुवया… तिला नकोसं वाटलं स्वत:ची प्रतिमा पाहणे. या सगळ्यात तिचा बराच वेळ गेला, तहान लागलीच होती. आता चहाची तल्लफ आली. ती खुर्चीचा आधार घेत उठली व सरळ स्वयंपाकघरात गेली. ग्लासभर पाणी प्यायली. मांडणीवरचं पातेलं गॅसवर ठेवलं. गॅस चालू केला. चहा केला. चहात, दूध, साखर टाकली नि समोरच्या खिडकीतून सोसायटीतली मजा न्याहाळू लागली.
किती मजेत आहेत ही लोकं. मस्त फिरतात. हॉटेलिंग करतात. आनंदात राहायला आणखी काय हवं असतं. एक जोडपं बाकावर बसून निवांत गप्पा मारत होतं. त्यांची शाळकरी मुलं लादीवर खेळत होती. स्पृहाला क्षणभर हेवा वाटला त्यांचा पण ती आठवत राहिली, आपणही अशीच छोटी, माफक स्वप्नं पाहिली होती. कोणाच्यातरी सोबतीने आनंदाने संसार करायचा वादा केला होता मनोमन! जाऊ दे नकोच त्या आठवणी.
तिनं कपात चहा गाळला. चहाच्या वासाने तिला आणखी तरतरी आली. खुर्चीत बसून तिने मोबाईल उघडला.
‘काय करावं रविवारी जावं की नको गेट टुगेदरला? नकोच जायला. कुठेही गर्दीत गेलं की निघालाच भूतकाळ उगाळून! कुठे असता? नवरा काय करतो? तो कुठे जॉब करतो? मुले किती? काय करतात? तू जॉब करतेस का? आणखी काय? बस्स एकट्यावरच थांबवलं का? बस्स. नको होऊन जातं. खोटे सांगितले तर खरे माहित असलेले गर्दीत असतात. खरं सांगावं तर ऐकणारे पाल झटकल्यासारखे झटकतात. ‘नवऱ्याला सोडून दिलाय मी,’ मी नाही राहत त्याच्यासोबत. तो गावाकडे उंडारल्यासारखा ढोसत जगतोय असे सत्य सांगितल्यावर कोण पालीसारखं झटकायचं राहील? काहीजणांना गुप्त माहिती मिळाल्यासारखे गर्दीभर बातमी पसरवल्याचा अनुभव आलाय. घटकाभर आनंदासाठी जावे, नातेवाईकांना भेटायला जावे तर मनाला डाचण्या देणारा अनुभव येतो. ज्यांना आपण मानतो, त्यांनीच नंतर ‘नवऱ्याने हिला टाकलंय’ अशा बातम्या पसरवल्या. मग तिने माहेरच्या माणसांशिवाय इतरांचा पाश आक्रसून टाकला.
एवढ्या वर्षांनी अनिकेतचा फोन आलाय. त्याला असेल का माहित आपलं हे असं झालंय ते? पण तो काहीच बोलला नाही. जाऊ दे. नकोच जायला. हाय, हॅलो करायचं. पोट फुटेस्तोवर चापायचं, मोबाईल क्रमांकाची देवाण-घेवाण करायची. कोणीतरी फॉरेन रिटर्न नाहीतर उद्योगपती झाला असेल, त्याचं मनोगत ऐकायचं, की झालं गेट टुगेदर. हाय काय नि नाय काय? सुरुवातीला खूपच टिंगल. इकडच्या तिकडच्या मोठेपणाची, व्यासंगाची पोती सोडणार. मग चार सहा महिन्यात ग्रुप जिवंत राहण्यासाठी पुन्हा एखाद्या पार्टीचं आयोजन तरी नाहीतर पहिल्याच गेट टुगेदरमधील उणीवांवर बोट ठेवून रिमूव्ह होऊन बंडखोरी करायची. असंच होणार, असंच तर एकत्र न आलेलंच बरं. नाहीतरी बऱ्याच ठिकाणी असंच होतं.
विचारांच्या नादात चहा थंड झाला होता. तिने एका दमात पिऊन टाकला. उद्याची मॉर्निंग ड्युटी होती म्हणजे पाचलाच उठावं लागणार. हल्ली पायामुळे तिला ड्युटी करणेही अवघड झाले होते. पण घराचे कर्ज फेडणे महत्त्वाचे होते आणि रोज काय खाणार? तरी बरं चपाती आणि धुणंभांडी करायला राधाक्का यायच्या. पोटच्या पोरापेक्षा राधाक्काचा तिला फार आधार वाटे. पर्समधले पैसे कमी झाले की समजायचे दिवट्याने हात मारला म्हणून. बापाने आयुष्यभर तेच केलं, आता पोरातही तेच गुण आलेयत. पण सांगायची लाज!
संध्याकाळ झाली की बिल्डिंगची सावली लांबत जाई. निरभ्र आकाशाच्या पार्श्वभूमीवर विजेच्या तारा ठळक दिसत. एकात एक गुंतलेल्या तारांचं कोडं सोडविण्यात तिचा बराच वेळ जाई.
त्या रात्री दहावीच्या बॅचमधले चेहरे आठवीत राहिली. तिचा निर्णय पक्का होता… न जाण्याचा. पण मनात जावंसं वाटत होतं. या विचाराने तिच्या शारीरिक वेदना ती विसरली. तिला गाढ झोप लागली,
पुढचा आठवडा ड्युटी करण्यातच गेला. हॉस्पिटलमधून निघायचं, टॅक्सीनं मुंबई सेंट्रल गाठायचं. मग द्यायचं ट्रेनमध्ये कोंबून स्वत:ला. घर येईपर्यंत अंग आंबलेलं असे. व्हॉटस् अॅप उघडायची इच्छा होत नसे. फोन आलाच तर उचलायची. शनिवारी ती ड्युटीवर गेलीच नाही. कशी जाणार? पाचचा गजर सातला झाल्यावर ती तरी काय करणार? अलार्म सेटींगमध्ये काहीतरी चुकलं आणि फजिती झाली. तिने व्हॉट्स अॅप ओपन केलं. दहावीच्या ग्रुपवर लांबलचक सूचनावजा पोस्ट होती. दोन दिवसांपूर्वीच टाकलेली. सर्वांनी यायचा आग्रह. ग्रुपवर गप्पा मारण्यापेक्षा प्रत्यक्षात एकत्र आल्यावर मनोगत, अनुभव शेअर करण्याची कल्पना मांडली होती. स्पृहाला ही कल्पना आवडली, त्यापेक्षा गेट टुगेदरच्या नियोजनाची जाणीव झाली. तिच्या मनात कुतूहल जागे झाले. तिने अनिकेतला फोन केला. ‘हॅलो अनिकेत, मी आले असते, पण इतक्या लांब एकटीने नाही येऊ शकत.’
“का तुझी गाडी आहे ना? हार्डली दोन-अडीच तासांची रनिंग आहे. “पायामुळे नाही झेपत रे इतकं ड्राईव्ह करायला.’
“मग मुलाला घेऊन ये सोबत. तुझी अडचण मला माहीत आहे.” अनिकेत
त्याच्या या वाक्याने स्पृहा सावध झाली. क्षणभर गप्प बसली.
“स्पृहा, हे बघ, तू समजतेस तसं काही होणार नाही. आपण कोणीही एकमेकांच्या पर्सनल लाईफमध्ये डोकावणार नाही. मनोगत बोललंच पाहिजे असं नाही. तुला वाटलं तरच बोल. तुला ज्या क्षणी ऑकवर्ड वाटेल तेव्हा तू मला सांग मी तुला अडजेस्ट करीन. जस्ट जॉईन अस. तुला आनंदच वाटेल.” अनिकेत सलगपणे बोलत होता. तिला काय बोलावे हेच कळेना.
“तुझे येणं आम्ही गृहीत धरलंय. तू नक्की यायचंय. बाकी भेटल्यावर बोलूच.” अनिकेत.
अनिकेतच्या ठासून बोलण्याचं तिला आश्चर्य वाटलं. रात्री तिने मुलाला सांगितलं. “उद्याला जायचंय, लवकर ऊठ.” दिवट्याला गाडी चालवायला आवडायचं. त्याने नम्रपणाचा भाव आणत ‘हो’ म्हटलं.
तिला वाटलं शाळेतच गेट टुगेदर असावं, पण तिने मेसेज पाहिला, अॅड्रेसमध्ये एका फार्म हाऊसचा पत्ता होता. शहरापासून फार लांबही नव्हता. अगदी जवळही नव्हता. अनिकेत म्हणाला, “उगीच कोणाला बोट ठेवायला नको.” अनिकेतच्या विचारांचं तिला कौतुक वाटलं.
हिरवं लॉन, फुलझाडं, डेरेदार वृक्ष, त्यांची दाट सावली, त्याखाली झोपाळे, कोपऱ्यात स्विमिंग पूल, मस्तच होतं फार्म हाऊस. ललिता, शारदा, मीना, रश्मी, मंगला सगळ्यांनी अक्षरश: मिठ्या मारल्या. प्रत्येकीच्या स्पर्शातून आपुलकीचा अनुभव होता. मुलं म्हणजे आता प्रौढ झालेले रमेश, प्रशांत, प्रमोद, गौरव तर ओळखता येत नव्हते. चेहऱ्यात केवढा बदल झालेला. पोट सुटलेली, केस पिकलेले. बरं, दहावीपर्यंत दाढीमिश्यांचा पत्ता नव्हता. दाढीमिश्यांमुळे चेहरा ओळखता येत नव्हता. त्यातून फार गमती होत. स्पर्धेच्या वेळी झालेलं भांडण, गॅदरिंगमधील फजिती हे सारं शेअर करता करता दुपार झाली. स्पृहाला आज केवढी भूक लागली होती. तिने मुलासाठी एक ताट गाडीतच पाठवलं. मग निवांतपणे मैत्रिणींसोबत चाखत-माखत जेवली. कोणी सेल्फी काढत होते, तर कोणी फोटो. कोणी दुसऱ्याला आग्रह करत होते तर कोणी एखाद्याची फजिती करत होते. सर्वजण वय पंधरा-सोळाचे झाले होते.
चारच्या सुमारास मध्यभागी टेबल मांडलं त्यावर माईक ठेवला. सभोवार खुर्त्या मांडल्या, एकेकाने येऊन आपले अनुभव शेअर करायचे, मग तर रांगच लागली, कोणी चित्रकार होता, कोणी व्हायोलीन वाजवतो, तर कोणी युरोपसह जग फिरून आलाय. एकाने दोन विषयात डॉक्टरेट केलीय तर एकीचे चार कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. दोघांनी आकाशवाणी काबीज केली, एकाने अपघातात अपंगत्व येऊनही कुटुंबाची जबाबदारी पेलली. स्वतः ड्रायव्हिंग करीत इथवर आलाय. एकीने नवऱ्याच्या जाण्यानंतर मुलांना वाढवलं. एकाला सी.ए. तर दुसऱ्याला डॉक्टर घडवलं. प्रत्येकाच्या यशोगाथेमध्ये ओळखीचा, आपुलकीचा चेहरा होता. स्पृहाला सर्वांबद्दल प्रचंड अभिमान वाटत होता. ती प्रत्येकासाठी जोरजोराने टाळ्या वाजवत होती. वेळेअभावी काहीजणांना बोलता आले नाही. त्यात स्पृहा होती. पण पुढच्या वेळेस सर्वांना वेळ दिला जाईल अशी ग्वाही अनिकेतने दिली. सर्वांचे आभार मानण्यासाठी त्याने हात जोडले व सर्वांनी त्याला धन्यवाद दिले. “तुझ्या नियोजन व कल्पनेमुळेच आजचा दिवस संस्मरणीय झाला आहे.” मग औपचारिकता गळून पडली होती. खुर्व्या पांगल्या. रांगा मोडल्या. मने जवळ आली. प्रत्येकाला स्वत:तला ‘मी’ जपता आला.
स्पृहाने घड्याळात पाहिले. पाच वाजत आले होते. पर्स उचलून मित्र-मैत्रिणींनी बाय-बाय करत पार्कीगकडे गेली. काळोख पडायच्या आत घरी पोहोचायला हवं म्हणून तिची घाई चालली होती. ती गाडीजवळ पोहोचताच मुलगा ड्रायव्हिंग सीटवर विराजमान झाला. त्याला उठवत स्पृहा म्हणाली, “ऊठ, तिकडे बस, मी ड्रायव्हिंग करते.’ दिवट्या बघत राहिला. “अरे, सरक तिकडे, मागं बघून सांग गाडी रिर्व्हसला टाकतेय.’ असं म्हणत स्पृहाने सारथ्य स्वीकारले. हायवेला लागल्यावर सगळ्या विंडो ओपन करून वारा पिल्यागत स्पृहा गाडी पळवत होती. दिवट्या तोंड वासून मम्मीकडे बघायचा. त्याला कुठे माहीत होतं, मम्मीचं वय त्याच्यापेक्षा कमी झालंय. स्पृहा गाणं गुणगुणतच एक्स्लेटरवर पाय दाबीत होती. तिचं मनआनंदाने भरून गेलं होतं.
-यशवंत तुकाराम सुरोशे
मु. महाज, पो. धसई, ता. मुरबाड,
जि. ठाणे – ४२१ ४०२
मो. ९६२३१६९४०३
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०२० मधून)
Leave a Reply