या फेसबुक आणि व्हाट्सअपमध्ये पब्लिक फारच गुंतलेय असं तुम्हाला वाटतं ना? मलाही तसंच वाटतं.’ नुसतं वाटून काय उपयोग काहीतरी करायला पाहिजे!’ असं भाषणात म्हणतात ना ते खरच आहे. मग ठरवलं या सगळ्या दोस्ताना फेसबुक व्हाट्सअप वरून उठवायचं आणि चांगले गेट-टुगेदर करायचं. दोस्तांचा ग्रुप परत जमवायचा. लागलो कामाला. पक्या, दिल्या, उम्या, सूर्या टाकले मेसेज व्हाट्सअप वर एकेकाला. हां!.. व्हाट्सअप वरूनच!.. म्हणलं काट्यानच याच काटा काढायचा. पण कुठलं?.. एकाचाही रिस्पॉन्स नाही. खात्री पटली शिव्या घातल्या शिवाय कोणी हलणार नाही म्हणून, मंग लावले फोन एकेकाला आणि घातल्या धाड धाड फुल्या फुल्याच्या शिव्या. बायको म्हटली ,”अहो, कशाला कटूपणा घेताय?” …’कटूपणा’ म्हणजे ‘कटूता’? अमेरिकन अध्यक्ष अब्राहम लिंकन आणि सिंगापूरचे ली कुआन आपापल्या देशासाठी कटू निर्णय घेण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेल हेही यातील. देशाची गरज म्हणून त्यांनी त्या त्या काळात तसे निर्णय घेतले.
जे देशात ते समाजात, जे समाजात ते गावात , जे गावात ते गल्लीत आणि गल्लीत ते घरातही लागू होते. आमच्या भारतीय एकत्र कुटुंब पद्धतीत घरातले थोरले आप्पा, अण्णा, दादा असे निर्णय घेत असत. हे लोक आतून मृदू असतात आणि कुटुंबाच्या हिताचे निर्णय घेत असतात हे गृहीतक आहे. देशात, समाजात, गावात ,गल्लीत, घरात घडतं ते ग्रुप मध्ये ही घडू शकत.
ग्रुप वरची मरगळ झटकण्यासाठी असं कटू संभाषण आवश्यक होतं. मात्रा बरोबर लागू पडली. एकेकाचा प्रतिसाद यायला लागला. कुणी खाण्याची जबाबदारी घेतली, तर कोणी पिण्याची, तर कोणी चखण्याची. मैफिल जमली. (अशावेळी म्हणण्याचा एक पांचट शेर आहे- ‘अकेले ही निकले थे… लोग आते गए कारवा बनता गया!’.. पण याचा उत्तर भागही आहे तो कुणी म्हणत नाही) जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. सगळेच ‘नाॅस्टेलजियात’ गेले. वाटलं कृत्रिम फेसबुकी व्हाट्सएप्पी बोलणे मागे पडून काहीतरी ‘गहिरे’ ओठावर येईल. त्यातून एखादा अस्सल जिवनानुभव टपकेल. ते मौतिके आपण अलगद झेलू. पुढे मागे कुठे साहित्य ‘फार्मात’ पेरू. विचार केला ‘लगे हातो’ दोन-चार नव्या कविता ऐकवाव्यात. पण कसलं? जुने गाणे म्हणण्याची टूम निघाली. कविता बासनातच ठेवाव्या लागल्या. हळूहळू एक एक जण निरोप घेता होऊ लागला. मैफिल निमाली.( आता उत्तर भाग-‘ लोक जाते गये.. कारवा बिखरता गया!’) बासनातल्या कवितेसह मी एकटाच उरलो. सोबतीला रिकामे ग्लासेस, विस्कटलेला चखना, बेसिन मधल्या खरकट्या दिशेस्.( मी यांना शिव्या घातल्या तो राग कवितेवर निघाला बहुतेक.) असू दे, पण मी एकटा कसा म्हणता येईल?.. जळी, स्थळी, काष्टी ,पाषाणी असणारा परमेश्वर होता ना सोबत!.. सापेक्षतावादन तो आहे म्हणून मी आहे ,मी आहे म्हणून तो आहे. असं आमचं अदैत्व साधत.
… म्हणून गाळीव अनुभव असं म्हणालो!..
…. तुमचा काय अनुभव? ..
…. एकटेपणा आणि परमेश्वराबद्दल?
-मनोज महाजन.
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपवरील लेखक मनोज महाजन ह्यांनी लिहिलेला हा लेख
Leave a Reply