अनघा प्रकाशन आयोजित कथास्पर्धेत सौ प्राची गडकरी यांनी लिहिलेली प्रथम क्रमांक प्राप्त कथा
अनघा दिवाळी अंक २०२० मध्ये सौ प्राची गडकरी यांनी लिहिलेली ही कथा.
“बाप रे! इतकं सुंदर घड्याळ कुणाचं आहे?”
आईने पुस्तकाचे कपाट आवरताना तेथील घड्याळ पाहून आश्चर्याने विचारले.
बाबांनी पेपर वाचताना डोळे वर करून घड्याळाकडे पाहिले आणि खांदे उडवून व ओठ बाहेर काढून नकारात्मक उत्तर दिले.
मी संस्कृतचे पाठांतर सोडून मी धावत त्या घड्याळापाशी गेले आणि म्हटलं, “किती सुंदर आहे घड्याळ! मी घेऊ का गं आई, वर्गात सगळ्या मुली वर्गात घड्याळ लावून येतात.’
आई नेहमीप्रमाणे त्रासलेल्या भूमिकेत असल्यामुळे मला ओरडून म्हणाली, “आधी शंभर मार्काच्या संस्कृतकडे लक्ष द्या. महत्त्वाचे वर्ष आहे हे. एकदा दहावी पास झालात की घड्याळ लावून मिरवा.”
आईच्या अशा तिरकस बोलण्याने घड्याळाची उत्सुकताच निघून गेली. इतक्यात घरातून घाईघाईत सुरभी बाहेर आली. तिने ते घड्याळ कॉलेजच्या बॅगेत टाकत म्हटले, “माझ्या मैत्रिणीचे आहे. काल तिने हाताला लावायला दिले होते. तिला परत द्यायचे राहून गेले. आज देऊन टाकते.’
आता तर आई आणखीनच चिडली. “काय गरज होती दुसऱ्याचे घड्याळ हातात मिरवायची? जर तुझ्या हातून कुठे हरवले असते तर आपली ऐपत तरी आहे का ते भरून द्यायची? खबरदार पुन्हा अशा लोकांच्या महागड्या गोष्टी घरात आणल्यास तर!”
सुमीनं आईच्या बोलण्याकडे लक्ष न देता बाबांना म्हटलं, “बाबा, उद्या फी भरायचा शेवटचा दिवस आहे. आज चेक देता का? तसंही आज पहिली दोन लेक्चर्स ऑफ आहेत. मी फी भरून टाकते.”
बाबांनी सुमीला चेक लिहून दिला. सुमीने कॉलेजची बॅग उचलली आणि मला टाटा करीत कॉलेजला निघून गेली.
सुमी कॉलेजला गेल्यावर आई बाबांना म्हणाली, “या सुरभीला फॅशनची चटक लागली आहे. नटण्याकडे जास्त लक्ष असतं. तुम्ही फार डोक्यावर चढवून ठेवलंयत मुलींना. पाहिलंत आज डबा पण विसरली.’
बाबा शांतपणे आईला म्हणाले, “अगं, या वयात मुलींना हौस असते नटण्याची. तसं आपण कुठे मुलींची हौसमौज पूर्ण करू शकतो. पण या वाढदिवसाला मी सुरभीला एक चांगलं घड्याळ घेईन बघ.
घड्याळाचे ऐकल्यावर आई एकदम चिंतेने म्हणाली, अहो, काहीतरीच काय? तिचा वाढदिवस आणि सुमतीताईच्या मुलीचं लग्न एकाच महिन्यात आहे. तुम्ही मामा पडता म्हणून मामाकडची साडी आपल्याला घ्यावी लागेल. पुन्हा बाहेरगावाला यायला जायला पैसे लागतील. सगळा खर्च सांभाळून शक्य होईल का आपल्याला घड्याळ घेणे? त्यापेक्षा येत्या फेब्रुवारीमध्ये घराचे हप्ते संपतील की मार्चमध्ये दोघींनाही छानपैकी घड्याळ घेऊ.’
आईच्या चेहऱ्यावर कित्येक वर्षांनी मी त्यावेळी तेव्हा हास्य पाहिले. कारण आईला एक तर चिंतेत किंवा काम करतानाच मी पाहिले आहे.
आई शिवणकामात तरबेज असल्यामुळे घरातच ती आजूबाजूच्या कपड्यांच्या दुकानातून अल्टरेशनचे काम आणायची तसेच इतर शिवणकामही खूप करायची. ब्लाऊज, पंजाबी ड्रेस, शाळेचे गणवेष, लहान बाळांचे कपडे ती उत्तम शिवत असल्यामुळे तिला भरपूर कामही मिळायचे. मशीन चालवून पाय दुखले की ‘संसाराला हातभार’ म्हणत उरलेल्या वेळात ती साड्यांना फॉल लावण्याचे काम करायची. बाबा पोस्टमन असल्यामुळे दररोज त्यांची प्रचंड पायपीट व्हायची तरीसुद्धा ते घरी ऑर्डरप्रमाणे सुंदर सुंदर लाकडाचे देव्हारे बनवायचे. ब्लॉकचे लोन, आलं गेलं,, रितीरिवाज, मध्येच आजी-आजोबांना गावाला पैसे पाठविणे, यामुळे आमची परिस्थिती बेताची असली तरी आमच्या दोघींच्या शिक्षणासाठी, क्लाससाठी आई-बाबांनी कधीच तडजोड केली नाही. शिक्षणासंबंधात प्रत्येक उत्तमच गोष्ट त्यांनी आम्हाला दिली.
सुरभीची मात्र कॉलेजला जायला लागल्यापासून थोडी निराशाच दिसायची. मुंबईतील मोठ्या कॉलेजमध्ये असल्यामुळे तिथे रोज मुली छान छान कपडे घालून येतात आणि मी मात्र तीन-चार ड्रेस आलटून पालटून घालते याबद्दल ती नेहमी आईकडे हट्ट करायची. आई तेव्हा म्हणायची, “कपडे दाखवायला जाता का शिकायला जाता कॉलेजमध्ये?”
जुन्या साड्यांचेसुद्धा ड्रेस शिवणाऱ्या आईला काय माहिती की बाहेर काय फॅशन चालू आहे? कॉलेजलाईफ काय असते? कॉलेजमध्ये मुली कशा एकट्या पडतात बहनजी टाईप मुलींना मुलांपेक्षा मुलीच आपल्या ड्रेसकडे पाहून नाक मुरडीत असतात. कुठेतरी या गोष्टीसुद्धा मुलींच्या मनावर परिणाम करत असतात, असे सारखे सुरभी मला म्हणायची. पण आई-बाबांना हे काय कळणार? कारण त्यांचं बालपण आणि शिक्षण खेड्यात झालं आणि समजा कळले तरी वळणार कसे? कारण परिस्थितीमुळे काहीही करू शकत नव्हते ते दोघे.
आता आम्हाला आशा होती ती मार्च महिना उजाडण्याची कारण एकदा या छोट्याशा ब्लॉकचं लोन संपलं की आमची पैशाची चणचण कायमस्वरूपी संपणार होतो.
त्यादिवशी रात्री आईने जेवताना सुरभीला विचारले, “सुरभी, घड्याळ दिलं का गं मैत्रिणीला?”
“हो दिले.’ सुरभी कांदा हाताने ठेचत ठेचत म्हणाली.
बाबांनी सुरभीच्या हातातला कांदा घेतला आणि एका झटक्यात ठेचून म्हणाले, “सुरभे, तुला लवकरच छानस घड्याळ घेईन बघ.’
“त्यापेक्षा आधी दोन-चार चांगले ड्रेस घ्या बाबा, सुरभी गालाचा फुगा करून लाडात येऊन म्हणाली.
“अगं, पुढच्या महिन्यात सुमतीताईच्या मुलीचे लग्न आहे तेव्हा तुम्हा दोघींना नवीन ड्रेस घेणारच आहे. एक रिसेप्शनला आणि एक हळदीला आणि उंचवाले बूटही तुला घेणार आहे मी. पण त्याआधी उद्या आपल्या सर्वांचे विदर्भ एक्स्प्रेसचे तिकीट बुक करतो.”
बाबा मोठ्या आनंदाने आपले पुढील बेत सांगत होते तेव्हा सुरभी हळूच म्हणते कशी, “मी नाही येणार बाबा लग्नाला.”
बाबांनी तोंडाकडे नेलेला घास पाठी घेऊन आश्चर्याने विचारले, “का? अगं, आत्याला बरं नाही वाटणार, सुरभी.”
“बाबा, नेमकं त्याच सुमाराला आमच्या कॉलेजचे गॅदरिंग आणि वेगवेगळे ‘डे आहेत. मला ते मिस करायचे नाहीयेत.
“डे म्हणजे?” बाबा जेवायचे थांबले.
इतक्यात मी मध्येच नाक खुपसून म्हटले, “अहो बाबा, म्हणजे रोझ डे, सारी डे, चॉकलेट डे वगैरे वगैरे.”
आता मात्र आई एकदम चिडलीच. “लग्न मिस झालं तरी चालेल, पण हे कॉलेज ‘डे’ मिस नाही करायचे तुला. सुरभी, काहीही बोलू नको समजलं ना आणि तुला घरी एकटी ठेवून आम्ही जायचं का? अगं, चार दिवसात तुझं काय एवढं कॉलेज मिस होणार आहे?”
“आई, अगं मुली एकट्या हॉस्टेलमध्ये राहतात, परदेशात राहतात. मी तर आपल्या घरात एकटी राहायचं म्हणते.’ सुरभी आईला समजावण्याचा प्रयत्न करीत होती. पण आई आपल्याच विचारात गुंग. आणि म्हणते,
“नाही नाही… मला नाही बरोबर वाटत हे. पूर्वीसारखं चाळीत राहात असतो, तर गोष्ट वेगळी होती. चाळीतले लोक नेहमीच मदतीला धावून येतात पण ब्लॉकमध्ये कोणी मेलं तरी कळणार नाही, नको रे बाबा… अहो, त्यापेक्षा मी सुरभीबरोबर थांबते. तुम्ही दोघं जा लग्नाला.”
आई नाही तर आत्या, काका, आजी, आजोबा ऊहापोह करतील आणि तिथे बाबांचंही लक्ष लागणार नाही तिथे लग्नात. म्हणून सुरभीनेच कॉलेज गॅदरिंग सोडून लग्नाला यायचं कबूल केलं.
परंतु त्या दिवसापासून सुरभी थोडी अबोलच झाली. कामापुरते बोलायचे, कॉलेजमधून उशिरा यायचे आणि आलं की मोबाईल पाहात बसायचं असेच काहीसे तिचे रूटीन झाले होते.
आपल्यामुळे तिच्या बिचारीचा मूड गेला या भ्रमात आईबाबा असल्याने ते फारसे सुरभीला ओरडतही नव्हते. एकदा तर आईने कॉलेजच्या बॅगेमध्ये डबा ठेवताना, तेच घड्याळ पुन्हा पाहिले. परंतु दोनच दिवसांनी आम्ही लग्नासाठी गावाला जाणार होतो. निघताना घरात वाद नको आणि सुरभीचा मूड नको जायला म्हणून आई गप्पच बसली.. मला मात्र हळूच म्हणाली, “एकदा गावाहून आले की विचारीन सुरभीला.’ दुसऱ्या दिवशीसुद्धा आईने चोरून सुरभीची बॅग तपासली तेव्हाही घड्याळ बॅगेतच होते.
सुरभी मैत्रिणीचे घड्याळ का परत देत नाही, ही काळजी आईच्या चेहऱ्यावर मला स्पष्ट दिसत होती.
गावाला लग्नात आम्ही खूप खूप धमाल केली. नातेवाईकांच्या गोतावळ्यात सुरभीलासुद्धा कॉलेजच्या गॅदरिंगचा विसर पडल्यासारखे झाले होते. लग्नाच्या प्रत्येक विधीत सुरभी आनंदानं भाग घेत होती. एका विधीला तर आम्ही सगळ्याजणी नऊवारी साड्या नेसलो होतो. सुरभी तर फारच सुंदर दिसत होती. तेव्हा तर आजी म्हणालीसुद्धा आईला, “आता पुढच्या वर्षी सुरभीचे लग्न करा. बास झालं शिक्षण.”
तेव्हा मात्र आई ठासून म्हणाली, “नाही गं बाई, आता कुठे एकोणीस वर्षे पूर्ण झाली. अजून खूप शिकायचे आहे सुरभीला. मग चांगली नोकरी, चांगलं शिक्षण. आणि चांगली नोकरी असली की आपोआप चांगला नवरा मिळेल.’
“अगं इतकी सुंदर पोर तुझी, दहा मागण्या येतील बघ, काय काळजी करायची गरजच नाही तुला.” आजी सुरभीकडे पाहून बोलत होती.
बोलाफुलाची गाठ म्हणजे गावच्या पाटलांनीच त्यांच्या मुलासाठी सुरभीचा हात मागितला. मुलगा जनावरांचा डॉक्टर. चौसोपी वाडा, कैक एकर जमीन. सहा ट्रॅक्टर, दोन ट्रक दारात, फिरायला जीप आणि मोटारसायकल. गावच्या घरी तर सगळ्यांना आनंद झाला. पण एकदा मुंबईला जाऊन सुरभीशी चर्चा करून नंतर कळवतो या वचनावर आम्ही मुंबईला परत आलो.
घरी आल्यावरसुद्धा पुढचे चार दिवस आमची गावचं लग्न, मजामस्ती, फोटो, पंगती, हळद याच्यावर चर्चा चालू होती. मी मात्र येणाऱ्या प्रीलीमसाठी अभ्यासावर जोर धरला. आईची मशीन जोरदार फिरू लागली. सुरभीसुद्धा अलीकडे खूष दिसत होती. कॉलेजचा विषय घरात फारसा काढायचा नाही. परंतु मैत्रिणींचे वाढदिवस, पार्ट्या, बाहेर फिरणं, हल्ली खूप वाढायला लागलं होतं तिचं.
आज संक्रांत म्हणून आईने लहान डबा भरून तीळगूळ खास मैत्रिणींसाठी सुरभीच्या बॅगेत ठेवायला बॅग उघडली. पहाते तर तेच घड्याळ पुन्हा दिसले. आज मात्र आईची सुरभीची जराही पर्वा न करता तिला जाब विचारला, “सुरभे, घड्याळ अजून कसे काय तुझ्याजवळ?”
आईचा चढलेला पारा बघून सुरभीनेदेखील पारा चढवला. “तू का हात लावतेस माझ्या बॅगेला आई?’ का “हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही. घड्याळ का नाही दिले परत मैत्रिणीला.’ आईने गंभीर होऊन विचारले.
“त्या मैत्रिणीने मला देऊन टाकले हे घड्याळ गिफ्ट म्हणून. त्यामुळे ते आता माझेच झाले आहे.’ सुरभी बॅगेत पुस्तके टाकत म्हणाली.
आई पुढे काही म्हणण्याच्या आत सुरभीने बॅग खांद्याला अडकवून चप्पल पायात घालायला लागली. नवीन सुंदर चप्पल बघून आई पुन्हा आश्चर्यचकित झाली. आणि म्हणाली, “ही चप्पल कुणाची आहे?” “कुणाची म्हणजे? माझीच आहे चप्पल.”
आईने या एका वाक्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला. “कधी घेतलीस? पैसे कुणी दिले? किती रुपयाला?”
“मैत्रिणीने दिली.” असे म्हणत सुरभी घराच्या बाहेर पडली आणि तिने दरवाजा खाडकन बंद केला.
आई बेचैन झाली. तिने बाबांना फोन लावला. नेहमीप्रमाणे बाबा फोन घरीच विसरून गेले होते. सुरभीचे लक्षण ठीक दिसत नाही हे तिच्या लक्षात आले म्हणूनच तिची परीक्षा संपली की सुरभीचे लग्न करावे असे ठरविले. तसेच पाटलांचे चांगले स्थळ घरात चालून आले होते.
संध्याकाळी जेवण झाल्यावर आईने बाबांजवळसुरभीच्या घड्याळ आणि चपलेचा विषय काढला. बाबांनाही थोडे खटकलेच. त्यांनी सुरभीला जवळ बसवून विचारले, “काय भानगड आहे ही? कोण तुला अशा महागड्या वस्तू भेट म्हणून देत आहेत? काय त्या मैत्रिणीचे नाव, मला फोन लावून दे तिला म्हणजे मीसुद्धा तिचे आभार मानीन. आणि हे सारं खोटं असेल तर या मे महिन्यात तुझे लग्नच उरकावे म्हणतो.”
तेव्हा मात्र सुरभी एकदम गांगरून गेली. तिने तेव्हा खोटंच मैत्रिणीचे नाव सांगून वेळ मारण्याचा प्रयत्न केला. परंतु मे महिन्यात आपण त्या मुलाशी लग्नाला तयार आहोत हे सांगून आईबाबांचा विश्वास मिळविला. सुरभीने लग्नाला होकार देताच आई-बाबांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ते घड्याळ, चप्पल या थिल्लर गोष्टी विसरूनच गेले. उद्याच गावाला फोन करून आजी-आजोबांना होकार कळवू या असे बाबा म्हणाले. परंतु दुसऱ्या दिवशी किंक्रांत असल्यामुळे पौष महिन्यात कशाला लग्नाच्या शुभ गोष्टी म्हणून माघातच कळवू होकार असे आईने आपले स्पष्ट मत दिले.
मार्चमध्ये आमच्या घराचे लोन फिटणार, माझे शालेय शिक्षण पूर्ण होऊन मी कॉलेजमध्ये जाणार, मे महिन्यात सुरभीचे लग्न म्हणजे चहुबाजूंनी आनंद आमच्या घरात येणार होता. आता सुरभीचे अधिकच लाड आई-बाबा करत होते. डोळे झाकून तिच्यावर विश्वास ठेवून, तिची प्रत्येक मागणी पुरविण्याचा प्रयत्न करीत होते.
त्या दिवशी सुरभीच्या कॉलेजची पिकनिक होती म्हणून आईने भरमसाट खाऊ तिच्या बॅगेत भरला. बॅगेत तिला पुन्हा ते घड्याळ दिसले. परंतु तिला आता त्याची पर्वा नव्हती. कारण त्या घड्याळातील वेळेपेक्षा कितीतरी पटीने सुंदर वेळचा विश्वास सुरभीने तिला दिला होता. बाबांनी दोनशे रुपये वरखर्चासाठी दिले. सुरभीसुद्धा खूप खूष होती. आपल्या कपड्यांची बॅग सुरभीने स्वतः भरली. मला पण मोह झाला पिकनिकचा. मी विचारलेसुद्धा सुरभीला, “मी पण येऊ का ग पिकनिकला?”
तेव्हा ती खळखळून हसली आणि म्हणाली, “चल वेडाबाई, काहीतरीच काय? पण पुढच्या वर्षी मी तुला नक्कीच नेईन हं.”
उगाचच माझी खोटी समजूत काढून सुरभी आम्हाला सगळ्यांना टा टा करून कॉलेज पिकनिकला गेली.
आईबाबासुद्धा आपापल्या कामाला लागले. मी पुन्हा. एकदा संस्कृतच्या पुस्तकात डोके खुपसून अभ्यासाला सुरुवात केली.
रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास बाबांचा फोन वाजला. बाबांनी तो फोन उचलला आणि ते एकदम घाबरल्यासारखे झाले. ते नुसतेच, हो आलोच… फोन बोलत होते. फोन ठेवताच ते आईला म्हणाले.
“आपल्याला लवकर निघायचे आहे. भिवंडीजवळील एका हॉटेलवर पोलिसांनी रेड मारली. त्यात आपल्या सुरभीला पकडलंय.”
“अहो, पण ती तर पिकनिकला गेली आहे इगतपुरीला.’ आई एकदम घाबरून म्हणाली.
“वेळ घालवू नको. पटापट नीघ. रस्त्यात सांगतो सगळे.’ असे म्हणत आई-बाबा मला बाहेरून कुलूप लावून निघून गेले. मला धड कळलेही नाही, की नेमकं काय झालंय घरात? एकटे राहायचा माझ्यावर आलेला पहिलाच प्रसंग. बाहेरून कुलूप होते तरीही मी आतून कड्या लावल्या. अभ्यास बंद करून सोबत म्हणून मी टी.व्ही. लावला. वेळ जाता जात नव्हता. सारखी घड्याळाकडे पाहत होते. सगळ्या खिडक्या बंद करून घेतल्या. पडदेसुद्धा ओढून घेतले. अधूनमधून देवाला नमस्कार करीत होते.
इतक्यात कुलूप उघडण्याचा मला आवाज आला. मी घड्याळात पाहिले. पहाटेचे साडेतीन वाजले होते. मी आयहोलमधून पाहिले तर बाबा दरवाजाबाहेर उभे होते. मी दार उघडले. आई, सुरभी आणि बाबा आत आले. बाबांनी पुन्हा दार बंद करून कड्या लावल्या आणि डोक्याला हात लावून सोफ्यावर मटकन बसले. सुरभी आणि आई रडत होत्या.
सुरभी रडत रडत म्हणत होती, “बाबा, सॉरी! मी पुन्हा त्या मुलाला कधीच भेटणार नाही. माझे चुकले. मी तुला फसवलं.”
तेवढ्यात रडत रडत आईने उठून एक थोबाडीत मारली सुरभीला आणि म्हणाली, “त्या हॉटेलचे लोक म्हणत होते तुम्ही नेहमी जायचे तिथे. आज रेड पडली म्हणून आम्हाला कळाले. नाहीतर आजही कळाले नसते हे असलं घाणेरडं प्रेम एका घड्याळासाठी तू केलंस काय वेळ आणली या घड्याळाने आपल्यावर. शी! लाज वाटते मला.”
सुरभी मात्र हात जोडून सारखी म्हणत होती. बाबा डोक्याला हात लावून खाली मान घालून बसले होते. सुरभी बाबांजवळ गेली. बाबा उठून उभे राहिले.
“बाबा, बोला ना माझ्याशी.’
बाबांनी सुरभीकडे न बघताच तिला जोरात ढकलून दिले. सुरभी धाडकन पालथीच पलंगाच्या कोपऱ्यावर आदळली. तिच्या डाव्या कानामागे पलंगाचा मुका मार लागला आणि ती बेशुद्ध पडली.
आई-बाबांनी लगेच तिच्या तोंडावर पाणी मारले परंतु सुरभी हालचाल करेना. आईने गदागदा तिला हलवले. तरीही ती काहीच बोलेना. इतक्यात तिच्या तोंडातून हिरवी निळी उलटी बाहेर पडली आणि एक उचकी देऊन तिने मानच टाकली. आई-बाबा प्रचंड घाबरले. बाबा ताबडतोब डॉक्टर आणायला गेले.
डॉक्टरांनी विचारले काय झाले? तेव्हा बाबा काही बोलायच्या आत आई म्हणाली, “बाथरूमला गेली होती खाली, अंथरुणात पाय अडकून पडली ती एकदम पलंगाच्या कोपऱ्यावर आदळली.”
त्यामुळेच ब्रेनहॅमरेज झालं. सुरभीला तपासून त्यांनी मृत घोषित केले.
पुढे पोस्टमार्टेम, पोलीस वगैरे खूप गोष्टी झाल्या परंतु आपण आपल्या मुलीचा जीव घेतला या भावनेने बाबांना तिसऱ्या दिवशी हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चार दिवसात घरात दोन प्रेते पाहून आई फार म्हणजे, अगदी ठार वेडी झाली. गावाहून आजी-आजोबा आले होते. त्यांच्या आधाराने मी तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ती या वेडातून बाहेर येणं ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे असेच डॉक्टरांपासून सगळ्यांना वाटत होते. घरावर कोसळलेले संकट आणि माझीही बिघडलेली मानसिक स्थिती पाहून आजीने गावाला जायचा निर्णय घेतला.
माझे कपडे, पुस्तके, आजी भराभर बांधून घेत होती. कारण आमची अर्ध्या तासात टॅक्सी येणार होती. इतक्यात मला संस्कृतचे पुस्तक दिसले. त्यावर मी खूप ठिकाणी ‘मार्च’ असे लिहिले होते. कारण मार्च महिन्यात घराचे लोन फिटल्यामुळे आमच्याकडे आनंदीआनंद येणार होता. आता मार्च काय आणि जून काय मला सगळे महिने सारखेच होते. मी संस्कृतचे पुस्तक माळ्यावर टाकले तेवढ्यात आजीने माझ्या हातात सुरभीचे घड्याळ आणून दिले. ज्या घड्याळाने आमच्या सगळ्या सुखाचा अंत केला होता. वेळ दाखवणं हे घड्याळाचे काम आहे परंतु वेळीच स्वत:ला सांभाळणे हे आपले काम आहे नाहीतर आयुष्यात कधी चांगली वेळ येत नाही हा सुरभीच्या घड्याळातून शिकलेला धडा हा कायमस्वरूपी मनात कोरला गेला होता. मी ते घड्याळ कचऱ्याच्या डब्यात टाकले आणि घराला कुलूप लावले.
— प्राची गडकरी
मो. ९९८७५६८७५०
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०२० मधून)
Leave a Reply