घरांच्या स्वच्छतेचं काम हाती घेतलं होतं. आवरा-आवर सुरू होती. माळोच्यावरची सफाई करत असताना एका कोपऱ्यात गवताच्या काड्यांनी विणलेलं छोटं घरट हाती लागलं. रिकामच होतं ते बहुदा अर्धवट असावं. गवताच्या काड्या, कापसाचे पुंजके एकत्र करून घरटे तयार करण्याचा प्रयत्न चालला असावा चिमणा-चिमणीचा. मग त्यांने ते अर्धवट का सोडले असावे…माणुस आदीम अवस्थेत असल्यापासुन कुठना-कुठे राहत होता. कुठेतरी म्हणजे कधी झाडाच्या फांदीवर, कुठे दगडाच्या कपारीत, कधी छोट्याशा गुहेत. कधी डोंगरमाथ्यावर झोपडी बांधुन… अशा एक ना अनेक ठिकाणं माणसानं राहण्यासाठी तयार केली. त्याच राहण म्हणजे उनं, वारा, पाऊस यापासुन सरंक्षण मिळावं एव्हढ्यासाठीच… होत. अलिकडच्या काळात माणसाच्या राहण्याच्या ठिकाणांच स्वरुप आमुलाग्र बदललं. तो राहु लागला घरात. आपल्या हक्काची माणसं जिथं राहतात ते घर. जिथे आपल्याला कशाचीही चिंता सतावत नाही ते घरं. जिथे आपलेपणाची जाणीव प्रखर असते ते घर. जिथे असतो नात्यातला ओलावा, जिथे असते जपणारं हळवेपण.. जिथे असतात घरपण टिकवणारे नात्यांचे बंध… घर असतं मातीचं, घर असतं पत्र्याचं, घर असतं पाचट टाकुन तयार केलेलं, घर असत कुडाच्या भिंतींच, घर असतं सिमेंटच्या घट्ट भितींनी तयार झालेलं. घर असतं पंचतारांकीत… एक ना अनेक प्रकार घरांचे. पशु-पक्ष्यांसह प्राणी देखील वेगवेगळ्या घरांत राहत असतात. आपापल्या घरांची काळजी घेत असतात.
घरांचे प्रकार तरी किती असावेत.. असं सहज गंमत म्हणुन शोधण्याचा प्रयत्न केला अर्थात गुगुलवर. तर तेथे पहिल्या क्षणाला जवळ पास सहा अरबच्यावर पाने उघडली. अर्थात त्यात घरांच्या रचना, मांडणी, डिझाइन, प्रकार यापासुन आधुनिक गॅझेटने सज्ज असलेल्या घरांची माहिती उपलब्ध आहे. पक्ष्यांची घरटी हा खरोखरच अभ्यासाचा विषय, त्यावर अनेकांनी केलेला अभ्यास उपलब्ध आहे. तरी देखील त्यातील नावीन्य संपत नाही. सिंह गुहेत राहतो, ते त्याचं घर. साप बिळात राहतो, ते त्याच घर. मुंगी वारुळात राहते ते तिच घर. गिधाड, गरुड या पक्ष्यांच घरटं म्हणजे कडेकपाऱ्या. कावळ्याची पिले कोकीळेच्या घरात वाढतात, हे सर्वांना माहितच आहे की. ‘चिमणीचं घरटं मेणाचं, काऊचं शेणाचं’ बालपणापासुन आपण ऐकत आलेलो. प्रत्यक्षात काड्यांचा वापर करून कावळ्याचं घरटं तयार होतं, चिमणीचं घरट असतं गवताच्या मऊ काड्यांपासुन तयार झालेल. काही पक्षी उंच झाडांवर घरटी बांधतात. सुगरणीच्या घरट्याची भुरळ आपण साऱ्यांना पडलेली आहेच. इतकी की सुरगणीच्या खोप्यावर बहिणाबाईंनी अजरामर काव्य रचलेलं… ‘अरे खोप्या मध्ये खोपा… सुगरणीचा चांगला…’ पशु-पक्ष्यांच्या घरांची यादी बरीच लांबू शकते.
आधुनिक होत जाताना माणसांच्या घराचे हॉटेल कधी होऊ लागलं हे लक्षात आलं नाही. सुविधा आल्यात पण शांती गेली. सुख आलंय पण समाधान गेल. कारण सुविधा आणण्याच्या प्रयत्नात जी धावपळ केलीय तिची भरपाई कशी आणि कुठुन करणार. अलिकडच्या काळात घर श्रीमंत झालीत… पण माणसांच काय झालं… एक छानसं वाक्य नुकतच वाचनात आलं ते अस होतं… ‘घरपण टिकवायचं असेल तर दारात कुत्रा नको, अंगणात तुळस हवी. हातात मोबाईल नाही पुस्तक हवी आणि घरात झुंबर नसलं तरी चालेल, पण मंद प्रकाश देणारी समई हवी’. किती समर्पक आणि छान अर्थासह मांडणी केलीय ना. आपणा साऱ्यांना अगदी असेच घर मिळो…
— दिनेश दीक्षित ९४०४९५५२४५
Leave a Reply