नवीन लेखन...

घर हरवलेला पोलीस

शासकीय विभागातच नाही तर खाजगी क्षेत्रातसुध्दा काही ठिकाणी कामकाज चोवीस तास चालू असतं. परंतु अशा क्षेत्रात आठ किंवा बारा तासांच्या शिफ्टमध्ये कामकाज चालतं. काही क्षेत्रात तर फक्त दिवसा काम चालतं. रात्री कार्यालयं बंद असतात. अनेक अशी सरकारी कार्यालयं आहेत, ज्या ठिकाणी जनतेशी निगडीत कामकाज चालतं, पण ते फक्त दिवसापुरतं मर्यादित असतं.

अशा शासकीय कार्यालयात जनता कार्यालयीन वेळेत जाऊन आपली कामं करते. अशा कार्यालयातील एखाद्या अधिकाऱ्याला किंवा घटक प्रमुखाला भेटण्यासाठी पूर्व परवानगी घ्यावी लागते, किंबहुना ती घेऊनसुध्दा त्याची भेट होईलच याबाबत साशंकता असते.

ज्या शासकीय कार्यालयातील काम चोवीस तास चालू असतं, अशा ठिकाणी जनतेच्या सेवेसाठी किंवा तांत्रिक कामाकरीता दोन किंवा तीन शिफ्टमध्ये काम चालू असतं आणि तो विभाग अतिशय महत्त्वाचा आहे. तो विभाग शासनाकडून कायम कार्यान्वित ठेवण्याचा आदेश असतो आणि ते ठिकाण म्हणजे “पोलीस स्टेशन “.

हे पोलीस दल जनतेकडून, शासनाकडून कायम दुर्लक्षित राहिलेले आहे असं मला वाटतं.

कोणत्याही पोलीस ठाण्यात जाऊन पाहणी केली तर एक बाब प्रामुख्याने जाणवेल आणि ती म्हणजे पोलीस ठाण्याच्या इमारतीचा मुख्य जाण्यायेण्याचा जो भाग आहे. त्याला दरवाजा नाही. दरवाजा विरहीत कोणते ठिकाण असेल तर ते एकमेव म्हणजे “पोलीस ठाणे”.

त्याजागी दरवाजासाठी लागणारी जागा मोकळी असते परंतु दरवाजा नसतो. त्यामुळे दरवाजा बंद करण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि या विभागात रात्रंदिवस चोवीस तास सतत कामकाज चालतं. दोन शिफ्टमध्ये काम सुरु असतं. केव्हा केव्हा तर चोवीस तास चालतं.

ज्यावेळी कोणी पोलीस दलात प्रवेश करतो, त्यावेळी त्याच्याकडून चोवीसतास कर्तव्यावर राहण्याचा नियम सांगितला जातो. त्या व्यक्तीकडून एक बंधपत्र लिहून घेतलं जातं. एकमेव पोलीस दल असे आहे की, त्यांना कोणतीही शासकीय अगर सणानिमित्त सुट्टीचा नियम लागू नाही.

आठवड्यातून एक साप्ताहिक सुट्टी दिली जाते. पण वेळ प्रसंगी ती सुध्दा बंद केली जाते. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस कुटुंबासोबत राहणेसुध्दा दुरापास्त होऊन जाते. पोलीस खात्यात काम करताना प्रत्येक क्षणाला, प्रत्येक घटकेला नव नवीन प्रसंगाला सामोरे जावे लागते.

समोर येणारा प्रसंग काय असेल याचा काही एक अंदाज येत नाही. अशा अवस्थेत काम करणाऱ्या माणसाची मानसिक परिस्थिती काय असेल हे कोणीच सांगू शकणार नाही.

एखादी गंभीर घटना घडली किंवा महत्त्वाच्या सणांचे/ उत्सवाचे वेळी पोलिसांना चोवीस तास अविश्रांत काम करावं लागतं. कधी कधी तर आठ आठ दिवस घरी जाता येत नाही. घरी वेळेवर जाता येईल याची खात्री नाही. अशा कायम मानसिक तणावाखाली काम करावं लागतं.

ज्या माणसानं पोलीस खात्यात येऊन सेवेचं व्रत अंगीकारलं आहे, त्यांनी  कामाचा ताण किंवा कामाच्या त्रासाबद्दल बोलायचं नाही असा एक अलिखीत करार असतो. पोलिसांच्या राहण्याच्या समस्यांपासून सुरुवात होऊन पुढे त्याची ड्युटी संपेपर्यंत अनेक समस्यांचा डोंगर त्याच्यापुढे उभा असतो. स्वत:च्या समस्यांकडे लक्ष द्यायचं नसतं किंवा त्याला त्याकडे लक्ष देण्यास फुरसत नसते.

पोलीसखात्यात चोवीसतास एक ना अनेक प्रकारच्या तक्रारी घेऊन लोक येतात. प्रत्येक माणसाला वाटतं की, पोलीसठाण्यात पाय ठेवल्याबरोबर तिथल्या हजर असलेल्या अधिकाऱ्याने विनाविलंब समस्या ऐकून त्याचं निवारण करुन लागलीच त्यांच्या तक्रारीवर कारवाई करावी.

यात वावगं असं काही नाही. समाजातील लहान-थोर, गरीब-श्रीमंत अपेक्षाच नाही तर हक्क समजून पोलिसांशी वागतात. पोलिसठाण्यात तक्रारी येण्याचे प्रकार पाहून तुम्ही हैराण होऊन जाल.

घरामध्ये नळाला पाणी नाही, वीज पुरवठा बंद झाला आहे, रोडवर खड्डे झालेत, रिक्षावाले येत नाहीत, रस्त्यावर कचरा साठला आहे, शेजारी त्रास देतात, मारामारी झाली, चोरी झाली, दरोडे, खून, अपघात झाला. अशा प्रकारच्या एक ना अनेक तक्रारींचा पाढा सतत पोलिसांसमोर चालू असतो. त्यातच संप, बंद, सण-उत्सव, मोर्चे, अनेक सभा यांचा बंदोबस्त याबद्दल तर बोलायलाच नको.

आपल्या लोकशाही असलेल्या देशात प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या निवडणुका होत असतात. कधी ग्रामपंचायत, नगरपालिका, विधानसभा, तर कधी लोकसभा. या निवडणुका जाहिर झाल्यापासून पोलीस दल बंदोबस्तामध्ये चोवीस तास व्यस्त होते. पदयात्रा, चौका चौकातील सभा तर त्याचबरोबर मोठ्या नेत्यांच्या जाहिर सभा, उमेदवारांचे संरक्षण आणि त्यानंतर मतपेट्यांचं संरक्षण करता करता पोलिसांचा दमछाक होते. पोलिसांना मिळणाऱ्या वेतनभत्यावर कोणीही लक्ष देत नाही.

त्याच्याकडून कामाच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात केल्या जातात. परंतु केलेल्या कामाच्या तासांचा, वेळेचा कोणीही विचार करताना दिसून येत नाही.

या सर्व प्रकारच्या तक्रारी, त्यांचे निवारण करणे, गुन्ह्यांचा तपास करणे, आरोपींचा शोघ घेणे, त्यांना कोर्टात हजर करणे अशी हजार प्रकारची प्रकरणं हाताळतांना जनतेच्या अपेक्षा, पत्रकार, शासन, वरिष्ठांचा दबाव तर चालू असतोच. या सर्व व्यापांमध्ये पोलीस शिपायापासून ते पोलीस प्रमुखांपर्यंत सर्वांनाच हा ताण सहन करावा लागतो.

पोलीस खात्यात पोलीस स्टेशन स्तरावर हा त्रास जास्त सहन करावा लागतो. ह्या सर्व तक्रारी ऐकून घेऊन त्याचे निराकरण करीत असताना त्या पोलीस अधिकाऱ्याचा दिवस व रात्र केव्हा संपते हे त्यांनासुध्दा कळत नाही.

पोलीसखात्यात अनेक अधिकारी होऊन गेले. त्यापैकी काही अधिकारी घड्याळच वापरत नव्हते. त्यामुळे वेळ किती झाला हे समजण्याचं प्रश्नच उद्भवत नाही. घराचं, वेळेचं भानच, राहत नाही. घराची आठवण येत नाही. पोटात काही नसलं तरी भुकेची आठवण येत नाही. त्यांच्यावर कामाचा ताण म्हणा किंवा त्रास म्हणा इतका असतो की, तुम्ही विचारच करु शकणार नाही.

पोलीसदलाशिवाय इतर खात्यामध्ये घरातील व्यक्ती ज्या वेळी कर्तव्यावर जातात आणि परत येतात, त्यांच्या वेळा ठरलेल्या असतात. ठरलेल्या वेळेपेक्षा अशा व्यक्तीला दहा मिनिटे जरी यायला उशीर झाला तरी त्यांच्या कुटुंबियांच्या जिवाची घालमेल सुरु होते. पोलिसांची कामावर जाण्याची वेळ ठरलेली असते. परंतु घरी जाण्याची वेळ मात्र त्यांच्या हातात नसते. पोलीसदल आणि इतर विभागामध्ये ही फार मोठी दरी तुम्हाला पाहायला मिळेल.

आमच्या भारतीय लोकशाहीमध्ये कायदा सर्वांसाठी समान आहे. मग त्यात कोणी मोठा असो वा छोटा, गरीब असो वा श्रीमंत, सर्वांना कायदा लागू  आहे. पण रस्त्यावर जा-ये करतांना किती सुजाण नागरिक कायदे पाळतात हे आपण पाहतोच. अशा लोकांना पाहिल्यानंतर कधी कधी वाटतं की, हे कायदे मोडण्यासाठीच तर केले नाहीत ना?

जनतेने कितीही कायदे तोडले, नियम तोडले तरी कारवाई होऊ नये म्हणून ते पुन्हा पोलिसांवरच दबाव आणून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करतात. सर्वसाधारण जनतेला हे समजायला हवं की, कायदे, नियम लोकांच्या हिताकरीता, लोकांच्या कल्याणाकरीताच बनवले आहेत. एखादा गंभीर गुन्हा किंवा अगदी एखादी शुल्लक चूक जरी पोलिसांकडून झाली तर मात्र समाज, शासन व मिडीयाकरून सर्व बाजूने पोलिसांवर टिकेची झोड उठवली जाते. सर्व खात्याला बदनाम केले जाते. एखाद्या पोलिसाने गुन्हा केला तरी सर्वांना बदनाम केले जाते.

पोलीसखात्यात सर्वच अंमलदार/ अधिकारी चांगले आहेत किंवा सज्जन आहेत असं म्हणता येणार नाही. परंतु काही अधिकारी/ अंमलदार आपलं सर्वस्व खात्याला अर्पण करुन काम करतात. आज आपण समाजामध्ये पाहिले तर परिस्थिती अशी आहे की, प्रत्येकास असं वाटतं की, “मी जे करतो ते बरोबर आहे.” अशानं समाजाचं परिवर्तन होणार नाही.

आज समाजाबरोबर, सर्व शासकीय यंत्रणेत काम करणाऱ्या लोकांचे सुध्दा समाजप्रबोधन होणं आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीनं स्वत:पासून सुधारण्याची सुरुवात केली पाहिजे. दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना आपल्या हाताची उर्वरीत तीन बोटे आपल्याकडे आहेत याचा विसर पडता कामानये. कायद्याची बंधन सर्वांनीच पाळलं पाहिजे. तरंच समाजाची सुधारणा होईल.

पोलीसदलात काम करताना अनेक क्लिष्ट व गुंतागुंतीचे गुन्हे तपासताना येणारा मानसिक ताण प्रचंड असतो. अशा ताण तणावाखाली पोलिसांना चोवीस तास काम करावं लागतं. पोलीस ठाण्यात हजर झाल्यापासून गुन्ह्याचा तपास, शोध, आरोपी आणि बंदोबस्त यामध्ये पोलिसांचा वेळ कसा व कोठे

जातो हे समजतसुध्दा नाही. कधी कधी तपासामध्ये आरोपींनी वापरलेल्या नवीन नवीन आयडिया, मार्ग, पध्दत याचा मागोवा घेता घेता पोलीस स्वत:लाच विसरुन जातो.

पोलीस खात्यात काम करताना काळ-वेळेचं बंधन नसतं. सकाळी ड्युटीवर आलेल्या पोलिसाला अनेक वेळा ड्युटी संपता संपता एखाद्या गंभीर गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात करावी लागते. कधी एखादी किचकट व क्लिष्ट अशी तक्रार तुमच्या समोर येते. मग रात्रं दिवस तपास चालू होतो. अशा वेळी पोलीस आपले कुटुंब, घर, नातेवाईक यांना विसरुन जातो. रात्री उशीरा घरी जातो. त्यावेळी मुलं झोपलेली असतात. सकाळी लवकर उठून बंदोबस्त किंवा महत्त्वाच्या तपासासाठी घरातून निघतो, त्यावेळी मुलं झोपलेली असतात. आठ-आठ दिवस मुलांना वडीलांचं दर्शन होत नाही. त्यांनासुध्दा प्रश्न पडतो की ही कसली ड्युटी? त्यांचे मित्र त्यांच्या वडिलांसोबत शाळेत जातात, फिरायला जातात. परंतु पोलिसांच्या मुलांना हा आनंद मिळत नाही. त्यामुळे मुलांच्या मनावर परिणाम होतो. कधी कधी मुलं चिडचिड्या स्वभावाची होतात. काही मुलं एकलकोंड्या स्वभावाची होतात. तसेच पोलिसांना त्यांच्या घरच्या किंवा इतरांच्या कोणत्याही लग्न कार्य, धार्मिक कार्यच काय पण एखाद्या महत्त्वाच्या नातेवाईकाच्या अंत्यविधीलासुध्दा जाता येत नाही.

पोलिससुध्दा वर्दीच्या आत एक माणूस असतो हे कोणी विचारात घ्यायलाच तयार नाहीत. सर्व समाजाला, शासनाला, न्यायव्यवस्थेला तो सतत क्रियाशील असलेला आवडतो. परंतु त्यांच्या आशा, आकांक्षा, इच्छा, आवड याचा विचार ह्या समाजात होताना दिसत नाही.

जशी सर्वांना घराची ओढ असते तशी पोलिसांनाही असते. त्याला सुध्दा कधीतरी घराची आठवण येते. त्याचं मन व्याकूळ होतं. मग असं वाटतं की, आपण वेळेत घरी जावं, आपल्या कुटुंबात सामील व्हावं. पण पोलिसांसाठी ते एक स्वप्न ठरतं.

ऑगष्ट वॉल्मर यांनी एके ठिकाणी लिहून ठेवलं आहे.

‘‘पोलिसांचा जनता सतत उपहास करीत असते. सामाजिक उपदेशक त्यांच्यावर सतत टिकाच करीत असतात. वर्तमानपत्रे त्यांचे खच्चीकरण करीत असतात. सरकारी वकील व न्यायाधिशांचे त्याला सहकार्य मिळत नाही. सन्माननीय व्यक्ती त्याला तुच्छतेने दूर ठेवतात. तो सतत अगणित मोह व धोक्यांना सामोरा जात असतो. त्याने कायद्याची अंमलबजावणी केली तर ती आवडत नाही व केली नाही तर कारवाई केली जाते. त्याच्याकडे एक उत्तम सैनिक, डॉक्टर, मुत्सद्दी, शिक्षणतज्ञ व वकीलाची पात्रता असण्याची अपेक्षा केली जाते. परंतु त्यास रोजंदारी कामगाराच्या वेतनापेक्षा कमी वेतन दिले जाते.’

ऑगष्ट वॉल्मर यांनी एक दाहक सत्य लिहून ठेवलेलं आहे. परंतु या गोष्टींना विचार ना समाज, ना शासन, ना न्यायालय, ना पत्रकार करताना दिसत.

ज्यावेळी आमची जनता-जनार्दन सण, उत्सव साजरे करतात त्यावेळी पोलीस रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून समाजात कोणतीही अघटीत घटना घडू नये यासाठी रस्त्यावर उभा असतो. ज्यावेळी समाजातील घटक सण-उत्सवाचा मनमुराद आनंद घेत असतात, त्यावेळी समाजाला असं आनंदी असलेले पाहूनच पोलिसाला आनंद होतो. ज्यावेळी तो घराबाहेर असतो, त्यावेळी त्याचं कुटुंब, पत्नी, मुलं आपल्या पतीविना, पिताविना सण साजरा करतात. पण त्यांच्या मनात कोठेतरी एक शल्य टोचत असतं.

आमचे बाबाही आज घरी आमच्यामध्ये असते तर ….

पण त्यांच्या ह्या ‘जर – तर ‘ ची कोणाला पर्वा आहे? जो तो आपल्या आनंदात रमून गेलेला असतो. पोलिसांना मात्र सण ना वार. त्याच्यासाठी शोध, तपास, बंदोबस्त हाच सणवार व उत्सव असतो.

पोलिसांच्या समस्यांचा विचार करतांना कोणी दिसत नाही. परंतु तो रोडवर उभा असताना सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या असतात. तो रस्त्यावर चोवीस तास रात्रंदिन उभा असतो. म्हणून त्याच्यावर लोक सहजपणे सर्व प्रकारचे आरोप करतांना दिसतात. त्यामध्ये अगदी रस्त्यावर बसणाऱ्या भिकाऱ्यांपासून ते सत्ताधाऱ्यांपर्यंत सर्वांचा समावेश असतो.

आरोप करणाऱ्यांना कारण लागत नाही. तक्रार घेतली तर आरोपींकडील लोक नाराज होतात. कारवाई करण्यात कसूर सोडा, थोडा विलंब झाला तरी त्याला बेजबाबदार, भ्रष्टाचारी अशी अनेक दुषणं दिली जातात. पोलिसांचं कामच कसं (Thankless) आभार विरहीत असतं. कडक कारवाई केली तर पोलिसांनी अत्याचार केला म्हणून टिका व नाही केली तर तो कामचुकार म्हणून वरिष्ठांकडून कारवाई.

रोडवर कडक वर्दीतल्या पोलिसाची एकच बाजू लोकांना दिसते. त्याही पलीकडील म्हणजे पोलिसातल्या माणसाची बाजू कोणालाच दिसत नाही. प्रत्येकालाच पोलीस सतत हवा असतो. पण त्याची जवळीक कोणालाही आवडत नाही. समाजातील बहुतेक लोकांच्या तोंडी एक प्रसिध्द डायलॉग ऐकायला मिळतो तो म्हणजे,

“नकोरे बाबा, पोलिसांची दोस्तीही नको अन् दुश्मनीही नको.”

का?

इतके पोलीस खाते नालायक आहे?

की वर्दीतली माणसं नालायक आहेत?

या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहित आहे. तरीही पोलिसांचा सर्व ठिकाणी तिरस्कारच केला जातो.

कधी त्यांना माणसांत घेण्याचा प्रयत्न कोणी दिसत नाही. पोलीस वर्दीमध्ये हॉटेलात जेवताना पाहिला तरी ” हा फुक्कटचं कसा खातो? ” म्हणून त्याचेकडे हिन नजरेने पाहणारे महाभाग या समाजात आहेत. त्यांच्या राहण्याच्या, ड्युटीच्या मुलांच्या शिक्षणाच्या समस्यांचा विचार करताना कोणी दिसत नाही. एक ना अनेक समस्यांचे डोंगर पोलीस आपली शिदोरी म्हणून जवळ बाळगतो. आज आमच्या लोकशाहीमध्ये अनेक क्षेत्रात संघटना आहेत. परंतु पोलिसांची संघटना नाही. शिक्षकांसाठी त्यांचा प्रतिनिधी शिक्षक दिला जातो. पण पोलीस खात्याचं काय?

फक्त बिनबोभाट काम करीत राहणं. शासन, समाज, पत्रकार व न्याय व्यवस्था असे चार खांबाचे ओझे त्यांच्या खांद्यावर ठेऊन चोख कामगिरी ठेवण्याची अपेक्षा सर्वजण करताना दिसतात.

पोलीस खात्यात काम करणाऱ्या प्रत्येकाला समज गैरसमजाच्या भोवऱ्यातून जावं लागतं. अनेक वेळा अशा गैरसमजांमधून वैवाहिक जीवन संपुष्टात आलेली अनेक उदाहरणं आपणास पहायला मिळतील. पोलिसांना ड्युटीचं, कामाचं वेळापत्रक नाही, जाण्या-येण्याचा ठिकाणा नाही. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेकदा कटू प्रसंग निर्माण होतात. पोलिसांच्या कुटुंबाने तरी किती मानसिक त्रास सहन करायचा? त्याला देखील मर्यादा आहेत. परंतु त्यांच्या या अतिशय नाजुक अशा समस्यांनी त्याला पुरते बेजार केले आहे. ड्युटीवर उशीर झाला तर वरिष्ठ नाराज, घरी उशीर झाला तर कुटुंब नाराज. अशा विचित्र कात्रीमध्ये पोलीस नावाचा प्राणी अडकून पडला आहे. ह्या कात्रीमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नांमध्ये त्याचं मन रक्तबंबाळ होतं.

अशा रक्तबंबाळ झालेल्या मनावर सर्वजण निर्दयतेने चालत त्या मनाला तुडवत जात असतात. तो मात्र मनातून ओघळणाऱ्या दुःखरुपी रक्ताकडे स्वत:च त्रयस्थाप्रमाणे पहात असतो.

पोलीस अधिकारी व जवानांच्या पत्नी व कुटुंब जर समजुतदार नसती तर आजच्या घडीला अर्ध्यापेक्षा जास्त पोलिसांची कुटुंबे घटस्फोट होऊन रस्त्यावर आलेली दिसली असती. अगदी मनापासून सांगायचं तर त्या पोलिसांच्या पत्नींना त्यांच्या कुटुंबाला त्रिवार सलाम करावासा वाटतो. कारण ती पोलीस पत्नी, माऊली व कुटुंब सदोदित त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. त्यामुळे पोलीस चोवीस तास घराच्या बाहेर आहेत. म्हणूनच समाज निर्विघ्नपणे शांततेत राहताना दिसत आहे.

पोलीस दलात नोकरी करीत असताना अनेक समस्यांमुळे काहीजण व्यसनाधीन झालेले आहेत. काही आरोग्यामुळे, आजारामुळे त्रस्त झाले आहेत. काही कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आजाराला कंटाळून, कुटुंबाच्या समस्यांना कंटाळून तर कधी नोकरीतील अतितणावामुळे मानसिक त्रास सहन न झाल्याने आत्महत्येचा मार्ग अवलंबिलेला पहायला मिळतो. पण अशा प्रकारांमुळे घाबरुन न जाता इतर पोलिसांनी त्रस्त समाजाचं स्वास्थ मात्र कायम ठेवलं आहे.

पोलीस, नोकरी करताना चोरांचा शोध, हरविलेल्या लोकांचा, न्यायालयातून फरार झालेल्या आरोपींचा, कुविख्यात गुन्हेगारांचा चोवीस तास सतत तपास व शोध घेत असतो. या त्यांच्या तपासामध्ये व शोधामध्ये पोलीस मात्र स्वत:चं घर हरवून गेला आहे.

पोलिसांच्या सेवेत अनेकवेळा जो एखादा छोटा गुन्हेगार पकडलेला असतो, तो कालांतराने त्यांच्यासमोर मोठा गुंड होऊन पोलिसांना आवाहन करत असतो, तर दुसरीकडे अनेक कुविख्यात गुन्हेगार आपले गल्लीबोळातील कार्यक्षेत्रं गुंडीगिरीच्या जोरावर अंतरर्देशिय स्तरावर नेऊन ठेवल्याचे पाहत असतो.

एखादा सामाजिक कार्यकर्ता त्यांच्यासमोर लहानाचा मोठा होऊन मंत्रीपदापर्यंत पोहोचलेला पहातो. पोलिसांच्या या शोध मोहिमेत स्वत:च्या घरातील त्यांचे बोट धरुन चालणारी छोटी चिमुरडी ती एव्हाना मोठी झालेली असते. तिच्याकडे पाहण्यास मात्र त्याला वेळ मिळत नाही. तो त्याच्या ड्युटीत सतत व्यस्त असतो.

अशा खात्यात तो ३५ ते ४० वर्षे सेवा करुन निवृत्तीच्या उंबरठ्यावर ज्यावेळी उभा असतो, त्यावेळी त्याला स्वत:चे नातेवाईक, कुटुंब, मित्र व सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचे हरवलेलं घर शोधता शोधता जीवनाची संध्याकाळ कधी होते हे समजण्याअगोदरच काळरुपी रात्रीनं त्याच्यावर झडप घातलेली असते.

— व्यंकट पाटील

(व्यंकट पाटील यांच्या ‘घर हरवलेला पोलीस’ या लेखसंग्रहातील हा लेख.)

Avatar
About व्यंकट भानुदास पाटील 15 Articles
सहायक पडोलिस आयुक्त या पदावरुन निवृत्त झालेले श्री व्यंकटराव पाटील ह पोलीस कथा लेखक आहेत तसेच त्यांच्या कादंबऱ्याही प्रकाशित झाल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..