यंदाच्या दिवाळीची सुरुवात ३१ ऑक्टोबरला परिमल राजहंसच्या मैफिलीने झाली आणि दिवाळीचा माहोल १३ नोव्हेंबरच्या “मागे उभा मंगेश” या शांताबाई शेळकेंच्या जन्मशताब्दी निमित्त झालेल्या मैफिलीने संपुष्टात आला.
आम्ही उभयता जाणे अपरिहार्य होते कारण सुमारे वीस महिन्यांनंतर नाट्यगृह अनुभव घ्यायला आम्ही उत्सुक होतो.शांताबाईंचे शब्दब्रह्म, हृदयनाथ / आनंदघन यांचे नादब्रह्म आणि विभावरी आपटे-जोशी / मधुरा दातार यांचे स्वरब्रह्म साऱ्यांचं ऐक्य हा दुर्मिळ योगायोग यशवंतराव नाट्यगृहात कानांना भिडला.
तीन वर्षांपूर्वी याच ठिकाणी आम्ही सलील कुलकर्णी/मधुरा/विभावरी यांची भावगंधर्व हृदयनाथांबरोबर दिवाळी पहाट बघितली होती.त्याचा प्रत्यय पुन्हा आला.
कार्यक्रमाची सुरुवात पंडितजींच्या स्वागताने (नुकतेच २६ऑक्टोबरला हृदयनाथांनी ८५ व्या वर्षात पदार्पण केले) झाली. ५५-६५ वर्षांपूर्वी रचलेल्या गीतांनी ( माझ्या वयाइतका कालावधी) पुढचे तीन तास सुरेल झाले. सोबतीला गतकाळात रमलेल्या ( खरं तर घुसलेल्या) पंडितजींची भाष्यवजा कॉमेंट्री अधिक गहिरी होती. स्वतः निर्माण केलेल्या स्वरकृतींकडे ते काहीसे तटस्थ होऊन,दुरून, अचंब्याने बघत होते, काळाचा मागोवा घेत होते.
त्यांच्या पाठीशी कायम उभा असलेला “मंगेश” आम्हांला मधुराने शांताबाईंच्या शब्दांतून भेटवला. ” किशोरी आमोणकर आणि आम्ही मंगेशकर, दोन्ही कुटुंबे गोव्याची असल्याने मी किशोरीला अरे-तुरे असे संबोधित असे ” ही आठवण सांगताना किशोरीला – तिची उंची माहित असल्याने एक अनवट रचना (जिचा राग माहीत नाही) द्यायचे ठरले आणि शांताबाईंनी त्यांवर ” ए श्यामसुंदर ” असे सहजशब्द डकवले आणि गोकुळाच्या गल्लीबोळात सावळ्याला शोधत हिंडणारी एक व्याकुळ यमुना गानसरस्वतीने अजरामर केली.
” जिवलगा ” या युनिक शब्दाने सुरु होणारे गाणे पहाटे दिसलेल्या सत्पुरुषाच्या दर्शनाने प्रातःकालीन श्रीगौरी रागात बांधले गेले पण सुरावट सगळी परतीच्या उन्हाने उतरणीला लागलेली ! एच एम व्ही च्या दोन वादक नियमाच्या जाचाला कंटाळून फक्त तंबोऱ्यावर हे आर्त गीत शांताबाईंनी किती सहज तयार केले ती आठवणही हृद्य वाटली.
कोळीगीतांसाठी किनाऱ्यावरील चांदोबाची चांदी वेचल्यावर ” वल्हव रे नाखवा ” जमले. अरुण दातेंनी नकार दिल्यावर समुद्राची गाज आवाजात असलेले हेमंतदा पुढे आले. जब्बारच्या आग्रहास्तव “जैत रे जैत ” मधील ठाकर गीते स्वतःच्या शैलीत कशी केली याचीही खुमासदार आठवण होती. दीदी,शांताबाई, पंडितजी आणि भालजी यांच्या पन्हाळा बैठका व “ऐरणीच्या देवा ” ची जन्मगाथा त्यांनी सांगितली. वयाने मोठ्या असलेल्या नायकांना २२ व्या वर्षी स्वतःचा आवाज कसा दिला आणि “लता जैसी सुरीली आवाजको बेसुरा पेश करनेवाला एकमात्र संगीतकार” अशी स्वतःची झालेली बदनामी त्यांनी तितक्याच विषादाने सांगितली.
काळाच्या पुढे जाऊन दिलेले आपले संगीत उपेक्षिले गेले याचबरोबर सगळे सखेसोबती सोडून गेले आता मी आणि दीदी उरलोय याचीही नोंद त्यांनी घेतली.
खरं तर लता नंतर मराठीला जागतिक पटलावर नेण्याचे सामर्थ्य असलेली दोनच मराठी माणसे- साहित्य क्षेत्रात जी ए आणि संगीत क्षेत्रात निर्विवाद पणे भावगंधर्व हृदयनाथ ! दोघांचीही भारताबाहेरील स्तरावर यथायोग्य नोंद घेतली नाही.
प्रतिभेचे वाटप वडील करीत नाही, ते “वरून ” झालेले असते हे सांगताना त्यांनी “माऊलींचे ” उदाहरण दिले. चारही भावंडात विठ्ठलपंतांनी एकसारखी प्रतिभा वाटली नव्हती. मंगेशकर घराण्यात “लता ” कडे ती दैवजात प्रतिभा आली. तिचा मी लहान भाऊ आहे आणि संगीत सूर्य दीनानाथांचा मुलगा आहे याचा सार्थ अभिमान त्यांनी वारंवार अधोरेखित केला. मीनाताईंनी संगीतबद्ध केलेले आणि उषाताईंनी गायलेले एक अप्रसिद्ध गीत ” तू नसता मज संगे ” त्यांनी स्वतः वन्समोअर देऊन ऐकले तेव्हा त्यांच्या भावमुद्रेवर दीनानाथ उमटलेले होते.
तीन वर्षांपूर्वी पाहिलेले हे संगीताचे “घर” यावेळी थकलेले दिसले. मध्येच एखादा उर्दू शेर तब्येतीने ऐकविणे, गायक-वादकांना चुकल्यावर तंबी देणे अशा काही ओझरत्या क्षणांमधून जुने पंडितजी भेटले पण त्यांच्या भाषेत कार्यक्रमाची फलश्रुती म्हणजे एवढ्या कालावधीनंतर इतक्या संख्येने श्रवणरसिक जमा होणे हीच होती.
” घेता किती घेशील ” अशी आमची अवस्था बघितल्यावरच त्यादिवशी पडदा समाधानाने पडला.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply