नवीन लेखन...

घराचं स्वप्नं साकारताना…..

आपल्या लहानपणापासूनच “घर” ह्या विषयीची अनेक गाणी, गोष्टी आपण ऐकलेल्या असतात. मग तो चॉकलेटचा सोनेरी चमचमता बंगला असेल अथवा चिऊताईच्या घराची गोष्ट असेल. अगदी लहानपणापासूनच आपल्या मनात घर करून राहिलेल्या “घर” या संज्ञेशी आपलं एक प्रकारे निराळंच नातं निर्माण झालेलं असतं. सतत कानावर पडणाऱ्या “घर” ह्या शब्दाचं एक प्रचंड आकर्षण लहानपणापासून आपल्याला वाटत असतं. घरातलं मन आणि मनातलं घर ह्यांचं नातं अगदी दुध-पाण्यासारखं असतं. सहजासहजी ते वेगळं करता येत नाही. “घर” या संज्ञेनी एकप्रकारे आपल्या मनातच घर करून ठेवलेलं असतं.

आपल्याला घराची जरुरी केवळ शरीरासाठी मुलभूत गरज भागवणे अशी नसून त्याची खरी गरज मनासाठी अधिक असते. आपल्या शरीरासाठी तो केवळ निवारा असतो, तर मनासाठी मात्र आपलं घर आपल्यासाठी खूप काही असतं. आपल्या घरात आपण अनुभवलेला प्रत्येक क्षण आपल्यासाठी विलक्षण अनुभूती देणारा ठरत असतो. आपण जे काही अनुभवत असतो, त्यांचा आपल्या मानसिकतेवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम नेहेमी होत असतो. आपण आणि आपलं अंतर्मन देखील त्याचा प्रत्यय घेत असतं. जेव्हा शरीरानं आपण घरापासून दूर असतो, तेव्हा अनेकदा मनानं मात्र घरात असतो, मनानं घरापासून दूर गेलेलो नसतो. आपल्या मनाचं आपल्या घराशी असलेलं अतूट नातं घराच्या निवडीच्या दृष्टीकोनातून आपण समजून घेणं म्हणूनच आवश्यक असतं.

 

  • घराची पसंती

काहीवेळा निवडलेलं घर केवळ आपल्या आर्थिक मर्यादेत बसू शकतं म्हणून ते पसंत करणं इतर बाबतीत कदाचित त्रासदायक ठरू शकतं. घराची निवड अर्थात पसंती करताना काही मुलभूत बाबींचा अभ्यासपूर्वक विचार करणं जरुरीचं असतं. त्यासाठी काही प्रश्न स्वतःलाच विचारून बघावेत.

  • घराची निवड कोठे करावी ? ठिकाण परिसर कोणता असावा ?
  • घर कोणत्या स्वरूपातील असावं ? व्हिला, बंगला, फ्लँट, ड्युप्लेक्स, रो-हाउस, अपार्टमेंट, स्टुडीओ अपार्टमेंट इत्यादी पैकी कोणता प्रकार योग्य ठरेल, परवडेल ?
  • आपल्या मुलभूत गरजांची पूर्तता होऊ शकते का ? घराचं आकारमान, आकार, एकूण खोल्यांची संख्या इत्यादी सोयीचे आहे का ?
  • घराची किंमत आर्थिक मर्यादेत बसणार का ? कर्ज घेतलं तर ते फेडणे सहज शक्य आहे का ? दैनंदिन गरजांवर त्याचा परिणाम तर होणार नाही ना ?
  • पसंत पडलेलं घर कितव्या मजल्यावर आहे ? लिफ्टची सोय आहे का ?
  • पिण्याचं पाणी आणि इतर वापरासाठीचा पाणीपुरवठा कसा आणि किती आहे ?
  • घराला नैसर्गिक हवा, उजेड, सूर्य-प्रकाश पुरेशा प्रमाणांत उपलब्ध आहे का ?
  • घरांत संडास, बाथरूम किती आणि कोणत्या ठिकाणी आहेत ? त्यामध्ये कोणकोणत्या सोई-सुविधा आहेत ?
  • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कोणत्या आणि काय उपाय योजना केलेल्या आहेत ? सुरक्षा रक्षक, सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे का ?
  • घराच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ, सुंदर, सुरक्षित, सुशिक्षितता असलेल्यांचा आहे का ? सभोवताली, आजूबाजूला काय काय आहे ?
  • पसंत पडलेल्या घराच्या जवळपास दवाखाना, डॉक्टर, भाजीपाला, दुध-फळे, किराणा, लौंड्री, औषधे इत्यादी उपलब्ध असणारी दुकाने आहेत का ? वाहतूक व्यवस्था जसं सिटी बसेस, खाजगी वाहतूक व्यवस्था, ऑटोरिक्षा इत्यादीची सोय कशी आहे ? त्यांच्या वेळा काय आहेत ?
  • वास्तव्यासाठी जीवनावश्यक सोई-सुविधा काय आणि किती आहेत ?
  • घराची रचना कोणत्या दिशेला आहे ? त्या अनुषंगाने हवा, उजेड, वारा, पाऊस इत्यादी कशा प्रमाणांत उपलब्ध होऊ शकते ? अथवा किती परिणाम करू शकतं ?
  • घराला बाल्कनी, टेरेस आहेत का ? किती, कोणत्या दिशेला, कितव्या मजल्यावर ?

 

  • तांत्रिक आणि कायदेशीर बाबी

एखाद्या पसंत पडलेल्या घराची आपल्यावर अशी काही भुरळ पडते, कि अनेकदा त्या घराशी संबंधित तांत्रिक आणि कायदेशीर बाबी आपल्याकडून दुर्लक्षित राहतात. अनावधानाने केलेल्या घराच्या व्यवहारात आर्थिक फटका बसू शकतो आणि मानसिक त्रासही सहन करावा लागू शकतो. त्या दृष्टीकोनातून काही महत्वाच्या बाबींचा अभ्यासपूर्वक विचार करणं योग्य ठरतं, आवश्यक असतं.

  • पसंत पडलेल्या घराचा नकाशा संबंधित शासकीय खात्याने मंजूर केलेला आहे का ? मंजूर नकाशावर जसं बांधकाम दाखवलं आहे, तसंच प्रत्यक्ष काम करण्यांत आलं आहे कि त्यांत काही बदल करण्यांत आलेले आहेत ?
  • संबधित प्रमाणपत्रे, दाखले, मान्यताप्राप्त करण्यात आल्याचे दाखले, नियमितपणे शासकीय नियमानुसार भरलेल्या रक्कमा आणि त्यांच्या पावत्या, विविध खात्यांची ना हरकत प्रमाणपत्रे, विकसकाचे जागा मालकाशी झालेले कायदेशीर करार, कायदेशीर बाबींची पूर्तता करणारी सर्व प्रकारची कागदपत्रे उपलब्ध आहेत का ?
  • तांत्रिकदृष्ट्या योग्यप्रकारे घराचं बांधकाम झालेलं आहे का ?
  • दरवाजे, खिडक्या, विद्युतीकरण इत्यादी कामांचा दर्जा चांगला आहे का ?
  • नव्या कामात भिंतीना भेगा, लिकेज अथवा रंगाचे पोपडे वगैरे काही नाही ना ?
  • संडास, बाथरूममध्ये सांडपाणी तुंबणे, लिकेज, टँकशी संबंधित समस्या नाही ना ?
  • घराच्या बांधकामाचा दर्जा कसा आहे ? त्याचा प्रकार कसा आहे ?
  • घराची मोजमापे आणि त्यासाठी आकारलेली किंमत योग्य आहे का ? करारनाम्यांत नमूद केलेली घराची मोजमापं आणि प्रत्यक्षातील मोजमापं एकमेकांशी जुळतात का ?
  • घराचं मुल्यांकन केल्यास घरासाठी मोजलेल्या रक्कमेशी ते जुळतं का ?
  • विकसक करारावर नोंदवल्याप्रमाणे सर्व सोई-सुविधा पूर्णपणे देत आहे का ?
  • करारांत नमूद केल्याप्रमाणे घराचा ताबा ठरल्यातारखेला मिळणार आहे का ?

घराची खरी गरज मनालाच अधिक असते. म्हणूनच मन प्रसन्न राहाण्यासाठी घर देखील प्रसन्न असलं पाहिजे. जसं आपलं मन सुंदर असतं तसंच घर सुद्धा सुंदर असलं आणि दिसलं पाहिजे. आपल्या घराच्या स्वरूपावरून आपल्या अंतर्मनाची ओळख होत असते. आपल्या घराचं स्वरूप आणि रूप आपल्या अंतर्मनांचा आरसा असतो. आपल्या निवडलेल्या घरामुळे आपलं व्यक्तिमत्व देखील खुलून येत असतं. सौदर्याचा साक्षात्कार केवळ घरातच होतो असं नाही, तर अंतर्मनातही होत असतो. त्यासाठी घराची निवड करताना वरील सर्वच बाबींचा अभ्यासपूर्वक विचार करणं जरुरीचं असतं.

— विद्यावाचस्पती विद्यानंद

लेखकाचा ई-मेल :
vidyavachaspati.vidyanand@gmail.com

Avatar
About विद्यावाचस्पती विद्यानंद 32 Articles
शिक्षण तज्ज्ञ, जेष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक, व्याख्याते, स्तंभ लेखक, कवी, व्याख्याते, अभिनेते, मानसशास्त्रीय समुपदेशक, करिअर आणि आध्यात्मिक मार्गदर्शक. एकूण १८ पुस्तकांचे लेखन (पैकी ६ क्रमिक पाठ्य पुस्तके गेल्या ६ वर्षांपासून विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी उपलब्ध), २००० पेक्षा अधिक लेखांना विविध माध्यमांतून प्रसिद्धी, ३० वर्षे शैक्षणिक क्षेत्रांत प्राध्यापक, प्राचार्य आणि संचालक म्हणून योगदान, ३५ वर्षे वैविध्यपूर्ण व्यवसायातील अनुभव, निरनिराळ्या विद्याशाखांमधून एकूण २८ पदवी व पदव्योत्तर शिक्षण तसेच २ विषयांमध्ये पी. एच. डी. (मानसशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र), सद्यस्थितीत तिसऱ्या पी. एच. डी. चे (आध्यात्म विषयांत) काम सुरु.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..