फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, आदरणीय वसंत वाघ सरांचा मला महिन्यातून एकदा तरी फोन येतो, ‘गुडमाॅर्निंग सुरेशराव, मी डेक्कनला येतोय. पंधरा मिनिटांत ‘गुडलक’ला या.’ मी लगेचच निघतो. भिडे पुलावरुन पलीकडे गेलं की, दहाव्या मिनिटाला मी गुडलकला पोहोचतो. रिक्षा कडेला घेऊन सर उतरतात. आम्ही दोघे गुडलकमध्ये पलीकडील पॅसेजमधील एक टेबल पटकावतो. वेटरला दोन चहाची आॅर्डर दिल्यानंतर सर बोलू लागतात…
‘सुरेशराव, या पुण्याविषयीच्या माझ्या अनेक आठवणी आजही ताज्या आहेत. मी सातारहून पुण्यात आलो. गरवारे महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मला खूप प्रयत्न करावा लागला. त्यावेळी मला खूप व्यक्तींनी अनमोल सहकार्य केले. मी सदाशिव पेठेतील एका खानावळीत जेवत होतो. त्या खानावळीच्या मालकाने महिन्याचे पैसे द्यायला माझ्याकडून कधी उशीर झाला तरी, एका शब्दाने मला अडवले नाही. ती माणसंच माणुसकी जपणारी होती. जेवण देखील घरच्यासारखंच असायचं. आजही सदाशिव पेठेतील त्या रस्त्याने जाताना मला त्या खानावळीची आठवण होते… तुम्ही या विषयावर लिहा कधीतरी….’
सरांनी मला विषय सुचवला व मी भूतकाळात गेलो. आम्ही रहायचो भरत नाट्य मंदिर जवळ. त्याकाळी अमृततुल्य, हाॅटेलं, खानावळी यांचं प्रमाण फार कमी होतं. पेरुगेट चौकात ‘पूना बोर्डींग हाऊस’ व टिळक स्मारक चौकात ‘बादशाही बोर्डींग’ या दोन खानावळी माहीत होत्या. त्या काळात बाहेरचं जेवण करण्याची फॅशन नव्हती. बाहेरगावाहून नोकरीसाठी, कामासाठी आलेले खानावळीत जेवायचे. तिथून पायी चालत जाताना आमटीला दिलेल्या फोडणीचा गोडसर वास नाकात शिरायचा. जेवण करुन बडीशेप खात बाहेर पडणारी माणसं पानपट्टीवर जाऊन पान, सिगारेट घ्यायची.
‘बादशाही’ मध्ये प्रत्येकाला जेवणासोबत पितळेच्या घाटदार तांब्यात पाणी व फुलपात्र दिले जात असे. तिथं नेहमी माणसांची गर्दी असायची. अशाच महाराष्ट्रीयन जेवणासाठी ‘पाटणकर खानावळ’ नवा विष्णु चौकात होती. तिथं चपाती ऐवजी नेहमी पुऱ्याच असायच्या. या खानावळीत मालकापासून आचाऱ्यापर्यंत सर्वत्र पुरुषच दिसायचे.
विजयानंद टाॅकीजजवळ एक गुजरात लाॅज नावाचं हाॅटेल होतं. तिथंही चांगलं जेवण मिळायचं. बाकी स्टेशनजवळ, बसस्थानकाजवळ जेवणाची हाॅटेलं हमखास असायची.
काही कालावधीनंतर पुणं वाढत गेलं. पुण्याची लोकसंख्या वाढली. पेन्शनरांचं पुणं जाऊन बाहेरगावच्या ‘विद्यार्थ्यांचं पुणं’ झालं. पुण्यातील काॅलेजची संख्या वाढली. परप्रांतातून विद्यार्थी शिकायला आले, शिकले आणि नोकरीला लागून इथलेच रहिवासी झाले. त्यांच्या जेवणाचा प्रश्र्न सोडविण्यासाठी खानावळी जाऊन अनेक मेस उभ्या राहिल्या.
२००० नंतर स्पर्धा परीक्षांसाठी पुण्यात अनेक अॅकडमी सुरु झाल्या. बाहेरगावचे विद्यार्थी होस्टेलमध्ये राहून जेवणासाठी मेस लावू लागले. कित्येक कुटुंबांनी घरगुती मेस चालू केल्या. ते एक उत्पन्नाचे साधन झाले. दहा माणसांच्या जेवणात कुटुंबाचं जेवण सहज निघत होतं. महिन्यातील चार रविवारी संध्याकाळच्या जेवणाला सुटी असायची.
काही वर्षांनंतर प्रत्येक पेठेमध्ये चौका-चौकांत मेस दिसू लागल्या. त्यामध्ये व्हेज बरोबर आठवड्यातून दोनदा नाॅनव्हेज देणाऱ्याही मेस होत्या. काही इमारतींवर मेसच्या पाट्या असायच्या. ‘फक्त मुलींसाठी जेवणाचे डबे दिले जातील.’ काही पाट्यांवर ‘मुलांचे डबे महिना रु. २०००/- व मुलींचे डबे महिना रु. १५००/-‘ असा मजकूर असायचा. मुली, मुलांपेक्षा कमी जेवतात म्हणून त्यांना कमी पैसे.
गेल्या तीस वर्षांत शहरातील कुटुंबांना जेवणासाठी ‘डायनिंग हाॅल’ या अभिनव प्रकारची जेवण व्यवस्था निर्माण झाली. डेक्कन, कोथरूड, स्वारगेट, सदाशिव पेठ, इ. ठिकाणी डायनिंग हाॅल सुरू झाले. हाॅटेल श्रेयस, जनसेवा, मुरलीधर, रसोई, हाॅटेल अशोका, सिद्धीविनायक, दुर्वांकुर, सुकांता, सपना अशा अनेक डायनिंग हाॅलमध्ये आजही पुणेकर यथेच्छ भोजन करतात.
काॅलेजला जाईपर्यंत मी बाहेरचं खाणं कधीही केलं नव्हतं. नंतर काही कारणास्तव ते होऊ लागलं. सदाशिव पेठेत आॅफिस सुरु झालं आणि काही वर्षांनंतर आम्ही रहायला बालाजी नगरला गेलो. सुरुवातीला जेवणासाठी दुपारी घरी जाऊन पुन्हा आॅफिसला येत होतो. यामध्ये तीन तास वाया जाऊ लागले. मग आॅफिसशेजारील निंबाळकर यांच्या खानावळीत दुपारचे जेवू लागलो. त्यांच्या घरात दोन टेबलावर आठजणं जेवायला बसत असत. छोट्या वाट्यांमध्ये आमटी, भाजी लगेच संपून जायची. पुन्हा मागितली तर तो मालक वाढताना भांड्यावर पळीचा आवाज काढायचा. काही महिन्यांनंतर ती खानावळ बंद केली.
नंतर ज्ञान प्रबोधिनी जवळील ‘विद्याभवन’ खानावळीत जाऊ लागलो. मराठे यांची ती खानावळ होती. ऐंशी साली हेच मराठे गणिताचे क्लासेस घेत होते, त्यावेळी त्यांच्या क्लासचे पोस्टर डिझाईन आम्ही केले होते. ही खानावळ प्रशस्त होती. दरवाजातून आत शिरलं की, टेबल रिकामं आहे का हे आधी पहावं लागायचं. दुपारी अडीच नंतर गर्दी कमी होत असे. आत गेलं की, मराठेकाकू आतमधील माणसाला आवाज देत, ‘अरे, दोन ताटं करा रेऽ’ आम्ही खुर्चीवर ताटांची वाट पहात बसायचो. छोटू नावाचा पस्तीशीच्या एक वाढपी सर्वांच्या दिमतीला हजर असायचा. प्रत्येकाला जेवणात चार चपात्या दिल्या जायच्या. आतमध्ये दोन महिला चपाती करीत बसलेल्या असायच्या. मराठेकाकूंचा एक दंडक होता, प्रत्येक चपातीसाठी कणकेचा गोळा हा पन्नास ग्रॅमचाच घ्यायचा. त्यासाठी जवळच एक वजनकाटा ठेवलेला असायचा. काही मेंबर भरभर जेवायचे त्यांची पहिली चपाती संपली की, ते शांतपणे वाट पहात बसायचे. छोटू ताटात चपात्या घेऊन आला की, प्रत्येकाला तो आपल्याकडेच आधी यावा असं वाटायचं. त्यातूनही एखादा माणूस चिडला तर काकू छोटूवर रागवायच्या. छोटू बडबड करीत आम्हाला ताट आणून द्यायचा. इथेही वाट्या भातुकली सारख्याच होत्या. ताटात ताकाची वाटी असायची. कधीकधी ताक संपून जायचं. अशावेळी दाढीवाले मराठेकाका वाटीभर दह्यात दोन लिटर पाणी घालून आमच्या समोरच ताक करायचे व वाढायचे. चपात्या संपल्यावर तांदूळ कणीचा भात येत असे. तो गरम गरम वाढल्याने मन तृप्त होत असे.
कित्येक महिने आम्ही विद्याभवन मध्ये पोटपूजा केली. मराठेकाका व काकू गेल्यानंतर काही काळ त्यांचा मुलगा व सुनेने खानावळ चालू ठेवली होती. नंतर ती बंद केली. त्या मोठ्या हाॅलची विभागणी करुन आता त्याच जागेवर सहा दुकान भाड्याने दिलेली आहेत. या विद्याभवनची एक आठवण अशीही आहे की, माझे परममित्र कि. स. पवार हे पहिल्यांदा जेव्हा पुण्यास आले तेव्हा त्यांनी याच मराठे काकांकडे विद्याभवनमध्ये नोकरी केलेली होती.
नवी पेठेत मानकर यांची ‘आस्वाद’ नावाची एक जुनी खानावळ अजूनही चालू आहे. गेली अनेक वर्षे कित्येक रिक्षावाले इथे जेवण करून गेले आहेत. पायऱ्या चढून वर गेलं की, एका लांबलचक हाॅलमध्ये एकावेळी पन्नास एक माणसं जेवू शकतात. इथं तीन चपात्या, वरण, आमटी, सुकी भाजी, भाताची मूद, दह्याची वाटी, कारळ्याची चटणी दिली जाते. स्वैपाकी, वाढपी कोकणी असल्यामुळे जेवण घरच्यासारखे असते. इथं चपात्या गरम गरम देतात. पोट इतकं भरतं की, रात्रीचं नाही जेवलो तरी चालेल असं वाटतं. जेवण चालू असताना पापडवाला ‘पापड पापड’ म्हणत फिरत असतो. त्या पापडाचे पैसे वेगळे द्यावे लागतात. एका टेबलावर चारजण बसलेले असतात, एखादा माणूस वाढलेल्या ताटामध्ये भाजी तशीच ठेवतो किंवा न आवडलेली आमटी तशीच सोडून जातो, तेव्हा त्याचा फार राग येतो. आधी सांगून त्याबदली दुसरा पदार्थ मिळू शकतो पण या आडमुठांशी कोण बोलणार?
अलिकडे आम्ही बाहेरचं जेवण सहसा करीत नाही. एखादे दिवशी अचानक अनिल उपळेकर सरांचा फोन येतो. मी आपणाकडे येतो आहे, प्रदर्शन पहायला जाऊ व नंतर सिद्धीविनायकला जेवण करु. आम्ही प्रदर्शन पाहिल्यानंतर टिळक रोडवरील सिद्धीविनायक मध्ये जातो. अप्रतिम जेवण व अमर्याद गप्पा होतात. तन आणि मन तृप्त होतं….
‘सुरेशराव, कुठं हरवलात?’ सर मला जागं करतात. चहा पिऊन झालेला असतो. आम्ही दोघेही उठतो आणि बिल देऊन गुडलकच्या बाहेर पडतो.
– सुरेश नावडकर १४-१२-२०
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत.
Leave a Reply