घरटं छोट पण मन मोठं.ती सोसायटी छोटीशी बांधकाम अंतिम टप्प्यात. काही घरात माणसं रहायला आली होती. पण समोरासमोर असलेल्या घरात अजून कुणीही नव्हते आले. आणि तेथील एका गॅलरीत एक चिमणी विचार करत होती की किती छान असतं ना. माणसांच घर मोठ आणि सुरक्षित. आणि आम्हाला काडी काडी जोडावी लागते. कापूस. दोर. चिंधी शिवाय एखाद्या झाडावर खूप काळजी वाटते पिल्लांची स्वतःची. पण मलाही असेच घरट बांधायला मिळेल का? या विचारात असतानाच एक भली मोठी गाडी आली. सामान उतरवून निघून गेली. आणि आठपंधरा दिवसांनी एक जोडपे आले. चिमणी स्वतःशीच हसली. हा चिमणा मला पण असेच घेऊन जाईल का त्याच्या घरी. आणि खरच चिमणा तिला घेऊन आला इकडे राजाराणी तिकडे चिमणा चिमणी. सगळे काही चांगले चालले होते. ते दोघे व हे दोघे दिवस भर बाहेर जायचे आणि संध्याकाळी आल्यावर नवीन नवीन बेत ठरवत. चिमणा चिमणीला काहीही समजत नव्हते पण ते दोघे आनंदी आहेत हे पाहून हे देखिल आंनदात…
अचानक ढग जमा व्हावेत आणि अंधार व्हावा तसेच झाले. रोज काही ना काही कारणाने यांची भांडण व्हायची. दोघेही उपाशी. पण कोण समजावणार. चिमणीला वाटायचे ही बाई का समजून घेत नाही. तर चिमणा विचार करत होता की बाई दिवस भर बाहेर काम करुन येते. आणि हा खुशाल बसून राहतो. एक काम करत नाही. आणि वरून तिलाच डाफरतो. पण आपल्याला काय करायचे ते दोघे बघून घेतील त्यांचे. दिवसेंदिवस वाद वाढतच गेले. आणि दोन्ही घरची मंडळी एकत्र आली खूप चर्चा झाली. आणि काहीही बदल झाला नाही म्हणून निघून गेली. आणि एके दिवशी तिने आपली बॅग भरली निघून गेली. चिमणा चिमणी वाट पहात होती पण नाही आली ती. आणि आता त्यांनाही समजले की हे दोघे परत या घरात नांदणार नाहीत. त्यामुळे इकडून तिकडे ते फक्त घिरट्या घालत. दुसर्या दिवशी चिमणी म्हणाली आज मी नाही जाणार बाहेर. मला बर वाटत नाही. चिमणा म्हणाला अग तू नको करुस काहीही मी जातो आणि आणतो तुझ्या साठी विश्रांती घे. चिमणी म्हणाली किंती जपतोस रे तू मला. आणि आता आपल्या कडे एक नवीन पाहुणा येणार आहे. त्यामुळे मी लागते घरट्यात सोयी करायला. आणि खरच काही दिवसांनी छोट्या घरट्यात चिवचिव ऐकू आली…
हे सारे काल्पनिक आहे पण मला वाटले की पशुपक्ष्यांचे शिक्षण, लग्न वगैरे काही नाही तर ते एकमेकांना समजून सांभाळून घेतात. कदाचित भांडण करत असतील. मात्र घर सोडून एकमेकांना सोडून देत नाहीत. कारण त्यांचे घरटं छोट आहे पण मन मात्र खरंच खूप मोठे आहे. दोघेही उच्च शिक्षित. आर्थिक स्वावलंबन. जबाबदारी नाही. बंधन नाहीत सगळ्या सुखसोयी. अजून काय हवं असतं सुखी संसारासाठी ते सगळे काही आहे तरीही असे का व्हावे? हे समजत नाही. पण माणसा परीस… हेच खरं आहे….
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply