‘तू आहेस ना घरट्यात
मी आत्ता आलो’
असं म्हणून तो गेला
तेव्हा मला दिसला – अपरंपार विश्वास
.त्याच्या डोळ्यात
दूरदेशी जाताना लढावं लागलंच
तर आपले जायबंदी पंख घेऊन
तो येईल माझ्याचकडे
किंवा टिपलेलं सोनं मोती
आणून देईल माझ्याच पदरात !
त्याच्या डोळ्यातला विश्वास – मला जपायलाच हवा !
हसरं चिवचिवतं चिमणंपाखरू घरट्यात शिरलं
तर त्याला मी दिसलेच नाही
त्याला मी हवी होते.
त्याच्या दृष्टीत पोरके अश्रू तरळले
तेवढ्यात त्याला मी दिसले
आणि पाखरू चिवचिवलं हसून पुन:
त्याच्या हसण्यानं घरट्यामध्ये आभाळ थिटं झालं
त्याचं हसणं मला जपायलाच हवं !
एकदा मीही आभाळात गेले
परतल्यावर दिसली त्याच्या नजरेत माझी प्रतीक्षा
आणि चिवचिवत पाखरू माझ्या गळ्यात पडलं
तेव्हाच ठरवलं –
आभाळ निसटलं हातातून तरी चालेल
घरटं जपायला हवं!
–सौ. राजलक्ष्मी देशपांडे
Leave a Reply