नवीन लेखन...

घरातच फुलवा बाग

घराभोवती बाग फुलवण्याची कितीही इच्छा असली तरी आजच्या फ्लॅट संस्कृतीमुळे बागेसाठी जागा पुरत नाही. अशा वेळी निसर्गप्रेमींना घरातच बाग फुलवावी असे वाटते. इनडोअर प्लॅन्ट्समुळे ते सहज शक्य होते. या रोपांमुळे घर सुशोभित होतेच, पण हवेतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वाढही होते. थोडी काळजी घेतली आणि वेळेवर खत-पाणी दिले तर

घरातील बागही आपल्याला बाहेरच्या बागेसारखाच आनंद देते.आपल्याला सर्वांनाच निसर्गाच्या सानिध्यात राहायची आवड असते; परंतु सिमेंटच्या जंगलांमध्ये ते शक्य होत नाही. म्हणून काही हौशी लोक घराच्या अंगणातच बाग फुलवतात. पण फ्लॅट संस्कृतीमध्ये घराला अंगण असणे दुरापास्तच असल्याने अनेकांच्या मनात असूनही बागेची हौस पूर्ण करता येत नाही. पण इच्छा तिथे मार्ग म्हणतात हेच खरे. घरात खास ‘इनडोअर प्लॅन्ट्स’ लावून ते आपली हौस पूर्ण करतात. इनडोअर गार्डनिंग हा काहीतरी अवघड प्रकार आहे तसेच अंगणातील बागेची सर त्याला येत नाही असे अनेकांना वाटत असते; परंतु प्रत्यक्षात इनडोअर गार्डनिंगमध्येही आपल्याला आनंद मिळू शकतो. इनडोअर प्लॅट्समुळे घरातील वातावरण तर स्वच्छ राहातेच; परंतु त्यांचा घराच्या सजावटीसाठीही चांगला उपयोग करता येतो.इनडोअर प्लॅन्ट म्हटले की आपल्याला मनी प्लॅन्ट किंवा बांबू अशी बोटावर मोजण्याएवढीच नावे आठवतात.

बाजारात विविध प्रकारचे इनडोअर प्लॅन्ट्स उपलब्ध आहेत. त्यातील दहा सर्वाधिक लोकप्रिय प्लॅन्ट्सचा विचार करुया.

* एन्जल आयव्ही रिंग टॉपिअरी : याला वायर व्हाईन असेही म्हटले जाते. त्याची वाढ वेगाने होत असल्याने खिडकी किंवा फ्रेम सुशोभित करण्यासाठी त्याचा चांगला वापर करता येतो.

* ब्रेडेड फिकस ट्री : या रोपाची फारशी काळजी घ्यावी लागत नाही. तसेच ते कोणत्याही वातावरणाशी जुळवून घेते म्हणून इनडोअर प्लॅट्समध्ये याची लोकप्रियता सर्वाधिक आहे. या रोपट्याचा पूर्ण सांभाळ आणि ब्रेडेड खोड खूपच आकर्षक दिसते.

* कॅक्टस कॉम्बो बोन्साय : कॅक्टस कोणत्याही वातावरणात आणि तापमानात वाढू शकते. वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे ते अनेकांना आवडते तर काहींना आवडत नाही.

* शॅमेडोरिया पाम : या रोपामुळे आपल्या घराच्या कोणत्याही कोपर्‍याला समशितोष्ण कटिबंधाचा फील येतो.

* चायनिज एव्हरग्रीन : या रोपट्याला कमी प्रकाश तसेच कमी देखभाल लागते. त्यामुळे घरातील बागेची सुरुवात त्याच्यापासून करणे योग्य ठरते. घरातील वातावरण शुद्ध करण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावते.

* मिनिएचर हर्ब स्टॅण्डर्ड टॉपिअरीज् : ही रोपे आकाराने लहानअसतात. लॅव्हेंडर, रोझमेरी आणि सेरिसा ही तीन रोपे या प्रकारात मोडतात. यांना काहीसा अधिक सूर्यप्रकाश लागतो, पण त्यांच्यात सभोवतालचे वातावरण प्रफुल्लित करण्याचे सामर्थ्य असते.

* मॉथ ऑर्किड, नॉव्हेल्टी स्ट्राईप्स : आपल्याला फुलांची आवड असेल आणि प्रत्येक खोलीत बुके ठेवण्याची इच्छा असेल पण तेवढी फुले मिळत नसतील तर घरात विविध ठिकाणी हे रोप लावावे. म्हणजे त्या-त्या ठिकाणी जिवंत बुके ठेवल्याचा आनंद मिळाला

* पोनीटेल पाम : झाडांना नियमित पाणी घालणे जमत नसेल किंवा हे काम सारखे विसरत असेल तर पोनीटेल पामचे रोप घरात लावावे. या रोपाचे खोड बरेच जाड असते आणि या खोडावरच पाने येतात. त्याची फारशी देखभालही करावी लागत नाही.

* ट्रॉपिकल कॉम्बो बोन्साय : या छोटेखानी रोपांचा वापर करून आपण घरातल्या लहानशा कोपर्‍यातही ट्रॉपिकल गार्डन तयारकरू शकतो.

* अमारिलीस, ‘यलो गॉडेस’ : अमारिलीस या रोपाला गॉडेस ऑफ फ्लॉवर्स असे म्हटले जाते. या रोपाला फिकट पिवळ्या रंगाची ट्रंपेटच्या आकाराची फुले येतात. फुलांच्या देठाजवळ हिरवा रंग असतो.

सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे इनडोअर प्लॅन्ट्समुळे घरातील हवेत ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. फुलझाडे असल्यास मंद सुगंध दरवळत राहतो आणि घराची शोभाही वाढते. काही इनडोअर प्लॅन्ट्स कुंड्यांमध्ये तर काही व्हासमध्ये लावली जातात. कुंड्यांमधील झाडांना चांगली फुले येत असल्याने बहुधा हीच झाडे घरात लावली जातात. वरील रोपट्यांखेरीज डिफेनबॅशिया, हेसिथ, बांबूसा, क्रोटॉन, गुलाब, बिगोनिया, ट्युलिप्स, पेलार्गोनियम ही रोपेही लोकप्रिय आहेत. इनडोअर प्लॅन्ट्सची काळजी फारशी घ्यावी लागत नाही पण काही उपाय योजले तर त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते.

जवळ-जवळ सर्वच इनडोअर प्लॅन्ट्स 65 ते 75 अंश फॅरेनहाईट (18 ते 23 अंश सेल्सिअस) या तापमानाला चांगली वाढतात. आपल्याकडे उन्हाळ्यात तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाते. पण इतरवेळी असलेले तापमान या रोपांसाठी चांगले असते. रात्रीचे तापमानही 10 अंश फॅरेनहाईटने कमी असावे. घरातील एखाद्या ठिकाणी थंड किवा उष्ण वारे वाहत असतील तर त्याठिकाणी ही रोपे ठेवू नयेत. बहुतेक इनडोअर प्लॅन्ट्सना हवेत 15 ते 20 टक्क्यांची आद्रता लागते. आद्रता कमी झाल्याचे वाटत असल्यास या रोपांवर पाणी शिंपडावे. इनडोअर प्लॅन्ट्स लावण्यासाठी खाली दोन ते तीन छिद्रे असलेल्या कुंड्यांचा वापर करावा. रोप लावण्यापूर्वी ती कुंडी निर्जंतूक करून घ्यावी. त्यासाठी पाणी आणि क्लोरिन ब्लिच यांचे 10:1 असे प्रमाण असलेले द्रावण तयार करून त्यात ही कुंडी काहीकाळ बुडवावी.वाढ होत असलेल्या रोपांना दोन महिन्यांमधून एकदा खत द्यावे. रासायनिक खतापेक्षा जैविक खताचा वापर केल्यास अधिक चांगले. वाढ पूर्ण झालेल्या रोपांना खत देण्याची गरज नसते. कमी प्रकाशात वाढणार्‍या रोपांना खतही कमी लागते. खताचे प्रमाण अधिक झाल्याचे ओळखण्याची एक पद्धत आहे. रोपाच्या पानांच्या कडा वाळल्या सतील किंव
ा जळल्यासारखे वाटत असेल तर खत अधिक होत आहे असे समजावे. घराच्या पश्चिमेकडील बाजूस ठेवलेल्या रोपांना अधिक सूर्यप्रकाश मिळतो तसेच तेथे तापमानही अधिक असते. रोपाच्या प्रकारानुसार ते कोणत्या दिशेस ठेवावे हे ठरवता येते. कमी तापमानात किंवा कमी सूर्यप्रकाशात ही रोपे घराच्या बाहेर ठेवल्यास त्यांना नवसंजिवनी प्राप्त होते. रोपाला योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळण्यासाठी ते रोज फिरवावे. अशी काळजी घेतल्यास घरातील रोपे ताजी आणि टवटवीत दिसतील आणि त्यामुळे घराच्या प्रसन्नतेत अधिक भर पडेल.

(अद्वैत फिचर्स)

— शिल्पा कुलकर्णी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..