नवीन लेखन...

घरचा वैद्य

कुटुंबव्यवस्था हे भारताचे बलस्थान आहे. आपल्या संस्कृतीमध्ये जे जे काही चांगले, पवित्र, उदात्त आहे ते सर्व स्त्रियांच्या सहभागानेच साध्य झाले आहे. सांस्कृतिक मूल्यांची जोपासना स्त्रियांनीच जास्त प्रमाणात केली. भारतीय स्त्रीकडे पाहिले की अष्टभुजा देवीची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. फक्त फरक एकढाच की देवीच्या हातात शस्त्रे आहेत आणि भारतीय स्त्रीच्या हातात शास्त्रे. कुटुंबातल्या सगळ्या भूमिका ती लीलया पेलते. हे पाहिल्यावर अभिमान वाटतो. स्त्री किंवा महिला म्हटले की, प्रेम, माया, ममता, वात्सल्य, सोशिकपणा हेच आठवते. ब्रह्मदेवाने तिची जडणघडणच तशी केली आहे.

एक काळ असा होता की, स्त्रीचे कार्यक्षेत्र हे घरापुरतेच मर्यादित होते. त्यामुळे येणारे परंपरागत सणवार, कुळधर्म, कुळाचार यातून संस्कृतीचे शिक्षण मिळत असे. त्याचबरोबर कुटुंबाची काळजी कशी घ्यावी हेही घरातील मोठ्यांच्या वागण्यावरून, संस्कारातून शिकायला मिळे. पण आता तसे नाही. आजच्या स्त्रीचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे. ती प्रगत आहे. आता असे एकही क्षेत्र नाही की, तिथे स्त्रियांचा सहभाग नाही. पूर्वी असे मानले जाई की, अमूक एक काम स्त्रीला जमणार नाही, झेपणार नाही. ती गोष्ट तिच्या आवाक्याबाहेरची आहे. पण गेल्या काही वर्षातील स्त्रियांची प्रगती पाहिल्यावर असे लक्षात येते की, तिने या सगळ्या समजुतींना धक्का देत आपले कसब सिद्ध केले आहे. तिची ताकद जबरदस्त आहे. ती शिक्षण घेते, विविध नोकऱ्या करते, पण त्याचबरोबर घरची जबाबदारीही लीलया सांभाळते. मुलांचा अभ्यास, त्यांची जडणघडण, त्यांचे आरोग्य, केवळ मुलांचेच नाही, तर घरातील सगळ्यांचीच काळजी घेताना ती दिसते. अर्थात ती हे सर्व निरपेक्ष वृत्तीने करते. कुठलीही अपेक्षा न ठेवता एक कर्तव्य म्हणून. वर उल्लेख केल्याप्रमाणे ती कुटुंबाची काळजी घेतेच. कुणाला काही दुखले-खुपले तर डॉक्टरांकडे न जाता घरच्या घरीच प्रथमोपचार करते. ही शिकवण तिला घरातील आजीकडून मिळालेली असते. साधे उदाहरण घ्या. भाजी चिरताना वगैरे तिचे बोट कापले तर ती पटकन् त्यावर हळद लावेल. हळदीवरून आठवलं. भारतीय पाककलेत वापरण्यात येणारा प्रत्येक पदार्थ हा औषधी गुणांनी युक्त आहे. याचे ज्ञान पूर्वजांनाही होते. त्यामुळे भारतीय मसाले जेवण चविष्टच नाही, तर आरोग्यदायीही बनवतात. अनेक आजारांवर याचा उपयोग होतो. याचे ज्ञान मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होते. आजीबाईंच्या बटव्यात असे अनेक जादुई पदार्थ असत. आपला मसाल्याचा डबा पाहा. त्यात मोहोरी, हिंग, हळद, धने, जिरे, सुखेनैव नांदत असतात. यातील प्रत्येक पदार्थ औषधी आहे. पोटात कळ येत असेल तर आजी, आई चिमूटभर मोहोरीला थेंबभर चुना चोळून पाण्याबरोबर घ्यायला सांगत. मंत्र घातल्याप्रमाणे दुखणे पळून जाई. पाळीच्या वेळेस कित्येक स्त्रियांना खूप त्रास होतो. पोटात दुखते त्यावेळेस पिकलेल्या केळ्याबरोबर हिंग खायला सांगत. उन्हाळ्याच्या दिवसात धने, जिरे पाण्यात उकळून ते पाणी प्यायला सांगत. जेणेकरून उन्हाळ्याचा त्रास होणार नाही. पोटात थंडावा राहील. हा उपाय लहानथोर सगळ्यांसाठी असे. ताकात जिरेपूड, सैंधव घालून थोडे पातळ ताक करून ते दिले जात असे. त्यामुळे अन्नपचन चांगले होई. असे एक ना अनेक प्राथमिक उपचार केले जात. त्याचबरोबर ती औषधे बरोबर लागू पडतात की नाही हेही बघितले जाई. ज्याला आपण followup म्हणतो.

सर्दी पडशावर तर घरगुती उपचारच चांगले उपयोगी पडतात. डोके दुखत असेल तर सुंठ, सांबरशिंग दुधात उगाळून थोडे कोमट करून त्याचा लेप कपळावर लावत. नाक चोंदले तर झोपताना घरच्या साजुक तुपाचे दोन-तीन थेंब कोमट करून नाकात घालत किंवा ओव्याची पुरचुंडी करून हातावर चोळून ती हुंगायला देत. जेणेकरून नाक मोकळे होई. तसेच टाच्या विकारावरही ओवा उपयोगी पडतो. पोटात थंडी झाली की, काळ्या मिऱ्याचे पाच-सहा दाणे तुपात तळून भातावर घालून खायला देत असे.

पूर्वी परसबागेत तर औषधाचा खजिनाच असे. दूर्वा, तुळस, बेल, गवती चहा, पुदिना वगैरे लावत असत. सर्दी झाली की धने, तुळस, दालचिनी, लवंग, मिरी, बेल, गवती चहा पाण्यात उकळून काढा देत. खोकला झाला की, दूध-हळद दिले जात असे. कोरोना काळातही आपण याचा अनुभव घेतला.

पूर्वी खेडेगावात घरोघरी गायी पाळल्या जात. गाईचे तूप वर्षानुवर्षे साठवले जाई. त्याचा अँटिसेप्टिक म्हणून उपयोग करत. याची जाणीव घरातल्या स्त्रीला असे. कुठे कापले, खरचटले, तर ते तूप लावले जाई.

यावरचा माझा अनुभव असा माझे यजमान स्कूटरचे काम करत होते. ते काम करत असताना अचानक स्क्रू ड्रायव्हर तळहातात घुसला आणि थोडी खोलवर जखम झाली. प्रथमोपचार म्हणून आधी हळद लावली. जसा रक्तस्राव थांबला, तसे जखम स्वच्छ करून त्यात गायीचे जुने तूप भरले आणि त्यावर पट्टी लावली. दोन दिवसांनी पट्टी काढली, तेव्हा लक्षात आले की तिथे जखमेची साधी खूणही नव्हती. असाच आणि एक अनुभव. आमच्या शाळेतल्या एका शिपाई काकांच्या डोक्याला खोक पडली. पाण्याचे स्टीलचे पिंप स्टुलावर होते. काका काही कारणासाठी ते खाली वाकले, पण उठताना त्यांना अंदाज आला नाही आणि पिंपाचा नळ डोक्याला लागून खोक पडली. दोन दिवसांनी डोक्यावर पट्टी पाहून विचारले तेव्हा वरील हकीकत समजली. त्यांनाही तूपाचा उपाय सांगितला. त्यांना तो पटला आणि त्यांनी अमलातही आणला. आश्चर्य म्हणजे दोन-तीन दिवसातच जखम पूर्ण भरली.

मध्यंतरी असे वाचनात आले की, आपले छत्रपती शिवाजी महाराजही प्रत्येक गडावर गाईच्या जुन्या तुपाची साठवण करत. लढाईत मावळ्यांना ज्या जखमा होत, त्यावर उपाय म्हणून ते तूप वापरले जाई.

आजही घरची स्त्री स्वतःचे करिअर सांभाळताना आजीबाईच्या बटव्यातून काही पदार्थ वापरून कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेत असे. Care & Care करत असते.
म्हणजेच नुसती काळजी घेत नाही तर केलेल्या उपचाराचा फायदा होतो की नाही तेही बघते. थोडक्यात आजच्या भाषेत followup ठेवते. ती जरी कामावर असली तरी फोन करून घरच्यांशी संवाद साधून काळजी घेत असते. म्हणतात ना ‘घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी’ अशी आहे आजची स्त्री. नव्या-जुन्याची सांगड घालणारी.
सलाम तिच्या कर्तृत्वाला!

– मंजिरी माधव दांडेकर

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..