‘‘मीच एव्हढा शहाणा कसा’’ ह्या अनघा प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील श्रीकांत बोजेवार ह्यांनी लिहिलेला हा लेख
तात्यासाहेब माझ्यासमोर बसले होते. त्यांची मुद्रा सतत ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान याच आविर्भावात असते, तशीच ती आताही होती. माझ्या मुद्रेवर कायम लोकांचे ऐके ब्रह्मज्ञान’ असे भाव असल्याने मी ज्ञानकण वेचण्याच्या तयारीत होत. तात्यांनी अर्थपूर्ण पॉज घेतला आणि म्हणाले, “आता हेच बघ ना, हळद ही काही हळद नव्हे.” मी चकितच झालो. आपला वाणी गेली अनेक वर्षे आपल्याला हळद नामे जी पिवळ्या रंगाची पूड देतो ती हळदच नव्हे? मी सात्त्विक संपापाने म्हणालो, ‘आता बघतोच त्या वाण्याला. हळदीच्या नावाखाली मला झेंडूच्या फुलांची पूड देतो की काय तो? आणि तात्यासाहेब, तुम्हाला हे माहिती होतं तर मला आधीच नाही का सांगायचं? तात्यांच्या चेहऱ्यावर माझी कीव करणारे भाव आले. “अरे मुढा, वाणी तुला देतो ती हळदच होय. पण ती काही हळद नव्हे.” आता मी अधिकच संतापलो. “म्हणजे तो त्यात काहीतरी मिसळून देतो, भेसळ करतो असे म्हणायचं आहे का तुम्हाला?” आता मात्र तात्यांना माझी कीव करण्याचा सुद्धा कंटाळा आला असावा. “गधड्या, नीट ऐक. आपण वरणात, भाजीत जी हळद घालतो, त्याचा हेतू भाज्यांना चव यावी एवढाच फक्त नसतो. हळद हे औषध आहे, जंतुनाशक आहे. भाजीत आपण हळद घातली नाही तर लाखो जंतू आपल्या पोटात जातील.” माझ्या डोळ्यांसमोर फ्लॅशबॅक सुरू झाला. गॅसवर रटरटत शिजणारी भाजी. त्या भाजीत वळवळत असलेले लाखो जंतू. माझ्या बायकोने तिखटा-मिठाचा डबा बाहेर काढताच त्या जंतुंनी एकच आकांत सुरू केला. बायकोने हळदीच्या डब्यात चमचा खुपसून चमचाभर हळद भाजीत घातली आणि जंतुंनी फटाफट माना टाकल्या. डोळ्यांपुढला फ्लॅशबॅक संपला.
“काय म्हणताय काय तात्या? म्हणजे जेवताना भाजीच्या फोडीला लागलेला मसाला असे आपण ज्याला म्हणतो, ती त्या जंतुंची कलेवरं असतात तर !” “तुला सांगतो, बोट कापलं, जखम झाली, भाजलं, सुजलं, लागलं, खुपलं की चिमूटभर हळद, 99 घ्यावी आणि लावावी. डॉक्टरची गरज नाही. मग आवाज हळू करत म्हणाले, ‘लग्नाच्या आधी वर-वधूंच्या अंगाला हळद का लावतात सांग बरे? ”
“हळदीने त्वचा गोरी होते म्हणून. लग्नानंतर नाही, तर किमान लग्नात तरी चेहऱ्यावर तजेला असावा म्हणून.
“बरं, त्वचा गोरी का बरे होते?’
मी पुन्हा अज्ञानाच्या खोल खोल गुहेत जातो आहे ते माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटले. ही संधी साधून तात्या म्हणाले, “अरे मूर्खा, आपल्या त्वचेवर लाखो जंतुंचा कचरा साठलेला असतो. त्वचेला घट्ट धरुन असलेले हे जंतू, हळद लावली की मरतात आणि पाण्यासोबत वाहून जातात. त्यामुळे त्वचेला तजेला येतो.” मग व्हॉल्यूम कमी करत ते म्हणाले, “लग्नांनंतरच्या रात्री काही जखम वगैरे झालीच तर आधीच हळद लावून ठेवलेली बरी ना. म्हणून लावतात हळद.” असे म्हणत त्यांनी मला कोपराने ढोसले. त्याचा अर्थ न कळून मी म्हणालो, “पण लग्नानंतर जखम का बुवा होईल? ‘
“कशी तुम्हाला दोन दोन मुलं होतात रे, काडीची अक्कल नसताना असे पुटपुटतच तात्या उठले आणि निघून गेले. हळदीचा, अकलेचा आणि मुले होण्याचा काय संबंध आहे ते काही माझ्या लक्षात आले नाही.
घरगुती इलाज सांगण्यचा हा एक भयंकर आजार आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात आढळतो. या आजाराचे वैशिष्ट्य म्हणजे हा आजार आहे हेच अनेकांना माहिती नसते. त्यामुळे त्यावर इलाजही करता येत नाही. काहीही झाले की यांचे औषधोपचार तयारच असतात. जरा कुठे म्हणावे की पोट दुखतेय, की झाले.
‘चिमूटभर ओवा खा, लगेच बरे वाटेल. ‘ घरात ओवा नसतो म्हणून मग कुणाला तरी वाण्याकडे पाठवले जाते. तो चिमूटभर ओवा देत नाही, त्यामुळे मग, पन्नास-शंभर ग्रॅम आणावा लागतो. चिमूट, चिमूट असा चारदा खाऊनही काही फरक पडत नाही, तेव्हा अखेर डॉक्टरकडे जावे लागते. उरलेला ओवा तसाच पडून राहतो किंवा तो संपविण्यासाठी म्हणून रविवारी भजी तळावी लागतात. एकदा तर अशाच एका घरगुती उपाय सूचकाने सर्दीवर हमखास उपाय म्हणून ओव्याच्या विड्या ओढण्याची युक्ती सांगितली. कधी नव्हे ते मला पानठेलेवाल्याचे तोंड पहावे लागते. घाबरत-घाबरत त्याला विड्या मागितल्या. विड्या आणल्यावर बायकोने त्यातला तंबाखू काढून टाकून त्या रिकाम्या केल्या, त्यात ओवा भरला आणि मला गॅसवर विडी पेटवूनही दिली. परंतु झुरका मारला की ओवा खाली सांडू लावला. लादीवर जिकडे-तिकडे ओवा दिसू लागला. घरभर धूर झाला. शेजाऱ्यांना वास जाऊन ठसका भरला. सर्दी मात्र चार दिवसांनी, व्हायची तेव्हाच कमी झाली.
घरगुती इलाज सांगणाऱ्यांना बळी पडायचे नाही, असे मी अनेदा ठरवतो. परंतु सांगणारी माणसे खूप प्रेमाने सांगतात म्हणून त्यांचे मन मोडवत नाही. कधी-कधी सांगणारी माणसे बायकोंच्या माहेरची असतात, म्हणून नाही म्हणायची हिंमत होत नाही तर कधी-कधी घरगुती उपाय सांगणारी बायकोची सुंदर मैत्रीण किंवा ऑफिसातली हवीहवीशी वाटणारी सहकारी असते, म्हणून नाही म्हणवत नाही.
एकदा मी पायरीवरुन घसरुन पडलो आणि पाय दुखावला. जखम वगैरे काही झाली नव्हती. त्यामुळे कुणीतरी म्हणाले की, कशाला डॉक्टरकडे जाता, उगा पाचसातशेचा खड्डा पडेल, त्यापेक्षा तुळशीचा पाला ठेचून बांधा.
मग काय, घरची तुळस दोन दिवसात बोडकी झाली. चार दिवसात तिची सर्वच पाने संपली. मग शेजारची, मग वरच्या मजल्यावरची, असे करता करता आमच्या सोसायटीतील सर्वच तुळशीचे आम्ही पर्णहरण केले. तरी, पायाचे दुखणे काही कमी झाले नाही. अखेर डॉक्टरकडे गेलो. उशीर केल्याबद्दल चार शिव्या खाल्ल्या, तेव्हा कुठे बरे वाटले. ज्या आत्याबाईने तुळशीच्या पाल्याचा जालीम उपाय सांगितला होता तिला हे सगळे सांगितले तर म्हणाली, “कृष्णतुळशीचा पाला पाहिजे होता, तुमच्या सोसायटीत मेल्या सगळ्या हिरव्यागार तुळशी, त्यांचा काही उपयोग नाही. ” ‘तुळशींची झडली पाने आणि ती पाट्यावर वाटणारे म्हणतात हिरवी’ अशी म्हण ‘खाणारा म्हणतो वातड’ च्या चालीवर आमच्या सोसायटीतील बोडक्या तुळशींनी त्या घटनेनंतर केली असेलही कदाचित.
आम्लपित्त झालेली व्यक्ती, अर्थात अॅसिडीटीग्रस्त रुग्ण हे तर अशा घरगुती उपायवाल्यांचे आवडते गि-हाईक. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ च्या चालीवर ‘अॅसिडीटी आवडे सर्वांना’ असे म्हणायलाही माझी हरकत नाही. कुणी जर पोटावरुन हात फिरवताना दिसला, भूक नाही म्हणून सांगू लागला किंवा मळमळतेय म्हणून तक्रार करू लागला की ही माणसे उत्साहाने नुसती उसळायला लागतात.
“त्या अमूक-तमुकला आम्लपित्ताचा बारा वर्ष त्रास होता, कितीतरी डॉक्टर झाले, पण काही उपयोग झाला नाही. त्याला म्हटलं की रोज सकाळी उठल्या उठल्या इंचभर आलं खायचं. आठ दिवसात आम्लपित्त गायब. आता तो काहीही झालं की आधी मला विचारतो.” ही स्टोरी मी अनेकदा अनेकांकडून ऐकली आहे.
एकाने तर माझा चेहरा पाहून मला सांगितले, “बंड्या, तुला आम्लपित्त झाले तरी आहे किंवा होणार तरी आहे.” मी म्हटले, “अजिबात नाही. ” तर तो म्हणाला, “तुझा चेहरा आम्लपित्त व्हायच्या आधी होत असतो तसा झाला आहे आता. आम्लपित्ताचे भविष्य असे चेहऱ्यावर उमटते हे मला माहितीच नव्हते. अपेक्षेप्रमाणे माझा चेहरा पडला, तेव्हा तो मला म्हणाला, “काही घाबरु नकोस, मी आहे ना. खरेतर त्याला कसे टाळता येईल, या विचाराने मी काळजीत पडलो होतो. परंतु त्याला वाटले की मी त्याचा उपाय ऐकायला थांबलो आहे, “हे बघ, असे म्हणत त्याने स्वत:ची दोन बोटे घशात घातली आणि वॅकवॅक करीत ओकारी काढल्याचे आवाज करू लागला. त्याला काय झाले म्हणून पाहायला दोन-चार माणसे थांबली. त्यांना तो म्हणाला, “यांना उपाय सांगतोय आम्लपित्तावरचा.” मग तेही थांबले. थांबले. त्या सगळ्यांच्या साक्षीने आम्लपित्त्या म्हणाला, “बंड्या, अरे पित्त म्हणजे काय, तर आम्लामुळे गॅस धरुन, नासलेलं अन्न असं उलटी करुन ते बाहेर काढून टाकायचं. बास्स.
एकदा पायाला फोड झाला आणि त्याची गाठी आली. ती गाठ फुटावी म्हणून विड्याचे पान गरम करुन लावले गेले. त्याने काही फरक पडला नाही तेव्हा कुणीतरी कंबरमोडीचा पाला आणा, म्हणून सांगितले. कंबरमोडीचे झाड कसे दिसते ते कळावे म्हणून अख्खे गाव आणि विकिपीडिया पालथा घातला, पण झाड काही दिसले नाही आणि दिसलेही असेल तरी कळले नाही.
कावीळ नामक रोगावर तर डॉक्टरकडे जायचे नाव काढले तरी लोक वेड्यात काढतात. या रोगावरचे काहीतरी औषध असते ते फक्त उसाची रसवंती चालविणाऱ्यांकडेच मिळते आणि त्याने फक्त कावीळ बरी होते असे म्हणतात. मी एका ‘मग तू डॉक्टर मित्राकडून याची खातरजमा करुन घ्यावी म्हणून त्याला विचारले तर तो म्हणाला, “माझी कावीळही रसवंतीवाल्याच्या औषधानेच बरी झाली. दवाखाना टाकण्यापेक्षा रसवंतीच का नाही काढत? ‘ असे मी त्याला मनातल्या मनात मोठ्याने म्हणून मोकळा झालो.
अर्धशिशी हे नाव मला फार विचित्र वाटते, ते त्यात दोनदा शी आल्याने. त्यावरचे उपाय तर एकाहून एक अफलातून. मिरे वाटून डोक्याला लेप लावा. लवंगाचे तेल चोळा. कोहळ्याच्या बिया उगाळून लावा… काय वाट्टेल ते. मिरे आणि लवंग या उष्ण प्रकृतीच्या आणि कोहळ्याच्या बिया मात्र शीत प्रकृतीच्या. अशा भिन्न प्रकृतींचा लेप एकाच दुखण्यावर कसा काय सुचवला जातो? अद्याप कोणी संशोधन किंवा पाहणी केलेली नाही; परंतु अर्धशिशी अर्थात अर्धे डोके दुखण्याचा हा विकार साधारणतः बायकांमध्ये दिसून येतो, ही वस्तुस्थिती आहे. बायकांचे अर्धे डोके दुखते, कारण त्यांना अर्धेच डोके असते, असा विनोद मी घरी करतो. परंतु अद्याप तो जाहीरपणे करण्याची हिंमत झालेली नाही, कारण मार बसला तर डोके पूर्णच फुटते, अर्धे फुटत नाही, हे मला माहिती आहे. सासूशी भांडण झाले, स्वयंपाक करायचा कंटाळा आला, नकोसा पाहुणा घरी आला… अशा अनेक प्रसंगांवर अर्धशिशी हा उत्तम उपाय आहे. डोक्याला रुमाल वगैरे गुंडाळून चेहरा पाडून बसले की, झाले ! खरेच डोके दुखते की नाही, हे काही कोणाला तपासून पाहता येत नाही. अशावेळी टाईमपास म्हणून अनेकांकडून घरगुती उपचाराचे सल्ले दिले जातात आणि ते देणारांनाही खरे काय, ते माहिती असते म्हणून मग, जे काय तोंडाला येईल ते सांगितले जाते.
ब्याहाडे, काळे मीठ, शेंदेलोण, ज्येष्ठमध, लेंडी पिंपळी अशा चित्रविचित्र नावांचे पदार्थ मला अशाच घरगुती उपायवाल्यांमुळेच माहिती झाले. मात्र घरगुतीवाल्यांचा खरा धसका मी घेतला तो माझ्या डोळ्याला रांजणवाडी उर्फ मांजोळी झाली तेव्हा मी सुजलेल्या पापणीने आणि जड डोळ्याने वावरत असताना अशाच एका घरगुतीवाल्याने मला धरले आणि विचारले, “तुझ्या घरी किंवा शेजारी लहान मूल आहे का, वर्षा-दीड वर्षाचं? ”
का रे बुवा, तू पोलिओ डोसची एजन्सी वगैरे घेतली की काय? ”
माझ्या डोळ्याकडे पाहत तो म्हणाला, म्हणाला, “लहान मुलाची नुनी असते ना, टोकाला डोळा घास, दोन तासांत रांजणवाडी गायब होईल.” मी त्याला हात जोडले!
– श्रीकांत बोजेवार
‘‘मीच एव्हढा शहाणा कसा’’
अनघा प्रकाशन
Leave a Reply