काहीशा विस्मृतीत गेलेल्या किंवा धावपळीच्या जीवनशैलीत मागे पडलेल्या अनेक पारंपरिक पदार्थांना सणावारांच्या निमित्ताने स्वयंपाकघरात पुन्हा मानाचे स्थान मिळते. घारकुटाचे वडे हे त्यापैकीच.
श्रावणात शनिवारी मारुतीला व शनीला ह्या वड्यांची माळ करून घालण्याची प्रथा आहे. श्रावणी सोमवारी शंकराच्या नैवेद्याला हे वडे व दही आणि घारगे करण्याची पद्धत आहे. काळाच्या ओघात आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात ती खरंच विस्मृतीत गेलेली दिसते.
साहित्य :
तांदूळ, हरभर्याची डाळ, उडीद डाळ, ज्वारी, मेथीचे दाणे, धणे, तीळ, मीठ, तिखट, हळद आणि तळण्यासाठी तेल.
कृती :
तांदूळ, डाळी, मेथी, धणे व ज्वारी सर्व एकत्र करून किंचित जाडसर दळून आणावेत. पुरेसे पीठ परातीत घेऊन त्यात हळद, चवीनुसार तीळ, मीठ, तिखट घालावे व हाताने मिसळून घ्यावे. नंतर त्यावर गरम तेलाचे मोहन घालावे. पुन्हा मिसळून घ्यावे. गरम पाण्यात पुरीच्या पीठाइतपत भिजवून १५ मिनिटे ठेवावे.
नंतर तेल गरम करून पाण्याच्या हाताने पीठ मळून घेऊन वडे थापून मध्ये भोक पाडून तळावेत. नंतर तिखद, मीठ, चाट मसाला घातलेल्या दह्यासोबत किंवा लोण्याबरोबर खाण्यास द्यावेत.
— सौ. निलिमा प्रधान
Leave a Reply