सदाशिव पेठेत माझं बालपण गेलं. रस्त्यावरच घर असल्याने जाता येता रस्त्यावरील माणसांचं निरीक्षण करण्याचा मला त्यावेळी छंदच लागलेला होता. कळायला लागल्यापासून केशव कुलकर्णीला मी पहात होतो. तो रहायचा भारत इतिहास संशोधन मंडळाच्या आवारातील बैठ्या खोलीमध्ये.
मी केशवला तो पंचवीस वर्षाचा असल्यापासून पाहिल्याचं आठवतंय. तो उंचीने पाच फुटांहून कमीच होता, अंडाकृती उभट चेहरा, डोक्यावर शेंडी ठेऊन जिरेकट केलेला, त्याचे डोळे चिनी लोकांप्रमाणे बारीक होते. तुरळक वाढलेली मिशी व दाढी. अंगात खांद्यावर दोन्ही बाजूला पोलीसासारख्या पट्या लावलेला खाकी ढगाळ सदरा व खाकी अर्धी विजार. तो अनेकदा अनवाणीच दिसायचा.
माझे वडील सदाशिव हौदासमोरील काॅर्पोरेशनच्या शाळा क्रमांक पाच मध्ये शिक्षक होते. तेव्हा केशव कुलकर्णी त्यांचा विद्यार्थी होता. केशव हा लहानपणापासूनच मतिमंद होता. त्याने पाचवीला असताना शाळा सोडली आणि तो शेजाऱ्या- पाजाऱ्यांची पडेल ती कामं करु लागला. कधी कुणाला दळण आणून दे, कुणाचं वाणीसामान आणून दे अशी कामं करत त्यानं स्वतःची उपजिवीका चालू ठेवली.
लहानपणी त्याला एकदा रस्त्यावरील पिसाळलेलं कुत्रं चावल्यामुळे, गाडीखान्यात जाऊन पोटात चौदा इंजेक्शन घ्यावी लागली होती. तेव्हापासून त्याने कुत्र्याची धास्ती घेतली होती. कुणी ‘छूऽऽ’ जरी म्हटले तरी तो घाबरून जात असे.
केशवच्या याच कुत्र्याला घाबरण्याला काही टवाळखोर मुलांनी हेरले व त्याला त्रास द्यायला सुरुवात केली. तो रस्त्याने शांतपणे जात असताना शेडगे आळीतील मवाली मुलं त्याच्याजवळ जाऊन ‘छूऽ’ असे ओरडत. ते ऐकून केशव घाबरुन जात असे. जेव्हा त्याला कळून येई की, कुत्रं काही आसपास नाहीये, आपल्याला त्रास देण्यासाठी ही मुलं टपलेली आहेत.
तेव्हा तो रस्त्यावरील दगड उचलून त्यांच्या दिशेने भिरकावयाचा. तोपर्यंत मुलं पसार झालेली असायची. मला हे पाहून वाईट वाटायचं. त्या नतद्रष्ट मुलांना समज देण्याचं तेव्हा माझं वयही नव्हतं. अशावेळी एखादा वयस्कर त्याची समजूत काढायचा व केशव आपल्या हातातील दळणाचा डबा घेऊन गिरणीकडे निघून जायचा.
गरीबाला कुणी वाली नसतं, हेच खरं. वर्षानुवर्षे केशवला त्रास देणारी गुंड मुलं मोठी होऊन ‘बाप’ झाली व त्यांचीच पुढची पिढी केशवच्या खोड्या काढू लागली. केशवला मी ऐंशी ब्याऐंशी सालापर्यंत पहात होतो. त्यानंतर तो काही दिसला नाही. त्याच्या घरी कोण कोण होतं हे देखील मला माहित नव्हतं. कदाचित तो आजारी होऊन गेला असावा…
केशवसारखाच एक अनिल पटवर्धन होऊन गेला. तो रहायचा ब्राह्मण मंगल कार्यालयाजवळ. त्याला एक धाकटा भाऊ आणि आई वडील होते. योगायोगाने तो देखील वडिलांच्या पाच नंबर शाळेतीलच विद्यार्थी.
अनिलच्या घरी अतिशय गरीबी. तो सदाशिव पेठेतील कित्येक कुटुंबांना सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत रामेश्वर डेअरीतील दूध घरपोहोच पुरवायचा. त्या कामात त्याचा धाकटा भाऊ मदत करीत असे. प्रत्येकाची दुधाची किटली वेगवेगळी असायची. एकावेळी तो दोन्ही हातातून दहा दहा किटल्या कसरत करीत घेऊन जायचा. त्या किटल्यांना वाटेत कुणाचा धक्का लागला तर दूध वाया जात असे व त्यामुळे अनिलचे नुकसान हे ठरलेले. त्याला देखील केशव कुलकर्णी प्रमाणेच पेठेतील टवाळखोर मुलं त्रास देत असत. रामेश्वर डेअरी नव्वद साली बंद झाली. त्यामुळे अनिलची रोजीरोटी संपुष्टात आली. नंतर तो मिळेल ते काम करुन गुजराण करु लागला.
दरम्यान त्याचं लग्न होऊन तो एका मुलीचा पिता झाला होता. आम्ही त्याच्या गल्लीतून जाताना तो हमखास मोठ्या आवाजात हाक मारायचा, ‘ओऽ नावडकर, लक्ष कुठंय तुमचं?’ मग त्याच्याशी थोडं बोलून आम्ही पुढे जायचो. आता तर त्याचं वयही झालं होतं. साठी उलटल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. डोक्यावरचे केस अस्ताव्यस्त वाढलेले होते. दाढीची खुंट वाढलेली, एकेकाळी दोन्ही हाताने दुधाच्या जड किटल्या उचलल्याने आता हात व मनगटावरील शीरा फुगलेल्या दिसत होत्या. अंगात चौकटीच्या डिझाईनचा शर्ट व पॅन्टची बाॅटम चार वेळा वरती दुमडलेली दिसायची. पायात स्लीपर असायची.
चार वर्षांपूर्वी मुलीचे लग्न झाल्याचे अनिलने भेटल्यावर वाटेत थांबवून सांगितले. त्याच्या चेहऱ्यावर कर्तव्यपूर्तीचे समाधान दिसत होते. गेल्या वर्षी ब्राह्मण मंगल कार्यालयाजवळून जाताना एका झाडावर लटकविलेल्या ‘भावपूर्ण श्रद्धांजली’च्या बोर्डने लक्ष वेधून घेतले. बोर्डावर अनिलचा हसरा फोटो झळकत होता.
‘कष्टाने छळले होते, मरणाने केली सुटका…’
अनिलच्या संपूर्ण खडतर आयुष्याचं सार या सहा शब्दांतच सामावलेलं आहे…
या दोघांसारखं एकाकी जीवन कुणाच्याही वाट्याला येऊ नये…
महाराष्ट्राचे वाल्मिकी ग. दि. माडगूळकरांनी जे लिहीलेलं आहे ते या दोघांच्याही बाबतीत पटणारं आहे…
घटा घटांचे रुप आगळे,
प्रत्येकाचे ‘दैव’ वेगळे..
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
८-९-२०.
प्रत्येकाचे दैव वेगळे,, अगदी खरे आहे.