नवीन लेखन...

घोडे व्यापाऱ्याची मुलगी (संक्षिप्त रूपांतरीत कथा ८)

“बोल, मंजुळा. काय करायचं ठरवलंयस तू ?”
मोठ्या भावाने पुन्हां विचारले.
त्याला उत्तराची पर्वा नव्हती.
तो सुरक्षित होता.
मंजुळा गप्पच होती.
तिघे भाऊ आणि मंजुळा टेबलाशी बसून बोलत होते.
ते टेबल, आजूबाजूचं महाग फर्निचर, ते मोठं घर हे सगळं त्यांना सोडून जायचं होतं.
दोन दिवसांच्या आत.
सकाळच्या टपालातून आलेल्या नोटीशीनंतर हे नक्की झालं होतं.
त्यांची चर्चा निष्फळ होती.
त्या तिघा भावांना त्यांत स्वारस्य नव्हतं.
ते तिघे बेकार आणि निकामी होते.
बहीण एकटी पडली होती.
ती पंचवीशीची, थोडी बुटकी होती.
तिच्या चेहऱ्यावर थोडी उदासी होती.
तिचे आयुष्य भावांपेक्षा वेगळं होतं.
जर तिने चेहऱ्यावर कठोर भाव बाळगले नसते तर ती सुंदर दिसली असती.
बाहेर घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला.
बाहेरच्या रस्त्यावर रोजच्या सरावासाठी नेले जाणारे घोडे दिसत होते.
ह्यापुढे घोडे त्यांच्या आयुष्यात रहाणार नव्हते.
आपलं आयुष्य आधारहीन होणार म्हणून ते मनातून घाबरलेले होते.
तरी शेवटी ते तिघे तरूण होते, सशक्त होते, देखणे होते.
मोठ्या भावाने एका श्रीमंत मुलीबरोबर जुळवलं होतं आणि तो घरजावई व्हायला उत्सुक होता.

डौलदार घोड्यांकडे पहाताना त्याला आपणही आता पाळलेल्या पशुसारखेच रहाणार याची जाणीव झाली.
पण त्याला ते हवे होते.
दोन नंबरचा भाऊसुध्दा शारिरीक पातळीवर जगणारा प्राणीच होता.
पण दुसऱ्यांवर हुकुमत गाजवणारा प्राणी होता.
आताही त्याचा बहिणीवर हुकुमत गाजवायचा प्रयत्न होता, “तू बेबीताईकडे जाऊन रहा ! तेंच योग्य आहे.”
मंजुळाने त्यालाही उत्तर दिले नाही.
सगळ्यात धाकटा, मंजुळाहून लहान, भाऊ म्हणाला, “मी तिच्या जागी असतो तर नर्सिंगचा कोर्स करायला गेलो असतो.”
मंजुळाने त्याची दखल घेतली नाही.
लहानपणापासून तिला ह्या तीन भावांच्या चिडवण्याची, तिची टर उडवण्याची संवय होती.
तिने नेहमीप्रमाणे तिघांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.
दोन नंबरच्या भावाने विचारले, “बेबीताईचे तुला पत्र आले होते कां ?”
मंजुळा म्हणाली, “हो, गेल्या आठवड्यात”.
भाऊ म्हणाला, “मग ती रहायला बोलावतेय की नाही ?”
मंजुळा म्हणाली, “हवं तर येऊन रहा म्हणतेय.”
तो म्हणाला, “मग जा ना तिच्याकडे.”
मंजुळा गप्पच राहिली.
धाकटा भाऊ म्हणाला, “तिच्याकडे जा नाहीतर दोन दिवसानंतर रस्त्यावर रहावं लागेल तुला.”
तिचा चेहरा अधिक कठोर झाला पण ती शब्दही बोलली नाही.
तीनही भाऊ एव्हाना बाहेर जायला निघाले होते.

धाकटा भाऊ खिडकींतून बाहेर पहात म्हणाला, “डॉक्टर रमाकांत इकडे येतोय बहुदा.”
तोपर्यंत डॉक्टर आतही आला होता.
मोठ्या भावाने विचारले, “इकडे कुठे ?”
डॉक्टर म्हणाला, “सहज इथून जात होतो, वाटलं तुम्हाला भेटून जावं.”
डॉक्टर आवाज जरा बसला होता.
“डॉक्टर , सर्दी झालेली दिसते. आता डॉक्टरलाच सर्दी झाली तर रोगी काय करणार ?”
डॉक्टर हेटाळणीने म्हणाला, “तू रोगी आहेस कां ?”
मोठा भाऊ म्हणाला, “छे! मला कधीच डॉक्टर लागत नाही.”
डॉक्टर म्हणाला, “नाही ना मग उगाच चिंता करू नको.
तुम्ही गाव सोडून जाताहात म्हणून भेटायला आलोय.”
डॉक्टर मध्यम उंचीचा तरूण होता.
त्याची कातडी फिकट होती.
“आम्ही दोन दिवसांत जातोय.”
धाकटा भाऊ म्हणाला.
मंजुळा टेबलावरचं आवरून जाऊ लागली.
डॉक्टर तिच्याशी बोलला नव्हता, तिच्याकडे लक्षही दिले नव्हते.
मोठा आणि धाकटा भाऊ निघून गेले.
जाताना मोठा भाऊ शेपूट दोन पायांत घालून गेलेला वाटला.
मधल्या भावाची व डॉक्टरची मैत्री होती.
मधल्या भावाच्या भविष्याबद्दल ते बोलत असतांना मंजुळा परत बाहेर आली.
डॉक्टरने तिला विचारले, “तू बहिणीकडे रहायला जाणार असशील ना ?”
मंजुळेने डॉक्टरवर डोळे रोखले.
तिची ती स्थिर नजर डॉक्टरला नेहमीच अस्वस्थ करत असे.
“नाही” ती म्हणाली.
“मग काय करणार आहेस, सांग तरी !” मधला भाऊ ओरडला.
पण ती आपले काम करत राहिली.
डॉक्टरने मधल्या भावाला संध्याकाळी जेवणासाठी बाहेर भेटायचे ठरवले व तो तिथून निघाला.

दोघे बाहेर आले मुख्य दरवाजांतून थोड्या अंतरावर दोन्ही बाजूला घोड्यांचे रिकामे पडलेले तबेले दिसत होते.
मंजुळाचे वडील फारसे शिकलेले नव्हते.
पण घोड्यांची त्यांना उत्तम पारख होती.
तेव्हां तबेले भरलेले असत आणि माणसांची भरपूर ये जा असायची.
वाडा नोकरा-चाकरांनी भरलेला होता.
मंजुळाने आईच्या मागे दहा वर्षे घर पाहिलं होतं.
पहिली सात आठ वर्षे तिला ते कठीण गेलं नव्हतं.
कारण भरपूर पैसा हाती असे.
अलिकडे बाबांनी भाग्य परत यावं म्हणून दुसरं लग्न केलं आणि सर्व घालवून बसले.
उलट कर्जही करून ठेवलं.
पूर्वी ती स्वाभिमानाने घर चालवत होती.
आता गेलं वर्षभर वडिल गेल्यापासून नोकर नसलेलं घर ती तीन निकामी भावांसाठी कसंबसं चालवत होती.
तिच्या कुणी मैत्रिणींही नव्हत्या.
बाहेर फारसे येणे जाणेही नव्हते.
चौदाव्या वर्षापर्यंत तिची आई होती.
आईवर तिचं खूप प्रेम होतं.
आईच्या आठवणींवर ती दिवस काढत होती.
वडीलांचीही तिला माया वाटे पण त्यांनी दुसरे लग्न केल्यापासून ती त्यांच्यावर खूप नाराज राहिली.
गरीबीचे दिवस तिने हालांत काढले.
पण तीही इतर भावंडाप्रमाणेच होती.
तिच्यासाठी शेवट जवळ आला होता.
आता ती आईच्या मागे जाणार होती.
आता तिला बाजारात जाऊन स्वस्तातल्या स्वस्त वस्तू शोधाव्या लागणार नव्हत्या.
लोकांची नजर चुकवायला लागणार नव्हती.
तरीही तिने कां सांगावे, ती काय करणार होती.
तो तिचा प्रश्न होता.

दुपारी ती जवळच्या देवळांत गेली. तिथे गर्दी नसे.
तिथे तिला नेहमी बरे वाटे.
ती पूर्वी आईबरोबर तिथे येत असे.
तिने घंटा वाजवली.
आईसारखाच बेल शंकराला वाहिला.
प्रदक्षिणा घातल्या.
शंकर मृत्यूचा, स्मशानवासी देव.
तिथे आल्यावर आईच्या जवळ आल्यासारखे तिला वाटे.
आई करत असे त्या सर्व गोष्टी तिने केल्या.
तिला आई ज्या जगांत गेली त्या जगाबद्दल कुतूहल होते.
डॉक्टरच घर तिथे जवळच होतं.
डॉक्टर गांवाचा नोकर होता, त्याला गांवभर फिरावे लागे.
आता तो कांही रोग्याना बघायला बाहेर पडत होता तोच त्याला देवळाच्या पायऱ्यावर डोकं टेकून उभी रहात असलेली मंजुळा दिसली.
तो चालता चालता गुंग होऊन तिच्याकडे पहातच राहिला.
त्याला ती गूढ आणि दुसऱ्याच जगांतली भासली.
ती वळली आणि त्या दोघांचे डोळे क्षणभर भिडले.
मग डॉक्टरने तिला ओळखल्यासारखे स्मित केले व तो भरभर चालू लागला.
पण त्याच्या मनांत ती गूढ आणि चमत्कारीक नजर घर करून राहिली

दुपारची फेरी चारापर्यंत संपवून तो घरी परत आला आणि तासाभराने संध्याकाळच्या फेरीसाठी बाहेर पडला.
तो टेकडीच्या दिशेने निघाला.
टेकडी चढल्यावर त्याला सर्व गांव दिसत होता.
मंजुळाच्या वडिलांचा वाडा, समोरचे तबेले स्पष्ट दिसत होते.
ते कुटुंब निघून जाणार याचे त्याला वाईट वाटत होते.
मंजुळाच्या भावांशी बोलतांना त्याला त्याच्या नेहमीच्या कामाच्या रगाड्यांतून विरंगुळा मिळायचा.
त्याला कामगारांच्या घरांत जावे लागे.
तो स्वतः सुशिक्षित आणि विचारी होता पण कामगारांचे भावनाप्रधान जीवन जवळून पहाताना त्याला आनंदही वाटे.
उजेड हळू हळू कमी होत असतांना त्या वाड्यांतून एक काळे कपडे परिधान केलेली व्यक्ती बाहेर पडत असलेली त्याला दिसली.
नक्कीच ती मंजुळा असावी.
खात्री करून घेण्यासाठी तो थोडा उतारावर आला.
वाढत्या अंधाराबरोबर ती दिसणार नाही म्हणून नजर न हटवतां ती कुठे जातेय, हे पाहू लागला.
ती तळ्याच्या दिशेने चालली होती.
ती तळ्याच्या कांठावर दोन क्षण उभी राहिली आणि मग तळ्याच्या मध्याकडे जाऊ लागली.
तो स्तब्ध होऊन तिच्या आकृतीकडे पहात होता.
ती बरीच पुढे गेल्याने पाणी तिच्या छातीपर्यत पोंचले होते.
तो स्वत:शीच उद्गारला, “अविश्वसनीय.”
मग तो तळ्याच्या दिशेने धांवत सुटला.

शेतांतून आडवाटेने धावत, धांपा टाकत, तो तळ्याच्या कांठावर पोहोचला व क्षणभर थांबून निरखून पाहू लागला.
त्याला तळ्याच्या मध्यावर काळ्या रंगाचा वेश दिसल्यासारखे वाटले.
मग तो तळ्यात शिरला.
तळ्याच्या घाणेरड्या पाण्याचा स्पर्श, वास त्याला नकोसा वाटत होता.
तरी तो चालत राहिला.
पाणी त्याच्या कंबरेपर्यंत आले होते.
त्याला पाण्यात पडायची भिती वाटत होती.
कारण त्याला पोहता येत नव्हते.
तो दोन्ही हात फिरवून तिचे कपडे हाताला लागावेत म्हणून चांचपडत होता.
क्षणभर कांहीतरी हाताला लागलेसे वाटले पण परत ते निसटले.
त्यांत त्याचाही तोल गेला.
त्याने पाण्यात गटांगळी खाल्ली.
तोल सावरण्यासाठी त्याला कांही क्षण लागले, जे त्याला तेव्हा अनंत भासले.
तो पुन्हा पायांवर उभा राहिला.
त्याचवेळी तिचे शरीर पाण्यावर आलेले त्याला दिसले.
त्याने ते घट्ट पकडले व ओढत किनाऱ्याकडे आणू लागला.
गुडघाभर पाण्यांत आल्यावर त्याने ते उचलले व किनाऱ्यावर आणले.
त्या भयकारी तळ्यातून सुटल्याबद्दल दैवाचे आभार मानले.
ती पूर्ण बेशुध्दावस्थेत होती.
त्याने तिच्या पोटातलं पाणी बाहेर काढून टाकायचे आणि तिला शुध्दीवर आणायचे प्रयत्न सुरू केले.
हळूहळू त्याच्या प्रयत्नांना यश येऊ लागले.
तिचा श्वासोश्वास नीट सुरू झाला.
त्याने तिचा चेहरा पुसला.
आपला कोट तिच्या अंगाभोवती लपेटला व तिला उचलून तो तिच्या वाड्याकडे घेऊन जाऊ लागला.

तिचे वजन त्याला जास्तच जड वाटत होते.
वाड्यापर्यंतचा रस्ता संपेल असेच वाटेना.
शेवटी तो तबेले आणि बाग ह्यामधून वाड्यावर येऊन पोहोचला.
त्याने हांका मारल्या पण घरांत कुणीच नव्हते.
त्याने तिला आंत नेले व स्वयंपाकखोलींत शेगडीजवळ नेऊन ठेवले.
तिचे डोळे आता उघडले होते तरीही ते कांही पहात नव्हते.
तो धावत वर गेला व रग घेऊन खाली आला.
मग त्याने तिचे घाण वास येत असलेले ओले कपडे काढले.
तिला सुक्या टॉवेलने पुसले आणि रगांत गुंडाळले.
बाहेरच्या कपाटांत त्याला व्हिस्कीची बाटली सांपडली.
त्याने स्वतः दोन घोट घेतले आणि व्हिस्की तिच्या घशात ओतली.
तिचा परिणाम तात्काळ दिसूनआला.
तिने आता नीट त्याच्याकडे पाहिले.
जणू कांही त्याच्या तिथल्या अस्तित्वाची तिला प्रथमच जाणीव झाली.
तो म्हणाला, “कसं वाटतय ?”
त्याला आपले ओले घाण वासयेणारे कपडे बदलायचे होते.
तो त्याचा विचार करत होता.
तिने विचारले, “मी काय केले ?”
डॉक्टर म्हणाला, “तू तळ्यात चालत मध्यभागाकडे गेलीस.”
तिच्या नजरेने त्याच्या अंगावर शहारे आले. मग तो भानावर आला.

“मी वेडी झाले होते कां ?” तिने विचारले.
डॉक्टर म्हणाला, “क्षणिक वेडेपणा.”
तिने पुन्हां विचारले, “आतांही माझी बुध्दी थाऱ्यावर नाही कां ?”
डॉक्टरने शांतपणे विचारलं, “तुला काय वाटतं ?”
मग म्हणाला, “नाही. तुझी बुध्दी शाबूत आहे.”
त्याने तिची नजर टाळली.
त्याला तिच्या नजरेने पुन्हा अस्वस्थ केले.
ती त्याच्याकडे रोखून पहात होती.
तो म्हणाला, “मला इथे दुसरे कपडे कुठे मिळतील ? ओले कपडे बदलणं आवश्यक आहे.”
तिने विचारले, “डॉक्टर , तुम्ही माझ्यासाठी तळ्यात उडी मारलीत ?”
डॉक्टर म्हणाला, “नाही. मी चालत आलो, मधे एक गटांगळी मात्र खाल्ली.”
कांही क्षण शांतता पसरली.
त्याला कपडे बदलायला जायचे होते.
पण आणखी एक इच्छा त्याच्या मनांत डोकावत होती.
त्याचा बुध्दीवरचा ताबा गेल्यासारखा वाटत होता.
कपड्यांचा ओलेपणा असूनही त्याला आता जाणवत नव्हता.
तिने विचारले, “तुम्ही असे कां केले ?”
डॉक्टर म्हणाला, “कारण मला तुला असा मूर्खपणा करू द्यायचा नव्हता.”
ती म्हणाली, “तो मूर्खपणा नव्हता. त्यावेळी तेंच करणं योग्य होतं!”
डॉक्टर म्हणाला, “मी येतो कपडे बदलून.”
तो असं म्हणाला तरी तिने जायला हो म्हणेपर्यंत हलायची त्याची हिंम्मत नव्हती.
जणू कांही तिने त्याचा ताबा घेतला होता आणि तो त्यातून सुटू शकत नव्हता किंवा त्याला सुटायचे नव्हते.

अचानक ती उठून बसली.
तिला आपले कपडे नसल्याची, अंगाभोवती रग गुंडाळल्याची जाणीव झाली.
तिला आपले ओले कपडे बाजूला टाकलेले दिसले.
तिने विचारले, “माझे कपडे कुणी काढले ?”
डॉक्टर म्हणाला, “मी काढले तुला शुध्दीवर आणायला.”
ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली.
तिने विचारले, “म्हणजे तुम्ही माझ्यावर प्रेम करतां ?”
तो फक्त उभा राहून तिच्याकडे पहात होता.
ती उठली, आपल्या गुढघ्यांवर उभी राहिली आणि तिने त्याच्या पायांना मिठी मारली.
चेहरा त्याच्या मांड्यांवर घासला.
तिचे स्तन त्याच्या गुढघ्यांवर दाबले गेले.
एका वेगळ्याच लालसेने, विजयी मुद्रेने आणि आत्मविश्वासाने तिने त्याच्याकडे पाहिले.
“तू माझ्यावर प्रेम करतोस, मला माहित आहे, तू माझ्यावर प्रेम करतोस.”
आणि सर्व जग विसरून ती त्याच्या ओल्या कपड्यांतल्या पायांची चुंबने घेत राहिली.
त्याने तिच्याकडे पाहिले, ओले केस, उघडे खांदे.
तो चकीत झाला, गोंधळला आणि घाबरलाही.
त्याने कधी तिच्यावर प्रेम करायचा विचारच केला नव्हता.
त्याने एक माणूस म्हणून तिला वांचवले होते.
तिच्यावर उपचार केले, तेव्हां तो डॉक्टर होता.
त्याच्या मनांत वैयक्तिक पातळीवर कांहीच नव्हतं.
त्याला तिचं मिठी मारणं आवडलं नाही.
हे भयानक होतं.
त्याचं एक मन बंड करत होतं.
पण तिची मिठी तोडून टाकण्याच धैर्यही नव्हतं.

तिने पुन्हा त्याच्याकडे त्याच नजरेने पाहिलं.
त्या नजरेतून येणाऱ्या ज्वालेपुढे त्याला हतबल झाल्यासारखं वाटलं.
ती पुटपुटत होती. “तुझं माझ्यावर प्रेम आहे, तुझं माझ्यावर… “
तिचे हात त्याला आपल्याकडे ओढत होते.
पण त्याने कधीच तिच्याकडे त्या नजरेने पाहिले नव्हते.
अजूनही तो स्वीकारायला तयार नव्हता.
त्याने तिचा उघडा खांदा धरला आणि त्याच्या हातातून वीज गेल्यासारखे त्याला वाटले.
ती वेडी होती कां ?
त्याच्या मनांत आलं.
त्याचे मन तिच्यापुढे हार पत्करायला तयार नव्हतं.पण तिच्या खांद्याचा स्पर्श आव्हानात्मक होता.
तिचा चमकणारा चेहरा सुंदर होता.
तो दरवाजाकडे पहात होता.
ती अचानक शांत झाली.
त्याने तिच्याकडे पाहिले.
त्याला तिच्या डोळ्यात त्याच्याबद्दलचा संशय दिसला.
त्याला तो सहन झाला नाही.
त्याने आपल्या मनाचा हट्ट मोडला.
तिच्याकडे पाहून मंद स्मित केलं.
त्याच्यावरून न हललेले तिचे डोळे हळूहळू पाळण्याने भरून आले व ती रडू लागली.
तोही गुढघ्यांवर बसला.
त्याने तिचा चेहरा आपल्या खांद्यावर ओढून घेतला.
तिचे अश्रू त्याची मान आणि पाठ भिजवत होते.
मधेच त्याला तिच्या ओल्या केसांचा घाणेरडा वास आला आणि त्याचवेळी तिने त्याच्यापासून दूर होऊन त्याच्याकडे पाहिले.
त्याला ती गूढ नजर, त्यातला संशय नको होता.
तो त्या नजरेला घाबरत होता.
काय करावे हे न समजून तो तिची चुंबने घेऊ लागला.
ती त्याच्याकडे लाजून पहात होती.
तिच्या नजरेत त्याला तीच घाबरणारी चमक दिसली पण आता ती नकोशी वाटली नाही कारण तिच्या डोळ्यांतला संशय जास्त दाहक होता.
तिने चांचरत विचारले, “तू प्रेम करतोस माझ्यावर ?”
तो मोठ्या कष्टाने “हो” म्हणाला.
ते खोटे होते म्हणून नव्हे तर ते खरे आहे, हे नव्याने त्याच्या लक्षांत आले होते.
तिने आपला चेहरा वर करून त्याच्याकडे पाहिले आणि त्याने तिचे हलके चुंबन घेतले.
त्याचा तिच्यावर प्रेम करायचा इरादा नव्हता पण आता त्याने मर्यादा ओलांडली होती.
आपल्या अपार प्रेमाची मोहरच जणू त्याने उमटवली.
तिचे डोळे पुन्हां भरून आले.
मग ती त्याच्यापासून दूर झाली.
तो मनांत विचार करत होता, “हेच ते प्रेम कां ?
मी असा भावनांत गुंतलो, हे माझ्या मित्रांना कळलं तर ते हंसतील मला.”
खोलीतल्या अल्प उजेडांत त्याला तिचा उघडा खांदा, उघडा दंड आणि एक स्तनही दिसला.

“तू कां रडतेस आता ?” त्याने तिला विचारले.
त्याची तिच्या दंडावरची पकड घट्ट झाली.
तिला मनांत स्वतःची खूप लाज वाटू लागली होती.
ती म्हणाली, “मी रडत नाही. मी तुझ्यासाठी दुसरे कपडे घेऊन येते.”
पण ती उठली नाही.
“माझे चुंबन घे” त्याला म्हणाली.
त्याने ओझरते चुंबन घेतले.
थोडे रागानेच. मग ती उठली.
आपल्या भोवतालचा रग सांभाळत आता ती त्याच्याकडे घाबरून पहात होती.
ती वर गेली.
त्याला तिचा रग गुंडाळतांना पाहिलेला देह आठवत होता पण तेव्हां त्याने तो फक्त एक डॉक्टर म्हणून पाहिला होता.
आता त्या आठवणी नको होत्या.
तिने वरच्या माळ्यावरून कपडे खाली फेकले व म्हणाली, “कपडे बदल तुझे.”
त्याने कपडे बदलले.
भिंतीवरच्या घड्याळात सहा वाजले होते.
सात वाजता त्याला कामावर हजर व्हायचे होते.
तो खालून म्हणाला, “मला जायला हवं आतां !”
ती लागलीच खाली आली.
तिच्या निळ्या वेशांत ती सुंदर दिसत होती.
त्याला त्या थोड्या ढगळ कपड्यांत पाहून ती हंसली.
“अवतारच वाटतो कां अगदी ?”
ती म्हणाली, “नाही. पण तुला असा पहायला मला आवडत नाहीय.”
तो म्हणाला, “मी निघतो.”
तिने विचारले, “गेलचं पाहिजे कां ?
पुन्हां तिने त्याच संशयित नजरेने त्याच्याकडे पाहिले.
ती पुढे म्हणाली, “आणि माझ्या केसांना येणारा हा घाण वास.
मी भयानक आहे.
तुझ्या प्रेमाच्या लायकीची नाही.”
ती पुन्हा रडू लागली.
त्याने तिला छातीशी धरले.
“मूर्खासारखं नको बोलूस.
मीही तुझ्यावर प्रेम करतो.
आपण लग्न करूया.
लवकरच. जमलं तर उद्याच.”
ती म्हणाली, “मला फार अपराधी वाटतयं.
मी तुझ्यासाठी योग्य नाही.
तू माझ्यावर प्रेम करूच शकत नाहीस.”
डॉक्टरने तिचे चुंबन घेतले,
“असं बोलू नकोस, तू मला हवी आहेस.”
त्याचा आवाज तिला वेगळाच आला, थोडा घाबरवणारा,
ती त्याला नको असण्याच्या भीतीपेक्षाही थोडं जास्तच घाबरवणारा.

— अरविंद खानोलकर.

मूळ कथा – द हॉर्स डीलर्स डॉटर.

मूळ लेखक – डी.एच.लॉरेन्स.(१८८५-१९३०)


डी. एच. लॉरेन्स (१८८५-१९३०) हा त्याकाळी बंडखोर लेखक समजला गेला. औद्योगीकरणामुळे कुटुंबावर होणारे परिणाम, स्त्री नोकरी करू लागली तिच्या स्वातंत्र्याचा प्रश्न, राजकीय अथवा सामाजिक गटबाजी ह्याविरूध्द त्याने खूप लिखाण केले. त्याने १२ कादंबऱ्या, पंधरा लघुकथा संग्रह, त्याहून अधिक कविता संग्रह, तेवढीच नाटके व इतर अनेक विषयांवर विपुल लिखाण केले. त्याकाळी त्याच्या लेखनांत स्त्री-पुरूष संबंधाचा उघड उल्लेख करणारा तो पहिला लेखक होता. त्यामुळे त्याच्या लिखाणावर अश्लिल हा शिक्का मारण्यांत आला. त्याची ‘लेडी चॕटर्लीज लव्हर’ ही कादंबरी त्याचसाठी गाजली. तिच्यावर अनेक वर्षे बंदी होती. त्याच्या लिखाणामुळे त्याला अनेक खटले, बहिष्कार, मानहानी सोसावी लागली. त्याचे सर्व आयुष्य हालांत गेले. त्याच्या मृत्यूनंतर कांही दशकांनी त्याच्या लिखाणाचे योग्य मूल्यमापन झाले व त्याचे नांव झाले.
हॉर्स डीलर्स डॉटर ही जरी लघुकथा असली तरी ती ६५५० शब्दांची आहे. (मी रूपांतर २२४५ शब्दांत केलं आहे). औद्योगीकरणाच्या लाटेत अनेकांचे व्यापार बसले. तसा ह्या कुटुंबप्रमुखाचाही धंदा बसला. नंतर तो मरण पावला. धडधाकट पण कुचकामी तीन मुलगे आणि हिंमत न हरतां कृतीशील रहाणारी मुलगी शेवटी दारिद्र्यांत एकटी पडते, तेव्हां आत्महत्त्येचा निर्णय घेते. योगायोगाने एक तरूण तिला वाचवतो आणि ती त्यालाच जबरदस्तीने प्रेमिक करून त्याचा आधार घेते. तिचे त्याच्यावर प्रेम आहे/होते असा उल्लेखही नाही. स्त्रीची अपरिहार्यता त्यांत अधोरेखित केली आहे. इंटरनेटवर ह्या गोष्टीची अनेक परीक्षणे वाचायला मिळतील. त्यांत “रद्दी” पासून “अत्त्युत्तम” पर्यंतचे सर्व प्रकारचे मूल्यमापन आहे. ही कथा समजायला कठीण आहे. घोडे व्यापा-याशी संबंधित म्हणून अनेक ठीकाणी घोड्यांचा, घोड्यांच्या शरीराचा, हालचालींचे अनेक उल्लेख आणि माणसाचे पशुच्या स्तरावर जगणे ह्याचे उल्लेख आले आहेत. औद्योगीकरणामुळे कुटुंबातील व्यक्तींतला जिव्हाळा संपला आहे, प्रत्येकजण आपल्यापुरता विचार करतो आहे, हे प्राणीसदृश वर्तन दर्शवले आहे. माझ्या रूपांतरीत कथेच्या व्याप्तीत (तरी ती १५००ची मर्यादा सोडून दीडपट झाली आहे) ह्या सर्व गोष्टी तितक्या समर्थपणे दाखवणे कठीण होते. पण मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे व कथा तुम्हांला सादर करत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..