सशक्त अभिनेत्री, अभ्यासू भरतनाटय़म नृत्यांगना ते व्हिएतनाम येथे पार पडलेल्या ‘मिसेस इंडिया वर्ल्डवाईड 2017’ या सौंदर्यवतींच्या स्पर्धेमध्ये टॉप 50मध्ये बाजी मारणारी प्रतिभावान स्पर्धक तर याच स्पर्धेमध्ये ‘मिसेस टॅलेंटेड’ हा बहुमान पटकावणारी सन्मानमूर्ती म्हणजे कल्पिता राणे-सावंत. अभिनय, नृत्य आणि मॉडेलिंग अशा तिहेरी कलांवर अधिराज्य गाजवणारी हुशार कलावती म्हणून कल्पिताची ओळख जगाला आहे. मध्यमवर्गीय घरात जन्मलेली आणि घरी कोणतीही कलेची पार्श्वभूमी नसताना, या क्षेत्रात कोणताही गॉडफादर नसताना कल्पिताने मिळवलेलं हे यश नेहमीच कौतुकास पात्र ठरलं आहे. मात्र तिचा हा प्रवास तितकाच खडतर आणि धैर्याचा होता, हे तिच्याशी बोलताना नेहमीच जाणवतं.
कल्पिता एक उत्तम नृत्यांगना आणि कलासक्त अभिनेत्री तर आहेच, शिवाय ती बोलक्या चेहऱयाची मॉडेलदेखील आहे, हेच हेरून तिचे ‘फोटोंच्या गोष्टी’ या सदरासाठी फोटोशूट करायचं असं मी ठरवलं. सुरुवातीला भरतनाटय़म नृत्यप्रकारात आपला वेगळा ठसा उमटविलेल्या या नृत्यांगनेचा तिच्या नृत्यमुद्रा टिपण्याबाबत तिच्याशी मी बोललो. त्यानुसार तिचं कॉस्च्युम, मेकअप, हेअर हे करण्यात आलं. विजू माने प्रॉडक्शनच्या ‘स्टुडिओ 108’मध्ये तिचं हे फोटोशूट आयोजित करण्यात आलं होतं. भरतनाटय़म हा नृत्यप्रकार आणि म्हणूनच त्यातील भाव, मुद्रा, नृत्य करतानाची ऊर्जा हे सारं काही लाइव्ह शोच्या वेळी नीट टिपता येईल हे माहीत असूनही हे फोटोशूट करण्याचं मी ठरवलं. त्याचं कारण म्हणजे अनेकदा लाइव्ह शोमध्ये छायाचित्रकाराला हवी ती लायटिंग करता येतंच असं नाही. शिवाय यावेळी कलाकार त्याच्या कलेत गुंतलेला असल्याने त्याच्या मुद्रा या कॅमेऱयाच्या अँगलमध्ये नीट बंदिस्त करता येतात असं नाही. शिवाय कलाकाराच्या चेहऱयावर आलेला घाम, थकवा यामुळे ते फोटो फ्रेश वाटतातच असं नाही. या लाइव्ह शोच्या वेळी टिपता येतात ते कॅण्डीड फोटोज. मात्र मला ठरवलेले, पोज केलेले फोटो टिपायचे होते.
सुरुवातीला फ्लॅट लायटिंग (मॉडेलच्या उजव्या आणि डाव्या बाजूला समान तीव्रतेचा प्रकाश टाकून केलं जाणारं छायाचित्रण) करून काही फोटो मी टिपले. यानंतर कल्पिताच्या विविध भावमुद्रा त्याच कल्पकतेने टिपण्यासाठी मी ड्रमॅटिक लायटिंग केली. ही लायटिंग करत असताना कधी प्रकाशाचा एक स्रोत तर कधी प्रकाशाचे दोन स्रोत वापरून तिच्या विविध नृत्यछटा, भावमुद्रा मी कॅमेराबद्ध करण्याचा प्रयत्न करत होतो. कल्पिताची प्रचंड ऊर्जा, तिचा भरतनाटय़मचा अभ्यास आणि याच्या जोडीला तिच्यात लपलेली सशक्त अभिनेत्री आणि मॉडेल या साऱयाचा उपयोग मला फोटोशूटसाठी झाला. साधारणपणे दोन अडीच तास हे शूट चाललं.
कल्पिताने गेली अनेक वर्षे नृत्यक्षेत्रात आपला वेगळा दबदबा निर्माण केला आहे. अभिनय आणि मॉडेलिंग या क्षेत्रातही तिचं नाव अदबीने घेतलं जातं. इयत्ता तिसरीत असताना कल्पिताला अभिनयाची गोडी लागली. पृथ्वी थिएटरमधून अभिनयाचे प्राथमिक धडे तिने गिरवले. इथे तिची ओळख प्रेमा साखरदांडे यांच्याशी झाली आणि त्यांनी तिला सुलभाताई देशपांडे यांच्या ‘आविष्कार’ चंद्रशाळेत जाण्यासाठी सांगितलं. याच चंद्रशाळेत कल्पितावर अभिनयाचे संस्कार झाले. पुढे या संस्थेतर्फे ‘दुर्गा झाली गौरी’ या नृत्यनाटिकेतून काम करण्याची संधी तिला मिळाली. पुढे तिची निवड ‘झाशीच्या राणी’ या मालिकेसाठी करण्यात आली. या मालिकेत तिने झाशीच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. तर यानंतर ‘हुंकार’, ‘मांगल्याचे लेणे’, ‘शंभूराजे’, ‘हे माझे नव्हे’ अशा अनेक व्यावसायिक नाटकांत आपल्या अभिनयाने रसिक मन जिंकलं.
भारतीय विद्या भवनमधील गुरू विद्या राव यांच्याकडे भरतनाटय़मच कल्पिताने प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. तर सीसीआरटी स्कॉलरशिप मिळाल्याने पुढे गुरू तेजस्विनी लेले आणि गुरू दीपक मुझुमदार यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवण्याची संधी तिला मिळाली. भरतनाटय़म विशारद आणि दहावीची परीक्षा असं दोन्ही एकाच वेळी उत्तीर्ण होत पुढे नालंदा डान्स रिसोर्स सेंटर तिने नृत्याचं पुढील शिक्षण घेतलं. तर सध्या ती डॉ. अलका लाजमी यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवत आहे. आपल्याकडे असलेल्या नृत्य अभ्यासाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने कल्पिताने कल्पांगण सांस्कृतिक केंद्राची स्थापना 2001 साली केली आणि यंदा ही संस्था 18व्या वर्षात पदार्पण करत आहे हे विशेष. या संस्थेत आजवर 700 विद्यार्थ्यांनी विविध कलांचे धडे घेतले असून सध्या 90 विद्यार्थी इथे शिकत आहेत.
अभिनय आणि नृत्य या दोहोंची सांगड घालत असतानाच कल्पिताला मॉडेलिंग क्षेत्रानं खुणावलं. मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या कल्पिताच्या घरी अभिनय, नृत्य आणि मॉडेलिंग यापैकी कसलीच पार्श्वभूमी नाही. एकत्रित कुटुंब पद्धतीचं तिचं माहेर. वडील एका कंपनीत नोकरीत रुजू तर आई गृहिणी. तिच्या लहानपणी अभिनय आणि नृत्य याला घरातून विरोध झालाही, परंतु कल्पिताच्या जिद्दीपुढे तो फार टिकला नाही. तर लग्नानंतर मॉडेलिंग क्षेत्रात उतरण्यास उलट तिच्या नवऱयाने प्रोत्साहन दिल्याचे ती सांगते. ‘मिसेस इंडिया वर्ल्डवाईड 2017’ या सौंदर्यवतींच्या स्पर्धेत सहभागी झालेली कल्पिता 600 स्पर्धकांतून सर्वोत्कृष्ट 150 तर शेवटी टॉप 50च्या यादीत झळकली. व्हिएतनामला पार पडलेल्या विश्वविजेती या स्पर्धेसाठी हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणाऱया कल्पिताला यावेळी ‘मिसेस टॅलेंटेड’ हा किताब देऊन गौरवण्यात आले. घरच्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच हे यश मिळवता आल्याचं ती सांगते. अभिनय, नृत्य आणि मॉडेलिंग या तिघांवर एकत्रित स्वार होणाऱया कल्पिताने आपला आदर्श नव्या पिढीसमोर घालून दिला आहे.
धनेश पाटील
dhanauimages@gmail.com
Leave a Reply