आला आषाढ श्रावण
आल्या पावसाच्या सरी,
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋूतू तरी
काळ्या ढेकाळांच्या गेला
गंध भरुन कळ्यात
काळ्या डांबरी रस्त्याचा
झाला निर्मळ निवांत
कविवर्य बा.सी.मर्ढेकरांनी श्रावणाचे केलेले हे वर्णन प्रत्येक वर्षी श्रावण आला आठवत राहते. श्रावणाचे हे मोहक रुप कथा कादंबऱ्या, कवितांमधून वाचताना होणारा आनंद कुठे हिरावलाय कोण जाणे? श्रावण सरी कुठे लोप पावल्या? उन पावसाचा खेळ, पारिजाकाचा मंद सुगंध, रानातल्या हिरव्यागार पिकांमधून वाहणारा मंद वारा त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आनंद यांची जागा न बरसणाऱ्या आषाढातल्या काळ्याकुट्ट ढगांनी घेतली. पाण्याअभावी भेगाळलेल्या भुईच्या रेषा शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दुष्काळ बनून उमटल्या त्याला आता चार वर्ष सरत आली. कृषी संस्कृतीतल्या गावगाड्याला चैतन्य देणारा श्रावण. मृगात पाऊसाच्या मुहूर्तावर पेरण्या झालेल्या. आषाढतल्या पावसाने पिके तरारलेली. श्रावण येईपर्यंत रानातली कामे संपलेली. जरा निवांतपणा आलेला गावगाडा श्रावणाचा आनंद घेतोय हे चित्रच दुष्काळाने हिरावून घेतलेय.
कवी इंद्रजित भालेराव म्हणतात
आला आषाढ श्रावण
गाई बांधल्या घरात
नाही सांजच्याला पीठ
माया फिरते घोरात
झाली फजिती तरीही
यावा आषाढ श्रावण
जातो पळून दुष्काळ
दहा तोंडाचा रावण.
ही कविता लिहताना कवीच्या मनात संदर्भ कदाचित वेगळे असतील आजच्या संदर्भात ही कविता दुष्काळानं श्रावणाचीही कधी घुसमट केलीय हेच सांगते. श्रावण सुरु होताच गावा गावात मंदिराच्या पारावर पोथ्या पुराणाचे पाठ सुरु होतात. कुठे हरिविजय तर कुठे शिवलिलांमृत वाचले जाते. शेतकरी आध्यात्मिक होतो. त्याची धरणीमाता अन्नब्रम्हाच्या पुजेस बसते. श्रावणात शेतकऱ्यानी तीची ओटी भरलेली असल्याने भाद्रपदात गरोदरा होते आणि अश्विनात पिक देते. त्यासाठी मृग आणि आषाढानं आधी तिला पाणी पाजून तिची कूस गर्भधारणेसाठी तयार करावी लागते. आषाढ रुसल्याने सध्या मात्र उन्हाने कडक झालेली जमिनीचीकूस उगवणार नाही. कारण तिला न्हाती धुती करायला श्रावणापर्यंतही पाऊस आलेला नाही.
श्रावण जसा सर्जनशिलतेचे प्रतिक तसेच कृषी संस्कृतीेचे महत्व सांगणारा महिनाही आहे. बोली भाषेतला एक शब्द आहे इर्जिक. त्याचा अर्थ शेतकऱ्याच्या घरचे गोड जेवण. शेतकऱ्यांना अन्नदाता म्हटले आहेच. भुकेल्यांच्या पोटी अन्न घालण्यासाठी पावसाचे चार महिने शेतकरी राबराब राबत असतो. थोडा निवांतपणा त्याला मिळतो तो श्रावणातच. एकमेकांना मदत करत शेतीची कामे करणे, लोकांच्या तोंडी गोड घास घालत अयल्याने कृषी संस्कृतीत शेतकऱ्याला प्रतिष्ठ होती. त्याला स्वाभिमान होता. परिस्थितीने स्वाभिमान हिरावल्यांनतर शेतकरी खंगला, हारला आणि त्याने मृत्यूला जवळ करणे सुरु केले.
बैलाची पाठ भिजवायला
पोळ्याच्या दिवशी पाऊस येतो
सुताची गाठ भिजवायला
पोळ्याच्या दिवशी पाऊस येतो.
देवळाचा कळस भिजवायला
पोळ्याच्या दिवशी पाऊस येतो
जुवातला पळस भिजवायला
पोळ्याच्या दिवशी पाऊस येतो.
श्रावण आणि गावगाड्यातल्या सणवारांची ही घट्ट विण उसवली तीही दुष्काळानं. शेतकऱ्यासाठी सर्वात मोठा असलेला हा सण त्या दिवशी बैलांची खांदे मळणी करण्यासाठीही खेड्यापाड्यात पाणी मिळत नाही ही आजची परिस्थीती. वाहनांसाठींच्या वॉशिंग सेंटरवर नेऊन बैलांना आंघोळ घालावी लागते. याच दरम्यान नागपंचमी येते.
श्रावणसडा, माहेरी धाडा
दाटली हुरहूर डोळ्यात
बाईचे हे बाईपण
जणू भोगतो श्रावण
एका अनामिक कवीची ही कविता पंचमीच्या सणासाठी माहेरच्या वाटेवर डोळे लावून बसलेल्या सासुरवाशीनीची आंतररिक हुरहूर व्यक्त करतात. इकडे पंचमीजवळ येताच तिच्या वडील आणि भावाच्या मनात भिती दाटते. पोरीला चोळीबांगडी करायलाही पैसा हातात नसतो. श्रावणात तिला माहेरी आणायचे तरी कसे याची खंत त्याला असते. श्रावणातही कोरड्या भकास शेताकडे पहात त्याला लहानी पोर उजवण्याची चिंता लागलेली असते. एक दशक झालं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा चेहऱ्यावरचा आनंद दुष्काळानं हिरावल्यानं श्रावणाची ही घुसमट सुरुच आहे. पुढची दहा वर्ष ही घुसमट सुरुच राहणार आहे. हवामानं तसा डाव साधला आहे. मर्ढेकरांच्या शब्दात सांगायचे तर
ओशाळला येथे यम,
वीज ओशळली थोडी,
धावणाऱ्या क्षणालाही
आली ओलसर गोडी.
ही गोडी सध्या क्वचीत पडणाऱ्या सरींची आहे. यावर्षीच्या श्रावणानं तरी पावसाचं भरभरुन दान द्यावं आणि गावगाड्याचं रुतलेलं चाक पुन्हा फिरु लागावं इतकीच अपेक्षा.
Leave a Reply